तंत्रज्ञानाचे सवंगडी

हलणारी चित्रं व रंग ही आकर्षक असतात. ह्यात दुमत नाही.

लहान मुलांची मनं ही अती चंचल असतात. त्यामुळे टॅबवरील गेममधे किंवा टीव्हीवरील कार्टूनमधे त्यांना सतत काहीतरी नवीन घडत असल्याचा भास होतो. आणि ते खिळून बसतात.

मुलांनाच काय आपणा सर्वांना खिळवून ठेवेल असं आजचं झपाट्याने बदलणारं तंत्रज्ञान आहे. आणि मोबाइल व टॅबलेट किंवा टॅब हे त्याचं सर्वसामान्य रूप. ही यंत्रे आजच्या मुलांच्या करमणूकीचीच नाही तर शिक्षणाचीही साधने बनली आहेत. मुलांना कुठल्या वयात मोबाइल द्यावा, तो दिल्यास इंटरनेटचा वापर कसा नियंत्रित करावा हे सर्वच पालकांना भेडसावणारे प्रश्न झाले आहेत. कारण ह्या यंत्रांच्या फायद्यांपेक्षा तोट्यांचीच अधिक चर्चा होत असते. 

खरं आहे की रेडिएशनचे वाईट परिणाम होतात. पण अजून कुठल्याच संशोधनात वा सर्वेक्षणात असं पूर्णत: सिद्ध झालेलं नाही की ह्या यंत्रांचा मुलांच्या बौद्धिक विकासावर वा सामाजिक वागणुकीवर अपाय होतो. एवढच काय तर हाणामारीचे, गोळीबाराचे व्हिडिओ गेम्स मुलांना हिंस्त्र बनवतात ह्याचंही प्रमाण नाही.

उलट, आॅस्ट्रेलियाच्या ग्रिफिथ व क्वीन्सटाउन महाविद्याल यांच्या संशोधनात असं आढळून आलं आहे की आजकालची ‘मोबाइल’ पिढी पूर्वीच्या मुलांपेक्षा कमी एकाकी आहे. त्यांनी १९७८ ते २००९ ह्या काळातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्यातील एकाकीपणाचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढला आहे.

असच एक सर्वेक्षण केलं अमेरिकेतील मिशिगन युनिवर्सिटीने. त्यांनी १९९१ ते २०१२ ह्या काळातील विद्यार्थ्यांचा अभ्यास केला. यातही असच आढळलं की ‘मोबाइल’मुळे मुलांवर काही वाईट परिणाम होतात असं ठामपणे म्हणता येणार नाही.

बरं, ह्या आॅनलाइन जगात सगळं वाईटच असतं असं नाही. माणुसकीची उदाहरणं इथेही आढळतात. ‘माइंडस्पेस’ या गेमच्या एका ‘फोरम’ वर एका मुलात आत्महत्येची लक्षणं जाणवली. तर फोरम वरील सर्वांनी त्या मुलाला चॅटद्वारे व नंतर एका काॅन्फरन्स काॅल द्वारे आत्महत्येपासून परावृत्त केलं.

शाळांमधे मोबाइल्स अनिवार्य होत चालले आहेत, पियर प्रेशर किंवा गरज किंवा काही शाळांत अभ्यासक्रमाचा भाग म्हणून. अनेक घरात दोन्ही पालक कामावर असतात तर शाळेत वा घरी मुलास काही अडचण आल्यास ते मूल पालकांना फोन करून कळवू शकतं. गेल्या महिन्यात शाळा सुटल्यावर माझ्या मुलाची व त्याच्या दोन मित्रांची स्कूलबस चुकली. त्यांच्यातल्या एकाकडे मोबाइल होता. त्याने आपल्या आईला कळवलं व तिने त्यांच्यासाठी ग्रॅबकार मागवली. आता त्या मुलाकडे मोबाइल नसता तर शाळेने आम्हा पालकांना कळवल असतच. पण त्यानंतर आमच्यापैकी एकाला टॅक्सी करून जाण्यापलीकडे काही पर्याय राहिला नसता. आम्ही पोहोचेपर्यंत मुलं शाळेत खोळंबली असती व टॅक्सीला दुप्पट पैसेही गेले असते (माझी कोकणस्थी सबब). 
तर अशा अनेक उदाहरणातून इंटरनेट-सज्ज यंत्रं गरजेची वाटू लागली आहेत.

मी विचार केला की ह्या विषयावर माझ्या दोन मित्रांची मतं घ्यावी. एक आहे ४० वर्षीय अमित देशमुख. साॅफ्टवेअर इंजिनियर अमितने अनेक वर्ष एथिकल हॅकर म्हणून काम केलं आहे. तो सध्या गूगलचा पार्टनर म्हणून मुंबईत काम करतो. दुसरा मित्र, किंबहुना मित्राचा मुलगा, आहे १९ वर्षीय स्वप्नील बापट. हा सध्या नॅश्नल सर्व्हिस, NS, करत आहे. ह्याने अतिशय मानाचे समजल्या जाणाऱ्या अशा NDU प्रशिक्षणात प्रवेश मिळवला आहे. स्वप्नील शाळेपासूनच ‘टेक-सॅव्ही’ आहे. उदा: सेकंडरी शाळेत असताना त्याने सिंगापूरच्या कम्यूनिटी सेंटर्ससाठी ऍप्स तयार केली होती. 

तर, सुरुवात करू अमितच्या अनुभवाने. अमित १० वर्षांचा असताना त्याची संगणकाशी ओळख झाली, एका ओळखीच्या कुटुंबाकडे. ह्या यंत्राला एक कीबोर्ड असतो ज्यावर सूचना टाइप केल्या असता ते यंत्र त्याप्रमाणे कार्य करते. ह्याचं अमितला विलक्षण अपरूप वाटलं. मग त्या कुटुंबाकडे कम्प्यूटर गेम्स खेळायला व थोडफार तंत्रज्ञान शिकायला तो जाऊ लागला. हळूहळू संगणाकाच्या सहाय्याने लाॅजिकचे प्रश्न व कोडी तो सोडवू लागला.

मग त्याला स्वत:चं तांत्रिक कौशल्य तपासावसं वाटलं. त्या काळी डायल-अप मोडेम भारतात येऊ लागले होते. एका मित्राच्या मदतीने अमितने मोडेम वापरून फोन करायचा पर्याय शोधला. ह्या प्रयोगाच्या यशाने अमितचा आत्मविश्वास वाढला व त्याने मोठं झाल्यावर तंत्रज्ञानाशी निगडित काम करायच ठरवलं.

इलेक्ट्राॅनिक्स इंजिनियरिंग करत असताना अमितला अनेक विषयात KT होत्या. पण तरीही तो NCST मधे डबल पोस्ट ग्रॅजुएट डिप्लोमासाठी निवडला गेला. इथे घोकंपट्टीपेक्षा ज्ञान मिळवण्यावर भर होता; शिकावं कसं व काय ते अमितला NCST मधे कळलं.

म्हणून अमित म्हणतो की पालकांनी नुसतं मुलांच्या मार्कांकडे लक्ष देऊ नये. मुलांचा कल ओळखून, त्यांची ऊर्जा योग्य दिशेने केंद्रित करायचा प्रयत्न करावा.

आजच्या मुलांना साध्या इनपुट-आउटपुटची गम्मत वाटत नाही. त्यांना संगणक किंवा इतक तंत्राद्वारे खऱ्या जगात काहीतरी करता आलं तर wow! वाटतं. पालकांनी मुलांना त्यांचा हा wow! शोधण्यास मदत करावी. मुलं केवळ तंत्रज्ञानाचे उपभोगते नसावे तर त्याचे सवंगडी व्हावे.

आता जाणून घेऊ हल्लीच्या पिढीचं मत. आजच्या अनेक तरूणां सारखाच स्वप्नीलही अद्ययावत तंत्रज्ञानाचा माहितगार आहे. सेकंडरी स्कूलमधे त्याने सिंगापूरच्या कम्यूनिटी सेंटर्स करता ऍप्स बनवली होती. त्याचं मत आहे की तंत्रज्ञानाचा बाऊ करून चालणार नाही. तसच पालकांनी जाणलं पाहिजे की त्याची पिढी मोबाईल तंत्रज्ञानाच्या अपायांना अगदी चांगली ओळखते. दीर्घकाळ मोबाइल-टॅबकडे पाहत राहण्याने डोळ्याला व मज्जासंस्थेला अपाय होण्याची शक्यता असते. म्हणूनच तो म्हणतो की लहान मुलांचा स्क्रीन टाइम मर्यादित करावा.

समवयस्कांमधे त्याला दिसतं की मोबाइलच्या आहारी गेलेली मुलं नीट संवाद साधू शकत नाहीत, कुणाशी जुळवून घेऊ शकत नाहीत. साहजिकच, बहुतेकांना ती मुलं बेशिस्त वाटतात.

लहानपणी कार्टून व कार्टून-आधारित व्हिडिओ गेम्स नी सुरूवात होते. मोठं होता होता अनेक मुलं ‘रोल-प्लेइंग’ सारखे गेम्स खेळू लागतात. भावनांचा — म्हणजे कामं, क्रोध, द्वेष — अतिरेक असलेले हे गेम्स मनावर खोलवर परिणाम करतात. प्रेम, श्रद्धा, नैतिकता ह्या भावना फोल वाटू लागतात. लहानपणापासून झालेले संस्कार निरुपयोगी वाटू लागतात. 

‘सेक्सटिंग’ हे आजचं एक कटु सत्य आहे. पियर प्रेशर आणि अश्लील ‘अनुभव’ घेण्याच्या ओढीने मुलं यात गुरफटतात. ‘बुलिईंग’ किंवा दादागिरी हे डिजिटल लाइफचं आणखी एक विदारक सत्य. एखाद्याला शाळा-काॅलेजात एकटं पाडण्यासाठी किंवा त्याच्याकडून हवं ते करून घेण्यासाठी दाणगट मुलं सोशल मीडिया वापरतात. पिडित मुले हताश होतात. मग आत्मविश्वास जाऊ लागतो. बरं-वाईट, खरं-खोटं यातला फरक धुसर होऊ लागतो. वाईट प्रवृत्तीं साठी सोपी टार्गेट्स होतात अशी मुलं. ही मुलं अगदी आत्महत्येचा विचार करू लागतात. हे रेडिएशनपेक्षा भयानक असे मोबाइल-टॅबचे परिणाम आहेत, असं स्वप्नील म्हणतो.

ब्लू व्हेल सारख्या गेम्सना बळी पडणाऱ्या ह्यांच्या पिढीला ‘स्ट्राॅबेरी जनरेशन’ म्हणतात ते उगीच नाही असं तो म्हणतो. आज विशीला पोहोचणाऱ्या ह्या मंडळींना बालपणी एवढं तंत्रज्ञान मिळालं नव्हतं. त्यांच्यासाठी तंत्रज्ञान हे कामं सोपी करण्याचं साधन आहे, बस्स. पण आजच्या ५-१० वर्षांच्या मुलांना ती गरज वाटू लागली आहे आणि हे वाईट आहे.

टॅब, फोनच्या किरणांनी कॅन्सर होतो किंवा तो व्हायला मदत होते हे अजूनही सिद्ध झालेलं नाही. तरीही WHO ने मोबाइल फोन किरणे तब्येतीसाठी हानीकारक असल्याचे म्हटले आहे. रेडिएशनच्या वाईट परिणामांची गंभीर दखल फ्रान्स व फिन्लंड यांनी घेतली आहे. अनेक सर्वेक्षणांत म्हटलं गेलं आहे की धोका सिद्ध झाला नसेल तरी मुलांच्या मज्जासंस्था परिपक्व नसतात आणि म्हणून त्यांना ह्या रेडिएशनपासून दूर ठेवावं. अपाय होतच नाही असंही नाही. फार वेळ मोबाइल व टॅबमुळे मुलांच्या झोपेवर परिणाम होतो; मित्र व परिवाराबरोबर ते कमी वेळ घालवू लागतात.

एक गमतीची गोष्ट म्हणजे तंत्रज्ञान क्षेत्राशी निगडित काही नामवंत व्यक्ती स्क्रीन टाईमवर सर्वात अधिक निर्बंध लावतात. स्टिव्ह जॉब्स व बिल गेट्स ह्यांनी आपल्या मुलांच्या तबकड्यांच्या वापरावर कडक निर्बंध लावले होते. नवल म्हणजे स्टिव्ह जॉब्स ह्यांच्या घरी एकही आयपॅड नव्हता! ट्विटर स्थापन करणारे इवान विल्यम्स ह्यांनी ही असेच नियम लागू केले होते -- त्यांची मुले त्यांना हुकूमशाह म्हणतात. पण ट्विटरचे सी. ई. ओ डिक कोस्टलो उलट मताचे आहेत. जोवर त्यांची मुलं घरातल्या लिविंग रूममधे आहेत तोवर त्यांच्या स्क्रीनटाईमवर निर्बंध नाहीत. कोस्टलो ह्यांना वाटतं की अती रोकटोक केली तर त्याचा मुलांवर विपरीत परिणाम होतो; ती बंड करतात.  

असो. बऱ्या-वाईट सगळ्याच गोष्टींची माहिती सहज उपलब्ध असल्याने मुलं झपाट्याने नवनवीन गोष्टी शिकत आहेत... काही, आपल्या कुवतीपेक्षा पुढच्या गोष्टीही. आणि येणाऱ्या काळात जर बहुतांश कामे रोबोच करणार असतील तर तंत्रज्ञानाकडे पाठ फिरवून किंवा मुलांना त्यापासून लांब ठेवून कसं चालेल?

प्रत्येक मोठ्या बदलाची आधी भितीच वाटते. त्यात तांत्रिक बदलाची अधिकच. रेडियो, नंतर दूरदर्शन, नंतर दूरदर्शनची दुसरी वाहिनी, मग केबल टीव्ही आणि नंतर इंटरनेट. प्रत्येक अविष्काराचे स्वागत चाचरतच केले गेले आहे. पण हळूहळू आपल्याला ह्या गोष्टींचा समतोल पद्धतीने वापर करणं जमू लागलं.

आज बहुतेक मुलांच्या हाती टॅबलेट वा फोन आहे ही चूक पालकांची व काहीशी आजी-आजोबांचीही आहे. व्यस्त दिनचर्येमुळे पालक मुलांबरोबर वेळ घालवू शकत नाहीत. आणि मुलांच्या न संपणाऱ्या ऊर्जेला व प्रश्नांना बिचारे आजी-आजोबा ते काय पुरे पडणार. मग हाती टॅब देणं हा एका सोपा पर्याय होतो. आजी-आजोबांना ‘पटवायला’ व त्यांच्याकडून स्क्रीनटाइम मिळवायला थोडासाच हट्ट पुरतो. तसच पालकांच्यातही चढाओढ असते: “त्याच्या मुलाकडे आयफोन ६ आहे; मी ५ तरी घेऊन द्यावा”. “अमक्याकडे एक्सबाॅक्स आलाय. मीही आणायला हवा”.

मग ह्या समस्येवर उपाय काय? मुलांना तबकड्यांच्या अपायांची माहिती देत राहिली पाहिजे. सांगितलं पाहिजे की इंटरनेटवर दिसणार्या अनेक जाहिराती फसव्या आहेत. सोशल नेटवर्किंग साइटवर नेमकी किती माहिती पुरवावी, कोणाची ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ स्वीकारावी इत्यादी गोष्टींबद्दल जागरुकता निर्माण करायला हवी.
ह्या तबकड्यांचा वापर आपण अलगदच नियंत्रित करत मुलांना विचार करायला लावणाऱ्या गोष्टींकडे वळवलं पाहिजे.

उदा: रूबिक्स क्यूब सोडवण्याचे अनेक व्हिडिओज् यूट्यूबवर आहेत. मुलांच्यात हे व्हिडिओ बघून क्यूब लवकरात लवकर सोडवण्याची स्पर्धा लावा. एक्स बाॅक्समधे बेसिक प्रोग्रॅमिंगचे खेळही आहेत. ह्यात मुलांना काहीतरी घडवण्यास प्रवृत्त करावं. मुलं जर काही वाद्य शिकत असतील तर संगीताशी निगडित कलात्मक ऍप्सकडे त्यांना वळवाव. खान अकॅडमी व कोर्सेरा सारख्या वेबसाइट्स उच्च शिक्षणाचं स्वरूप बदलत आहेत. त्यांचा वापर वाढवा.

शेवटी काय, ‘पालक उगाचच आपल्या स्क्रीनटाइमच्या विरोधात नाहीत’, हा विश्वास मुलांना द्या. झालच तर तुम्ही स्वत: तांत्रिकदृष्ट्या सजग, साक्षर व्हा.

स्वप्नीलचा ठाम विशवास आहे की AI, IOT ह्याचा सुळसुळाट असला तरीही मानव त्यावर नियंत्रण नक्की मिळवणार. नव्या पिढीच्या ह्याच उमेदीने मी ह्या लेखाचा शेवट करतो. आशा करूया की आजच्या व येणाऱ्या काळाच्या आव्हानांना आपण नीट तोंड देऊ!

- केशव पाटणकर


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा