ऋणानुबंध

मुळात माणूस हा एक समाजप्रिय प्राणी आहे, म्हणूनच बरेच वेळा आपण आपले नातेवाईक, मित्र, मैत्रिणी आणि ओळखीची लोकं, ह्यांच्या पलीकडे काही नाती जपत आणि जगत असतो. कधी कधी जाणीवपूर्वक आणि कधी कधी नकळत. एक प्रकारचे आपलेपण आणि जिव्हाळा असतो त्या नात्यांमध्ये. नेहमी अशा नात्यांना नाव देता येणं शक्य होईलच असं नाही. ती नाती आपोआप घडतात, आपण स्वतः काही न करता. भर उन्हात फिरताना एक सावली मिळाली की तेव्हा जसा आनंद होतो तसा आनंद ही नाती देत असतात. अपेक्षांचं ओझं नसतं आणि पुढे काय असे प्रश्न ही नसतात. 

लहानपणापासून मला व्यायामाची आवड आहे. पूर्वी ऑफिस सुटल्यावर रोज मी संध्याकाळी जॉगिंगला जायचे. मला अगदी नवल वाटायचं की बरोब्बर तीच लोकं त्याच वेळेला आपल्याला दिसतात. तशाच लोकांमधील हे एक 'काका'. थोडे बुटके, पांढरे केस आणि फ्रेंच बिअर्ड असलेले, साधारण पंचावन्न ते साठ वयाचे असतील. कायम उत्साहात, चेहेऱ्यावर एक स्मित हास्य आणि गोल मोठा चष्मा घातलेले, असे हे एक काका. रोज मी किती पळते ह्यावर त्यांचे फारच लक्ष असायचे. सुरवातीला मला रागच यायचा की हे काका असे का बघत बसतात? ह्यांना काय करायचय, मी कितीही पळीन किंवा एखाद दिवस पळणार सुद्धा नाही. एकदा मी पाळताना पडले, ते ह्या काकांनी पाहिलं. ते आले आणि त्यांनी मला आधार देऊन शेजारच्या चहाच्या टपरीजवळ बाकावर बसवलं, गुडघ्याला लागलं तिथे पाणी लावलं आणि चहा पण दिला. मग बोलताना जाणवले की त्यांच्यात काही आगाऊपणा नसून ते कौतुक आणि आश्चर्य वाटून पाहत असतात. आजही ते भेटले की बोलतात, हसतात आणि आमच्या मोजक्याच गप्पा होतात पण त्या सुद्धा नावीन चैतन्य देऊन जातात. कधी कधी मी किंवा काका एखाद दिवस आलो नाही तर लगेच दुसऱ्या दिवशी विचारपूस होते. गम्मत म्हणजे आम्हाला अजूनही एकमेकांची नावं माहित नाहीत. आम्हाला त्याची कधीही गरजच वाटली नाही. आजही फिरायला गेले की ते काका त्याच वेळेस फिरायला येतात. ते नेहमीप्रमाणे विचारतात "आज किती पळालीस गं?" तसं ह्या काकांचं आणि माझं काहीही नातं नाही पण ते अपोआप मनानी जोडलं गेलंय. 

एकदा पुण्यात हॉटेल मध्ये गेले असताना मला एक शाळेतली मैत्रीण दिसली. ती माझ्या वर्गातली माझी मैत्रीणच आहेना हे पाहण्यासाठी मी थोडी पुढे येऊन नीट पाहिले. त्याच वेळी तीने ही मला पाहिले आणि माझ्याकडे पाठ वळवली. मला ही गोष्ट फारच लागली कारण शाळेत आमची चांगली ओळख होती. तब्बल दहा वर्षं आम्ही एकत्र होतो. शाळेत असताना आणि नंतर सुद्धा आमच्यात असे काही भांडण किंवा गैरसमज झाले नव्हते. तेव्हा मला फार वाईट वाटले पण मग नंतर लक्षात आलं की काही नाती काळाच्या ओघात बदलतात.

अजून एक असाच अनुभव आला. पुण्यात गेलो रहायला की दरवेळेस आमची एक कौटुंबिक सहल असते. तसे ह्या वेळी आम्ही केळशी या छोट्याश्या टुमदार कोकणातल्या गावात गेलो. गाव अगदी छोटे आहे आणि तिथे जाणारा रस्ता तर अगदी अरुंद आहे. आम्ही ज्यांच्याकडे राहिलो, त्यांनी त्यांच्या घराचा वरचा मजला भाड्यानी दिला आहे. समोर नारळाची मोठी बाग, त्यात दोन विहिरी आणि त्यापुढे स्वच्छ समुद्र. हे सगळं आपल्याला झोक्यावर डोलत पाहता येतं. समुद्रावर जाऊन आलो की अंघोळीसाठी गरम पाणी असायचे. तिथे आजही चुलीवर स्वयंपाक करतात. आम्ही तिथे दोन दिवस होतो. अगदी ताज्या भाज्या आणि मासे, त्या शिवाय रोज एक गोड़ पदार्थ असे गरम गरम जेवण. गोड़ पदार्थात कधी आमरस तर कधी उकडीचे मोदक असे चविष्ट पदार्थ खाऊ घालायचे. ते खूप आग्रहानं आणि आपुलकीनं खायला घालायचे. भाज्यांना एक छान चव आसायची कारण प्यूअर ऑरगॅनिक फूड! पैसे भरायची वेळ आली तेव्हा वाटलं आता बरेच पैसे द्यावे लागणार पण आमच्या अपेक्षेपेक्षा निम्मेच पैसे भरावे लागले. त्यांनी त्यांचे घरगुती पदार्थ, पापड, लोणची, आमरसाच्या बाटल्या वगैरे अतीशय स्वस्त दारात आम्हाला विकल्या. कधी कधी ५-स्टार हॉटेल मध्ये जाऊन सुद्धा आपल्याला सर्विस चांगली न मिळाल्याने ते हॉटेल आपल्याला आवडत नाही. इथे ह्या लोकांनी अगदी आपलेपणानी सगळं केलं, हे आमच्या मनाला खूप भावलं. त्यांचा तोच आपलेपणा आणि प्रेम ह्यानी आमचं एक वेगळ नातं तयार झालं. अश्या निसर्ग रम्य ठिकाणी आपुलकीचे असे दोन दिवस आमच्या मनात कायमचे कोरले गेलेत.

माझ्या बाबांचा कायम लोकांना मदत करण्याचा स्वभाव होता. घरी येणाऱ्या लोकांना तर ते मदत करायचेच पण काही इतर लोकांना सुद्दा आर्थिक शिवाय कष्टानी मदत करायचे. हॉस्पिटल मध्ये कोणीही ऍडमिट असेल तर त्यांना डबा नेऊन देणे, वृद्ध लोकांबरोबर वेळ घालवणे आणि इतर वेळेस गरजू लोकांना स्टेशनवर, बस स्टॉपवर किंवा इतर कुठेही सोडणे, ते करायचे. त्यांना मी कारण विचारलं की म्हणायचे, "असतील गं काही ऋणानुबंध". काळाच्या ओघात काही नाती विसरली जातात तर काही पुसट होत जातात, काही नात्यांचे संदर्भ बदलतात तर काही नव्याने तयार होतात. ह्यालाच म्हणतात का ऋणानुबंध? आता हेच पहा ना, आपल्यात सुद्धा 'लेखक' आणि 'वाचक' हे नातं बनलच की नाही?


- संचिता साताळकर


३ टिप्पण्या: