थोरवी किती गाऊ मी!

सन २००१ मी बँकेतून VRS घेण्याआधी आम्ही दोघांनी बँकाॅक, पटाया , शेवटी 7 दिवस सिंगापूर अशी सहल आयोजित केली होती. ते आमचे पहिले सिंगापूर दर्शन. पण तेव्हा फक्त हाॅटेलमधे राहून सिंगापूरची पहाणी झाली. तोंड ओळख झाली कारण हाॅटेलमधे राहून तेथील लोकांची रहाणी, करणी, जीवनशैली याची काहीच कल्पना येणे शक्य नसते. पण सचिनची (मुलाची) बदलीच सिंगापुरात झाल्याने सिंगापुरात वास्तव्य करावयास मिळाले. आता तर दरवर्षी २ महिने सिंगापूरला येतो. आणि दरवर्षी चला "मामाच्या गावाला जाऊया" म्हणतात तसे दरवर्षी चला "सचिनच्या सिंगापूरला जाऊया" म्हणत नित्य नियमित रहावयास येतो. 

खरंच, सिंगापूर एक तर भारतापासून तसे जवळ. अहमदाबाद पासून पाच - साडेपाच तासांच्या अंतरावर. सिंगापूर सुरेख, सुंदर, शिस्तीचे अन् सोपे. सोपे एवढ्यासाठी की आमच्या सारख्या कधी तरी रहायला येणा-यांना तसेच वरिष्ठ नागरिकांना जर पत्ता नीट माहित असेल तर हिंडण्यात, फिरण्यात कठीणपणा भासत नाही. तसेच transportation ची सोय पण फारच छान. प्रत्येक cluster च्या वा रहात्या घराच्या जवळच शक्यतो MRT वा बस स्थानक असतात, त्यामुळे कुठेही जाणे सहज सुलभ होते. तसेच जीवन पण रहायला सुरक्षित आहे.

कुठेही नजर टाका, 5/25 झाडे नजरेसमोर येतात. सर्वत्र हिरवळ पसरलेली. Vertical plantation नजरेस येते. मध्यंतरी मी सिंगापुरात असताना आमच्या येथील चारोळी ग्रुप वर “असेच काही तरी येते माझ्या मनीं" म्हणून चारोळीचा विषय होता. तर लगेच माझ्या मनांत येथील हिरवळ पाहून विचार सुचला.

असेच काही तरी येते माझ्या मनीं,
दिन सिंगापूर सोडण्याचे येता जवळी,
घ्यावी डोळा भरूनी येथील हिरवळ,
जीवास देत राहील गारवा वर्षभर.

असे सदा हरित सिंगापूर सर्वांना आकर्षित करणारे आहे. तसेच सिंगापूरमधे येथील सिंगापुरी लोकात, आपल्या भारतीयांसारखी एकत्र कुटुंबपध्दती पहावयास मिळते. जेव्हा मी नातीला शाळेच्या बससाठी सोडायला जाते, तेव्हा एखादे तरी आजी वा आजोबा नातवा बरोबर सोडायला आलेले दिसतात. एक मात्र गोष्ट जाणवली की सिंगापुरी बायकांना आपल्या सारखे सबंध दिवस स्वयंपाक घरात रहावयास आवडत नसावे. ठिक- ठिकाणी food court दिसतात. आॅफिस मधून परत येताना ब-याच जणांच्या हातात तयार फूड पार्सल दिसतात. त्यामुळे त्यांच्या स्वयंपाक घरात उगाचच वर्दळ नसते.

इथे कपडे वाळत घालण्याची सोय मात्र फारच भयानक आहे. अर्थात घरात पण स्टँड अथवा दो-यांवर कपडे वाळत घालता येतात. तरी पण काही HDB मधे बांबूवर कपडे वाळत घालण्याची सोय धोकादायक वाटते. 

तसेच येथील लोकांच्यात स्त्रीदाक्षिण्य आहे, तसेच वरिष्ठ नागरिकांना मान देणे हे पण प्रामुख्याने दिसते. वरिष्ठांना Metro वा बस मधे जागा देणे वगैरे शिष्टाचार ते छान पाळतात. रस्त्यावर पण, कोणास कुठे जायचे याची कल्पना नसेल, अजाण असतील व विचारले तर योग्य माहिती सांगण्यात मदत करतात. वस्तूंची उपलब्धता म्हटली, तर आपल्या भारतीयांच्या सर्व साधारण लागणाऱ्या नित्य उपयोगी वस्तू पण मिळतात. 

या सर्व गोष्टींचे निरीक्षण सिंगापुरातील वास्तव्यात करता आले, तसेच संस्कृतिक दृष्ट्या सिंगापूरात दरवर्षी सर्व भारतीयांचा एक कार्यक्रम असतो. भारताच्या सर्व प्रादेशिक लोकांना, त्यांच्या त्यांच्या संस्कृती व कलेचे दर्शन घडविणारा कार्यक्रम असतो. भारतातील सर्व प्रादेशिक लोक तेथे आपापल्या नियत केलेल्या जागी संस्कृतीची झलक दाखवितात. आम्ही एकदा तिथे असताना आपल्या MMS ने सत्यनारायण पूजा, नूतन वर्ष गुढीपाडव्याबद्दल प्रत्यक्षात गुढी उभारून, तसेच गणपती उत्सव, दही हंडी , दसरा, दिवाळी सणांची पोस्टर्स लावून सण व उत्सवांचे दर्शन घडविले होते.

त्याच कार्यक्रमाच्या वेळी माझी श्री. माधवजी भावे यांच्याशी भेट झाली. सचिनने (माझ्या मुलाने) त्यांची ओळख करून दिली व शब्दगंधची माहिती करून दिली. त्यांनी पण मला सविस्तर शब्दगंध दर महिन्यास दिलेल्या विषयांवर एकेकाच्या घरी होतो ही माहिती दिली. पण त्या वर्षी आम्ही सिंगापूर पहाण्यात व्यस्त असल्याने शब्दगंधला हजर नाही राहू शकलो. पण दुस-या वर्षी सिंगापुरात येताच मात्र, श्री केळकरांकडे मी पहिल्यांदा शब्दगंधला आले. मग मात्र मला नियमित email द्वारा विषय कळू लागले. यात सांगावयाचे हे की सिंगापूर शब्दगंधने माझ्यातील कवी मन जागे केले. तसे आम्ही भारतात विविध ग्रूपवर हस्तलिखित काढतो. पण दर महिन्यास विषय देऊन सिंगापूर शब्दगंधने माझी कल्पना शक्ती जागृत केली. आता तर असे झाले आहे की आम्ही सिंगापूरमधे आलो की आवर्जून शब्दगंधला हजेरी लावतोच. सर्वांच्या कविता ऐकून मजा तर येतेच तसेच प्रत्येकाच्या काव्य शैलीचा आस्वाद पण घेता येतो. मला सामावून घेतल्याबद्दल मी सिंगापूर शब्दगंधची खरच ऋणी आहे.

तसेच आपले सिंगापूर महाराष्ट्र मंडळ मराठी संस्कृती टिकविण्यात फार सक्रिय आहे. भारताबाहेर पण आपली मराठी भाषा जिवंत ठेवण्यात मंडळाचा भरपूर वाटा आहे. तेव्हा असे भाषा व संस्कृती प्रेमी लोक सिंगापुरात असता, मराठी भाषा आणि संस्कृतीला नक्कीच कधीच मरण नाही.

- वैशाली वर्तक


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा