महाराष्ट्र मंडळ सिंगापूर - वार्ता

कोजागिरी शब्दगंध

कोजागिरीच्या निमित्ताने १५ ऑक्टोबर रोजी एका विशेष शब्दगंध मैफिलीचे आयोजन केले होते. या खास कार्यक्रमासाठी भारतातून काही पाहुणे मंडळी आली होती ज्यांच्यामुळे कार्यक्रमाची रंगत अजूनच वाढली. मोहना आणि संजय कारखानीस यांनी यजमानपद अतिशय अगत्यपूर्ण रीतीने भूषवले व मोहना यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालनही सांभाळले.

सुरुवातीला शब्दगंधींनी आपली एक-एक कविता सादर करून पाहुणे मंडळींना सिंगापुरातल्या मराठी कवितेची वैविध्यपूर्ण झलक दाखवली. त्यानंतर पाहुणे मंडळींचे सादरीकरण झाले. ज्येष्ठ कवयित्री, लेखिका आणि मराठी विश्वकोश मंडळाच्या अध्यक्षा डॉ विजया वाड यांनी त्यांच्या ओघवत्या कथाकथनातून हसत-खेळत सुखाचा मंत्र सांगितला. सुप्रसिद्ध कवयित्री, लेखिका, मुलाखतकार गौरी कुलकर्णी यांनी पावसावरच्या कवितांचा रंजक आढावा घेत काही आपल्याही रचना ऐकवल्या. लेखिका, कवयित्री रेखा नार्वेकर यांनी ज्ञानेश्वरीसारख्या अमृतकाव्याचा आस्वाद कसा घ्यावा हे त्यांच्या विवेचनातून सुंदर रीतीने सांगितले. त्यानंतर लेखिका, कवयित्री, प्रकाशिका लता गुठे यांच्या कविता वाचनाने सर्व श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेतला. शेवटी लेखक, अभियंता प्रकाश कुलकर्णी यांनी मोहना यांच्या एका कथेचे अभिवाचन केले.

कोजागिरीच्या या साहित्यसंध्येची गोडी सर्व शब्दगंधींच्या नेहेमीच स्मरणात राहील.





स्वानंद किरकिरे - गप्पा गोष्टी

सुप्रसिद्ध गीतकार, गायक, संवाद-लेखक व अभिनेते असलेल्या स्वानंद किरकिरे यांच्याशी गप्पा मारण्याची आणि त्यांच्या अष्टपैलू, मनमोकळ्या व्यक्तिमत्त्वाविषयी जाणून घेण्याची संधी १६ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र मंडळ (सिंगापूर) च्या सदस्यांना मिळाली. समीर इनामदार यांनी मुलाखतकाराची भूमिका बजावताना कार्यक्रम ओघवता ठेवला. स्वानंद किरकिरे यांचे इंदोरमधील बालपण, NSD मधील वर्षे, सुरुवातीचे चित्रपटसृष्टीमधले कष्टाचे दिवस आणि दिग्दर्शक बनण्याची आस असताना स्वतःमधला गीतकार सापडून यशाची वाट गवसल्याचे अनुभव ऐकताना सर्व श्रोते भारावून गेले. गप्पांच्या ओघात त्यांनी त्यांची अनेक लोकप्रिय गीते ऐकवून रसिकांना खुश केले. त्यांचा खडा आवाज, जिद्दी स्वभाव, हसत खेळत बोलण्याची शैली यामुळे ही गप्पा-गोष्टींची मैफल श्रोत्यांना एक परिपूर्ण अनुभव देऊन गेली. या कार्यक्रमाला ६० सदस्यांची उपस्थिती लाभली होती.








श्रीधर फडके - दुहेरी मैफल

२२ ऑक्टोबर रोजी सिंगापुरातल्या संगीत-रसिकांना अशी काही दुर्मिळ पर्वणी मिळाली जी कायम स्मरणात साठवून ठेवली जाईल. खू सभागृहात सकाळच्या प्रसन्न वातावरणात श्रीधर फडके यांनी गीत रामायण या अजरामर कलाकृतीमधील गाणी सादर करून रसिकांची मने जिंकली. वातावरण त्यांच्या सुरांनी भारून गेले होते आणि गीतांमधील हृदयस्पर्शी भावनांमध्ये श्रोतेही मंत्रमुग्ध होऊन गेले होते. श्रीधरजींनी गाण्यांबरोबरच गीत रामायणाच्या जडण-घडणीविषयी आणि बाबूजी व गदिमांविषयीच्या आठवणीही सांगितल्या. विनय पराडकर यांनी साजेसे निवेदन केले. 

मध्यंतरानंतर 'फिटे अंधाराचे जाळे' हा श्रीधर फडके यांच्या लोकप्रिय भावगीतांचा कार्यक्रम सादर झाला. अतिशय सुमधुर गीतांमधून त्यांच्या उत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाची झलक रसिकांना बघायला मिळाली. वेगवेगळ्या पठडीमधली अनेक गीते श्रीधरजी व शिल्पा पुणतांबेकर यांनी सादर केली. प्रेक्षकांची फर्माईश व त्याचबरोबर श्रीधरजींच्या अतिशय खुसखुशीत व अनौपचारिक गप्पांमुळे कार्यक्रम संपूच नये असे वाटत राहिले. 

या कार्यक्रमासाठी तबल्यावर तुषार अग्रे यांची साथ मिळाली. स्थानिक कलाकारांनीही या कार्यक्रमासाठी खूप मेहनत घेऊन कार्यक्रम अधिक रंगतदार केला. यामध्ये कीबोर्डवर अक्षय अवधानी व अनिशा म्हैसाळकर, तबल्यावर अमित शियेकर, तालवाद्यावर प्रसन्न पेठे, कोरस - विद्या सापळे, अनिता काळे, योगेश गोंधळेकर व सचिन कुलकर्णी, ध्वनी साहाय्य - संतोष अंबिके व निवेदन रुपाली गोंधळेकर यांचा उल्लेख आवश्यक आहे.







नाटक - माकडाच्या हाती शॅम्पेन

दर वर्षीप्रमाणे महाराष्ट्र मंडळ सिंगापुरतर्फे ह्या वेळीही एक दर्जेदार नाटक सादर झाले. विवेक बेळे  लिखित 'माकडाच्या हाती शॅम्पेन' हे नाटक २३ ऑक्टोबर रोजी खू सभागृहात स्थानिक कलाकारांनी रंगवले. पुस्तक, चाकू, मादक व पेन्सिल ह्या प्रमुख पात्रांच्या नातेसंबंधातील रूपकांमधून राजकारण व मीडिया ह्यावर उपहासात्मक भाष्य करणारे हे नाटक विनोदी अंगाने खुलत गेले. 

नाटकाचे दिग्दर्शन अमित जोशी ह्यांनी केले होते, तर ह्यातल्या प्रमुख भूमिका मंदार पटवर्धन, प्रसन्न जोगदेव, योगेश तडवळकर, आणि स्मिता मुंगीकर ह्यांनी साकारल्या. नेपथ्य - प्रीती तेलंग, वेशभूषा साहाय्य - अमृता कुलकर्णी, रंगभूषा - निकिता किंजवडेकर, प्रकाशयोजना - शुभेन फणसे, पार्श्वसंगीत - अक्षय अवधानी, रंगमंच व्यवस्था - लीना बाकरे, भूषण रोकडे, मोहित कुलकर्णी, ज्योती जोशी, आणि सत्यजित मोने.








बालनाट्य व आनंद मेळावा

महाराष्ट्र मंडळाने या वर्षी सुप्रसिद्ध लेखिका, दिग्दर्शिका सई परांजपे लिखित 'सळो कि पळो' बालनाट्य ६ नोव्हेंबर रोजी GIIS Queenstown च्या ऑडिटोरियम सादर केले. हा दिवस मुलांसाठी दिवाळी आनंद मेळावा म्हणून साजरा करण्यात आला. आनंद मेळाव्याला भरघोस प्रतिसाद आणि खूप कौतुक लाभले. २०० जणांची या दिवशी हजेरी होती.

नाटकाआधी लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा घेतली गेली. विषय होता "दिवाळी". यात अंदाजे ४० मुलांनी भाग घेतला. श्रीरंग केळकर व आरती बारटके यांनी या स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले.

त्यानंतर बालनाट्य यशस्वीरित्या पार पडले. यात आरोही टेमुर्णीकर, रूषभ पारसनीस, नील कर्णीक, ऋतुराज कुलकर्णी, ईशिता पै रायकर, सायली बापट, श्रुती पाटील, वर्धिनी पेंढारकर, अनुष्का वर्तक, श्रेयस दळवी, मानस खरे, रचना कुलकर्णी या बालकलाकारांनी काम केले. दिग्दर्शन होते नलिनी थिटे यांचे. दिग्दर्शन सहाय्य दिले समीर इनामदार व ओंकार बापट यांनी. तर संगीत होते अक्षय अवधानी यांचे. रंगमंच व निर्मिती व्यवस्था पाहिली भूषण रोकडे यांनी तर वेशभूषा अमृता कुलकर्णी यांनी. नृत्य-दिग्दर्शन मीनल पै रायकर यांचे असून रंगभूषा होती अस्मिता मेरुकर यांची. रंगभूषा व वेशभूषा सहाय्य दिले मीनल पै रायकर, पल्लवी खरे, कांचन बापट यांनी तर नेपथ्य संकल्पना प्रीती तेलंग यांची होती. गीत लिहिलं होते जुई चितळे यांनी व पार्श्वगायन केले अमोल परांजपे यांनी.

नाटकानंतर चिंगे परेडच्या WeCare बॅनरचे उदघाटन करण्यात आले. व जमलेल्या सर्वांनी त्यावर आपल्या स्वाक्षऱ्या केल्या. चिंगे परेड मधील महाराष्ट्र मंडळाच्या आगामी सहभागाबद्दल सर्वांना माहिती देण्यात आली व श्रीरंग केळकर व आरती बारटके या आपल्या बॅनर कलाकारांचे अभिनंदन करण्यात आले. अपर्णा पाटील यांचेही बॅनर चिंगे परेड मध्ये सहभागी असणार आहे. परंतु ते त्या सुमाराला तयार नसल्याने या कार्यक्रमात समाविष्ट केले जाऊ शकले नाही.

नाटकानंतर मुलांनी एकत्र येऊन १४ फन फेअर स्टॉल लावले होते. स्टॉल साठी १०$ ची माफक फी असून मुलांनी खेळासाठी जास्तीत जास्त किती दर लावावा हे महाराष्ट्र मंडळाने आखून दिले होते. यात स्टॉल लावणाऱ्या मुलांच्या कल्पकतेची आणि व्यवस्थापनाची झलक सर्वांना मिळाली. मुलांनी अतिशय सुरेख खेळ व पदार्थ करून सर्वांचे कौतुक संपादन केले. फन फेअर बघायला आणि खेळायला सर्व लहान मोठ्या सभासदांना खूपच धमाल आली. हा उपक्रम दर वर्षी करावा अशी जोरदार मागणी सर्वांकडून करण्यात आली.

चित्रकला स्पर्धा कार्यक्रम सूत्रधार - वेदश्री जठार
बालनाट्य सूत्रधार - नलिनी थिटे
फन फेअर व बाकी व्यवस्थापन - स्मिता अंबिके, भूषण गोरे व वेदश्री जठार
कार्यक्रम सूत्र संचालन : विशाल पेंढारकर







बुद्धिबळ स्पर्धा

बऱ्याच वर्षानंतर महाराष्ट्र मंडळ (सिंगापूर) ने बुद्धिबळाच्या स्पर्धा आयोजित केल्या. २० नोव्हेंबर २०१६ रोजी ममसी-लायब्ररी, GIIS मध्ये या स्पर्धा आयोजित केल्या गेल्या. ८ छोट्या स्पर्धकांनी जिंकण्यासाठी शर्थ लावली. सगळ्या लढती चुरशीच्या झाल्या आणि अंतिम फेरीत विजेतेपद श्रेयस दळवी याने पटकावले. उप-विजेतेपद ऋत्विज प्रधान याला मिळाले.

कार्यक्रम सूत्रधार - विशाल पेंढारकर
सहाय्य - केदार पळशीकर




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा