- संपादकीय -

नमस्कार, मंडळी!

ऋतुगंध शरदच्या काव्य - कवी विशेषांकात आपलं स्वागत.

उम्मीद होगी कोई

रात ढले वरना कोई आता नहीं

किस ने ये पुकारा?

असं गुलजार साहेबांनी जरी आशेवर लिहून ठेवलं असलं तरी काव्यप्रेमींना ते कवितेवरचंच वाटलं तर त्यात वावगं काय? याच प्रेरणेनी आम्ही काव्यविशेषांकाचं धाडस करायचं ठरवलं.

एक पूर्ण अंक कवितांवर काढायचा ही कल्पना आम्हांला सुरुवातीला आत्मघातकी वाटत होती. एक - एवढया कविता मिळतील का? दोन - कवींवर, कवितांवर कोणी लेख लिहील का? तीन - समजा आपण जुळवाजुळव केली तरी जे तयार होईल ते वाचकांना आवडेल का? अपेक्षेप्रमाणे वेगवेगळे अडसर आले आणि पारही झाले. कवितास्पर्धेला जोरदार प्रतिसाद मिळाला. पाच तरी कविता येतात की नाही इथपासून आपण २५ कवितांपर्यंत मजल मारली! स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व कवीमित्रांचं मनापासून अभिनंदन! पारितोषिक मिळणं - न मिळणं हा स्पर्धेच्या गंमतीचा भाग झाला. पण स्पर्धेसाठी कविता लिहिणं आणि पाठवणं हा प्रवास महत्त्वाचा आणि आपल्या परिवारातल्या कित्येक सदस्यांनी तो केला याचा आम्हांला अभिमान आहे. भारताबाहेर मराठी नुसती जिवंत नाही, कलावंत आहे हे हा उपक्रम आणि त्यातला सहभाग दाखवून देतो.

या अंकात तुम्हांला स्पर्धेत सहभागी झालेल्या कविता तर वाचायला मिळतीलच पण त्याचबरोबर स्पर्धेतर कविता आणि कवितेवरच्या कविताही तुमच्या भेटीला येत आहेत. शिवाय रॉय किणीकर, ग्रेस, कुसुमाग्रज, गदिमा, इंदिरा संत अशा दिग्गजांवरचे लेखही आहेत. एक कथाही आहे - कवितेभोवती फिरणारी! ममंसिं वार्ता, परिवार वार्ता याबरोबरच कथा, प्रवासवर्णन इत्यादिही आहेच. आणि या सगळ्या शब्दविश्वाला वेलबुट्टी आहे आपल्या छोट्या चमूच्या कलाकृतींची.

पुण्यातील कवयित्री आश्लेषा महाजन या आपल्या काव्यस्पर्धेच्या परीक्षक होत्या. त्यांची पंचवीसाहून अधिक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. कवितांबरोबरच त्या कथा, ललित, वैचारिक, बालसाहित्य, एकांकिका असे अनेक प्रकार हाताळतात. त्यांनी त्यांच्या परीक्षणात स्पर्धेतील कवितांमधील "आशय आणि अभिव्यक्तीचा स्तर उंच असल्याचे" नमूद केले आहे. आता शेवटचा टप्पा: तुम्हांला म्हणजे ऋतुगंधच्या सुजाण वाचकांना हा प्रयत्न कसा वाटतो ते पाहणे.

अंक जरूर वाचा. हा अंक लवकरच ऋतुगंधच्या ब्लॉग वरही येईल आणि तुमच्या प्रतिक्रिया तुम्हांला थेट कवी - लेखकांपर्यंत पोचवता येतील. त्यांना निश्चितच तुमच्या प्रतिक्रियांची उत्सुकता असेल; आम्हालाही आहे. त्यामुळे तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा.

या अंकानं तुम्हांला निखळ काव्यानंद मिळो आणि कवितेची आणि तुमची नाळ घट्ट जुळो ही शुभेच्छा!

आपली,
ऋतुगंध २०१५ समिती


ऋतुगंध २०१५ समिती 

नीतीन मोरे - संपादक 
जुई चितळे – सहसंपादक व मांडणी 
राजश्री लेले - जनसंपर्क 
अस्मिता तडवळकर - ऋतुगंध, ममंसिं संयोजक 
प्राची वर्तक - सजावट 
वेदश्री जठार - मुखपृष्ठ व सजावट 
यशोवर्धन जोशी - ऋतुगंध ब्लॉग संयोजक 

*** लेखांत व्यक्त झालेली मते ही पूर्णपणे संबंधित लेखकांची आहेत. महाराष्ट्र मंडळ सिंगापूर तसेच संपादक समिती त्यांच्याशी सहमत असेलच असे नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा