रात्र

ह्या एकाच बाईवर मी मनापासून प्रेम केलं. अर्थातच एकतर्फी. 

ती काही कुणाच्या हाती लागणारी नाही. वर वेगवेगळ्या वेळी इतकी वेगळी की आपण कुण्या भलत्याच माणसाला भेटलो का, असं वाटावं. पण तरीही - आणि कदाचित त्यामुळेच - तिचा शोध एक ध्यास झाला आणि मी अनेक रात्री जागून काढल्या, अजूनही काढतो. 

तिचा - माझा स्वभावधर्म एक आहे का, हे ही खात्रीनं सांगता येत नाही. मला एकटं राहायला आवडतं. ती एकटी राहते - की पडते - ते मला माहित नाही. पण एकांत हा तिच्या पदराला बांधलेला आहे. ती येते तेव्हा सगळं शांतावतं, मिटतं, निजतं. किंवा जागं असलं तरी आपल्यात आणि आपल्यासाठीच जागं असतं - नाईट क्लबांसारखं. तिच्यासाठी तिच्याबरोबर किती जणं जागतात मला माहित नाही. सूर्योदय आणि सूर्यास्त बघायला हजारो लोकांची उडालेली झुंबड मी अनेक ठिकाणी बघितली आहे. पण रात्र बघायला, जगायला, लोकं असे जमताना माझ्या तरी पाहण्यात नाहीत. दिवसाचा प्रकाशोत्सव साजरा करण्यातच सगळे इतके थकतात की रात्रीच्या तमोत्सवाची कोणी तमा बाळगत नाही. 

दुसरं असं की दृष्टीनं आपल्यावर जी काही जादू घातलीये तिच्या प्रभावाखाली दृश्य नाही ते बऱ्याचदा आपल्या जाणिवेच्या कक्षेतही नसतं. त्यामुळेही असेल कदाचित की रात्र "बघायला" कोणी जागं रहात नाही. पण रात्र मला बऱ्याचदा अँड्रियास हायनिकीच्या "डायलॉग इन द डार्क" सारखी वाटते - डोळसांना आंधळं करून संवेदनांच्या एका वेगळ्या जगात नेणारी. पण आयुष्यभर डोळ्यांवर पट्टी बांधून राहणारी गांधारी हा अपवादच. शिवाय तिला ते भावलं की नाही हा वादाचाच मुद्दा. त्यामुळे आंधळेपणाचा अनुभव हा नव्या जाणिवा खुल्या करणारा ठरण्यापेक्षा विस्कटून टाकणारा ठरू शकतो. कित्येक लोकांना अंधाराची - अगदी "डायलॉग इन द डार्क" सारख्या सुरक्षित अंधाराचीही - भीती वाटते. मला "तशी" भीती वाटत नाही कारण माझ्या मनातली पिशाच्चं तिच्या अंधारात मोकाट सुटत नाहीत. इतर काहींना चक्कर येते, उलटी होते. मला अदृष्टाच्या चाहुलीनं तसं भोवंडायला होत नाही. 

मला रात्र "दिसते" तिचा गर्द द्राविडी किंवा आफ्रिकन रंग मला आवडतो. ती त्यामुळे मला जास्तच सुंदर वाटते. जातीची. रंगरंगोटी करून सौन्दर्याचा आव आणणारी, दृष्टीसारखी नटवी वाटत नाही. दुसरं म्हणजे मला रात्रीचा अंधार म्हणजे दृष्टीच्या एकछत्री अंमलापासून मुक्ती वाटते. रंगवैभवांचे झेंडे रोवलेल्या लक्ष वेधण्याच्या गदारोळात स्पर्श, गंध, नादानं बहरणारी अनवट अरण्यकन्या वाटते. रात्री रातकिड्यांचा तानपुरा झंकारत राहतो, पाली चुकताल वाजवत राहतात, पानांची खर्ज सळसळ दरवळत राहते, समुद्राची खारट गाज झुळझुळत वाहते. पायाला ओलं दव बिलगतं, पाचोळा कुरबुरत चुरतो, पानांवरुन ओघळणारं पाणी टपटपत टप्पा गातं. वाहनांची चाकं झपझपतात. वारा गालांवरून, केसांवरून, कानाच्या पाळ्यांमागून, हातांच्या शहाऱ्यांवरुन रेशीमतो. रानाचा कडवट मादक वास त्याच्यावरती फवारलेला - एखाद्या अरबी श्रीमंताच्या उग्र उंची परफ्यूमसारखा. 

अंधार वाहत राहतो रात्रीच्या ब्रह्मपुत्र पात्रामधून - ग्रँड कॅनियन सारखा खोल, गंभीर. त्याच्या वाहण्याची लय सापडली की आपली नाव व्हायला वेळ लागत नाही. देहाकर्षणातून सुटून मी वाहत जातो संथ, अचंबित, नगण्य. आपल्या अस्तित्वाचं लख्ख भान येतं. शिवाय रात्रीची अदा काही अजबच. एखाद वेळी विश्वमोहिनी होऊन दिमाखात माझ्या उंबऱ्याच्या बाहेरून वाहत जाईल, मान रुबाबात वाकडी करून. आणि एखाद वेळी सरळ उशाला येऊन बसेल, केसांमधून हात फिरवेल, चहा हवा का विचारेल - एखाद्या प्रेयसीसारखी. ती सखी आहे, ती गुरु आहे, ती आदिमाता आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती "आहे", ती न चुकता येते. तिच्या किनाऱ्यापाशी प्रत्येकाला आपली हक्काची जागा आहे. तिच्या घाटावर निःशंक पाण्यात पाय सोडून बसता येतं आणि तिच्यात पडलेलं आपलं प्रतिबिंब विनान्याय पाहता येतं, स्वीकारता येतं. ह्यामुळेच ती मला आवडते, खूप खूप आवडते.



- नितीन मोरे


1 टिप्पणी: