राग शिवरंजनी

लेखक राजू भारतन यांच्या लेखात वाचले होते की ‘मेहेबूबा’ चित्रपटाचे गाणे ‘मेरे नैना सावन भादो’ हे राग शिवरंजनीवर आधारित आहे. तेव्हा शास्त्रीय संगीताची आणि माझी काहीही ओळख नव्हती. पण शिवरंजनी हे भारदस्त नाव वाचून या रागाबद्दल कुतूहल निर्माण झाले पण लगेच काही माहिती मिळाली नाही कारण त्याकाळी शास्त्रीय संगीताची माहिती असलेली एकही व्यक्ती माझ्या संपर्कात नव्हती. 

‘मेरे नैना सावन भादो’ जे लतादीदी आणि कै. किशोर कुमार यांनी गायले आहे त्याचे स्वरूप कायम मनात साठले गेले ते त्याच्या प्रवाही आणि वैशिष्ट्यपूर्ण चालीने. कै. पंचमदा यांनी नेहमीप्रमाणे जबरदस्त चाल बांधली आहे. या गाण्याविषयी वाचलेली एक आठवण अशी आहे की जेव्हा किशोर कुमार यांनी चाल ऐकली तेव्हा ते म्हणाले, “मुझे ऐसा गाने को आएगा नही. यह गाना लतासे गवा लो. उसका सुनकर मै अपने हिसाबसे गा लूंगा”. दोन्ही गाणी अतिशय गाजली हा नंतरचा इतिहास आहे.

गीत: मेरे नैना सावन भादो

दुसरी आठवण अशी आहे की मी माझ्या पहिल्या नोकरीत असताना आम्ही काही मित्र मुंबईतील गोराई बीचवर पिकनिकला गेलो होतो. माझा एक मित्र त्याकाळी बासरी वाजवत असे. त्याने त्यादिवशी आम्हाला काही फिल्मी गाणी बासरीवर ऐकवली. तेव्हा एका मित्राने राग शिवरंजनीवर आधारित गाण्याची फरमाइश केली. तेव्हा मला ‘मेरे नैना’ ची अपेक्षा होती कारण शिवरंजनीवर आधारित तेच गाणे मला माहीत होते. पण मित्राने ‘तेरे मेरे बीच मे कैसा है बंधन अंजना’ हे गाणे वाजवले. हे ऐकून माझे शिवरंजनीबद्दल कुतूहल परत चाळवले. योगायोग असा की हे गाणे पण लतादीदी आणि बालसुब्रमण्यम या दोघांनी गायले आहे . 

गीत: तेरे मेरे बीच मे कैसा है बंधन अंजना

तिसरी आठवण अशी आहे: एकदा कै गजाननराव वाटवे यांचा दूरदर्शनवर कार्यक्रम होता. तेव्हा मला गजाननराव यांची काहीही माहिती नव्हती. त्यांनी पहिले गीत सादर केले, ‘मोहुनीया तुज संगे नयन खेळले जुगार’. शब्द आणि त्याला पूरक अशी प्रवाही चाल लगेच मनात ठसली. हा कार्यक्रम माझ्या कायम लक्षात राहिला कारण कार्यक्रम ऐकताना माझी आजी अतिशय खुश झाली होती व गाणी गुणगुणत होती. गजाननराव तिचे आवडते गायक होते आणि तिला त्यांनी गायलेली सगळी गाणी तोंडपाठ होती. तिला असे गाताना मी प्रथमच ऐकले होते. पुढे मला शास्त्रीय रागांवर आधारित गाण्यांची माहिती मिळवण्याचा छंद लागला तेव्हा कळले की गजाननराव यांनी त्यादिवशी सादर केलेली ‘मोहुनीया तुज संगे’ आणि ‘वारा फोफावला’ ही गाणीदेखील राग शिवरंजनीवर आधारलेली आहेत.

गीत : मोहुनीया तुज संगे

कवी राजा बढे यांच्या कवितेला वाटव्यांनी स्वरसाज चढवून दिला ती चाल सर्वसामान्यांना गुणगुणता येण्यासारखी असल्यामुळे १९४०-५० च्या दशकात ती अतिशय प्रसिद्ध झाली.

एक गाणे अगदी लहान वयात मनात कोरले गेले ते आहे कै. माणिक वर्मा यांनी गायलेले ‘सावळाच रंग तुझा’. गदिमांच्या अप्रतिम शब्दांना कै. सुधीर फडके उर्फ बाबूजी यांनी अतिशय पूरक चाल बांधली आहे आणि ज्या पद्धतीने माणिकबाईंनी ती गायली आहे त्याचे शब्दात वर्णन अशक्य आहे. 

जेव्हा कुठलेही गाणे अजरामर होते आणि पिढ्यानपिढ्या टिकते तेव्हा शब्द, चाल आणि गायकी यांच्या त्रिवेणी संगमाने होते असे मला वाटते. तसेच हे राग शिवरंजनीवर आधारित गाणे पिढ्यानपिढ्या टिकेल. बाबूजींनी त्यांच्या सांगीतिक आयुष्यात अनेक चाली बांधल्या आणि त्यांच्या कित्येक चालींचे भरपूर कौतुक झाले पण ‘सावळाच रंग तुझा’ या चालीचे हवे तसे कौतुक झाले नाही असे मला वाटते. 

राग शिवरंजनीचा वापर संतवाणीमध्ये पण केला गेला आहे. कै. भीमसेन जोशी यांनी गायलेला तुकोबाचा अभंग कै. श्रीनिवास खळ्यांनी चालीत बांधला आहे.

गीत: राजस सुकुमार मदनचा पुतळा


१९९७ साली गायक आणि संगीतकार श्रीधर फडके यांनी आपल्या एका कार्यक्रमात ‘त्या कोवळ्या फुलांचा बाजार’ हे गाणे सादर केले. कवी अनिल कांबळे यांच्या शब्दांना श्रीधरजींनी स्वरसाज दिला तोही शिवरंजनीच्याच आधारे.

गीत: त्या कोवळ्या फुलांचा बाजार


राज कपूर यांच्या चित्रपटातील संगीताचा विषय जेव्हा निघतो तेव्हा राग शिवरंजनीचा उल्लेख टाळणे अशक्य आहे. अगदी ‘बरसात’ (९१९४८) पासून ‘हीना’ (१९९१) पर्यंत राज कपूर यांनी जे चित्रपट निर्मित केले त्यातील गाण्यांच्या चाली या राज कपूर यांनीच बांधल्या. चित्रपटाचा संगीतकार राज कपूर यांच्या चालीलाच सांगीतिक स्वरूप द्यायचा. तर राज कपूर यांची दोन अजरामर गाणी शिवरंजनीमध्ये बांधलेली आहेत:

चित्रपट ‘संगम’ - ‘गीताचे बोल: ओ मेरे सनम ओ मेरे सनम’ 
एका प्रेमिकेची गाथा सुबोध प्रद्धतीने या गाण्यात मांडली आहे.


चित्रपट ‘मेरा नाम जोकर’ - ‘जाने कहाँ गये वोह दिन’ - 
मला व्यक्तिशः मुकेश यांची गायकी फारशी आवडत नाही पण हे गाणे एक अपवाद.


अशाप्रकारे सुगम संगीतामधून राग शिवरंजनी वरचेवर समोर येत राहिला पण हा राग शास्त्रीय स्वरूपात फारसा आजवर ऐकायला मिळाला नाही. एकदा एका प्रसिद्ध पेटीवादकाला मी विचारले की शिवरंजनी रागावर शास्त्रीय रचना का गायल्या जात नाहीत तेव्हा त्यांनी उत्तर दिले प्रसिद्ध गायक पंडित संजीव अभ्यंकर हे शिवरंजनी मधील एक रचना गातात तसेच पंडित शिवकुमार शर्मा, पंडित हरिप्रसाद चौरसिया आणि उस्ताद बिस्मिल्ला खान यांनी छोट्या रचना शिवरंजनी मध्ये वाजवल्या आहेत.

पंडित संजीव अभ्यंकर यांची शास्त्रिय रचना

उस्ताद बिस्मिल्ला खान यांची रचना


पंडित शिवकुमार शर्मा यांची रचना


पंडित हरिप्रसाद चौरसिया यांची रचना


या काही रचना ऐकल्यानंतर जाणवलं की शिवरंजनी जरी नाव भारदस्त असले तरी या रागाचे स्वरूप हे छोट्या रचनांना पूरक असेच आहे. पण एक खंत नक्कीच आहे. सुगम संगीतात वरचेवर समोर येणारा राग शास्त्रीय संगीतात उपेक्षित असाच आहे. पण तरी मन आशावादी आहे की यापुढे आणखीन काही रचना या रागात ऐकायला मिळतील.

-शैलेश दामले



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा