ती

आज अशा एका नाव नसलेल्या नात्याविषयी लिहिणार आहे कि जे नाते असल्याचे मी कितीतरी दिवस मनातल्या मनात सुद्धा मान्य करायला संकोचत होते, चारचौघात उल्लेख तर खूपच लांब. 

कितीदा संभ्रम व्हायचा कि आमचं काही नातं आहे का खरंच? हे केवळ आपल्याच मनाचे भास नाहीत ना? पण मग अखेर पटले कि, 'आहे बरं का आपले नाते! ते देखील नुसते नाही तर अगदी जिवाभावाचे'. त्यानंतर कधी खाजगीत, जवळच्या मित्र परिवारात ह्याची कबुली द्यायला सुरुवात केली. पण जाहीरपणे? ना रे बाबा ना ! मग एकदा परिस्थितीवश जाहीर कबुली द्यायलाच लागली. पण तरी ते रिलेशनशिप स्टेटस लिहायचे झाले असते तर 'कन्फ्युज्ड' असेच लिहावे लागले असते. किंबहुना अजूनही ते तसेच आहे. 'कन्फ्युज्ड' ! कधी मी तिच्या मागे असते तेव्हा ती नखरे करते तर कधी ती उत्सुक असते भेटायला आणि दार वाजवते तेव्हा मी कोणत्यातरी दुसऱ्याच कामात मग्न असते. मला वाटते हे काम झाल्यावर दार उघडूया पण तोपर्यंत तिला कुठला धीर निघायला? ती कधीचीच निघून गेलेली असते. मग दिवसेंदिवस आमची गाठभेटसुद्धा नसते. 

कधी वाटते तुझी चाहूल लागलीये, 
वळून पहावे तर तिथे तू नसतेसच … 
तिथे असतात कधी हलणारी झाडाची पाने, 
कधी पानांवर खेळणारे उन्हाचे कवडसे,
कधी पावसाचे चुकार चुटपुटते थेंब,
तर कधी उमललेले लाघट चंद्रबिंब …
ते पाहून परत मनात वळावे, 
तर तिथे तू येउन गेल्याच्या पाऊलखूणा,
आणि परत एकदा हुकलेला भेटीचा क्षण !

पण एखादा दिवस, एखादी वेळ अशी येते कि मला तिच्याशिवाय तरणोपाय नसतो. तिच्यावाचून श्वास घेणे पण मुश्किल होऊन जाते आणि मग कागदावर शब्द उतरायला लागतात. ती प्रसन्न असेल तर कागदावर पूर्ण स्वरुपात अवतरते नाहीतर मग आहेच ... नेहमीचा आमचा लपंडाव आणि माझा जीव अधर. आत्तापर्यंत 'ती' कोण ते तुमच्या लक्षात आलेच असेल... कविता!

लहानपणापासून शब्द आणि कविता मनाला भुरळ घालायच्या. मनात काहीतरी उमटत राहायचे पण कागदावर उतरवायचा धीर व्हायचा नाही. त्याला कारण, माझा संकोच हे जसे होते, तसेच कवींची त्यावेळी समाजात असलेली प्रतिमा, हे देखील होते. कवी म्हणजे विचित्र, एककल्ली, समाजाच्या नियमांची पर्वा नसलेले, कोणत्याही विषयावर कविता लिहिणारे, कोणीही सापडताच त्यांना पकडून कविता ऐकवणारे, अशीच कवींची प्रतिमा समाजात होती आणि म्हणूनच कवी आला पळा पळा असेही गमतीने म्हटले जायचे. सगळ्यात गंमत म्हणजे प्रसिद्ध कवींच्या कविता वाचलेल्या असणे ह्याला समाजात प्रतिष्ठा होती बरं का, पण कविता लिहिणाऱ्यांविषयीची मात्र अशी प्रतिमा! मला तर समाजात मिळूनमिसळून राहायचे होते, प्रवाहाविरुद्ध पोहण्याची हिंमत नव्हती. झुंडीबरोबरच जायचे होते. मग त्यासाठी कवितेचा त्याग करायला लागला तरी चालेल अशी त्या वेळची माझी मानसिकता होती. 

पण एकदा असे झाले कि एका कार्यक्रमासाठी कविता शोधायचे काम माझ्याकडे होते. नेमकी तेव्हा मी अनेक व्यापात एवढी गुंतलेली कि संदर्भ ग्रंथालयात जायलाच वेळ झाला नाही कि जवळ असलेली पुस्तके वाचायलाही वेळ झाला नाही. कविता तर संध्याकाळी द्यायचीच होती कारण जाहीर कार्यक्रम होता. मग मीच कविता लिहून दिली आणि तीच एका अर्थाने आमच्या नात्याची जाहीर कबुली ठरली. तोपर्यंत कोण काय म्हणेल ह्याची पर्वा करणे हे माझ्या कवितेशी असलेल्या अनुबंधापेक्षा महत्वाचे नाही, अशी आयुष्याविषयीची समजदेखील आली होती आणि मग आमचे हे नाते मी मनोमन स्वीकारले. 

मनोमन निर्विकल्प स्वीकार हा कोणतेही नाते बहरण्यासाठी अत्यावश्यकच. आमचेही नाते मग असेच बहरत गेले. जमिनीखालून एखादा झरा सतत वाहत असावा, नजरेला दिसला नाही तरी त्याच्या ओलाव्याने जमिनीवर हिरवळ असावी, शीतलता असावी, तसेच काहीसे. कवितेने मला काय दिले ह्याचा रुक्ष ताळेबंद मी मांडणार नाही, मोजणार देखील नाही, ह्या नात्याला कोणत्याही लौकिक मापकांमध्ये. एवढेच सांगेन कि काही नाती अशी असतात जी आपले भाग्य म्हणून आपल्या ओंजळीत आलेली असतात. नुसत्या स्मरणमात्रेही आपले आयुष्य सुगंधाने दरवळून टाकतात, तेजाने भारुन टाकतात, जगण्याकडे आशावादी दृष्टिकोनातून बघायला शिकवतात. नुसते कविता लिहिणेच नाही तर इतर कवींच्या कविता वाचणे, समजून घेणे, मुरत आणि मुरवत जाणे, ह्या नात्याचा अविभाज्य भाग आहे. किती ज्ञात अज्ञात कवींच्या सुंदर सुंदर कविता मला वाचता आल्या, मन:पूर्वक उपभोगता आल्या. त्यात आढळलेले, आवडलेले शब्द, कल्पनाविष्कार माझे भावविश्व उजळवून गेले. त्यातला अर्थ कधी हाती लागला तर कधी हुलकावणी देऊन गेला. बंद मुठीत एखादे रत्न असावे आणि बंद मुठीतूनही त्याचा प्रकाश बाहेर सांडावा, नुसतेच तेवढे नाही तर त्या प्रकाशाला स्वर्गीय सुगंध पण लाभावा तसे दर वेळी सुंदर कविता वाचताना, जाणून घेताना वाटत राहिले. 

कविता एकाच वेळी अपार आनंद आणि तीव्र वेदना देऊन जाते आणि आपण तरीही कायम तिच्या प्रेमात राहतो. असे काय असते कवितेत? का आपण एवढे नादावून जातो? ह्या संबंधांचे भविष्य काय असे विचार मी आता करीत नाही. एवढेच म्हणते, 

मी रेलून उभी आहे कवितेवर,
आयुष्यभराचा भार टाकून, 
आणाभाका न घेताही,
ती आहे सतत. . . माझ्याबरोबर. 
आणि आता ती आणि मी यातील सीमारेषाच नामशेष,
कवितेच्या आधीची मी कशी होते, आठवत नाही,
त्या आधी मी होते का? मी 'मीच' होते का?



-सौ. वृंदा टिळक


८ टिप्पण्या:

  1. sundar lekh aani lekhamadhil donhi kawita suddha sundar aahet.
    Yeshwant

    उत्तर द्याहटवा