सारस्वती खवय्येगिरी


मध्यंतरी व्हाट्सअॅप वर एक विनोद आला होता… एकदा म्हणे कुठेसा मोर्चा चालला होता. सारस्वत समाजाचे लोक त्या मोर्च्यात सहभागी होण्यास निघाले आणि वाटेत माशांचा बाजार दिसला. पाहता तर काय, मोर्चा विसरले आणि मासे खाण्यास निघून गेले! आजपर्यंत सर्वांवर विनोद ऐकले आणि वाचले आहेत पण आम्हा सारस्वत समाजावरचा विनोद वाचून खूप मजा आली... खूप सत्य आहे बरं का ह्या विनोदामध्ये !!! जेवला आहात कधी कोणत्या सारस्वता कडे? अहो काय म्हणता "नाही”!!! चला बरं माझ्याबरोबर मग, मी ओळख करून देते आज आमच्या खाद्यपदार्थांची. अस्सल कोकणी मेजवानी बघून तोंडाला पाणी सुटेलच की नाही बघा !!!

मी गौड सारस्वत ब्राह्मण म्हणजे आम्ही मूळचे कारवार गोवा बाजूचे कोकणी भाषिक समाजाचे आहोत. आमचे पूर्वज सरस्वती देवीचे उपासक होते आणि सारस्वत मुनी आमचे गुरु होते. तसेच सरस्वती नदीकिनारी स्थायिक असल्याने आम्हाला सारस्वत ब्राह्मण म्हटले जाते. आम्ही कोकणातल्या सागरी किनाऱ्यावरचे रहिवासी. किनारी भागाकडून असल्यामुळे आमच्या खाद्यपद्धतीमध्ये स्थानिक पदार्थांचा वापर सढळ हाताने होतो. भात हे आमचे मुख्य अन्न. त्याबरोबर मासे आणि नारळाचा वापर करून बनवलेले अन्न हे आमचे वैशिष्ट्य. खोबरेल तेलाचा वापर आम्ही जेवणात आवर्जून चव वाढवण्यासाठी करतो. आम्ही माशांशिवाय नाही तर आमच्याशिवाय मासे जगूच शकत नाहीत असं म्हटलं तरी चालेल. आम्ही जन्मजातच खाण्याचे शौकीन. संकष्टी आणि पंचमी सोडली तर एकही रविवार आमचा माशांशिवाय जात नाही. मला तर सलग काही आठवडे मासे खाल्ले नाही तर पोटात गाठच येते बाई!! चिकन, मटण आणि अंड्यापेक्षा मासे हा आमचा मुख्य आहार. 

पापलेट, सुरमई, कोळंबी, बांगडा, मांदेली, बोंबील, चिंबोरी, तिसऱ्या अशा अनेक माशांचे विविध प्रकार आमच्या जेवणात तुम्हाला दिसतील. साग्रसंगीत जेवण नसेल तरी चालतंय. एखादे नुसते आंबट, म्हणजे माशाची आमटी असो किंवा तळलेले मासे असो किंवा सुक्या बांगडा, सुंगठाची किसमूर असो, नुसता भात आणि सोलकढी, फुटी कढी असली की आमचं जेवण तय्यार. लागली ना भूक ?? हो पण सोय म्हणजे खोब्र हे आवर्जून असायलाच हवं घरी, खोबऱ्याशिवाय आम्ही जगूच शकत नाही.
एकमेकांशी बोलताना सुद्धा, "आज रांधप कसले ??" म्हणजे आज जेवण काय हे आवर्जून विचारतो एकमेकास.

​​​​​​​​आता तुम्ही म्हणाल हे काय नुसते मासेच खातात की काय तर असं नाही हा!! शाकाहारी म्हणजे आम्ही त्याला शिवराक जेवण म्हणतो त्यामध्ये सुद्धा आमच्याकडे विविध प्रकार होतात. शिवराक म्हणजे कांदा लसूण घातल्याशिवाय बनवलेले जेवण. मराठी महिन्याप्रमाणे येणारे सर्व सण आम्ही शिवराक जेवण बनवून साजरे करतो. प्रत्येक सणाला विशिष्ट पदार्थ ही आमची खासियत आहे. घरात शुभकार्य म्हटलं की मुगा गाठी म्हणजे खोबऱ्याचा मसाला वापरून केलेली मुगाची भाजी ही असलीच पाहिजे. तूर-मूग डाळीचं, आलं आणि फोडणी घातलेलं आंबट म्हणजे "तोय" ही तर उपवासाची खास आमटी. खोबरं, धणे, लाल मिरची, चिंच आणि हळद; बस, ह्या ५ गोष्टींचं वाटण केलं आणि बहुतेक सर्व भाज्यांमध्ये घातलं की आमचं शिवराक जेवण तय्यार. तोय भाताबरोबर अप्पी इमले च लोणचं आणि सुक्या मिरचीचे उडदाचे पापड असले की भाजी नसली तरी चालून जाते. कधीतरी त्याबरोबर बटाटा, शेवग्याच्या शेंगा, कच्ची केळी, भोपळा, वांगं, नीरफणस ह्यांच्या फोडी म्हणजे काचऱ्या जेवणात प्रवेश करून जेवणाची गोडी वाढवतात. 

सकाळच्या नाश्त्यामध्ये सुद्धा एक किंवा दोन प्रकार नाही तर १०० प्रकारचे पदार्थ आम्ही बनवू शकतो. अनेक प्रकारचे पोळे म्हणजे डोसे, अप्प्याचे प्रकार, पोह्याचे अनेक प्रकार, इडली, सांजा, पुरी भाजी, उसळ पाव, उडदाचे बोन्डे म्हणजे वडे हे काही खास पदार्थ. चटणी पीटो म्हणजे सुक्या खोबऱ्याची डाळ घातलेली चटणी असली की काम झाले. मग त्यावर मस्त तुपाची धार सोडायची आणि कोणत्याही थालीपीठ पोळ्यांबरोबर खाल्ली की आमचा नाश्ता झाला. डोश्यांमध्ये ताकाचे पोळे, कलिंगडाचे डोसे, सोयी पोळे हे नाश्त्याची शोभा वाढवतात. पातळ आणि जाड पोहे पासून अनेक प्रकाराचे पोहे आम्ही बनवतो. दिवाळीला पहिल्या दिवशी पाच प्रकारचे पोहे बनवून त्याचा नैवेद्य देवाला दाखवतात. फोडणीचे पोहे, पांढरे पोहे, नारळाच्या रसातील पोहे, सांबार पोहे, मसाला पोहे असे अनेक पोह्याचे प्रकार फक्त आमच्या घरी दिसून येतात. फणसाच्या पानातील इडली हा एक नाविन्यपूर्ण पदार्थ नाश्त्याची मजा वाढवतो.

गोडाचे पण आमच्याकडे जरा वेगळेच पदार्थ असतात. पंचखतंय म्हणजे नारळ गुळाचे पंचखाद्य हा मुख्य प्रसाद असतो. केळ्याची किंवा फणसाच्या गऱ्याची मुळक म्हणजे भज्जी, हळदीच्या पानावर केलेली पातोळी, मुगाचं कढणं म्हणजे पायसम, चण्याच्या डाळीचं मडगण, नारळाच्या रसातील शेवया आणि पोहे, मांडे, मुगाची गोड़ खिचडी, तवसाळी म्हणजे काकडीचा केक हे सणावारांना बनणारे विशिष्ट पदार्थ आहेत. गणपतीला उकडीचे नसून तळलेले मोदक आम्ही नैवेद्यास बनवतो. पहिल्या दिवाळीला जावयाला तर चक्क बांगड्याचे दोडक खायला घालतात.

​​​​​​​​डाळी खाऊन कंटाळा आला की तांबोळी म्हणजे खोबरे वाटण हा एक प्रकार आम्ही भाताबरोबर खाण्यास बनवतो. हिंगाची, कांद्याची, दोडकीच्या सालांची, ओव्याच्या पानांची तांबोळी झक्कास चव आणते. उडीद मेथी, बटाटा सोंग, ओडी आंबट, अननस फणसाची भाजी हे खास कोकणी पदार्थ आहेत. तोंडी लावण्यास कैरीचे गोड़ लोणचे असले की जेवणाची लज्जत वेगळीच येते. ओडी म्हणजे सांडगे, कोकम, तिरफळ ह्या गोष्टी प्रत्येक सारस्वताच्या घरी नक्की सापडणारच.

जन्मापासून आईच्या हातच्या ह्या सर्व पाककृती खाऊन लग्न झाल्यावर माझ्या सासूबाईंकडूनही काही नवीन पाककृती शिकून आमच्या सारस्वत जेवणाचा वारसा मी पुढे चालू ठेवला आहे. मला निरनिराळे पदार्थ शिकून ते खाऊ घालायचा छंद आहे. मी खाद्यप्रेमी असल्याने सर्व जातीचे पदार्थ खाते आणि नव्याने शिकून बनवते पण आमची सारस्वत खाद्यसंस्कृती मी त्याबरोबर अजूनही जपून आहे. कितीही महागड्या हॉटेल मध्ये जेवलं तरी घरच्या भाताला जी चव आहे ती कुठेच मिळणार नाही.

काय मग आवडलं का आमचं सारस्वती खाद्यपुराण ?? तोंडाला पाणी सुटलं ना ?? सांगितलंच होतं मी तुम्हाला भूक लागल्याशिवाय राहणार नाही.
||इति श्री सारस्वती खवय्येगिरी संपूर्णम ||


- श्रध्दा सोहोनी

 ​​​​​​

1 टिप्पणी: