जिकडे तिकडे चोहीकडे

मानवाला जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा या गोष्टींची अत्यंत आवश्यकता असते. त्याप्रमाणे मनाची  'करमणूक' करण्याचीही नितांत गरज असते. मन आनंदी असेल तर शरीर निरोगी राहते. विविध कलागुण व्यक्त करणे हे मानवी जीवनाचे निरोगीपणाचे लक्षण आहे. पण आजच्या यांत्रिक युगामध्ये प्रत्येक गोष्ट यंत्राव्दारे केली जाते,  त्यात 'करमणूक' ही आलीच.

मग 'करमणूक'  म्हणजे काय? माझ्या मते जी गोष्ट केल्यावर मानवाला निखळ आनंद मिळतो, मन, शरीर उत्साही व टवटवीत होते ती गोष्ट म्हणजे 'करमणूक'. 

उत्तम करमणूक होण्यासाठी आपल्याकडे अनेक गोष्टी उपलब्ध आहेत. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती. त्यामुळे घरात भरपूर माणसे असत. सर्व भावंड मिळून गप्पागोष्टी, दंगामस्ती, खाणे, खेळणे होत असतानाच भरपूर 'करमणूक' घरातच होत असे. शाळा, अभ्यास या व्यतिरिक्त शाळेतही अनेक स्पर्धा, खेळ व्हायचे. मोकळ्या हवेत मैदानी खेळ खेळल्यामुळे शारिरीक व्यायाम तर होत असे पण त्याचबरोबर मन व शरीर उत्साही रहात असे. मनाची एकाग्रता व बुध्दीला चालना मिळण्यासाठी बुध्दीबळ, कॅरम या सारख्या अनेक स्पर्धा होत असत. या व्यतिरिक्त घरातही लहानमोठ्यां सोबत अनेक बैठे खेळ खेळले जायचे. यात कधी गाण्याच्या भेंड्या, पत्ते, सागरगोटे असे खेळ खेळले जात. लहान मुलींचा आवडता खेळ म्हणजे भातुकली. या खेळामधूनच मुलींना पुढील आयुष्यातील गोष्टीची माहिती होत असे. कळत नकळत सर्वांच्या सहवासातून मुलांवर उत्तम संस्कार होत असत.

उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या गावाला जाणे ही हक्काची करमणूक होती आमची. सख्खे, चुलत, मावस असा कुठला ही भेदभाव कधी घरात होत नसे. बारव, कालवा मध्ये पोहणे, कैऱ्या, चिंचा पाडणे, पोहायला जाताना मीठाची पुडी हमखास खिशात असायची. आंब्याच्या झाडाच्या कैऱ्या गुपचुप तोडून खाण्यात किती आनंद मिळतो, हे अनुभवल्या शिवाय कळणार नाही. मुलं दंगामस्ती करत कालव्यात उड्या मारत मनसोक्त पाण्यात डुंबत असत. घरी सर्वजण एकत्र आल्यामुळे खाण्यापिण्याचा मस्त बेत केलेला असायचा. रानमेव्याची चव जिभेवरची संपते न संपते तोच घरी आल्यावर विविध पक्कवानांचा स्वाद यथेच्छ घेतला जाई. अशा या सुंदर जीवनात यापेक्षा अजून कोणत्या वेगळ्या करमणुकीची गरज आहे? सर्वाच्यां सहवासात उन्हाळ्याची सुट्टी केव्हा संपून जायची ते आम्हाला कळायचे सुध्दा नाही.

बघता-बघता पावसाळा सुरू व्हायचा. श्रावणाची चाहूल लागताच मन आनंदाने नाचू लागले की "हासरा नाचरा, जरासा लाजरा। सुंदर साजिरा श्रावण आला " असे गाणे आपोआप ओठी येत असे. अचानक कोसळणाऱ्या श्रावणसरी, भिजलेल्या मातीचा सुगंध, हिरवा शालू नेसून सज्ज झालेली धरणी, ढगांची लपाछपी आणि या ऊनपावसाच्या खेळानंतर अचानक होणारे इंद्रधनुष्याचे दर्शन .आहाहा!! किती आल्हाददायक वातावरण असते श्रावणात. जिकडे तिकडे चोहीकडे, आनंदी आनंद गडे! अशा वेळी पावसाळी सहलीचा आनंद घेणे, यासारखी दुसरी करमणूक नाही. अशा सहलीमुळे निसर्गाशी हितगूज साधता येतेच पण शरीर व मनला टवटवी येते, अशा वातावरणामध्ये खंडाळ्याचा घाट बघण्याचा मोह कोणाला होणार नाही? मग आठवण येते ती हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट। सांग ग दिसतो कसो खंडाळ्याचा घाट! अशा निसर्गरम्य सहलीचा आनंद घेणे ही एक चांगली करमणूक होऊ शकते.

श्रावणातील अनेक सण, व्रतवैकल्ये साजरे करताना आपली करमणूक होऊ शकते. त्याबरोबरच आपल्या संस्कृतीची जोपासना केली जाते. गणपतीच्या दहा दिवसात गणेश स्थापना, सजावट, आरती, पंचखाद्य व मोदक अशा प्रसादाची स्वादिष्ट चव चाखायला मिळत असे. पूर्वी या दिवसात करमणुकीसाठी अनेक ठिकाणी संस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असे. या दहा दिवसातील मुख्य करमणूक म्हणजे "मेळे" मोठ्या स्टेजवर विविध संस्कृतिक कार्यक्रम, नाटक, नक्कल, डान्स असे तीन तासाचे मनोरंजन केले जायचे. कुटुंबासमवेत मेळे बघायला खूप मजा येत असे. बाळगोपाळांसाठी सर्कस बघायला जाणे ही एक करमणूक होती त्यावेळी. सर्कशीतले प्राणी, जोकर बघून मुलं खूश व्हायची.

गणपती नंतर येणारा मोठा सण म्हणजे दसरा! "दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा" तो आपट्यांची पान  सोनं लुटून साजरा होत असे. यानंतर दिवाळीची तयारी सुरू व्हायची. दिवाळीच्या निमित्ताने सर्व विखुरलेल्या कुटुंबातील व्यक्ती आवर्जून  गावी एकत्र येत असत. सर्वजणांसाठी ही करमणूक म्हणजे पर्वणीच असे. थंडी असली तरी सकाळी लवकर उठून उटणे लावून अभ्यंगस्नानं करत, मोती साबण, सुवासिक तेलाचा सुगंध मन कसे प्रसन्न व्हायचे. दिवाळीसाठी सर्व फराळ हमखास घराघरात बनवत असे. आकाश कंदील, मातीचा किल्ला बनवणे, दारी रांगोळी काढणे, दिव्याची रोषणाई हे सर्व करताना कलागुणांना वाव मिळत असे. नवीन कपड्यांची  खरेदी केली जात असे. नवीन कपडे घालून फटाके फोडणे ही सर्वात आवडती करमणूक लक्ष्मी पूजन केल्यावर छोटे फटाके, कनकावळे, भुईनळे, चक्र, फुलझडी अशा फटाक्याने पिशवी भरून जायची. सर्व भावडांमध्ये समप्रमाणात फटाक्याची वाटणी होत असे. हा आनंद साजरा केल्यावर भावडांना ओवाळून झाल्यावर मिळणाऱ्या दहा, पाच रुपयांचा आनंद तर शब्दात वर्णन करता येणार नाही. त्यावेळी एका रुपयाला सुद्धा चांगली किंमत होती. एवढे आनंदाचे क्षण आयुष्यात असल्यावर वेगळी काय पाहिजे आपल्याला करमणूक?

त्यावेळी ग्रामदेवतेची जत्रा भरत असे. अशा जत्रेचा आनंद लुटणे ही त्याकाळी चांगली करमणूक होती. रहाट पाळणे, वेगवेगळ्या ठिकाणी बसून फोटो काढणे, लहानसहान वस्तूची खरेदी करताना मनस्वी आनंद होत असे. बुढ्ढी के बाल, गोडीशेव, रेवड्या, भेळभत्ता खाण्याची खरी मजा तर जत्रेतच घ्यावी. यासारखी दुसरी करमणूक म्हणजे जादूचे प्रयोग. बाळगोपाळांची हे आवडती गोष्ट आहे.

सर्वांत महत्त्वाची व सर्वांना कधीही करता येणारी करमणूक म्हणजे वाचन. "वाचाल तर वाचाल" हे आपणा सर्वांनाच माहिती आहे. वाचन, लिखाण हे करमणूकीचे उत्तम साधन आहे. ज्ञान संपन्न व माहिती समृध्द समाज घडण्यासाठी वाचन करण्याची नितांत गरज आहे. वाचन केल्याने व्यक्तिमत्व विकासा बरोबरच भाषा सुधारण्यास मदत होते. पुस्तकाबद्दल ओढ निर्माण होऊन तो आपला सच्चा मित्र बनू शकतो. आजकाल अनेक ठिकाणी वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी वाचकमंच, वाचनकट्टा यासारखे उपक्रम राबवून आवड व महत्व समाजात रूजविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आपल्या आयुष्यात वाचन ही सर्वात "अनमोल करमणूक" आहे. हळूहळू या सर्व गोष्टी मागे पडत चालल्या आहेत. तरी आपण सर्वांनी यात्रिंक करमणुकीच्या मागे न लागता इतर गोष्टींची आठवण ठेवून आपली "संस्कृति  व करमणूक" याचे जतन करावे, हीच अपेक्षा आहे.

- प्रतिभा विभूते


२ टिप्पण्या:

  1. नमस्कार
    मी नागनाथ विभूते, पुणे.
    प्रतिभा ताई तुमचा लेख वाचला.गावाकडच्या आठवणी ताज्या झाल्या.सोलापूर ला असताना आम्ही खूप धम्माल करायचो.तुम्ही सांहितवेले सर्व खाऊ खायचो,दिवाळी तर विसरूच शकत नाही.
    हे सर्व वाचून तुमचे गाव कोणते होते याची उत्सुकता लागली आहे.
    माझा व्हाट्सअप नं +91 96 65 59 90 05
    आहे.विभूते नागनाथ,

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. धन्यवाद!
      मी लासलगाव जवळ विंंचूर हे माझे मूळ गाव आहे.पण लग्नानंतर आम्ही नाशिक ला राहत होतो.या पूर्वी ही माझे लेख ऋतूगंध मध्ये आले आहेत.आपल्या प्रतिक्रिया बद्दल परत एकदा धन्यवाद!

      हटवा