प्राचीन भारतीय संस्कृतीची जगव्याप्ती - भाग ५

मागील भागात आपण मलेशियातील भारतीय संस्कृतीचा प्रभाव पाहिला. आता आपण काल-प्रवासी इंडोनेशियामधील प्रवासाला सुरवात करूया.

इकडे इंडोनेशियामध्ये ख्रिस्त पश्चात दुसऱ्या शतकापासून भारतीय राज्य स्थापनेला सुरवात झाली. पल्लव घराण्यातील देववर्मन याने दुसऱ्या शतकात जावा बेटावरील राजकन्येशी विवाह करून जावा बेटावर 'शलाकानगर' (आजचे पान्देग्लांग) येथे आपले राज्य स्थापन केले. पुढे पल्लव राजवंशातीलच जयसिंहवर्मन याने ख्रिस्त पश्चात ३५८ च्या सुमारास स्थापन केलेले जावा बेटावरील तरुम (तारुम) नदीच्या काठावरील 'तारुमनगर' हे राज्य त्याच्याच वंशातील पूर्णवर्मन या त्याच्या पणतूने उत्कर्षाच्या कळसाला पोहोचविले. भारतीय धरणशास्त्राचा वापर करून त्याने तरुम नदीचा प्रवाह बदलून शेतजमिनीला पाणी मिळण्याची व्यवस्था केली. पुढे सहाव्या शतकात या राज्याचे सुन्दा आणि गालू असे दोन भाग पडले.

आसाम, मगध आणि बंगालवर राज्य करणाऱ्या पाल घराण्यातील जयानास (जयांश?) या राजाने सहाव्या शतकात बलाढ्य आरमार आणि सैन्यासह इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटावर स्वारी करून 'श्री-विजय' साम्राज्याची स्थापना केली. पाल राजवंशाने महायान बुद्धधर्माचा स्वीकार केला असल्याने साहजिकच "श्री-विजय" हे बौद्धधर्मी राज्य स्थापन केले. त्याने सुमात्रा बेटावरील छोटी छोटी राज्ये तसेच जावा बेटावरील तरुमनगर, सुन्दा तसेच गालू ही राज्ये जिंकली. तसेच गंगानगर, पट्टणी (लंकासुख) या राज्यांना मांडलिक बनविले आणि संपूर्ण मलेशिया आणि इंडोनेशिया येथील सामुद्रधुनी आपल्या अधिपत्याखाली आणली.

याच वेळी सहाव्या आणि सातव्या शतकात सुमात्रा आणि बोर्निओ येथील ऑस्ट्रो-नेशियन (तैवान आणि फिलीपाइन्स येथील वंश) आणि हिंदू भारतीय अशा मिश्र 'चाम' वंशाच्या संपन्न व्यापारी राज्यकर्त्यांनी दक्षिण विएतनाममध्ये आपले 'चंपा' हे वसाहतवजा राज्य स्थापन केले. त्याचा इतिहास आपण मागील भागात बघितलाच.

दक्षिण-मध्य जावा बेटावर त्याचवेळी 'शैलेंद्र' हे बलशाली राज्य उदयास आले होते. इतिहासकारांच्या मते भारतीय कलिंग राजवंशातील राजांनी या राज्याची स्थापना केली होती आणि ते देखील महायान बौद्ध धर्माचेच अनुयायी होते. श्री विजय आणि शैलेंद्र साम्राज्यांनी एकमेकांशी मैत्रीपूर्ण व्यवहार आणि वैवाहिक संबंध स्थापित केले होते. शैलेंद्र राजांच्या काळात ख्रिस्तपूर्व आठव्या शतकात जावामधील 'बोरोबुदूर' या जगप्रसिद्ध बौद्ध स्तूप-समूहाची निर्मिती झाली.

भारत, मलेशियन आणि इंडोनेशियन द्वीपांवर निर्माण होणारे मसाले, सोने, रत्ने, शेतमाल आणि चीनमधून निर्यात होणारे रेशीम, इतर वस्तू, तसेच चीन, जपान, कोरिया आणि भारत, अरब देश, इजिप्त व रोमन साम्राज्य यांमध्ये समुद्री मार्गाने होणारी व्यापारी देवाण-घेवाण हा या सर्व राज्यांच्या अर्थव्यवस्थेचा कणा होता.

शैलेंद्र साम्राज्याने कंबोडियावर स्वारी करून काही काळ कंबोडियावर सुद्धा राज्य केले. पूर्व आणि दक्षिण जावा, बाली इत्यादी बेटांवर त्यावेळी काही हिंदू राज्यांचे अधिपत्य होते. नवव्या शतकात शैलेंद्र साम्राज्य काहीसे दुबळे झाल्यावर संजय राजवंशाच्या 'मातरम' या साम्राज्याने मध्य जावा आणि बाली बेटे यावर आपले वर्चस्व निर्माण केले.

"संजय" राजवंश हिंदुधर्मीय असल्यामूळे त्यांनी या सर्व प्रांतात हिंदू धर्माची स्थापना केली आणि मोठ्या प्रमाणावर शिव, विष्णू, गणेश आणि इतर हिंदू देवदेवतांच्या मंदिरांची उभारणी केली. त्यामध्ये योग्यकर्ता येथील 'प्रम्बानान' या जगप्रसिद्ध मंदिर-समूहाचा समावेश आहे. राजा लोकपाल, बातीलुंग महासंभू आणि दक्ष या राजांनी २४० प्रम्बानान मंदिरांचे निर्माण केले. त्यासाठी ओपाक नदीचा प्रवाहसुद्धा वळविण्यात आला. पुढे श्री-विजय साम्राज्याने पुन्हा एकदा आक्रमण करून हे मातरम साम्राज्य स्वत:च्या अधिपत्याखाली आणले.

त्याच वेळी भारतात चोल वंशाचा पराक्रमी सम्राट 'राजराजा चोल' (चोलन, चोझन) याने चालुक्य (आंध्र आणि कर्नाटक), पंड्या (दक्षिण तामिळनाडू), कलिंग (ओडिशा), चेर (केरळ) या सर्व राज्यांचा पराभव करून दक्षिण व पूर्व भारतावर आपली सार्वभौम सत्ता स्थापन करण्यात यश मिळवले. त्याचबरोबर त्याने श्रीलंकेच्या सिंहल साम्राज्याचाही पराभव केला.

याच वेळेला, समुद्री मार्गावरील सत्ता, व्यापारावरील करवसुली, तमिळ व्यापारी जहाजांचे विशेष अधिकार या विषयांवरून सुमात्राचे श्री-विजय साम्राज्य, कंबोडियाचे साम्राज्य, थायलंडचा राजा या सर्वांशी चोल साम्राज्याचे गंभीर मतभेद होत होते.

राजराजा चोल याचा पुत्र महापराक्रमी सम्राट राजेंद्र चोल (पहिला) याने अकराव्या शतकात पूर्वेकडील बलाढ्य अशा पाल साम्राज्यावर आक्रमण करून राजा महिपाल याचा पराभव केला आणि मगध (बिहार), बंगाल, आसाम, पूर्व महाराष्ट्रासहित छत्तीसगढ, झारखंड, पूर्व उत्तर प्रदेश (काशी), ब्रह्मपुत्रेचे खोरे या सहित सर्व पूर्व आणि दक्षिण भारतावर निरंकुश सत्ता मिळविली. भारताच्या तथाकथित आधुनिक पुस्तकी इतिहासात या दोन्ही महापराक्रमी सम्राटांची फारशी वाच्यतादेखील नसणे ही अतिशय खेदकारक गोष्ट आहे असे माझे मत आहे.

असा महापराक्रमी सम्राट राजेंद्र चोल (पहिला) याच्या विश्व-दिग्विजयाची कहाणी आपण पुढील भागात पाहू या.
- निरंजन भाटे

1 टिप्पणी: