अति…रिक्त

“पुन्हा बोअर होतय ? ढीगभर खेळणी, ते प्लेस्टेशन व असंख्य पुस्तकं असुनही ?!”

८० च्या दशकाआधी जन्माला आलेल्या वाचकांना सांगायला नको की आजच्या तुलनेत त्याकाळी करमणुकीची साधने किती तुटपुंजी होती. परवाच ९-१० वर्षांच्या मुलांना मी सांगत होते की आम्ही लहान असताना अनेक घरात टीव्हीसुद्धा नव्हता. वर्गातली सगळी मुले चकित झाली व मला आदिमानव असल्यासारखी बघू लागली. तब्बल अर्धातास त्यांचे प्रश्न व आपापसातली चर्चा चालूच होती! कोण म्हणतं की हल्लीच्या मुलांना लक्ष केन्द्रित करता येत नाही?!

त्याकाळी टीव्हीवर अगदी मोजके कार्यक्रम लागत पण ‘आमची माती आमची माणसं’ किंवा ‘कामगार विश्व’ कोण विसरू शकेल? ते ब्लॅक अॅंड व्हाइटवर पाहिलेले थोडे थोडके कार्यक्रम कदाचित आजच्या एल.ई.डी वरील असंख्य कार्यक्रमांपेक्षा अधिक आनंद देऊन गेले.

वाट बघण्यात मजा होती, मग ते रविवार सकाळचं ‘चित्रहार’ वा ‘रामायण’ असो किंवा शुक्रवारचं ‘द वर्ल्ड धिस वीक’. दहा-एक मिनिटे त्या (बहुदा) सप्तरंगी पट्ट्या दिसत रहायच्या आणि त्यानंतरच कार्यक्रम सुरू व्हायचा. पण घरचे सगळेच त्या पट्ट्या बघत रहायचे. जागचं हलतय कोण?!

त्या टीव्ही बघण्यात इतरही मजा होती. गच्चीत जाऊन एॅंटीना नीट करणे व वरूनच आवाज देणे, “आता दिसतय का?... आता बघा?” टीव्हीलादेखील एक गोल फिरवायचे बटण असायचं… ट्यूनिंग. दूरदर्शनची ढिम्मं गोल निशाणी दिसली ही हायसं वाटे. बातम्यांची वेळ ही निखळ बातम्यांचीच असे. त्यात ‘सनसनी’च्या मसाल्याची गरज नव्हती. चित्रपट रोज लागत नसत. कुठल्या शनिवारी घरातील सर्वांच्या आवडीचा चित्रपट लागणार असेल तर त्याची मजा काही औरच! सगळ्यांनी एकत्र टीव्हीसमोर जमायचे, कधी शेजारचं एखादं कुटुंबही येत… मग चहा तर हवाच. पुन्हा चिवडा वा भेळही येत असे चवीला.

आणि तरीही क्रिकेट मॅचचा हात कोण धरील?! बिल्डिंगमधील टीव्ही व सगळ्यांना कोंबण्याइतकी जागा असलेल्या घरात मॅच रंगायची. अक्खी बिल्डिंग एका घरात कोंबली की घरात असाही अंधार वाटे आणि तरीही खिडक्यांना पडदे लावले जायचे, स्क्रीनवर उजेड अजिबात पडू नये म्हणून. मग त्या बंदिस्त खोलीत, खेळाडूंपेक्षा घामाघूम होत मॅच अधिक रंजक व्हायची.

तात्पर्य, पुर्वीच्या करमणुकीच्या गोष्टी आपल्या जीवनशैलीचा भाग वाटायच्या. आता विकतचा प्ले श्टेशन ती मजा देत नाही. जीवनशैली व करमणूक ह्या संकल्पना दुभंगल्या आहेत. ज्यात आपण सुख शोधतो ते पर्याय आपल्या जीवनशैलीचा भागच नसतात. 

असंख्य वाहिन्या  मन रमवत नाहीत; खोलीभर खेळणी खेळ करत नाहीत; टेबलवरील नवनवीन खाऊ पोषण देत नाहीत; अनेक ट्यूशन क्लास ज्ञान देत नाहीत. 

गरजेपेक्षा अधिक असलं की नेमकं कशात मन रमवायचं असं गोंधळायला होतं आणि त्याचा मनावर ताण पडतो. पर्याय शोधता शोधता अक्षरष: दमणूक  होते आणि शेवटी काहीतरी निवडायला काहीतरी सोडाव लागतं. मग ज्या गोष्टीचा उपभोग नाही घेता आला ती विशेष वाटून ती सुटल्याचा पश्चात्ताप होतो.

सगळच अलोट आहे आणि तरी कसलीशी उणीव आहे.

- स्वप्ना मिराशी



२ टिप्पण्या: