- फक्त लढ म्हणा!! -

"ओळखलंत का सर मला?” पावसात आला कोणी,
कपडे होते कर्दमलेले, केसावरती पाणी......’

कवी कुसुमाग्रजांची ही कविता गेले कित्येक वर्षं मनात घर करून आहे. ही कविता पहिल्यांदा वाचली तेंव्हा मी ७ वर्षांची होते. कवितापठणाच्या स्पर्धेसाठी माझ्या आज्जीने पाठ करून घेतली होती. त्या चिमुरड्या वयात ह्या कवितेचा अर्थ मला फारसा कळला नाही.

‘क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून :
गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून
माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली
मोकळ्या हाती जाईल कशी - बायको मात्र वाचली’

नाशिकमध्ये राहत असल्यामुळे “गंगामाई” म्हणजे आपली “गोदावरी” एवढे कळायचे आणि डोळ्यासमोर यायचा तो म्हणजे सोमेश्वरचा परिसर. कविता म्हणताना मनात एक चित्र निर्माण व्हायचं. सोमेश्वराच्या जवळची नदी, त्याच्या शेजारी एक छोटं टुमदार घर. एक दिवस गंगामाईने ठरवले की या घरात शिरायचे आणि त्या घरातून हवी ती वस्तू घेऊन यायची, जशी मी आजीकडे जाऊन आणायचे तशी. आणि आणता आणता चुकून घराला धक्का लागून ते घर पडले. तेंव्हा पूर येणे, त्याची भीषणता ह्याची कल्पनादेखील नव्हती. नदी अशी घरात शिरेलच कशी ह्या विचाराशीच माझी कल्पनाशक्ती थांबायची.

एके वर्षी दुर्दैवाने नाशिकमध्ये पूर आला आणि त्या कवितेतील गंगामाईच्या भेटीची भीषणता मला पहिल्यांदा जाणवली आणि 'कणा' परत एकदा मनावर परिणाम करून गेली. ह्या वेळी मला तिचा अर्थ कळत होता आणि त्या पुरामुळे आलेला भकासपणा मनाला घरे पडत होता.
‘भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले,
प्रसादापुरते पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले’

आणि जाणवत होती त्या इसमाची परिस्थिती. माझे मन त्याच्या बरोबरीने तुटत होते.

‘कारभारणीला घेउन संगे, सर आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे’

त्या इसमाचा मनोनिग्रह माझं मन हेलावून गेला. त्याच्याबरोबर माझा पण परिस्थितीशी लढायचा निग्रह वाढत गेला.

मागच्या वर्षी मी मुंबईला गेले होते तेंव्हा एका खास कॅफेला भेट देण्याचा योग आला. ह्या कॅफेचे वैशिष्ठ्य म्हणजे ही कॅफे असिड हल्ल्याला बळी पडलेल्या मुली चालवत होत्या. वर्णनावरून वाटावं की आतले वातावरण कदाचित उदास असू शकेल. ह्या मुलींनी जे सहन केले आहे त्यानंतर कोणीही हाच विचार करेल. पण आत शिरताच तिथले वातावरण वेगळे आहे असे जाणवते. भाजलेले चेहरे, नसलेले डोळे, कान ह्याची पर्वा न करता त्या मुली चेहऱ्यावरच्या स्मितहास्याने सगळ्या कॅफेला उजळून टाकत होत्या. त्यांचा उत्साह बघून कोणाचाही उत्साह वाढेल. त्यांच्या ह्या वृत्तीचे मला कौतुक वाटले. “काय घेणार तुम्ही? आमची कॉफी खूप छान असते.” सरिताने मला विचारलं. तिच्या चेहऱ्यावरच्या त्या सहज हास्याने मी स्तिमित झाले.“कसं करता तुम्ही हे सगळं इतक्या हसतमुखाने?" न राहवून मी विचारलं. ती हसली. कदाचित हा प्रश्न विचारणारी मी पहिलीच व्यक्ती नव्हते.

“काय आहे ना ताई, नियतीपुढे माणसाचं फार काही चालत नाही. आपण फक्त दोनच गोष्टी करू शकतो एकतर परिस्थितीवर रडत बसू शकतो किंवा ती परिस्थिती स्वीकारून तिच्याशी लढू शकतो. आपला “कणा” शाबूत आहे तोपर्यंत आपण सगळ्या आपत्तींना तोंड देऊ शकतो. हा विद्रूप झालेला चेहरा घेऊन लोकांची सहानभूती नकोय आम्हाला. आम्हाला फक्त ह्या समाजाने सर्वसाधारण माणूस म्हणून स्वीकारायला हवे आहे. ह्या कॅफेने आम्हाला स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवले आहे. मानाने आयुष्य जगतोय आम्ही. अजून काय हवं!!” एवढं बोलून ती परत जायला निघाली आणि सहज वळून म्हाणाली “मी ती कॉफी आणतेच तुमच्यासाठी, नक्की आवडेल तुम्हाला.” ती मागील दारात गायब झाली आणि माझ्या डोळ्यासमोर तरळत राहिल्या ह्या काही ओळी....

‘खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा,
पाठीवरती हात ठेऊन, फक्त लढ म्हणा!
फक्त लढ म्हणा!’
- सौ. सई वैद्य

२ टिप्पण्या: