अन्नदात्री सुखी भव!

हा ऋतुगंध लेखाचा विषय इतका जवळचा आहे ना की लेखणी घ्यावीच लागली. काय लिहावं आणि काय नाही असं झालयं. पण मी माझ्या गमती जमती नक्कीच सांगेन इथे!

लग्नाआधी स्वयंपाक आणि माझा तसा फारसा संबंध नव्हता. मला काही मोजकेच, काम चलाऊ पदार्थ करता येत होते, उदा. तांदळाच्या पिठाचे कुरकुरीत घावन, उकडलेल्या बटाट्याची पिवळी भाजी, तांदूळ आणि नाचणीची भाकरी, ओल्या खोबऱ्याची चटणी, वरण-भात, पुरी आणि, अगदी महत्वाचं, चहा!

पण लग्नानंतर वेगवेगळ्या पदार्थांची ओळख झाली आणि नवरा आवडीने सर्व खातो हे समजल्यावर तर काय मी पार सुटले. हळूहळू उपमा, केळं घालून शिरा, थालीपीठ, तळणीचे मोदक असे पदार्थ करायला शिकले. आणि ते वारंवार करते सुद्धा.

ही आवड मला आपसूकच लागली; आपणहून प्रयत्न्न नाही करावे लागले. मुळात माझा स्वभाव सर्व वाटून खाण्याचा… त्यामुळे आपण केलेला एखादा पदार्थ कोणाला आवडला की खूप छान वाटायचं… पुन्हा नवीन नवीन गोष्टी करण्याची आवड निर्माण झाली. ही आवड मी आजही जपते. सुरुवातीला माझे बाबा (सासरे) मी केलेल्या प्रत्येक डिशला “वा छान”, असं म्हणायचे. पण मग स्वतः ते खाल्ल्यानंतर कळायचं की आपण किती पाण्यात आहोत. पण मी मनाशीच ठरवायचे की पुढल्या वेळी अजून छान करूया. पण जेव्हा आई (सासूबाई) म्हणायच्या ना की भाजी किंवा वरण छान झालंय, तेव्हा खूप हायसं वाटायचं. आपण नक्कीच छान केलंय हे १००% पटायचं.

हळू हळू ही आवड माझा छंद झाला. सिंगापूरला आल्यावर तर काय हा छंद आणखीनच अधिक जोपासला गेला. मैत्रिणी जमून कधी भेळ, मिसळ, कधी उकडीचे मोदक तर कधी पाव भाजी! कधी कधी तर नुसता चहा! मला आठवतंय मी घरून काम करायचे आणि एका मैत्रिणीने सहज फोन केला मी म्हटलं, “ये ना चक्कर टाक घरी. मस्त आल्याचा चहा करते”. ती हे ऐकूनच इतकी खुश झाली मला म्हणे, “Thank you राणी, येतेच लगेच”! बस्स, मला काय हवं होतं अजून? ती आल्यावर मस्त गप्पा आणि कट्ट्यावरच्या चहाचा आस्वाद घेता आला. 
एखादा पदार्थ मी आपसूकच वेगळ्या पद्धतीने करायचा प्रयत्न करू लागले. बऱ्याचदा हा प्रयत्न असफल झाला पण मी त्यातही अजून काही छान करू शकता येईल का हा विचार करून दुसरा पदार्थ करायचे. त्यात भर म्हणजे आपली टेक्नॉलॉजी. यूट्यूब वर एक नाव टाकलं की सतराशे साठ रेसिपीज येतात. मग त्यातली सोपी आणि लवकर जी होणारी असते ती मी बऱ्याचदा निवडते. आणि बनवते. 

एक गम्मत आणि अनुभव सांगते. दूध नासवून त्यात साखर घालून खवा बर्फी करता येते हे पाहिलं. पण त्या दिवशी ते नासवलेले दूध थोडेसे आंबटच लागत होते. मी विचार केला साखर खूप जास्त घालावी लागेल आणि मग मिठाई अती गोड होईल. कोणीही न खाण्यापेक्षा मी सरळ एक कांदा, एक टोमॅटो, एक हिरवी मिरची, हिंग, धणे पावडर, जिरा पावडर, आमचूर पावडर आणि मीठ घालून पनीर भुर्जी केली. आंबट असल्यामुळे परत लिंबू पिळण्याची गरज नव्हती. त्यावर छान कोथिंबीर पेरून पानात वाढली. आणि सर्वांना आवडली. ही सगळ्यात आवडती डिश माझी. कारण दूध जरी नासलं तरी वाया न जाता इतकी स्वादिष्ट डिश तयार होते. अगदी ह्याच्या उलट अनुभव हल्लीच घेतला. 

श्रवणला खूप आवडणाऱ्या करंजा आईने पाठवलेल्या. त्या संपल्यानंतर साहेबांची डिमांड सुरु. वीकेंडला बनवल्या खऱ्या पण एक चूक केली: मैद्याच्या ऐवजी केक फ्लार वापरलं आणि झाली ना पंचाईत. त्या खुसखुशीत बनायच्या ऐवजी नरम झाल्या. आणि मला वेगळा शेरा मिळाला, “आई, करंजी छान झाली आहे, पण आजीने बनवली होती तशी नाही झाली”. ह्या वाक्यावर काय बोलू मला सुचेचना. त्याने दिलेली दाद इतकी मोजक्या शब्दात पण सकारात्मक होती. त्याच्या विचार शक्तीला वाहवा म्हणू की मला वाईट वाटेल म्हणून योग्य शब्दात दिलेल्या त्याच्या दादीला वाहवा देऊ कळेच ना!.

आता तर काय माझा चिरंजीव पण भारी खवय्या आहे!. एखाद दिवशी गोड नसलं जेवणात तर मला विचारतो, “आई, आज काहीच नाही का गं गोड बनवलंस?” आणि मग Drama King सारखे चेहरे
करतो. मग मलाच कसंतरी वाटतं… आणि त्याचं आवरेपर्यंत झटपट करता येईल अशी एक डिश डोक्यात आलेली असते. घरात ड्राय फ्रूट्स असतातच तेच अंदाजाने सीडलेस खजूर, काजू, बदाम, अक्रोड, वेलची पावडर एकत्र करून मिक्सरमधून काढते आणि पटकन लाडू वळते. लाडू डिश मध्ये ठेवते ना ठेवते तोच साहेब आमचं आवडत वाक्य बोलतात… “व्वा!something nice for me?” माझ्या चेहऱ्यावर हळूच हसू उमलतं आणि त्याचा चेहरा २ मिनिटं पाहत बसते. ही अजून एक माझी आवडती डिश.

अशीच दुसरी डिश म्हणजे दाण्याचे लाडू! चुकून कधी सकाळी लक्षात आलं नाही की आज काही विशेष आहे, प्रसाद दाखवायचा आहे, तर दाण्याचे लाडू हा उत्तम पर्याय आहे. कूट, गूळ आणि थोडीशी वेलची पावडर मिक्सर मधून फिरवून प्रसादासाठी लाडू रेडी!. माझ्याकडे सर्व प्रकारचे लाडू बनतच असतात: दाणे, ड्राय फ्रूट्स, हिरवे मूग, नाचणी, कधी कधी मोतीचुराचे पण!... कारण आवडीने खाणारा माझा लाडूच असतो ना!

काही जणांना वेग-वेगळ्या डिश खायची आवड असते पण मला वेग वेगळे पदार्थ स्वतः बनवून इतरांना खाऊ घालायला खूप आवडते. कित्येकदा माझं त्यानेच पोट भरतं. मग नवऱ्याचं वाक्य कानी पडत… “मीनल ना अमृत पिऊनच जन्माला आली आहे. तिचं पोट भरलं असेलच”!.
काहींना मात्र ह्या डिशचा फोटो बघूनच आस्वाद घ्यावा लागतो. हे काम फेसबुक ने खूप सोपं केलय.
एखादी नवीन डिश किंवा आवडीचा पदार्थ, विशिष्ट सणाला बनवलेला गोड पदार्थ, मी मध्यंतरी बऱ्याचदा फेसबुकवर अपलोड करायचे. पण नुसती डिशच नाही हा… त्या डिशला साजेसा असा आणि मला जितक्या कल्पकतेने मांडता येईल तसा मी फोटो काढून अपलोड करायचे. बापरे! आप्तेष्ठांचे, मित्र मैत्रिणींचे इतके छान काॅमेंट्स यायचे की अजून छान छान बनवण्याचा मोह आवरता यायचा नाही. मग केलेली डिश स्वतःच खाऊन कशी चालेल? मग ऑफिस मध्ये मैत्रिणींना घेऊन जा, घरी कोणी आलं की करून दे असं सुरु झालं ते अद्याप…

मला अजूनही आठवतंय मी इथे ऑफिस मध्ये सुद्धा पाणीपुरी बल्क मध्ये नेली होती आणि इथल्या प्रत्येकानेच ती खूप आवडीने खाल्ली ही होती! मुळात समोरच्याने खाल्लं की आपल्याला समाधान वाटतं आणि केल्याचा आनंद पण उपभोगता येतो.

डिश सजवताना मी नेहमी हाच विचार करते. पदार्थ कदाचित साधा असेल किंवा वेगळ्या पद्धतीने केलेला असेल पण तो ज्या पद्धतीने वाढला जातो किंवा सजवला जातो समोरच्याची भूक अजून वाढते आणि जेवणारा प्रसन्न मानाने जेवतो. आणि आपसूकच म्हणतो अन्नदाता सुखी भव!

असाच एक अनुभव सांगते. मी मध्ये ब्रेड मेकिंग चा लहानसा कोर्स केला ज्यात ब्रेड कोन शिकवले. त्यात तिने शिकवताना ४ वेगळ्या प्रकारची सारणं दाखवली. मग काय मी लगेच दुसऱ्या आठवड्यात तसे कोन बनवले पण यातलं सारण दाबेलीचं केलं आणि तितक्याच कल्पकतेने सजवलं. सगळ्यांना खूप आवडलं. 
ह्या सर्व प्रक्रियेत मला नेहमी एकच गोष्ट हवी असते… दाद! ती चांगली असो व वाईट, चांगली असली तर अजून नवीन काहीतरी बनवण्याचा हुरूप येतो आणि वाईट असली तर तो पदार्थ अजून छान कसा करता येईल ह्यासाठी पुन्हा डोकं खाजवले जात! :)

एखादा पदार्थ आवडीने करणे आणि तितक्याच प्रेमाने खाऊ घालणे यातून मिळणाऱ्या आनंदाची तोड नाही! माझ्या सासूबाई नेहमी म्हणतात स्वयंपाक करताना मन प्रसन्न ठेवावं आणि मनात छान विचार - त्यामुळे ते सर्व आपल्या पदार्थात उतरतं आणि स्वयंपाक छान बनतो. हे वाक्य मला नेहमी लक्षात असत आणि त्या विचारताच मी माझा हा छंद नेहमीच आवडीने जोपासत असते. आपणहूनच एक वेगळी एनर्जी, उत्साह आणि समाधान मिळत. मग कधी येताय ??
- मीनल लाखे


२ टिप्पण्या: