माझी खाद्यसफर

महाराष्ट्र मंडळाचा ऋतुगंध शरद २०१७ चा ई-मेल मिळाला आणि मनात नक्की केले की मी ह्या विषयावर लिहिणार. ऋतुगंधमुळे मिळालेल्या ह्या आवडीच्या विषयावर लिहिण्याच्या संधीने मनाची कळी खुलली. मनातील सुप्त इच्छा जाग्या झाल्या. खाद्यपदार्थ आणि पाककलेवर मुक्त लेखन करण्याची माझी हौस पूर्ण होणार होती. इतके दिवस मनात दडलेले विचार व्यक्त होणार होते.

मी खान्देशातील जळगावची. तिथेच माझे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले. त्यामुळे श्रीगणेश नक्कीच तिथल्या पदार्थापासून. लुसलुशीत, नरम हिरव्या वांग्यांचे कांद्याची पात टाकून केलेले भरीत, हिरव्या मिरचीचा ठेचा आणि त्यासोबत कळण्याची भाकरी, अहाहा! दुग्धशर्करा योग. तर्रीदार, लाल तिखट शेवभाजी आणि आमटी, पातोड्याची भाजी ही तिथली खासियत. डाळ-बत्ती, मिसळीचे वरण, तुरीच्या डाळीची खिचडी यांची चव तर अमृततुल्य. ज्वारीच्या बिबड्या, फुंडके यांची चव तर आयुष्यात नक्कीच चाखायला हवी.

मला स्वयंपाकाची आणि निरनिराळे पदार्थ करून बघायची आवड लहानपनापासूनच आहे. माझी आई ही सुगरण. रोजचा स्वयंपाक असो की कुळ धर्म - कुळाचाराचा स्वयंपाक, दिवाळीचा फराळ, मुलांच्या डब्याचे पदार्थ, चटणी, लोणचे, मुरब्बे सर्वच ती अगदी चविष्ट करते. तिला बघत मोठे होत असताना आपसूकपणे ही कला माझ्यात आली. आता नातीसाठी मॅगी, पास्ता, नूडल्स सुद्धा तिने हौशीने बनवले. हळूहळू आपले नेहेमीचेच पदार्थ पण माझ्यासाठी सुरुवात ठरली.

मी आत्याकडून नारळीपाकाचा लाडू, शेजारच्या वहिनीकडून एगलेस cake - तोही कुकरमध्ये - शिकले. सुट्टीमध्ये कुकिंगचा कोर्से ही केला. त्यात काही पंजाबी डिशेस, बिस्कीटं, नानकटाई शिकले.  नाशिकची आत्या आली तेव्हा इडली, डोसा, चटणी, सांबार शिकले. मामींकडून वेगवेगळ्या प्रकारचे पापड आजमावले. नवीन पदार्थ करण्याचे, खाण्याचे वेड लागले.

लग्नानंतर दिल्ली आणि फ्रॅंकफर्ट, जर्मनीला राहण्याचा योग आला. नवऱ्याच्या जर्मन सहकार्यांना गाजर हलवा खाऊ घातला जो त्यांना खूप आवडला. तिथले रुचकर केक आणि ब्रेडस मनसोक्त वजन वाढे तोवर खाल्ले. नवऱ्याकडून baking साठी ओव्हन मागून घेतला आणि तिथल्या डिपार्टमेंटल स्टोर मध्ये जेवढ्या प्रकारचे केक्सचे ड्राय-मिक्स होते ते सगळे प्रकार करून पाहिले. काही फसले काही जमले. पण स्वतः करून बघण्याचा अन् खाऊ घालण्याचा स्वर्गीय आनंद मिळवला.


सिंगापूर तर खवय्यांसाठी पर्वणीच. सुदैवाने इथे मिळालेली डोमेस्टिक हेल्पर सुद्धा उत्तम तेलगू कुक. त्यामुळे तेलगू पद्धतीच्या अनेक चटण्या, लोणची, भाताचे नानाविध प्रकार शिकली. लाॅंग वीकएंड आला की माझा भटारखाना सुरु झालाच म्हणून समजा. मी तिला काही शिकवणार किंवा ती तरी मला. हल्ली ऑफिस करून, मुलीचा वाढणारा अभ्यास पाहता मला या कुकिंगच्या आवडीवर नियंत्रण ठेवायला त्रास होतोय. हात वळवळतात पण गप्पं बसावं लागतं.

आत्याकडून शिकलेल्या लाडू अन् बाजरीच्या खिचडीचे फोटो तिला व्हाट्सएॅपवर पाठवल्यावर मिळालेली शाबासकी आणि तिने आईला ऐकवलेले चार कौतुकाचे बोल म्हणजे आयुष्याचा ठेवा वाटतो.

असे म्हणतात की आनंदी मनाचा रस्ता हा पोटाकडून जातो. त्यामुळे मला असे वाटते की पाकंकलेची सिद्धी असणाऱ्यांना आप्त स्वकीयांचे प्रेम, आपुलकी, जिव्हाळा जास्त मिळतो. सर्वांना ते आवडतात. अपरिचित, नवख्या देशामध्ये नवीन मित्र जोडण्यासाठी, मैत्री जोपासण्यासाठी, स्वतःची संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी पाकंकलेसारखा दुसरा सोपा मार्ग नाही.  

- अश्विनी काटकर


३ टिप्पण्या:

  1. अश्विनी, तुझ्या आईच्या हातचे जवळजवळ सगळेच चविष्ट पदार्थ मनसोक्त खाल्ले आहेत आणि तुझ्या पपांचा आग्रह.
    अशी मायेची माणसं मिळण म्हणजे नशिबच.

    उत्तर द्याहटवा
  2. अश्विनी, खुप सुरेख लिहिले आहेस,तुझी आई अन्नपूर्णा आहे, त्यांच्या हातच मी सातत्याने 2-3वर्षे खाल्लेल आहे, खऱ्या अर्थाने मोठी वहीनी.तुझे खूप खूप अभिनंदन keep it up n go ahead

    उत्तर द्याहटवा