कळतंय पण वळत नाही

मध्यंतरी मी पुण्याला गेले असताना माझी बालमैत्रीण अंजू हिच्या घरी गेले होते. आम्हाला दोघींना एका कार्यक्रमाला बरोबर जायचं होतं. मी तिच्या दारावरची बेल वाजवली तर तिच्या सासूबाईंनी दार उघडलं. हसतमुख चेहरा, नीटनेटकी राहणी, बोलका स्वभाव ह्या सगळ्यामुळे त्या नेहमीच मला खूप आवडायच्या. वय वर्ष साधारण ८५, पण सतत  काहीतरी करत राहणे, ह्या वयातही जमेल तितक्या नव्या गोष्टी शिकणे असं त्यांचं चालू असायचं. अंजू तयार होईपर्यंत त्यांच्याशी छान गप्पा रंगल्या. मी म्हटलं, मावशी, मी इतकी वर्षं तुम्हाला बघते आहे, तुमच्या फिटनेसचं रहस्य तरी सांगा.

तसं त्या मनमोकळ्या हसल्या, आणि म्हणाल्या अग, कसला आलाय फिटनेस आणि बीटनेस. आमच्या वेळी तर हा शब्दही कधी ऐकला नव्हता. पण आता मात्र मुला, नातवंडांच्या तोंडून सारखा ऐकते हो. मग त्या एक एक गंमती सांगू लागल्या. पूर्वी एकत्र, मोठ्ठं कुटुंब असायचं. अर्थातच घरातल्या बाईला भरपूर काम असायचं. विकतचं खूप मिळत नव्हतं आणि आणायची पद्धत पण नव्हती. मग स्वयंपाक पाणी, नाश्ता, दुपारच्या वेळचं खाणं सगळं ताजं करायचो. त्यातच भरपूर व्यायाम व्हायचा, आणि  छान भूक लागायची. दुसरं त्या म्हणाल्या ते मला खूपच महत्वाचं वाटलं. की, कुठलीही गोष्ट मनाला लावून घ्यायची नाही, आणि कशाचाही जास्त विचार करायचा नाही. आपलं कर्तव्य आपण उत्तम पार पाडायचं आणि बाकी सगळं भगवंता वर सोडून द्यायचं. किती छान बोलत होत्या मावशी. तेवढ्यात अंजू तयार होऊन आली, आणि आम्ही कार्यक्रमा करता निघालो. पण त्यांचे ते विचार माझ्या मनात रेंगाळत राहिले.

मध्यंतरी आम्ही दासबोधामधे पण हे वाचलं की, आपण संसारी लोकं असलो तरी मोह, माया, मत्सर, अहंकार ह्या पासून दूर राहण्याचा प्रयत्न करायचा. अर्थात आपल्या सारख्या सामान्य लोकांचीकळतं पण वळत नाहीअशी गत असते.

 सध्या तब्येती बद्दल लोकं जागरूक झालेत, ही खूप चांगली गोष्ट आहे. वार्षिक  शारीरिक चाचण्या करणे, आपले वजन, बीपी, शुगर आटोक्यात ठेवणे हे गरजेचे आहे. हल्ली ह्या चाचण्या तरुण वर्ग ही आवर्जून करतो. कारण तणावा मुळे, आणि बदलत्या जीवनशैली मुळे काही  आजार  तरुण  वयातच होऊ लागले आहेत. पण बरेचदा फिटनेस च्या नावाखाली  टोकाला जाऊन खाण्यापिण्यात बदल करणे, शरीराला त्रास होईल इतका व्यायाम करणे, हे  तितके योग्य वाटत नाही. त्यानी आनंद मिळण्यापेक्षा शरीराला शिक्षा केल्यासारखे होते. त्याचा शरीरावर वाईट परिणाम तर होतोच, आणि  चेहरा सुद्धा ओढल्या सारखा दिसतो.   आपलं natural metabolism पण बिघडतं. बारीक होण्याकरता वेगवेगळे diets करणे, सतत त्यात बदल करणे योग्य नाही.
माझ्या सासऱ्यांची तब्येत जात्याच खूप चांगली होती, ते नेहमी आनंदी आणि  स्ट्रेस फ्री असायचे. सगळ्यांशी हसुन खेळून गप्पा मारणे, जोरात मोकळे हसणे हा त्यांचा स्वभाव होता. अर्थातच आमच्या सर्व नातेवाईक आणि मित्र मंडळींमधे ते खूप लोकप्रिय होते. फिरायला जाणे, योगा करणे वगैरे ते नियमित करत. पण ते सतत आम्हाला शिकवायचे, की ज्यानी शरीराला मनाला आनंद मिळेल असा व्यायाम कराएखादे  दिवशी काही नाही केले तरी चालेल. पण मन आनंदी, तणाव रहित कसे राहील, ह्या कडे जास्त लक्ष पुरवा. ते प्रत्येक लहान गोष्ट खूप आरामात आणि मन लावून करायचे. उदा, बागकाम असो, ऑफीस चे काम  किंवा जेवण. त्यात उगीच घाई, गडबड केलेली त्यांना खपत नसे. जेवण अंगी लागले पाहीजे, प्रत्येक पदार्थाची चव घेऊन, आरामात जेवले पाहीजे. हा साधा पण किती बहुमोल सल्ला आहे, असे आता वाटते. आपल्या जेवणा मधे तिखट, आंबट, कडू, गोड, खारट असे सर्व रस असावेत. नीट चावून आणि शांतपणे जेवले, तर कमी जेवून सुद्धा पोट भरते. कारण पोट भरल्याचा संदेश २० मिनिटांनी मेंदू कडे पोचतो.

सध्या माणसा कडे सगळं आहे, फक्त स्वतः ला द्यायला वेळ नाहीये हे पाहून वाईट वाटतं. कारण आपण आयुष्य भर चांगलं करिअर, पैसा कमावणे ह्या मागे इतके धावत सुटतो, की स्वतः करता, कुटुंबा करता वेळच उरत नाही. आत्ताच्या तरुण पिढीला तर शांतपणे बसून दोन घास खायला आणि मिळवलेल्या पैशाचा उपभोग घ्यायला पण वेळ मिळत नाही. माणूस एखाद्या मशीन सारखे बिना तक्रार करता तासनतास काम करतो, आणि ह्याला आता पर्याय पण उरला नाहीये, ह्याची खंत वाटते. कारण जगात तुम्ही कुठेही रहा, तरुण पिढीला खूप तास काम करावंच लागतं. पूर्वी साधनं कमी असूनही आयुष्य जास्ती संपन्न होतं. कारण थोडक्यात समाधान होतं. आणि मनाला एक प्रकारचा निवांतपणा होता.

आपली तब्येत बरी नसली, तर शरीर आपल्याला तसे संदेश देत असतं. पण आपण त्या कडे दुर्लक्ष करतो  किंवा ताबडतोब एखादे antibiotic घेऊन आपण त्या दुखण्यालाच तात्पुरते चेपून टाकतो जे योग्य नाही. शरीरा मधे छोट्या, मोठ्या आजारांशी लढायची नैसर्गिक शक्ती असते. पण त्याला थोडा वेळ द्यावा लागतो, जो आता आपल्याकडे नसतो.

फिटनेस म्हणजे नुसतं वजन उंचीच्या तक्त्यात अडकून बसू नये. कारण प्रत्येकाची अंगकाठी, शारीरिक ठेवण ही  वेगळी असते. कधी कधी कमी किंवा थोडं  जास्ती वजन असलेले लोकं सुद्धा अतिशय फिट असतात. मुख्य म्हणजे आपला stamina चांगला हवा. वरचेवर आजारी पडायला नको. बऱ्याच आजारांना psychosomatic असे म्हणतात. म्हणजे हे आजार मनातून शरीरात जातात. म्हणूनच फ़क़्त शरीरा करता व्यायाम करणे पुरेसे नाही. मन पण तितकच सुदृढ आहे ना, हे बघणं गरजेचं आहे. जिमला जाणं, योग्य आहार घेणं, फिरायला जाणं ह्याच्या जोडीने दिवसात दोन, चारदा खळखळून हसणं, आपल्या आवडीच्या गोष्टींकरता वेळ काढणं, एखादा छंद जोपसणं पण खूप महत्वाचं आहे.

ऋतुगंधनी दिलेला हा विषय खूपच छान आहे त्यावर कितीही लिहिलं तरी कमी आहे. पण आपणही सगळे शारीरिक आणि मानसिक रित्या फिट राहण्याचा प्रयत्न करूया. आणि आपल्याला  मिळालेलं हे बहुमूल्य जीवन आनंदानी घालवुया.  


                                                                                                                                   - मेघना असेरकर



1 टिप्पणी: