युरोपच्या ऐतिहासिक जमिनीवरील माझे सोनेरी क्षण

मी पाहिलेला युरोप आणि इतरांनी ह्या पूर्वी पाहिलेला युरोप, काही खूप वेगळा असेल असे अजिबात नाही. खरे म्हणजे आपण सर्व कायमस्वरूपी प्रवासीच आहोत. नाही का? जीवनरूपी ह्या प्रवासात आपण सर्व जे काही टिपतो, अनुभवतो हेच तर महत्वाचे असते. म्हणूनच प्रवासवर्णनात गंतव्य किंवा दोन स्थळातील अंतर महत्त्वाचे नसून प्रवासात अनुभवलेल्या क्षणांचे महत्त्व अधिक असते. पुन्हा ज्याची त्याची एखाद्या प्रसंगाकडे वा घटनेकडे पाहण्याची दृष्टीही वेगवेगळी असते. काही लोक अवतीभवतीच्या निसर्गात, कुठल्या प्रसंगात, घालवलेल्या क्षणांत बरेच काही टिपतात आणि रसिकपणे, चोखंदळ प्रकारे त्या सगळ्यांचा आस्वाद घेतात तर काही निर्विकारपणे कोरडे राहून अलिप्तपणे तो क्षण वा अवघे जीवन घालवतात. आणि ह्या अनुभवांच्या वेगळेपणामुळेच तर प्रवासवर्णने दरवेळी वाचकास वेगळी भासतात. म्हणूनच नुकत्याच घडून आलेल्या माझ्या युरोप प्रवासाच्या आठवणी मनात ताज्यातवान्या असताना मी माझ्या प्रवासात अनुभवलेल्या क्षणांना, त्यातून गवसलेल्या आनंदाला, तसेच सोबत अनुभवलेल्या अडचणींना, कागदावर टिपण्याचे ठरवले.

आचार्य अत्रे म्हणतात "केल्याने देशाटन मनुष्यास येई शहाणपण". मराठी भाषिकांमध्ये खूप लोकप्रिय अश्या ह्या म्हणीला ऐकून असल्याने जगाचा प्रवास करण्याची संधी मिळावी असे नेहमीच मनात होते. तरीही पुस्तके मनुष्यास जागेवरून वितभरही न हलवता कसे अवघ्या जगाची प्रदक्षिणा घडवू शकतात, हे मी माझ्या वाचनाने जाणले.

कित्येक जगप्रसिद्ध ऐतिहासिक गाजलेल्या घटनांना ऐकून असल्याने त्या रोमांचकारी युरोपच्या जमिनीचे कल्पनेतील चित्र आणि त्याचा ठसा मनावर कायम होता. त्या मंतरलेल्या वास्तूंची भेट घेण्याचा मानस मनात ठेवून मी माझा युरोप प्रवास आखण्याचे ठरवले. आजच्या युगात प्रवास आखणे फार सोपे झाले आहे. इंटरनेट वरील travel sites वरून तुमचा सगळा प्रवास विनासायास आरामशीरपणे आखण्याची जबाबदारी घेणारे आयोजक सर्वच आखतात आणि खरेच धकाधकीच्या ह्या चाकोरीबद्ध आयुष्यात असल्या आखीव रेखीव प्रवासाचे आकर्षण न वाटले तर नवलच! मात्र असल्या पद्धतीने प्रवास करून आल्यावर लिहिलेली प्रवासवर्णने बहुतांश वेळी 'तोच तोच पणा' घेऊन येतात.

असो. नुकत्याच लोकप्रिय होत असलेल्या airbnb ह्या site वरून तुम्ही जात असाल त्या देशातील लोकांची घरे भाड्याने राहण्यास मिळतात असे समजल्यावर आम्ही तो अनुभव घेण्याचे ठरवले. हॉटेलमध्ये न राहता, असल्या अपार्टमेंटमध्ये राहणे हे आमच्या सारख्या शाकाहारी कुटुंबाकरिता खरोखरीच उपयोगी पडले. अपार्टमेंटमध्ये असणारी स्वयंपाक घरे, स्वयंपाकास लागणाऱ्या भांड्यांपासून इतर अनेक सोयींनी सुसज्ज असतात. अर्थातच त्याकरिता गृहिणीची फिरून थकून आल्यावर, स्वयंपाक करण्याची मानसिक तयारी आणि त्याच सोबत स्वयंपाकास लागणारा बाजारहाट करायची तयारी असली तरच ह्या सेवेचा फायदा! :) सुमारे १३ वर्षांपूर्वी पॅरिसच्या आयफेल टॉवरला गेले असताना मी हे अनुभवले की उपाशीपोटी “पॅरिस मधली इविनिंग”सुद्धा तितकीशी "रंगीत" वाटत नाही, त्यामुळे माझ्या अनुभवावरून मी "भूखे पेट भजन नाही होता" ह्या हिंदी म्हणीला प्रत्यक्ष अनुभवल्याने यावेळी हा airbnb विकल्प मला फारच आवडला. ह्या अपार्टमेंट सोबत सायकल्स पण पार्क केलेल्या होत्या. अख्या युरोपमधले सायकलप्रेम पाहून आपणासही सायकलवर फेरी मारण्याची अनिवार इच्छा होतेच. मी तरी माझा मोह आवरू शकले नाही. दुतर्फा सुरेख रंगीबेरंगी फुलांपानांमधून त्या कॉंन्क्रीटच्या गुळगुळीत वाटांवरून, दुचाकीची माझी फेरी मी मनसोक्त अनुभवली. आम्हां मुंबईकरांना धो धो पावसाने तुडुंब भरलेल्या किंवा दुपदरी रस्त्यांकरिता म्हणून सतत खणल्या जाणाऱ्या रस्त्यांची आठवण मनात आजही आहे. 'जहां जहां खुदा हैं, वहा वहा खुदाई हैं और जहां जहां नही खुदा वहा कल खुदेगा" ही विनोदी म्हण त्या रस्त्यांकरिता योग्य आहे. आणि म्हणूनच येथील 'नो ट्राफिक जाम' वाल्या रस्त्यांवरून फेरी मारणे मनास फार हवेहवेसे वाटले.

माझ्या युरोप प्रवासात माझ्या लक्षात आले की युरोप त्याच्या भिन्नतेमुळे विविध वयोगटातील तसेच विविध आवडीनिवडीच्या प्रवाश्यांना भुरळ पाडण्यास सक्षम आहे. काही प्रवासी व्हेनिस, फ्लोरेंस सारख्या शहरांना प्राधान्य देतात तर काही ऐतिहासिक महत्त्व असणाऱ्या रोमसारख्या शहराला भेट देतात. बहुतांश लोकांना इतिहास हा एक रुक्ष विषय वाटतो आणि म्हणूनच बरेच लोक स्मारक, किल्ले वगैरे पाहणे टाळतात. पण माझे व्यक्तिगत मत ह्याबाबतीत जरा वेगळे आहे. इतिहास हा वरकरणी रुक्ष वाटत असला तरी खोलात शिरून पाहिल्यास त्यातील रसाळपण आपणास नक्कीच जाणवते. रोम आणि व्हॅटिकन सिटी ही शहरे संगीत, कला आणि दुर्लभ अश्या बांधकामामुळे मला खूपच आवडली. वैभवसंपन्नता आणि त्याचसोबत क्रूरता पाहिलेला रोम; कित्येकदा भंगलेला, क्षतिग्रस्त झालेला आणि कित्येकदा पुनर्वसित झालेला रोम! रोमन साम्राज्यातून उदयास आलेली म्हण 'Rome was not built in a day' आपणा सर्वांच्या लक्षात असेल. रोममधील प्रत्येक पायवाट आम्हास एखाद्या स्मारकासमोर आणून सोडत होती. येथे सांगावेसे वाटते की बऱ्याचदा टुरिस्ट बसमधून बरेच काही टिपणे शक्य होत नाही म्हणून मी पाय सुजेपर्यंत रोमच्या त्या cobblestone रस्त्यांवरून हिंडत कित्येक ५०० ते ७०० BC च्या इमारती पहिल्या. त्या इमारतींवर उभे केलेले दगडी पुतळे आणि त्यांच्या चेहऱ्यावरील भयाक्रांत भाव आणि मुद्रा यांनी आम्हास यातना पाहिलेल्या रोमचे दर्शन घडविले. द्वितीय महायुद्धात भग्न झालेल्या ह्या १३०० - १५०० व्या शतकातील इमारतींना पाहून मंतरलेल्या पण शापित अश्या काळाची झलक वेळोवेळी मिळत होती.
... क्रमशः ...
- सौ रुपाली मनीष पाठक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा