महाराष्ट्र मंडळ सिंगापूर – वार्ता

नाटक निवडचाचणी वृत्तांत

मराठी माणूस आणि नाटक यांचं अतूट नातं आहे. परदेशात गेल्यावरही हे नातं जपलं जातं. महाराष्ट्र मंडळ सिंगापूरही दरवर्षी उत्तम नाटक सादर करते. अनेक गुणी कलाकार आणि दिग्दर्शकांनी आत्तापर्यंत दरवेळी चढत्या क्रमाने उत्तम नाटकं सादर केली आहेत.


ह्यावर्षी ही एक दोन अंकी नाटक आणि एक बालनाट्य सादर करण्याचा महाराष्ट्र मंडळाचा मानस आहे. त्यासाठी १६ मे २०१५ रोजी नाटकासाठी कलाकार निवडचाचणीचे आयोजन ग्लोबल इंडियन शाळेत करण्यात आले होते. बालनाट्यासाठी परीक्षक म्हणून दिग्दर्शक रमा कुलकर्णी होत्या तर दोन अंकी नाटकासाठी दिग्दर्शक अमित जोशी परीक्षक होते.

कोणतंही नाटक यशस्वी होण्यासाठी पडद्यावरील कलाकारांबरोबर पडद्यामागील कलाकारही तेवढेच महत्त्वाचे असतात. त्याच्यासाठी सुद्धा आपलं नाव नोंदवण्याची ही एक संधी होती. निवडचाचणीला उत्तम प्रतिसाद मिळाला. २५च्या वर बालकलाकार आणि २५ मोठ्या कलाकारांनी निवडचाचणी मध्ये भाग घेतला.
- राजश्री लेले

बाल चित्रकला कार्यशाळा

आपल्या छोट्या दोस्तांसाठी एखादा कार्यक्रम आयोजित करायला मिळणे ही मंडळासाठी एक पर्वणी असते. मुलांचा उत्साह, गोडवा आणि निर्मितीक्षमता भारून टाकणारी असते. मुलांच्या सृजनशीलतेला साजेसा एक विषय घेऊन आम्ही १७ मे २०१५ रोजी ग्लोबल इंडियन शाळेत एक कार्यशाळा घेतली. कलापदवीप्राप्त कलाशिक्षिका आणि महाराष्ट्र मंडळाची सभासद चारू आफळे हिने या कार्यशाळेची संकल्पना आणि नियोजन केले. हाताच्या आणि पायाच्या बाह्यरेषांमधून वेगवेगळ्या पक्षी प्राण्यांचे आकार शोधून काढायचे आणि रेखायचे अशी संकल्पना होती. या कार्यशाळेला भरघोस प्रतिसाद मिळाला. २५ मुलांनी या कार्यशाळेत भाग घेतला. महाराष्ट्र मंडळातर्फे त्यांना चित्रकलेचे सर्व सामान आणि खाऊ देण्यात आला. 















- नलिनी थिटे



इन्टरिम ऑडिट

आपलं महाराष्ट्र मंडळ ही जरी एक non-profit संस्था असली तरीही आपल्याला मंडळाच्या जमाखर्चाचा ताळेबंद ठेवावा लागतो आणि आपण जागरूकपणे तो ठेवतोही. नुकतंच आपलं इन्टरिम ऑडिट पार पडलं. आपले ऑडिटर्स अमृत जोशी व अमोल करमळकर यांनी, खजिनदार स्मिता अंबिके व सहाय्यक सचिव विशाल पेंढारकर यांच्या सहाय्याने ऑडिटचं कामकाज सुरळीतपणे पार पाडलं.
- मंजिरी कदम



वार्षिक सहल

ममंसिं ची वार्षिक सहल ११-१२ जुलैला सिंगापूरहून अडीच तासांच्या अंतरावरील क्लुआंग, मलेशिया येथील UK Agro Farm Resort येथे आयोजित करण्यात आली होती. लहान-मोठे असे ६६ सभासद ह्यात सहभागी झाले. 'Kampong life' चा अनुभव देणाऱ्या ह्या सुंदर, हिरव्यागार आणि ११० एकर एवढया विस्तीर्ण परिसरात लगोरी, फुटबॉल यासारखे खेळ तर रंगलेच, पण '3-Minute Sheep Catching Challenge’, Archery, Mouth Darts अशा वेगळ्या खेळांचा आनंदही सभासदांनी लुटला.



तेथील टूरमध्ये शेळ्या, टर्की, शहामृग यांना खायला देणे, आधुनिक पद्धतीने शेळ्यांपासून दुग्धोत्पादन कसे करतात ते पहाणे, थंडगार दूध आणि शहाळ्यांचा आस्वाद घेणे या सगळ्याची मजा सर्वांनी घेतली. मावळणारा नयनरम्य सूर्य आणि पिसारा फुलवलेला मोर जणू काही सिंगापूरवासींसाठी निसर्गाची भेट होऊन सामोरे आले. विशेष म्हणजे चांदण्या रात्री सगळ्यांनी मिळून सुंदर सुंदर आकाशकंदील हवेत सोडले, Housie आणि भेंड्यांचा कार्यक्रमही केला. पुष्कळ फोटो, नवीन मित्र आणि एक आल्हाददायी अनुभव घेऊन ममंसिं सभासद घरी परतले.
-    अस्मिता तडवळकर



शब्द-स्वर निवडचाचणी वृत्तांत

शब्दगंध' हा स्वरचित मराठी कवितांना वाहिलेला, गेली ११ वर्ष अव्याहत सुरू असणारा महाराष्ट्र मंडळ (सिंगापूर) चा मासिक उपक्रम आहे. त्याचप्रमाणे, ‘स्वरगंध’ हा आपला २००९ पासून गीत व संगीतावर आधारित उपक्रम आहे. शब्दगंधींच्या निवडक कवितांना स्वरगंधींनी चाल लावून या कवितांचे वाद्यवृन्दासहित सादरीकरण गणेशोत्सवातील एका दिवशी करायचे ठरवले आहे.

यासाठी सभासदांकडून कविता मागवण्यात आल्या. या आणि वर्षभरातील इतर कार्यक्रमांसाठी गायक, वादक आणि निवेदकांची चाचणी २८ जून २०१५ ला ग्लोबल इंडियन शाळेत घेण्यात आली. गायक व वादकांसाठी श्री रवींद्र परचुरे व श्री योगेश गोंधळेकर हे परीक्षक होते. निवेदकांचे परीक्षण सौ वृंदा टिळक व सौ राजश्री लेले यांनी केले. ८ गायक व ५ निवेदाकांनी ह्या निवडचाचणी मध्ये भाग घेतला.
- अस्मिता तडवळकर



आगामी कार्यक्रम
-  ऑगस्ट – SG50 Walk, पं. कैवल्यकुमार यांचा कार्यक्रम, विविध गुणदर्शन निवडचाचणी
- सप्टेंबर – गणेशोत्सव

शब्द - स्वर चाचणीच्या दरम्यान तिथल्या उत्साहाला चपखल दाद देणारी कविता सुगम काळे यांच्या उत्स्फूर्त लेखणीतून उतरली, ती इथे खास सादर करतो आहोत!

(चाल: एका तळ्यात होती)

एके दिसी दुपारी शाळेत भर उन्हात 
होती चिकार गर्दी बेफाट चिवचिवाट 

तेथे जमून गाती गंधर्व भावगीते 
तबल्यावरी विहरती लयबद्ध कुशल बोटे 

तालात शब्द करती पदनर्तने झकास 
सम येत असता माना डोलून जाती खास 

रसिकांत होई कल्ला ऐकून उंच तान 
गवई बुडून जाई स्वरगंगेत बेभान 

उरला नसे हिशेब स्थल काल बंधनात
बेहोश शब्द झाले धुंदी चढे क्षणात 

स्वरमंडले रचिती जो उत्सव सुरेल खासा 
आनंदडोह भरता गोडी चढेल न्यासा 

गीते दुपारभर ती ऐकून धन्य होत 
अश्राप लेखणीला जुंपूनिया कामात 

एके दिशी दुपारी शाळेत भर उन्हात 
होती चिकार गर्दी बेफाट चिवचिवाट

- सुगम काळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा