व्यक्तीस्वातंत्र्य

आकाशी झेप घे रे पाखरा,
सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा …

या गाण्याचा सुंदर अर्थ आपल्या सर्वांनाच माहीत आहे. अहो पिंजरा सोन्याचा असला म्हणून काय कोणाला पिंज-यामध्ये राहायला आवडेल का? तर शंभर टक्के उत्तर मिळेल, नाही. प्रत्येक व्यक्तीला, पशुपक्ष्याला स्वछंदी, स्वतंत्र राहण्यास आवडेल असच उत्तर तुमच्याकडून हमखास मिळणार.

पूर्वी देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी प्राणांची आहुती दिली. त्यामुळे पारतंत्र्यातून आपली मुक्तता झाली. आपण खरच खूप भाग्यवान आहोत कारण आपण स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणून जन्माला आलो.

आज आपल्या भारत देशात कुठलीही व्यक्ती असो ती जन्मत: स्वतंत्र असून त्या व्यक्तीला सम्मान, प्रतिष्ठा, अधिकार मिळालेले आहेत. प्रत्येक व्यक्तीला परमेश्वराने विचार करण्याची शक्ती व कुशाग्र बुद्धी दिली आहे. यामध्ये कुठेही भेदभाव केलेला दिसत नाही. मग आपण का माणसा माणसामध्ये असा भेदभाव करतो? विनाकारण समोरच्या व्यक्तीचे स्वातंत्र्य हिरावून घेतो? स्वतंत्र राहणे, स्वतंत्र विचार जोपासणे, आवडी निवडीचे स्वातंत्र्य जपणे म्हणजे स्वैर वागणे नाही हे सर्वांनी समजून घेतले पाहिजे. स्वतःला ओळखायला शिकलं की मग समजतं की जगाचे विचार किती संकुचित वृत्तीचे असतात.

खरंतर प्रत्येक व्यक्तीचे स्वतंत्र राहणे, वैचारिक स्वातंत्र्य जोपासणे, त्याच्या आवडी-निवडी-सवयी वेगवेगळ्या असणे याचे भान प्रत्येक नात्यामधे असले पाहिजे. "व्यक्ती तितक्या प्रकृती”, या म्हणीप्रमाणे प्रत्येकाने एकमेकास समजून घेणे गरजेचे आहे. आजही आपल्या समाजात वर्णभेद, भाषा, धर्म, मानसन्मान, सत्ता व धनसंपत्ती ह्याचे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला संघर्ष करावाच लागतो.

मानवाधिकारांनी प्रत्येकाला भरपूर गोष्टींचे स्वातंत्र्य दिले असून सुध्दा आज अनेकांना जातीयवादासाठी लढावेच लागते. गरीब जनतेला त्यांच्या हक्काचे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. शेतकरी, मजूर, अनाथ बालके व स्त्रियांना खरच स्वातंत्र्य आहे का? आज सर्व क्षेत्रात स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने वावरत असताना मात्र समाजाचा स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन खरच बदलला आहे का? ती मोकळेपणाने वावरू शकत नाही, म्हणूनच वाटते खऱ्या अर्थाने स्त्री स्वतंत्र आहे का? असे अनेक प्रश्न आजही स्त्रियांच्या बाबतीत दिसून येतात. (हे फक्त भारतातील स्वातंत्र्याबाबतचे माझे वैयक्तिक विचार आहेत. )

आपल्याकडे आर्यांच्या आगमनापूर्वी राहणाऱ्या सिंधू व द्राविडी संस्कृतींमध्ये मातृसत्ताक पध्दत होती. कुटुंबातील सर्व अधिकारस्वातंत्र्य स्त्रीला असायचे. पुढे भारत स्वतंत्र झाल्यावर पुरुष प्रधान संस्कृती सुरू झाली. यामध्ये सर्व अधिकार व सत्ता पुरुषांनी स्वत:कडे घेतल्यामुळे स्त्रियांना वैचारिक स्वातंत्र्य मिळेनासे झाले. आपले पूर्वज नेहमी संस्कृतीबद्दल सांगताना सद्गुणी सावित्रीचे उदाहरण देतात. तिने कसे आपल्या पतीचे प्राण वाचवून त्याला परत आणून आपला पतीधर्म निभावला, याबद्दल वारंवार सांगितले जाते. पण किती लोकांना माहीत आहे की सावित्रीच्या पित्याने तिला स्वत:चा पती निवडण्याचे स्वातंत्र्य दिले होते. सावित्रीने सद्गुणी मुलाची निवड केली. अतिशय हुशार व उत्तम संवाद कौशल्य अंगी असल्यामुळे सावित्रीने यमाचे मन जिंकून घेतले. पण आज पन्नाशीच्या आसपास असलेल्या किती स्त्रियांना स्व:ताचा जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य मिळाले होते. या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांना नेहमी दुय्यम स्थान दिले गेले आहे. खरंतर स्त्रीला वैचारिक स्वातंत्र्य हवे असते पण बऱ्याच घरांमध्ये पती, पत्नी एकमेकांवर अपेक्षांचे ओझे लादतात, आपल्या आवडीनिवडी सवयी सारख्याच असाव्यात असा आग्रह धरतात. यामध्ये पुरुष घरातील स्त्रियांना स्वातंत्र्य द्यायला तयार नसतात. प्रत्येक वेळी स्त्रियांना गृहीत धरले जाते. एक व्यक्ती म्हणून त्यांच्या भावनांचा, विचारांचा आदर केला जात नाही. स्त्रीला स्वतंत्र विचार, आवडीनिवडी असू शकतात हे पुरुष समजून घेत नसल्यामुळे तिला आपल्या साथीदाराकडून व्यक्ती स्वातंत्र्य मिळत नाही. पतीला ज्या गोष्टी आवडतात त्याच स्त्रीने केल्या पाहिजेत असा आग्रह केला जातो. आपले आयुष्य सर्वांना जर खऱ्या अर्थाने सुखकर करायचे असेल तर घरातील, समाजातील प्रत्येकाच्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाचा स्वीकार केलाच पाहिजे. प्रत्येकाच्या मेंदूला स्वतंत्र विचार करण्याची शक्ती निसर्गतः मिळालेली असताना पुरूषी अहंकाराने स्त्री स्वातंत्र्य गमावून बसलेल्या अनेक स्त्रिया समाजात दिसतात. अनेक मुलींना शिक्षणाची इच्छा असून देखील शिक्षण पुरे न करताच लग्न केले जाते. त्यानंतर त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. यामध्ये मुलीच्या पसंतीचा विचार न करता लग्न केली जातात.

आता काळ बदलला आहे. पूर्वीच्या व आताच्या पिढीमध्ये बराच बदल झालेला समाजात दिसत आहे. पुरुषांची मानसिकता ही काळानुसार बदलत आहे. ही गोष्ट खरोखर स्वागत करण्यासारखी आहे. शेवटी काय? तर, "एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ". तर स्वातंत्र्य हे सर्वांनाच प्रिय असते याचे उत्तम उदाहरण म्हणजे खान्देश मध्ये साजरा होणारा आखाजी सण. हा सण सर्व समाजासाठी "बंधनमुक्तीचा" दिवस मानला जातो. या दिवशी सर्व स्त्री, पुरुष, शेतकरी, मजूर, व्यावसायिक, लहानथोरांना पूर्ण स्वातंत्र्य दिलेले असते. पण स्वातंत्र्य काय एक दिवसासाठीच असावे का? तर नाही. योग्य वेळी योग्य वयात आलेल्या व्यक्तीला वैचारिक व आवडी निवडीचे स्वातंत्र्य दिले गेले पाहिजे. फक्त स्त्रियांना नाही तर समाजातील प्रत्येकाला स्वातंत्र्य मिळणे गरजेचे आहे. लहान मुलांना सुध्दा चुका झाल्या तरी त्या सुधारण्याचे स्वातंत्र्य पालकांनी द्यायला हवे. आपल्या चुका सुधारूनच मुले उद्या देशाचे सुजाण नागरिक बनू शकतात. पुरुषांनाही त्यांच्या वरिष्ठांकडून स्वातंत्र्य मिळायला हवे. महिला आपले दु:ख जगापुढे मांडू शकतात पण असे अनेक पुरुष आहेत जे आपल्या अडचणी, दु:ख समाजासमोर आणत नाहीत. त्यामुळे त्यांचा कोंडमारा होतो. थोडक्यात काय, तर प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य मिळालेच पाहिजे.

आज मात्र समाजात स्वातंत्र्याची व्याख्या बदललेली आहे. प्रत्येकाचे स्वातंत्र्या बाबतीचे विचार वेगवेगळे असू शकतात. मी पूर्वी व आताच्या परिस्थितीत प्रत्येकाला कसे स्वातंत्र्य मिळत आहे याबद्दल माझे मत मांडले आहे. आज परिस्थिती खूप वेगळी आहे. सर्वांना बरेच स्वातंत्र्य मिळत आहे. आपापल्या आवडी निवडी जोपासून स्वत:च्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करता येत आहे. ही संख्या अगदी शंभर टक्के नसली तरी बऱ्यापैकी लोकांना व्यक्तीस्वातंत्र्य मिळत आहे. भारतात पूर्वी मुलाच्या जन्माचे स्वागत जेवढ्या आनंदाने व जल्लोषाने केले जात होते तेवढ्याच जोमात आज मुलीच्या जन्माचे देखील केले जात आहे. ही खरोखर खूप आनंदाची गोष्ट आहे. पण प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य मिळाले म्हणून त्याचा अतिरेक होऊ देऊ नये. “अती तिथे माती" ही म्हण आपल्याला माहितच आहे. स्वातंत्र्य मिळाले म्हणून मनाला येईल तसे वागू नये. आपल्याला मिळालेल्या "बुध्दी व नितीमूल्यांचा ऱ्हास" होता कामा नये. आपली संस्कृती सांभाळून स्वतःचे स्वातंत्र्य प्रत्येकाने जपावे, एवढी माफक अपेक्षा व्यक्त करते आणि मी आपला निरोप घेते.

धन्यवाद!
साै .प्रतिभा मुकूंद विभूते






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा