गुंड्याभाऊची परदेशवारी!

“प्रथम व्हा बरे, आणि मगच या माझ्या कचेरीत, नाहीतर तुम्ही कराल इतरांनाही आजारी” अशी तंबी साहेबाने दिल्यामुळे मी त्या दिवशी घरीच होतो. दोन-तीन दिवस मला थोडा ज्वर होता आणि अशक्तपणा आला होता. मला वैद्यांनी सांगितलेले पथ्यही अगदी कसोशीने पाळत होतो. त्यामुळे मला नेहमीचे जेवण न मिळता माझे जेवण फळे आणि भाताची पेज एवढ्यावरच भागवण्यात येत होते. हेच माझ्या अशक्तपणाचे कारण आहे असे मी सांगून थकलो पण काही फरक पडला नाही. शेवटी मी मुमुक्षुचा नवा अंक वाचायला घेऊन गुंड्याभाऊची वाट बघत बसलो.

आज गुंड्याभाऊ यायचा होता. पुणे शहर आणि चीनमधील बीजिंग ह्यामध्ये मैत्री करार करून दोन्ही शहरांमधील किडे आणि इतर छोटे प्राणी ह्यांची विल्हेवाट लावण्याच्या व्यवस्थांचा तौलनिक अभ्यास करण्यासाठी पुण्यातून एक शिष्टमंडळ जाणार होते. त्यामध्ये आमच्या विशेष परिचयाचे आणि पुण्यातील नावाजलेले विद्वान प्रो. हवालदार ह्यांचा समावेश होता. परंतु ऐनवेळी मराठ्यांच्या घोड्यांना खरारा करायला नेमलेल्या राजपुतांच्या संदर्भातील काही नवीन कागदपत्रे उपलब्ध होण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे त्यांना तिकडे जावे लागले. तेव्हा त्यांच्याऐवजी शिष्टमंडळात गुंड्याभाऊची नेमणूक झाली. तिकडे मांसाहाराशिवाय दुसरा उपाय नाही असे कळल्यामुळे गुंड्याभाऊने बरोबर भरपूर शिधा आणि एक आचारी नेण्याची सूचना केली आणि ती मंजूर झाली. शिष्टमंडळ पुण्यातून मुंबईकडे निघाले. परंतु तो आचारी मात्र मुंबईमधून गायब झाला आणि त्याच्याशिवायच ते पुढे गेले. तेव्हा आता गुंड्याभाऊचा तिथे कसा निभाव लागतो ह्याच काळजीत आम्ही सगळे होतो.

पों पों असा आवाज आला. मोरू, मैना आणि बाकीचे धावत पळत बघायला गेले. ‘गुंड्याकाका आला’ असा गलबला करत परत आले. त्यांच्या पाठोपाठ सुमारे ४० पौंडाने कमी झालेला गुंड्याभाऊ आणि मागे त्याच्या ट्रंका घेऊन आमच्या आळीतला गाडीवाला मारुती, अशी मंडळी ओसरीपाशी आली. “आला का गुंड्या, केवढा वाळला आहेस! थांब हो जरासा” असं म्हणून आई आत गेली आणि एक भाकरीचा तुकडा घेऊन आली. तो त्याच्यावरून ओवाळून टाकल्यावर भाऊ आत आला. मुले त्याच्याभोवती नाचत होती. “तिकडे सगळी माणसं सारखीच दिसतात का रे काका? चीनी लोकं खरच किडे वगैरे खातात का रे?” “तू मला तिकडून काय खेळणी आणलीस रे गुंड्याकाका?” मोरू आणि मैनाने त्याला प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्यांना “आधी पोटपूजा आणि मग तुम्हाला सगळं सांगतो” असं म्हणून तो न्हाणीघरात गेला.

हात पाय धुवून झाल्यावर त्याने आधी स्वयंपाकघरात ठाण मांडले आणि म्हणाला “मावशी आणि वहिनी आधी पटकन काहीतरी जेवायला वाढा, कितीतरी दिवसात घरचं जेवलो नाहीये. तिथे फक्त भात आणि कलिंगड खावं लागलं, दुसरा उपायच नव्हता. तिथली सगळी लोकं अभक्ष्य भक्षण करणारी!” तेवढ्यात बाहेर मला मारुतीने माहिती पुरवली, “येताना सान्यांच्या हॉटेलात गेलो होतो आम्ही. एक घंटा आत होतो. त्यांच्याकडे तयार असलेले सगळे पदार्थ संपवूनच आलोय.” अर्थात गुंड्याभाऊला ओळखणाऱ्या लोकांसाठी काही हे नवीन नाही. सकाळच्या तालमीनंतर सान्यांकडे यथेच्छ ताव मारून एखाद्या लग्नाच्या नाहीतर मुंजीच्या पंगतीत जिलब्यांचे चवड उठवण्याची सवय आहे त्याला. मी त्याच्या आरड्या-ओरड्याकडे फारसं लक्ष न देता पुन्हा मुमुक्षु वाचायला सुरुवात केली. मुले त्याच्या ट्रंका उघडून आतल्या जिनसांचा पसारा करत होती. त्याची मावशी आणि भावजय मात्र गहिवरून जाऊन स्वयंपाकाला लागल्या होत्या. एरवी कुठल्याही गोष्टीवर एकमत न होणार्‍या त्या दोघी गुंड्याभाऊचे आहारविषयक लाड पुरवण्यासाठी मात्र जोडीने तयार असतात. सुमारे पाऊण तासानंतर तो भरलेल्या पोटावरून हात फिरवत बाहेर आला आणि लवंडला.

मी मोरूला पाठवून त्याच्या वडिलांना म्हणजे धोंडोपंतांना निरोप पाठवला. थोड्या वेळाने ते आले. गुंड्याभाऊ उठून चूळ भरेपर्यंत त्याच्या हातात चहाची कप-बशी देऊन ही त्याला म्हणाली, “आता मात्र आम्हाला तिकडच्या गमती सांगा भावोजी.” मी पण म्हणालो, मुलांनीही री ओढली. धोंडोपंत तिथेच सुपारी कातरत बसले होते. आई आतून येऊन खुर्चीवर बसली. हिने मोरूला सांगून तिची मैत्रीण गुलाब दिघेला बोलावून घेतले. अशी एकूण श्रोते मंडळी जमल्यावर गुंड्या रंगात आला आणि सांगू लागला.

( क्रमशः )

- शेरलॉक फेणे

1 टिप्पणी:

  1. लेखकाचे नाव शेरलॉक फेणे असल्यावर कथा excellent आहे म्हणावे की नुसतेच 'ttok' म्हणावे कळले नाही तरी कथाभाग फारच
    छान जमलाय हे मात्र नक्की कळले!

    उत्तर द्याहटवा