माझं विश्व

एक कथा बाळाची
आत्ताच्या काळाची

उमगली एक 
प्रकाशाची चांदणी
घेऊन आनंदाची बातमी 
आईबाबाच्या अंगणी

गोड बातमी कळताच
सर्वांना झाला आनंद खूप
आजोबांनी लावला देवासमोर
दिवा उदबत्ती धूप
आजीने ठेवले नेवैद्याचे ताट
वरून एक चमचा तूप

पोटात असताना वेळीअवेळी
खाऊ मागून आईला छळलं
मुलगा आहे कि मुलगी
हे तिला बरोबर कळलं

वाढलेलं पोट म्हणजे
होता आईचा हुकुमाचा एक्का
बाबांनी जपलं तिला खूप
न लागू देता एकही धक्का

पोटावर हात ठेवून म्हणाली आई,
"आत वाढतंय माझं बाळं
आता विणायला घेते हो मी
टोपी आणि शाल"

मी आत खेळतो आहे
हे तिला समजायचं 
पडताच एक लाथ
कधी कधी दुखायचं, पण
हसायची ती आतल्याआत

जन्माला येताना 
सहन केल्या तिनी कळा
आणि म्हणाली'
"एकदाचा बाहेर पड रे बाळा"

प्रसवाच्या वेळीस 
बऱ्याच झाल्या वेदना
बाबा, आज्जी आणि आजोबा
सगळेच करू लागले प्रार्थना

पहिल्याच क्षणी मला बघताच 
आनंदाचे अश्रू लागले गळू
आई झालेली जबाबदारी
लगेच लागली तिला कळू

जन्माला येताच तिने
धरले मला तिच्याजवळ
आणि म्हणाली,
"अय्या किती छान आहे तुझी जावळ!!!"

कसे आहे ना पहिल्यांदा
तिने ऐकले मला रडताना
मी ऐकलं तिला 
कौतुकाने हसताना

माझ्याकडे पाहताच
बाबांचा उत्साह वेगळा
पण माझं काय
आपला कधीही रडू लागला

बघायला आलेले म्हणायचे
"काय गो आई होणे
काही सोपे काम नाही बरे"
पण ती म्हणाली,
"बोलता न येता 
हे सांगायचे कसे
बाळाचे कष्टही तितकेच खरे"

आणि म्हणाली,
"स्वागत आहे हो बाळा तुझे ह्या जगात
घाबरू नको हा कशाशी
मी आहे तुझी आई सदैव तुझ्या पाठीशी!!!"

-सुमेधा जोशी

४ टिप्पण्या: