दिव्यत्वाची जेथ प्रचिती


दिव्यत्वाची जेथ प्रचिती
गदिमा अर्थात गजानन दिगंबर माडगूळकर, कोणत्याही मराठी माणसाला हे नाव नवीन नाही. मराठी रसिकांच्या हृदयात धृवपद मिळवणारे श्रेष्ठ कवी. शब्दप्रभुत्व, आशयसंपन्नता, सहज सोपी भाषा, लयबद्धता, गेयता, नादानुप्रास यांनी सजलेल्या आणि मनात खोलवर ठसणाऱ्या अलौकिक रचना. कवी, गीतकार, पटकथाकार, कादंबरीकार, गीतरामायणकार अशा विविध स्वरूपातून मराठी साहित्य क्षेत्रात गदिमांचे योगदान केवळ अजोड आहे. ऐतिहासिक, सामाजिक, अध्यात्मिक, देशभक्तीपर, शृंगारिक, वैचारिक, बालकविता अगदी सर्व विषयांची त्यांनी त्यांच्या काव्यात लीलया गुंफण केली आहे. गीतरामायणासारखा अमूल्य सुरमयीठेवा त्यांनी मराठी साहित्याला दिला आहे. त्यांनी पत्ररुपानी पाठवलेल्या गीत रामायणाविषयीच्या मनोगतात म्हटले आहे "अजाणतेपणे केव्हा, माता घाली बालगुटी, बीज धर्माच्या दॄमाचे, कणकण गेले पोटी.' पोटासाठी पराडकरांची सुगंधी धूप सोंगटी विकणाऱ्या गदिमांनी गीत रामायणाद्वारे संस्कृतीचा धूप महाराष्ट्रात दरवळत ठेवला आहे. मराठी रसिकांनी गदिमांना आदराने महाराष्ट्राचे "आधुनिक वाल्मिकी' अशी पदवी बहाल केली आहे. एवढी त्यांची भुरळ रसिकांना पडली आहे.
गदिमांना भारत सरकारने १९६९ साली पद्मश्री हा किताब बहाल केला. तसेच ते संगीत-नाटक अकादमीचे उत्कृष्ट नाट्य लेखन व विष्णुदास भावे गौरवपदक या पुरस्कारांचे मानकरी ठरले. १९६२ ते १९७४ अशी सुमारे १२ वर्षे ते महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्यही होते. १९७३ साली यवतमाळ येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
गदिमांचा जन्म १ ऑक्टोबर १९१९ रोजी शेटफळे, सांगली येथे झाला. घरची परिस्थिती यथातथा असल्याने शिक्षण अर्धवट सोडावे लागले. सुरुवातीच्या काळात अर्थार्जनासाठी त्यांनी चित्रपटकथा, गीते लिहावयास सुरुवात केली. ते वि. . खांडेकर यांचे लेखनिक म्हणून काम करत असत. पुढे त्यांची स्वत:ची सुगंधी-वीणा, जोगिया, पूरिया, चार संगीतिका, गीतरामायण, काव्यकथा, चैत्रबन गीतगोपाल, गीतसौभद्र अशी काव्यनिर्मिती झाली. याशिवाय कथा, कादंबरी, आत्मचरित्र, नाटक या वाङ्मय प्रकारांतही त्यांनी विपुल लेखन केले आहे. गदिमांनी सुमारे १४५ मराठी चित्रपटांची गीते लिहिली. ‘वैशाखीया नावाचा त्यांनी लिहिलेल्या चित्रपटगीतांचा संग्रह प्रसिद्ध आहे. विविध गीत प्रकारांची, नऊ रसांनी नटलेली किती किती गाणी अजरामर झाली आहेत. इथे मांडणे कठीणच आहे तरी नमुन्यादाखल काही :
उद्धवा अजब तुझे सरकार, विठ्ठला तू वेडा कुंभार, एक धागा सुखाचा शंभर धागे दु:खाचे, बाई मी विकत घेतला शाम, एका तळ्यात होती, बदके पिले सुरेख, गोरी गोरी पान, फुलासारखी छान, सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरि, रम्य ही स्वर्गाहुनी लंका, तुला पाहते रे तुला पाहते, माउलीच्या दुग्धापरी, आले मृगाचे तुषार, आज कुणीतरी यावे, ओळखीचे व्हावे, आला वसंत देही, मज ठाऊकेच नाही, बाई माझी करंगळी मोडली, दैव जाणिले कुणी, देव देव्हार्‍यात नाही - देव नाही देवालयी, धुंद मधुमती रात रे, धुंद येथ मी स्वैर झोकतो, घननीळा लडीवाळा, झुलवू नको हिंदोळा, गोरी गोरी पान फुलांसारखी छान, हे राष्ट्र देवतांचे - हे राष्ट्र प्रेषितांचे, इंद्रायणी काठी देवाची आळंदी, जग हे बंदीशाला, जिवलगा कधी रे येशिल तू, का रे दुरावा, का रे अबोला, लळा जिव्हाळा शब्दच खोटे.. प्रत्येक गीत लयबद्ध, नादमय, आशयपूर्ण, साधे सोपे ओघवते. अतिशय प्रभावीपणे जीवनांतले महान तत्वज्ञान सांगून जाते.
जोगियाही माडगूळकरांची माझी अत्यंत आवडती रचना. तमाशातल्या/ लावणीतल्या स्त्रीचे मनोगत व्यक्त करणारी कविता आहे. खरं तर ती एक नायकीण. पण तिचा समर्पण भाव, ओझरते पाहिलेल्या आणि पुन्हा कधी भेटेल कि नाही याची शाश्वती नसलेल्या प्रियकराच्या आठवांत ती विशिष्ट दिवस "साजरा' करते. प्रेम आणि त्यावरील श्रद्धा यांचा सुंदर मिलाफ या रचनेत दिसून येतो. त्यामुळे कुठेही तिची सामाजिक स्थिती लक्षात न येता एक स्त्री म्हणून तिला उच्च पातळीवर नेऊन गदिमांनी या रचनेला एक वेगळाच रंग दिला आहे.
कोन्यांत झोपली सतार, सरला रंग,
पसरली पैंजणें सैल टाकुनी अंग,
दुमडला गालिचा, तक्के खुकले खालीं
तबकांत राहिले देठ, लवंगा, सालीं.
झुंबरीं निळ्या दीपांत ताठली वीज
कां तुला कंचनी, अजुनी नाहीं नीज?
थांबले रसिकजन होते ज्याच्यासाठीं
तें डावलुनी तूं दार दडपिलें पाठी…..

या रचनेच्या आधी आपण थोडा लावणीचा इतिहास पाहू. पूर्व पेशवाईच्या काळात खऱ्या अर्थाने जन्माला आलेली आणि यथावकाश त्यात विविध बदल होत उत्तर पेशवाईत बहरात येऊन देखणी झालेली लावणी. तसा लावणीचा इतिहास त्याहून जुना आहे. पण दौलतजादा करणाऱ्या श्रीमंत मराठ्यांच्या काळात तिला जास्त महत्व प्राप्त झाले. लावणीचा एक स्वतःचा बाज असतो. ठेका असतो. जो ठरवूनही इतर कोणत्या भाषेत हुबेहूब भाषांतरित करता येणार नाही. लावणीतील श्रृंगार कानाला व मनाला सुखवणारा असतोच पण तो नेत्रसुखद व्हावा म्हणून कवनाची लावणी ही फडाची लावणी झाली. शाहिरी लावणी विविध अंगांनी सजत गेली जसे युद्धावर गेलेल्या पतीचा विरह, त्याची ओढ, हुरहूर या भावनांपासून ते शृंगारिक आव्हान, प्रणयवर्णन यापर्यंत, सामाजिक प्रश्नांवर सडेतोड बोलत उपरोधिक बाजाने जाणारे सवाल-जवाब सर्वच लावणीतून खुलत गेले.
कोन्यांत झोपली सतार, सरला रंग,
पसरली पैंजणें सैल टाकुनी अंग,
दुमडला गालिचा, तक्के खुकले खालीं
तबकांत राहिले देठ, लवंगा, सालीं.
सुरुवातीच्या या ओळींत गदिमा संपूर्ण वातावरण निर्मिती करतात. लावणी नर्तिका/गायिका आणि तिच्या आजूबाजूच्या वातावरणाचे नेटके वर्णन. "दुमडला गालिचा, सैल पसरलेली पैंजणे, तबकात राहिलेले देठ' या उपमा लीलया वापरून त्यांनी यथायोग्य परिणाम साधला आहे. लावणी सादर केल्यावर रसिकांना न "रिझवता' ती थेट आत येते आणि दार बंद करते. पुढील चार कडव्यात तिची मनोवस्था, तिची घालमेल आणि तिची अस्वस्थता यांचे वर्णन करताना आरसा, विडा, झुंबर यांचे संदर्भ आले आहेत. तिची तळमळ बोलती होते आणि ती म्हणते ..
"मी देह विकुनियां मागुन घेतें मोल,
जगवितें प्राण हे ओपुनिया "अनमोल',
रक्तांत रुजविल्या भांगेच्या मीं बागा,
ना पवित्र देहीं तिळाएवढी जागा'
यातूनच ती खऱ्या प्रेमासाठी किती आसुसली आहे ते जाणवते. शय्यासोबत करायला अनेक जण येतात पण असा देह विकून मिळालेले प्रेम बेगडी, अशाश्वत आहे याची तिला खंत आहे. "ना पवित्र देही तिळाएवढी जागा' किती सुंदर शब्दांत तिच्या व्यथेचे वर्णन केले आहे.
पुढे ती म्हणते-
शोधित एकदा घटकेचा विश्राम
भांगेत पेरूनी तुळस परतला शाम
सावळा तरूण तो खराच ग वनमाली
लाविते पान, तो निघून गेला खाली
अस्पष्ट स्मरे मज त्याचा वेडा भाव
पुसले ही नाही, मी मंगल त्याचे नांव
बोलला हळू तो दबकत नवख्या वाणी
"मम प्रीती आहे जडली तुजवर राणी’!
अहाहा! किती सुंदर शब्दांत आणि कोणतेही दाखले देण्याच्या भानगडीत न पडता गदिमांनी त्या स्त्रीला आपल्यावर प्रेम करणाऱ्या प्रियकराविषयी जे वाटते ते कि संयत आणि प्रभावीपणे मांडले आहे पहा. एक असाच वेडा प्रेमी तिच्या दारी येतो आणि आपले प्रेम व्यक्त करतो. तिला त्याचे नवल वाटते आणि ती हसण्यावर नेते .
नीतिचा उघडला खुला जिथें व्यापार
बावळा तिथें हा इष्कां गणितो प्यार ;
हांसून म्हणाल्ये, "दाम वाढवा थोडा...
या पुन्हां, पान घ्या..', निघून गेला वेडा!
जिथे लोक नीतीचा व्यापार करायला येतात तिथे हा खुळा प्रेमाच्या गोष्टी करतोय याची तिला गम्मत वाटते. सवयीने त्याला म्हणते -
"दाम वाढवा थोडाया पुन्हा , पान घ्या…'
आणि इथेच चुकते. तो निघून जातो आणि तिला आपण काय हरवले याची जाण होते आणि त्याच्या निघून जाण्याचा पश्चात्ताप होतो अशा प्रेमाच्या व्यापाराठी तो परत येणार नाही याची खात्रीही होते. अस्सल प्रेमाचे दान अव्हेरल्याचे दुःख तिच्या मनात कायम राहते आणि त्याच्या आठवणीत तो दिवस ती तिच्या परीने "व्रतस्थ' राहून साजरा करते.
राहिलें चुन्याचें बोट, थांबला हात,
जाणिली नाही मी थोर तयाची प्रीत,
पुन:पुन्हां धुंडितें अंतर आतां त्याला
तो कशास येइल भलत्या व्यापाराला?
तो हाच दिवस हो, हीच तिथी, ही रात
ही अशीच होत्यें बसलें परि रतिक्लांत,
वळुनी न पाहतां, कापित अंधाराला
तो तारा तुटतो - तसा खालती गेला.
हा विडा घडवुनी करितें त्याचें ध्यान,
त्या खुळ्या प्रीतिचा खुळाच हा सन्मान;
ही तिथी पाळितें व्रतस्थ राहुनि अंगे
वर्षांत एकदा असा "जोगिया' रंगे.
…..ही तिथी पाळते व्रतस्थ राहूनी अंगे वर्षात एकदा असा "जोगियारंगे

प्रेम या सर्वोच्च भावनेवरची उदात्त रचना. निरपेक्ष प्रेम कि काय म्हणतात ना तशी. एक तर ती नायकीण. त्यात जो कोणी खुळा तिला भेटतो तो परतण्याची शाश्वती नाही. असे असतानाही त्याच्या आठवात झुरते. त्याच्यासाठी विशिष्ट दिवस साजरा करते आणि याची त्याला जाणीवही नसेल हे माहित असूनही ते ती करत राहते. यालाच श्रद्धा म्हणतात. जेव्हा आपण एखादे व्रत घेतो तेव्हा आपणास ठाऊक नसते कि त्याचे फळ आपणास मिळेलच पण तरीही श्रद्धेने पाळत राहतो. तसेच तीही तिच्या अव्यक्त, असफल प्रेमावरील श्रद्धा पाळत राहते. कविता संपल्यावरही "जोगिया"चे गारुड तसेच राहते मनावर.
एखाद्या फुलाच्या पाकळ्या जशा संलग्न, एकमेकांत गुंतलेल्या असाव्यात आणि उलगडताना त्यांचा पसारा जाणवतो, तसे गदिमा जेवढे अभ्यासावेत तेवढे नव्याने जाणवत जातात. एकेक रचनेतून त्यांची अद्वितीय प्रतिभा आणि व्याप्ती उलगडत जाते. प्रामाणिक, मेहनती, सुसंस्कारीत आणि प्रतिभासंपन्न अशा सर्व गणांनी युक्त असे हे व्यक्तिमत्त्व. त्यांच्याविषयी काही लिहिणे म्हणजे "ज्योतीने तेजाची आरती' आपली प्रतिभावंत लेखणी आपल्याला केवळ पैसा देते, परंतु काळावर कायमचा ठसा उमटवत नाही हा सल त्यांना होता. या लेखाची सांगता त्यांच्याच विनम्र शब्दांत करताना त्यांची थोरवी जाणवल्याशिवाय राहत नाही..."मी पोचलो आहे ते स्थान कोण्या दुर्लभ ठिकाणी आहे असे नाही; परंतु माझ्यापुरते तरी मला या यश प्राप्तीचे नवल आहे इतकेच!'
गदिमांना शतश: प्रणाम!
दिव्यत्वाची जेथ प्रचीती..तेथे कर माझे जुळती !!
वनिता तेंडुलकर-बिवलकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा