ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी...

काही नाती नेहमी ह्रदयात फुलतात, मनात ठसतात 
या नात्यांना नाव असते ना रंग असतो 
असतो तो फक्त जिव्हाळ्याचा गंध 
आपुलकीच्या नात्यांना बांधून ठेवणारा मर्मबंध !

खोलीच्या बाहेर रात्र धुक्याची चादर लपेटून अजूनच गूढ भासत होती, रातकिड्यांचा किर्...किर् असा आवाज रात्रीच्या निरव शांततेच्या डोहात आवाजाचे तरंग उमटवत होता, वीज गेल्याने खोलीच्या बाहेरचा अंधार अजूनच अंगावर येत होता. त्याच वेळी त्या खोलीत एकत्र कुटुंबात वाढलेला आणि त्यांच्यापासून कधीच दूर न राहिलेला १७ वर्षाचा एक तरूण मुलगा एकटाच अंग चोरून बसला होता. तुम्हांला वाटेल ही एखाद्या गुढ कथेची सुरूवात तर नाही ना. पण नाही, ही माझी स्वतःची गोष्ट आहे. आज तब्बल वीस वर्षांनी देखील त्या रात्रीची आठवण सुध्दा मला नकोशी होते व माझ्या अंगावर सरसरून काटा आणते. माझ्या वयाच्या १७ वर्षांपर्यंत मी कधी म्हणजे कधीच एकटा राहिलो नव्हतो, आई-वडिलांपासून तर नाहीच. पण अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी मला स्वतःच्या घरापासून आणि आपल्या लोकांपासून पुढची चार वर्षे दूर रहावे लागणार होते. वसतिगृहात राहून मुलगा बिघडेल या भितीपोटी माझ्या बाबांनी (कोणी त्यांच्या डोक्यात हे भरवले होते तो अजूनपर्यंत भेटला नाही, पण जर कधी भेटलाच तर त्याची काही खैर नाही.) मला कॉलेजपासून साधारण वीस मिनीटांच्या अंतरावर एक छोटी दहा बाय दहाची खोली भाड्याने घेऊन दिली होती. पण १०-१२ नातेवाईकांनी सतत भरलेल्या घरातून वाढलेल्या माझ्यासाठी हे जणू सगळे काळ्या पाण्याच्या शिक्षेसमान होते. 

पण म्हणतात ना, जे होते ते कायम चांगल्यासाठी. कसे ते, हा लेख पूर्ण वाचल्यावर तुम्हांला कळेलच. बुडत्याला जसा काडीचा आधार तसे या नवीन गावात मला एकच आधार होता तो म्हणजे, माझ्या आईच्या बालपणीची मैत्रीण व तिचे कुटुंब – श्री. सुरेश व सौ. शोभा कुलकर्णी. मधल्या वीस वर्षांत या दोघींमध्ये लग्न होऊन वेगवेगळ्या शहरात रहात असल्याने फारसा संपर्क नावालाही नव्हता. दोघींमध्ये बराच फरक पडला होता. मावशीबद्दल आईकडून तिच्या कडक स्वभावाची, कॉलेजमधल्या धाडसी गोष्टींची वर्णने ऐकल्यामुळे मी सुरूवातीस तिला फारच घाबरून रहायचो. पण इतक्या दिवसांच्या सहवासाने मी ठामपणे सांगू शकतो की तो किंचीत कडक वाटणारा तिचा स्वभाव तिला वैयक्तिक आयुष्यात आलेल्या काही अनुभवांमुळे बनला होता. ती एखाद्या फणसासारखी आहे. या अशा दूर दूरपर्यंत सुरूवातीस कुठलेच नाते/नाव नसलेल्या पण आता रक्ताच्या नात्यापेक्षाही जास्त घट्ट अशा मायेच्या धाग्यांनी विणलेल्या या नात्यातील ओलावा/जिवंतपणा अजूनही तितकाच सजीव आहे. मी अशा नात्यांना कधी कधी नाव द्यायचे जाणिवपूर्वक टाळतो कारण मग ती नाती फारच औपचारिक होतात आणि त्याचे ओझे वाटायला लागते. या कर्तव्यदक्ष, प्रेमळ, सुगरण गृहिणीबद्दल मी आज लिहायचा प्रयत्न करणार आहे. तिच्या प्रेमाला, तिने मोजता न येण्याइतक्या केलेल्या उपकारांना, तिच्या अचाट धाडसाला, अफाट लोकसंग्रहाला, अचूक निर्णय क्षमतेला, योग्य सल्ल्यांना अचूक शब्दांत फक्त एका लेखात मांडणे, हे खरेतर माझ्या कुवतीबाहेरचे आहे. त्यासाठी एखादा सिध्दहस्त लेखकच पाहिजे. तिच्या व या कुटुंबियाबद्दल लिहायचे झाले तर वहीचे रकानेच्या रकाने भरतील तरीदेखील काहीतरी सांगायचे राहून गेल्याची जाणीव मला सतत सलत राहील. 

आता हा लेख लिहीताना त्या चार वर्षातल्या सगळ्या (चांगल्या व कटू) आठवणी डोळ्यासमोरून रंगबिरंगी पक्ष्यांचे थवेच्या थवे एकामागोमाग उडत जावे तश्या एकसलग गेल्या. माझी अभियांत्रिकीची चार वर्षे सुरळीत पार पडण्यामागे माझ्या मेहनतीपेक्षाही जास्त श्रेय या कुटुंबाला द्यावे लागेल. सुरूवातीच्या एक-दोन वर्षात, बरेच शनिवार-रविवार असतील जेव्हां मी अचानक कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांच्या घरी धडकलो असेन. घरात एकटे रहाणे ही कल्पनाच मला सहन व्हायची नाही. पण एकदाही त्या कुटुंबातील सदस्यांच्या कपाळावर आठी म्हणून उमटली नाही. त्या दोन दिवसात मला बेल वर मुक्त झालेल्या एखाद्या कैद्याला जो आनंद होत असेल ना, तसाच आनंद व्हायचा. सोमवारी विद्यापीठात जाताना माझी अवस्था कसाई धरून नेत असलेल्या बकर्‍यासारखी व्हायची. नंतर नंतर जसा जसा अभ्यासाचा भार वाढत गेला तसे तसे हे प्रमाण कमी होत गेले. पण मग मला बरेच दिवस घरी न आल्याबद्द्ल मावशी व काकांचा प्रेमळ ओरडा मिळे. 

त्यांच्या घरात सतत माणसांचा राबता असे. एकाच वेळी मावशीकडे, तिच्या भावजयीच्या भावाचा पुतण्या तर त्याच वेळी तिच्या मावस बहिणीची जाऊ, गावाकडचा शेत कसणारा गडी आणि अभियांत्रिकीला असलेला मी अशी बरीच लोकांची सरमिसळ असे. अशा वेगवेगळ्या लोकांचे नखरे, मानापमान सहन करत ती सगळ्यांशी अतिशय हसतमुखाने वागत असे व त्यांचा यथोचित पाहुणचार करत असे. माणसे जोडावीत आणि नाती जपावी ती देशस्थांनी असे का म्हणतात हे माझ्यासारख्या कोकणस्थाला (भले एकत्र कुटुंबातून आलो असतानाही) या कुटुंबाबरोबर राहूनच उमगले. माणसे जोडायला मी तेथूनच शिकलो. एखाद्या माणसामध्ये प्रमाणाबाहेर सहनशक्ति असणारी मावशी इतकी दुसरी व्यक्ति मी आजपर्यंतच्या आयुष्यात पाहिली नाही. त्यावेळी काही घरगुती कारणांसाठी मी धरलेला सोमवारचा उपवास बर्‍याच वेळी, एकतर सवय नसल्याने माझ्याकडून मोडला जाई. पण कितीही दिवसांनी/महिन्यांनी जरी मी त्यांच्या घरी गेलो तरी, सोमवारी माझ्या उपवासाला मला आवडणारे साबूदाण्याचे थालपीठ खाल्ल्याशिवाय ती मला सोडत नसे. तिला सगळ्यांच्या आवडीनिवडी, उपवास कसे लक्षात रहायचे, याचे कोडे मला अजूनही सुटलेले नाहीये.

वारणानगरच्या दूध संकलन प्रकल्पात मुख्य देखभाल अधिकारी म्हणून काम करणारे सुरेश काका, त्यांच्या हसतमुख व कामगारांच्या मदतीला तत्परतेने धावून जाणाऱ्या स्वभावामुळे सगळ्या कामगारांच्या गळ्यातील ताईत होते. बर्‍याच वेळी मध्यरात्री कामगारांना कामात आलेले अडथळे दूर करण्यासाठी गेलेल्या काकांना, मी पहाटे पहाटे परत आलेले व परत सकाळी तेवढ्याच उत्साहाने कार्यालयात जाताना पाहिले आहे. तरूण वयातील इंजिनीयरन्सना लाजवतील अशा उत्साहाने ते स्वतःला आपल्या कामात झोकून देत. आपल्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांशी कसे वागावे याचे उत्तम धडे मला काकांकडून मिळाले, त्याचा मला वैयक्तिकरित्या खूपच फायदा नोकरी करताना झाला.

अजून लिहीण्यासारखे भरपूर आहे पण ही शब्दमर्यादा मधे येते आणि सगळ्याच गोष्टी/अनुभव शब्दबध्द करणे माझ्या कुवतीबाहेरचे आहे. काही अनुभव मनाच्या कुपीत जपून ठेवायचे असतात, खास फक्त आपल्यासाठी. ते शब्दात मांडून त्यांची सांडवासांडव करायची नसते, नाहीतर त्यातील सुगंध उडून जायला वेळ लागत नाही. सांगलीच्या वझे वाड्यातील दहा बाय दहाच्या छोट्या खोलीत वाढलेल्या मावशीने मात्र त्याच वाड्याच्या मालकांच्या नातवाच्या (म्हणजे माझ्या) ह्रदयात मात्र स्वतःचे असे एक वेगळे स्थान राखले आहे. माझ्या कातडीच्या चप्पल पुन्हा पुन्हा करून जरी तिच्या पायात घातल्या तरी पुढील कित्येक जन्म देखील हे ऋण फिटणारे नाही. असे हे रक्ताच्या नात्यापेक्षाही जास्त घट्ट असलेले नाते हाच माझा आयुष्यभराचा अमूल्य ठेवा व त्यावर चक्रवाढ व्याजाने वाढत जाणारे या नात्यातील प्रेम हीच माझी खरी संपत्ती होय.


- ओंकार बापट


२ टिप्पण्या:

  1. You have aptly captured this journey with the underlying emotions. Having witnessed some of this personally (and being around in Warananagar during some of your weekend visits) I echo your sentiments. That family is an asset for all of us. I am sure Uncle's holy soul would have overwhelmingly received your words of gratitude...Well narrated!

    उत्तर द्याहटवा