याला जीवन ऐसे नाव

टी.व्ही.वर एक केक-शो बघताना माझा ५ वर्षांचा मुलगा एकदम म्हणाला, “मला केक टेस्टर व्हायचं आहे! केवढी मजा. रोज उठून केक खायचे!” 

अहो लहानाचं सोडा. आपल्यालाही काहींचा व्यवसाय/ जीवनशैली बघून वाटतच की, “काय लाइफ आहे ना!”. 
कदाचित आपल्यातले बहुतांश लोक काळाच्या, परिस्थितीच्या ओघात वाहत जातात. प्रवाहाविरुद्ध जाणंच काय तर, आपल्याला एखादा किनारा गाठून तठस्थपणे ओघाकडे पहायलाही जमत नाही. मग मनाला लागते एक फसवी ओढ. 

जणू, आयुष्य एक रेल्वे प्रवास आहे व तो अमुक एका स्थानकास पोहोचल्यावर सार्थ ठरणार आहे. आपण सतत एका “wow!” क्षणाच्या शोधात असतो. व्याख्या बदलत जातात: कामात बढती, मोठं घर, नवीन घ्यावयाची गाडी वा उपकरणं, मुला-मुलींची प्रगती, एखादा रोमांचक हाॅलिडे (स्काय डायव्हिंग / नाॅर्थर्न लाइट्स), किंवा कुणा प्रसिद्ध व्यक्तिची भेट! जणू ती परिस्थिती वा एखादी घटना आयुष्याला कायमचे “wow!” करून टाकेल. 
जीवन आणखी कुठल्या क्षणी / दिवशी नाही तर ह्या ‘आत्ता’मधेच आहे. लहानपणी आपण असेच जगत असतो... आत्ताच्या क्षणात. कालांतराने ह्याचा विसर पडतो.

म्हणूनच ह्या अंकात आम्हाला वेध घ्यायचा होता अशा व्यक्तींचा ज्यांचं जगणं काही औरच आहे, अलौकिक, वाखाणण्याजोगं, डोळे उघडवणारं. अशा व्यक्ती कुठल्याही “wow”चा पाठलाग न करता, चालीरितींचं ओझं न वागवता, पूर्णपणे ‘आज’ जगतात. आणि कळत नकळत, ह्यांच्याच हातून काही जगावेगळी कामं होतात. ज्यांनी चालीरितींचे धडे गिरवले नाहीत त्यांच्याकडूनच अनेकांना नवीन शिकवण मिळाली. 

तर ह्या अंकात भेटतील: आपलं जीवन हे आपल्यासाठी नसून इतरांना घडविण्यासाठी आहे ह्या तत्वावर जगणारे परोपकारी शिक्षक/समाजसेवक. ‘सर्वसाधारण’ म्हणावं असे असाताना देखील देवदूत वाटावे अशी कामं करणारी माणसं. विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन व प्रोत्साहन देऊन अलौकिक कामगिरी करण्यास प्रवृत्त करणारे प्राध्यापक. भितीचा लवलेश न ठेवता सात समुद्र सर करण्याचा विक्रम करणारे नौदल अधिकारी. एक ‘अल्ट्रा मॅरेथाॅन’ धावणारी जिद्दी स्त्री, जी एक उच्च पदस्थ व्यावसायिक व एक आई अशा भूमिका सांभाळताना इतर स्त्रियांच्या कल्याणासाठीही प्रयत्नशील आहे. वडिलांच्या अकाली मृत्यूनंतर कोवळ्या वयात घर सांभाळणारी मुलं... सगळ्याच व्यक्ती ‘जीवन गौरव’ पुरस्कार द्यावा अशी !

अशा विविध व्यक्तिचित्रांनी, अनुभवांनी ऋतुगंधचा अंक पुन्हा समृद्ध केल्याबद्दल आमच्या वाचक-लेखकांचे मन:पूर्वक आभार!

जीवनात किती आणि काय काय करता येईल हे पाहुया. इतरांना, आपल्या परिस्थितीला नावं ठेवण्यापेक्षा, कुढत बसण्यापेक्षा, हा दोन घडीचा डाव कसा खेळायचा ते शिकुया. 

ऋतुगंध समिती २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा