संपादकीय - स्व… तंत्र

माणूस हा एक सामाजिक प्राणी आहे. पण तांत्रिक व आर्थिक प्रगतीने तो स्वत:मधे रमू लागला आहे. ह्यात त्याला स्वतंत्र वाटतं. परिणामी, तो अधिकाधिक एकाकी होत चालला आहे. स्वातंत्र्याचा हव्यास अगदी लहानसहान गोष्टींत दिसू लागला आहे: माझी स्पेस, माझा मोबाइल, माझं फेसबुक/ट्विटर, माझे टीव्ही चॅनल, माझा वीकेंड... इतकच काय तर माझी कारसुद्धा!

प्रगतीच्या पथावर वाटचाल करताना आंतरराष्ट्रीय सीमांचं बंधन उरलेलं नाही. ह्यामुळे आपण आपल्याच लोकांपासून दूर जातोय. मनात जवळीक असेलही पण कळत-नकळत दुरावे वाढत चालले आहेत. नवरा बायको आपापल्या कामात आठवडाभर व्यस्त असतात आणि तरीही वीकेंड कसा घालवायचा यावर एकमत होत नाही. मग काय... तुझा तू आणि माझा मी विरंगुळा शोधतो... स्वतंत्रपणे.

मुलंही हाती असलेल्या टॅब-मोबाइलमुळे एकलकोंडी होत चालली आहेत. आपापसातला संवाद प्रत्यक्षात कमी व ह्या असल्या ब्लॉग्स वा ऑनलाइन माध्यमातून अधिक होत चालला आहे.

ह्या हव्यासामुळे सामाजिक, मानसिक व कौटुंबिक समस्या निर्माण होत आहेत. देश, मातृभाषा, कुटुंब यांवरील प्रेम, श्रद्धा लोप पावत आहे. या उदासीनतेचा परिणाम कुणा एका राष्ट्रासाठीच नाही तर मानवजातीसाठीच भयावह होऊ शकेल.

अनेक देशात जनसंख्या घटत आहे. तसच अधिकाधिक कामं स्वयंचलित होत असल्यामुळे माणसांची गरज कमी होत आहे. तात्पर्य, माणूस स्वत:च्याच ऱ्हासाकडे वेगाने चालला आहे. शक्य आहे की कालांतराने आपण पृथ्वीला मनुष्यापासून स्वातंत्र्य देऊन बसू... कवीकल्पना की रास्तं भिती ?!

सस्नेह
ऋतुगंध समिती २०१७
१५ ऑगस्ट २०१७



(चित्र : इंद्राणी कुलकर्णी )









   


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा