- ममंसिं वार्ता -

गणेशोत्सव २०१५

सकाळी गणेशाचे आगमन उत्साहात आणि इतमामात पारंपरिक पद्धतीने झाले. सकाळ - संध्याकाळी आरती आणि प्रसाद या स्वरूपाने गणपतीबाप्पाची सेवा नित्यनेमाने करण्यात आली.

१७ सप्टेंबरला संध्याकाळी अभिजात मराठी साहित्याचा आस्वाद देणारा कार्यक्रम "जे जे उत्तम" सादर करण्यात आला; विषय होता - ग्रामीण साहित्य. लहान मोठे मिळून १४ सभासदांनी ह्यात भाग घेतला.

१८ सप्टेंबरची संध्याकाळ रंगली ती "काव्यस्वरांजली" ह्या अनोख्या कार्यक्रमाने. शब्दगंधींच्या निवडक गेय कवितांना स्वरगंधींनी चाली लावून, या कवितांचे सुंदर गाण्यांत रुपांतर केले व ही गाणी सादर केली गेली काव्यस्वरांजली या कार्यक्रमात. एवढेच नव्हे तर या सुश्राव्य गाण्यांची ममंसिं ने सीडी तयार केली आहे जिचे नाव आहे 'अद्वैताची गाणी.' ही सीडी आपणास हवी असल्यास कृपया feedback@mmsingapore.org वर लिहा.

१९ सप्टेंबर च्या संध्याकाळी रंगला आपला सगळ्यात जिव्हाळ्याचा कार्यक्रम - आपल्या स्थानिक कलाकारांच्या 'विविधगुणदर्शनाने' दरवर्षी गणेशोत्सवाला एक वेगळीच रंगत येते आणि ममंसिं हे आपलं मंडळ आहे, आपली संस्था आहे याची सगळ्यांना पुनश्च खात्री पटते.

२० सप्टेंबर रविवारची सकाळ ही खास अथर्वशीर्ष सहस्रावर्तनांसाठीची. दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी साधारण ५० ते ६० भाविकांनी पठणासाठी हजेरी लावली आणि सालाबादप्रमाणेच 'वरण भात तूप लिंबू मोदक' अशा मराठमोळ्या प्रसाद-भोजनाचा आस्वाद सगळ्यांनी घेतला. या छोट्याश्या कार्यक्रमाला एक खास भेट लाभली ती सिंगापुरात नव्यानेच आलेल्या श्री चंद्रकांत संत यांच्या सुरेल बासरी वादनाची. बासरीचे सूर झंकारले, कार्यक्रमाचा माहौलच काही वेगळा झाला. या अनपेक्षित पर्वणीने भाविकांची मने उल्हसित झाली.

२० सप्टेंबरला संध्याकाळी पुण्याहून पाचारण केलेल्या श्री योगेश सोमण यांनी संत तुकारामांच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या प्रसंगांवर आधारित 'आनंदडोह' हा कार्यक्रम सादर केला. इथे त्यांचा हा २२५ वा प्रयोग झाला. यात सोमण संत तुकाराम व त्यांची पत्नी अवली या दोघांच्याही भूमिका अत्यंत उत्कटतेने साकारतात. तुकारामांनी आपले अभंग जेव्हा इंद्रायणी नदीत सोडले त्यावेळची त्यांच्या मनातली खळबळ, तथाकथित धर्मरक्षकांविषयी त्यांचे विचार, तुकारामांची पत्नी अवली यांचा वरकरणी बोलभांड स्वभाव परंतु मनात पतीच्या कौतुकामुळे होणारी त्यांची घालमेल ही सगळी रूपं श्री योगेश सोमण अतिशय ताकदीने उभी करतात. त्यामुळे प्रेक्षकांना ही मेजवानी न वाटल्यास नवल. कार्यक्रमाला साधारण २५० लोकांची उपस्थिती होती.

२१ तारखेला ढोल-ताशाच्या मिरवणुकीत , लेझीमच्या तालावर बाप्पाला गाजावाजात निरोप देण्यात आला.

गणेशोत्सवाची सांगता "रंग माझा वेगळा" या सुवर्णा आणि केतकी माटेगावकर या गुणी मायलेकींच्या कार्यक्रमाने झाली. सुरवातीपासूनच आपल्या गोड आवाजाने दोघींनी प्रेक्षकांना मोहवून टाकले . अनेक once more आणि टाळ्या घेत कार्यक्रम सादर झाला. पराग माटेगावकर यांच उत्तम निवेदन, synthesizer वरील साथ आणि प्रसाद जोशी याची तालवाद्यांची साथ यामुळे कार्यक्रमाला वेगळीच रंगत आली. आपले स्थानिक कलाकार अक्षय अवधानी आणि प्रसन्न पेठे यांनीही अनुक्रमे synthesizer आणि side rhythm ह्या दोन्ही बाजू छान सांभाळल्या.

राजश्री लेले


दूर देशीही नांदे माझी मराठी आनंदे

महाराष्ट्र राज्य भाषा संचालनालयाकडून आलेल्या आवाहनानुसार "मुलांच्या मराठी भाषा - स्पर्धा" घेण्याचं ठरलं व तशी घोषणाही गणेशोत्सवात करण्यात आली. परदेशस्थ आणि तीदेखील या सहस्रकात जन्मलेली मुलं - हा संदर्भ लक्षात घेऊन तीन वयोगटांकरिता स्पर्धांचा आराखडा ठरवला. स्वपरिचय, शब्दसंपत्ती, भाषण, निबंध-लेखन यांसहित श्लोक, कविता, गीत व दृक - श्राव्य माध्यमां चा वापर करून स्पर्धकांना आवडेल असा आराखडा बनवण्याचा प्रयत्न होता. त्यात हेतुपुरस्सर पालकांचा सहयोग राहील अशी योजना केली. सुदैवाने त्या साऱ्याला उत्साहाने प्रतिसाद मिळाला आणि ४० हून जास्त स्पर्धक नोंदवले गेले. मग "एकाच दुपारी" साऱ्या स्पर्धा घेऊन निकाल जाहीर करता यावेत यासाठी विशालच्या नेतृत्वाखाली अभिषेक, शिल्पा, मीनल, मोनाली, श्यामल, युगंधरा या प्रेमळ व सिद्धहस्त स्वयंसेवकांनी स्पर्धकांची व्यवस्था पाहिली तर राजश्री, कौस्तुभ, अस्मिता, स्मिता यांनी गुणांच्या आकडेमोडीचं काम केलं. जुई, अरुण व माधव यांनी परीक्षकाची जबाबदारी निभावली. सर्व स्पर्धकांना मंडळातर्फे खाऊ व प्रशस्तीपत्र देण्यात आलं तर विजेत्यांना भाषा संचालनालयाकडून आलेली प्रशस्तीपत्र के दिवाळीच्या कार्यक्रमांतर्गत प्रदान करण्यात आली.

माधव भावे

    पालवी गट


     मोहोर गट


     अंकुर गट


आगामी कार्यक्रम

नोव्हेंबर - Library Stock Taking

डिसेंबर - Audit

जानेवारी - ग्रंथालय दिन / संक्रांत, ममंसिं क्रीडास्पर्धा , आजीव सभासद सभा


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा