सखा- माझा जिवलग प्राणप्रिय सखा

त्याचं माझं नातं..साऱ्या चौकटींना भेदून जाणारं,
खूप जवळचं, खुप जिव्हाळ्याचं..मनाचा तळ गाठणारं,
आमची ओळखही जुनी, पुर्वजन्मीची वाटावी इतकी जुनी,
आणि तरीही नित्य-नुतन..जणु फुलं उमललेली असावीत पानोपानी !

माहिती नाही, माझ्या भावनांचे कल्लोळ सारे त्याच्यापर्यंत कसे पोचतात?
काही देखील न सांगता, ह्या ह्रुदयीचे त्या ह्र्दयी उमटतात?
एखादा सुखद प्रसंग..भावणारे सुर..सुक्ष्म छटाही त्याला कळतात
एखादी आठवण..काळजातले सल.. त्यालाही व्याकुळ करतात !

मला आवडतो त्याचा सहवास,
कुणीतरी आपल्याला इतकं जाणलय ही जाणीवच खास,
सतत त्याचा असणारा वावर माझ्या आसपास,
कुणीतरी, आपलं, इतकं हक्काचं असण्याचा आभास !

पण आजकाल मात्र त्यानं ताळतंत्रच सोडलय,
सतत माझ्याबरोबर रहाण्यासाठी भांडण मांडलय,
सांगितले देखील त्याला,
अरे बाबा, प्रत्येक रागाची एक ठरलेली वेळ असते,
त्या त्या ठिकाणी..त्या त्या वेळी तीच धुन शोभते !

तसेच आपण बरोबर असण्याचे, बरोबर दिसण्याचेही असतात नियम,
समाजात रहायचं तर पाळायलाच हवेत ना त्याचे कायदे कायम,
स्वत:चा नाही तर त्याने माझ्या प्रतिष्ठेचा तरी विचार करावा,
माझं वय, माझं समाजातील स्थान यांचा तरी आब राखावा !

पण नाहीच..सारखा आपला त्याचा एकच हट्ट,
सतत बरोबर राहू, आहे ना आपली मैत्री तेवढी घट्ट?
आता मलाही जाणवलय, 
त्याच्या सहवासाचं जणू मला व्यसनच लागलय

माझ्या अस्तित्वावरचे त्याचे आक्रमण मी प्राणपणाने रोखतीय,
कितीही तो प्रिय असला तरी त्याच्याशी नाते तोडायचे ठरवतीय,

पण कळले सारे, तरी वळत नाही,
वळलेही असले, तरी पाळले जात नाही,
अजुनही कुठेही, कधीही तो येतो, त्याला काहीच रोक नाही,
केव्हा तो माझ्या डोळ्यांतुन ओघळू लागतो..माझं मलाही कळत नाही !

- सौ वृंदा टिळक

1 टिप्पणी: