भेळ: एक निर्भेळ आनंद


भेळ...नुसते नाव उच्चारले तरी तोंडाला पाणी सुटते. भेळ, भेलपुरी, झालमुरी,चटपटे, चुरमुरी अशी तिची विविध भाषेतली नावे आणि प्रत्येक ठिकाणी तिला बनवण्याची वेगळी पद्धत! मात्र भेळ या नावाची खासियत अशी की "ळ" या अक्षराची देणगी फक्त मराठी भाषेला आहे. आणि ते अक्षर ज्या पदार्थांच्या नावात येते त्यांच्या मध्ये माणसाची ब्रह्मानंदी टाळी लावण्याची क्षमता आहे. उदा, भेळ, मिसळ... नाव निघाले की जीभ चाळवते... डोक्याला शॉट बसतो.


भेळ हा साग्रसंगीत सोहळा असतो. मला तर वाटते की भेळ हा प्रकार घरी बनवायच्या भानगडीत पडूच नये. सराईत भेळवाल्याच्या "हातची चव" घरच्या भेळेला येणे शक्य नाही. त्यापेक्षा आपल्या आवडत्या भेळेच्या गाडीवर अथवा दुकानात जावे. तिथे काचेच्या पेटीत ठेवलेले चुरमुरे-फरसाण, वरच्या कप्प्यात दिमाखात बसलेले टोमॅटो, कैरीचे डेकोरेशन नजरेने टिपावे. भेळवाल्यांची कांदा कापायची हालचाल निरखावी. 

भेळेची ऑर्डर दिल्यावर खुर्चीत बसण्याऐवजी तिथे उभे राहून "मेकिंग ऑफ" भेळ चा कार्यक्रम बघावा. भेळवाला भडंगाचे चुरमुरे, चटपटीत फरसाण यांच्या मिश्रणाला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि सिझन असेल तर कैरी यांची आहुती देतो. मग त्यावर चिंचेच्या पाण्याचा अभिषेक करतो. मग हिरव्या मिरचीची पूर्णाहुती पडते. मिरचीचा उग्र गंध नाकाची घ्राणेंद्रियें चाळवतो... यानंतर या सर्वांना पातेल्यात एकत्र केले जाते... प्रत्येक घटक त्याचे स्वतःचे अस्तित्व विसरून दुसऱ्या घटकात विलीन होईपर्यंत! भेळवाल्यांची ही भेळ कालवण्याची हालचाल लयबद्ध असते. मध्येच ते देवळातल्या घंटेसारखा पातेल्यावर डाव आपटून आवाज करतात तो कानांनी टिपायचा.

आतापर्यंत डोळे नाक आणि कान यांनी भेळेच्या आगमनाची वर्दी जिभेला दिलेली असते. हात देखील ती प्लेट हातात घ्यायला आतुर झालेले असतात. यथावकाश भेळवाला ती भेळ प्लेटमध्ये ओततो. त्यावर शेव, खारे दाणे आणि कोथिंबीर भुरभुरवतो, मग कोरडी पुरी आणि चमचा टाकून प्लेट हातात देतो. ती प्लेट हातात आली की आधी त्या भेळेचा सुगंध घ्यायचा आणि मग हळूचकन पहिला घास तोंडात टाकायचा. जिभेवर रेंगाळणाऱ्या त्या गोड तिखट आंबट मिश्र चवीने डोक्याला झिणझिण्या येतात... प्रत्येक घासागणिक त्या वाढतात… पोट भरते पण मन नाही अशी अवस्था होते. त्यानंतर मुखशुद्धी साठी थोडे खारे दाणे मागून घ्यावेत. असा भेळेचा आस्वाद पंचेंद्रियांनी घ्यावा!

महाराष्ट्रात कुठेही जा, तिथले एकतरी भेळेचे ठिकाण प्रसिद्ध असतेच! मुंबईला चौपाटीला जाऊन भेळ न खाणे म्हणजे देवळात जाऊन देवाला नमस्कार न करण्यासारखे आहे.

मी पुणेकर असल्याने पुण्यात माझी काही खास आवडीची ठिकाणे आहेत. ती अशी:

कल्याण भेळ
आधी लॉ कॉलेजच्या इथल्या कॅनॉल रोडवर रस्त्याच्या कडेला होते हे ठिकाण. भेळ पाणीपुरी चाट सँडविच दहिवडा असे बरेच प्रकार मिळत असले तरी भेळेसाठी प्रसिद्ध. गाडीवर भेळ विकत घ्यायची आणि आपल्या गाडीवर बसून खायची. त्यामुळे तरुण जोडप्यांची इथे गर्दी. इथली भेळ एकदम गोडसर पण त्याला योग्य तेवढ्या तिखटपणाची झालर. पुढे ती गाडी गेली पण आता जागोजाग ‘कल्याण भेळ’ ची दुकाने निघाली आहेत. त्यांच्याकडे मिळणारे चिंचेचे पाणी मिनरल वॉटर पासून बनवलेले असल्याने NRI लोकांच्यात पॉप्युलर आहे.

पुष्करणी भेळ

विश्रामबाग वाडा आणि चितळे दुकानाच्या मधल्या रस्त्यावर असलेल्या या दुकानात फक्त भेळ मिळते. संध्याकाळी काही तास हे ठिकाण सुरू असते. भेळ बनवणारे काका आणि ऑर्डर /पैसे घेणारे आणि कांदा कोथिंबीर कापणारे काका गेली 30 वर्षे बदललेले नाहीत. त्यांच्या भेळेच्या चवीतही फरक पडलेला नाही.

इतकेच नव्हे तर दुकानात गर्दी वाढली तर "20 मिनिटे थांबावे लागेल” किंवा “भेळ संपली" असे ठणकावून सांगायच्या त्यांच्या पद्धतीत देखील काही फरक नाही. त्यांच्याकडे रोज पाण्याचे पिंपभर चिंच-खजुराचे पाणी असते. ते संपले की दुकान बंद.त्यांची भेळ घरी पार्सल नेली तर ते इतर भेळ वाल्यांसारखी ओली भेळ कालवून न देता कांदा, चिंचेचे पाणी आणि कोरडी भेळ वेगळी पॅक करून देतात हे त्यांचे वैशिष्ट्य!

नवरत्न भेळ
ही पुष्करणी भेळेच्या दुकानासमोर मिळते. पुष्करणी भेळेपेक्षा तिखट पण चटकदार. आत बसायला निवांत जागा. लक्ष्मी रोडवर खरेदी झाल्यावर रस्त्यावर असलेला कोलाहल ऐकू न येता तिखट भेळ खायची असेल तर ‘नवरत्न भेळ’ ला जरूर भेट द्या.

कल्पना भेळ

SP कॉलेजवळचे हे ठिकाण. जेमतेम एक माणूस उभा राहील एवढे हे दुकान. बाहेर रस्त्यावर टाकलेल्या टेबल खुर्च्या. आणि एकदा खाल्ल्यावर पुन्हा ऑर्डर करावीशी वाटणारी भेळेची चव एवढ्या जोरावर चालते हे दुकान.

गणेश भेळ

कोथरूडला यशवंतराव चव्हाण नाट्य गृहासमोरच्या बोळात असलेले दुकान. यांच्याकडचे फरसाण सुद्धा ते स्वतः बनवतात. तिथे शेव तळणारे काका लहान मुलांना उकळत्या तेलात हात घालून कढईतून नाणे काढून दाखवायचे. या भेळेचे वैशिष्ट्य म्हणजे चविष्ट फरसाण आणि हिरव्या मिरचीचा झटका!! 

झटका भेळ
झटक्यावरून आठवले… शिवाजीनगर रेल्वे स्थानकावर जिन्याखलच्या जागेत मिळणारी ही भेळ झटका या नावासाठी प्रसिद्ध आहे. या भेळेच्या चवीत तर झटका आहेच पण मला वाटते दुकानाचे मालक भेळ बनवताना मानेला झटका देत भेळ कालवतात म्हणून झटका भेळ नाव दिले असावे त्यांनी! या भेळेची खासियत अशी की लोकल ट्रेन पकडायची कितीही घाई असली तरी अस्सल खवय्ये या भेळेचे पार्सल घेतल्याशिवाय पुढे जात नाहीत.

सारस बाग, कमला नेहरू पार्क, कोथरूडचे थोरात उद्यान, संभाजी बाग अशा सर्व बागांच्या बाहेर हमखास मिळणारा प्रकार म्हणजे भेळ!

असेच एकदा मुलांना संभाजी बागेबाहेर भेळेच्या दुकानात नेले तर तिथे फळ्यावर मेनू लिहिला होता. त्यात "टीव्ही भेळ" असे नाव दिसले. हा काय प्रकार आहे विचारल्यावर मालक म्हणाले, ओली भेळ पार्सल म्हटले तर आम्ही भेळ कालवून देतो. पण टीव्ही भेळ म्हटले तर कोरडी भेळ, चिंचेचे पाणी, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर वेगळे पॅक करून देतो. तुम्ही घरी आपापली कालवून टीव्ही बघत भेळ खायची. कांदा टोमॅटो उरला तर दुसरे दिवशी कोशिंबीर करायला होतंय! मला फार आवडला हा प्रकार!!

अशी ही सर्वगुण संपन्न भेळ! जिभेला आणि मनाला निर्भेळ आनंद देण्यासाठीच तिचा जन्म झाला आहे. म्हणून तर पिझ्झा बर्गरच्या परकीय आक्रमाणानंतरही भारतीयांच्या मनात ती स्वतःचे अढळ स्थान टिकवून आहे.
- विनया रायदुर्ग


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा