आरोग्याचे नाच-गणित

सुट्टीत भारतात गेलो होतो तेव्हा एका घरगुती गेट-टुगेदरला आम्ही मैत्रिणी मुलाबाळांसोबत भेटलो. अनेक दिवसांनी भेटल्यामुळे खूप गप्पा झाल्या. मुलांची गाणी, त्यांचे नाच हे कार्यक्रम सुद्धा झाले. त्यातच एका चिमुकलीने फार सुंदर आणि लयबद्ध असे नृत्य सादर केले. कलेकडे आणि विशेषत: नृत्याकडे माझा अधिक कल असल्यामुळे मी तिला “कुठे शिकतेस गं?”, असं पटकन विचारलं. तेव्हा कळलं की नृत्य हा विषय आता शाळेत बंधनकारक झाला आहे.

हल्ली नृत्य, गायन, वादन ह्यां कलांना विशेष महत्त्व दिले जात आहे ही चांगली गोष्ट आहे. नृत्य ह्या विषयात प्रचंड ताकद आहे.

नृत्याचा आरोग्याशी फार जवळचा संबंध आहे. नृत्यामुळे बुद्धी सर्वार्थाने विकसित होते. मन स्वच्छ, आनंदी आणि उत्साही तर राहतच, तसेच एकाग्रता वाढायलाही मदत होते. शरीराची लवचिकता वाढते, हातापायाच्या हालचाली प्रमाणबद्ध व लयबद्ध होतात, हृदय ताकदवर होते, फुफुसांची क्षमता वाढते, विचार दक्ष व चपळ होतात व आत्मविश्वास वाढतो असे नृत्याचे अनेक फायदे आहेत. 

नाचामुळे शरीराच्या अनेक अवयवांचा व्यायाम होतो. उदा: हात व बाहूंची अनेक दिशांमधे हालचाल होते व त्यांच्यावर अनेकदा ताणही पडतो. त्यामुळे ते लवचिक व बळकट होतात. डोळ्यांची बुबूळे प्रत्येक हालचालीत वापरली जातात. म्हणून डोळ्यांना सजग रहावे लागते व त्यातील स्नायू बळकट होतात. यामुळे डोळ्यांचे विकार, फ्रोझन शोल्डर व टेनिस एल्बो सारखे विकार होण्याची शक्यता कमी होते. नृत्यामुळे रक्तदाबही आटोक्यात राहतो. एरोबिक्स ह्या नाचावर आधारित व्यायामप्रकाराचे फायदे अनेक आहेत.

नृत्याला योगाचाही एक प्रकार म्हटले जाते. नृत्यात बोटांना जोडून ज्या हस्तमुद्रा केल्या जातात तशा योगासनातही केल्या जातात. आपल्या पाच बोटांच्या टोकांना पंचमहाभूतांची शक्ती असते. बोटांची टोकं एकमेकांवर दाबल्याने पंचमहाभूतांच्या शक्तींचा समतोल राहून शरीराच्या सर्व क्रिया व्यवस्थित होतात.


नृत्य म्हटलं की त्यात जसे शब्द व भाषा येतात तसेच येते गणितसुद्धा. आणि त्यातून येते स्वत:विषयीची जागृकता. संगीताच्या ठेक्याचा, लयीचा नीट हिशोब नाही ठेवला तर नृत्यातले सौंदर्य हरवते. वर्तुळाकार वा सरळ रेष ह्या गणिताच्या परीक्षेइतक्याच नाचातही अचूक काढणे गरजेचे असते. शास्त्रोक्त नाचात या अशा मांडणीचा विचारपूर्वक वापर केला जातो.

कत्थक मधे गिरकी घेत काढलेला वर्तुळाकार वा बॅलेमधील हातापायांचा षटकोन हे मनाची व शरीराची सांगड असल्याशिवाय साध्य करणं कठीणच. नृत्य सादर करतानाही मनाची एकाग्रता साधावी लागते. जरा जरी मनाची चलबिचल झाली तरी नृत्याचा ताल, ठेका, लय चुकू शकते.

सध्या शास्त्रीय किंवा लोकनृत्यापेक्षा बाॅलिवूड नृत्याकडे लोकांचा कल अधिक दिसतो. याचं एक कारण म्हणजे शास्त्रीय नृत्यात अनेक तांत्रिक बाबी असतात ज्या समजायला जड जातात व त्यामुळे नृत्याचा कंटाळा येतो. दुसरं कारण प्रसारमाध्यामातून लोकप्रिय होत चाललेले बॉलिवूड डान्सवर आधारित ‘रियालिटी शोज’ हे होत. गम्मत म्हणजे या रियालिटी शोजमुळ् शास्त्रोक्त नाचालासुद्धा चांगले दिवस आले आहेत. मुलं काहीतरी ‘हटके’ करण्याच्या वेडाने पाश्चात्य का होईना, पण शास्त्रोक्त नाच शिकत आहेत.

नृत्यशिक्षण लहानपणीच सुरू केलं तर मुलांना शिस्त लावण्यातही मदत होते. मनाची एकाग्रता वाढते व ह्यातून सकारात्मक विचार वाढतात. साहजिकच, आत्मविश्वास वाढून शरीरात जोम, जोश निर्माण होतो. अशा मुलांना इतरांशी संवाद साधण्याची कला आपोआपच अवगत होते. वेगवेगळ्या परिस्थिती व व्यक्तींशी जुळवून घेता येत. ह्यातून मुलांच्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो.

आपल्यापैकी अनेकांनी, विशेषत: पुरुषांनी, लहानपणी नाच शिकलेला नाही. पण कुठल्याही वयात तुम्ही नृत्य शिक्षण सुरू केलं तरी त्याचा फायदाच होतो.

पण आड येतो आपला भारतीय भिडस्तपणा: कोण काय म्हणेल, कोणाला काय वाटेल याचं ओझं सतत आपण मानगुटीवर वागवत असतो. लहान असताना मोठे काय म्हणतील व मोठं झाल्यावर लहान आपल्यावर फिदी फिदी हसतील यात आपण गुरफटलेले असतो. या तुलनेत पाश्चात्य देशातला माहोल वेगळा आहे. मनाचे करणे व स्वत:चा आनंद शोधणे याला ते गैर मानत नाहीत. हळू हळू आपल्याकडेही लोकांचा दृष्टीकोन बदलत आहे पण त्याला वेळ लागेल. गरज आहे नाचाची क्षमता ओळखण्याची. हे एक जीवनपरिवर्तनाचे साधन आहे -- स्वत:ला हरवून, आनंदाला मिठी मारून, स्वच्छंद पद्धतीने पण नजाकतीने जगण्याचं. मन व शरीराचा मेळ घडवून सुदृढ आयुष्य घडवण्याची किल्ली.

हेच तर खरं सर्वांगीण फिटनेसचं रहस्य. नाही का?


- सोनाली नाईक







1 टिप्पणी: