मैत्र

२७ हे अजिबातच कोवळं वय नव्हे, आणि गाठीशी १ वर्षाची मुलगी असलेल्या बाप्याला तर अजिबातच बावरून वगैरे जाणं शोभत नाही. पण आयुष्यात कधीही आई-वडील, भावंडं, मित्र-परिवार यांच्यापासून दूर न राहिलेल्या, वरण-भात, मॅगी, उकडलेलं अंड आणि चहा याव्यतिरिक्त स्वयंपाक न येणाऱ्या, आयुष्यात कधी चमचा विकत घेण्याचा देखील गृहस्थाश्रमी निर्णय न घेतलेल्या दाम्पत्याला घरापासून २,५०० मैलावर वर निर्मनुष्य आणि भयाण शांत अशा संध्याकाळी बावरून जायला होतं, नव्हे रडकुंडीला यायला होतं हे आम्हाला ऑगस्ट २००८ मध्ये कळलं.

ती आमची सिंगापूरातली पहिली संध्याकाळ… म्हणजे सिंगापूरला जाऊन राहायचं ठरवल्यावर एक - दोन चकरा झाल्या होत्या. सिंगापूर बद्दलच ज्ञान ‘अपूर्वाई’ च्या २ पानात आटोपलं होतं. ३ जण ओळखीचे निघाले. त्यांच्याकडून खर्चाचे अंदाज काढून झाले होते. भाज्यांपासून कणकेपर्यंत माहिती मिळाली होती. सिंगापूरच्या पहिल्या सकाळी मुस्तफाच्या बाहेर रस्त्यावर सांबारचा वास घेऊन वाटलं होतं की “ह्या… हे आपल्याला सहज जमेल.”

पण त्या संध्याकाळी जाणीव झाली की इथे सगळं आहे, पण अजून यात आपलं काहीच नाही आहे आणि अजून आपण कोणाचे काहीच नाही आहोत. “बचपन से जवानीतक का सफर” असा झाला होता की न्हाव्यापासून पानवाल्यापर्यंत (ज्याच्याकडे आम्ही जायचो नाही) सगळेजण आजोबांपासून सगळ्यांना ओळखायचे (म्हणूनच आम्ही जायचो नाही). पहिल्या रात्री एक सहकर्म्याच्या घरून पोळी भाजीचा डबा आणला आणि परत येताना हेग रोडवरच्या निम-अंधाऱ्या आणि निर्मनुष्य गल्य्यांतून चालत येताना एकटेपणा पहिल्यांदा मूर्त स्वरूपात जाणवला. चिरडून टाकणारा क्षण होता तो.

पुढचे कित्येक महिने आम्ही याच जाणिवेच्या वेगवेगळ्या स्थितींमधून गेलो. प्रत्येक शनिवारी आणि रविवारी वेग -वेगळ्या मॉलमधून निरर्थक भटकंती. अनेक देखण्या ठिकाणी जाऊन देखील परत आल्यावर कंटाळ्याची भावना. त्या पहिल्या काही महिन्यांमधलं सिंगापूर आठवणीतून जात नाही. अजूनही ‘निराश क्षण’ या विषयावरचं चित्र काढायला सांगितलं तर मी त्या हेग रोड वरच्या गल्लीचंच चित्र काढीन.

पुढचे काही महिने असंच चालू राहिलं. मग महाराष्ट्र मंडळाचा नवरात्रोत्सव आला. तिथेही येरे माझ्या मागल्या… उधारीतून व्यक्त व्हायचं झालं तर “बिन चेहऱ्याची गर्दी”. थोडा वेळ घालवून बाहेर पडलो. आणि कोणीतरी थांबवलं “तू रॅफल्स प्लेसला कामाला जातोस ना?” एक तरुणी आणि तिचा समवयस्क तरुण मित्र विचारत होते. बोलणं निघालं आणि चक्क परत भेटायचं ठरलं. आमच्या अविस्मरणीय सिंगापूर-निवासाची नांदी झाली. थोड्याश्या ओळखीचं रूपांतर पटकन मैत्रीमध्ये झालं. त्यांच्या बरोबरीच्या अजून काही पोरं-पोरींशी ओळख झाली.

सिंगापूरच्या आयुष्याला लय सापडली. पहिल्या आठवड्यात विराण वाटलेल्या वाटांवरची सुंदर फुलझाडं दिसायला लागली. नंतर नंतर तर मुलीला सकाळी शाळेत सोडायला जाताना आतल्या गल्ल्यांमध्ये सायकल थांबवून रोज २ चाफ्याची फुलं गोळा करण्याचा रिवाजच पडला.

वेळ सरत गेला. काही ना काही कारणाने नवीन मित्रांचा आणि सिंगापूरचा ऋणानुबंध संपला आणि सिंगापूरच्या प्रवाहीपणाचीही एक ओळख झाली. मंडळी आली तशी पांगली आणि आम्ही परत एकटे. पण आता आम्ही अनुभवी झालो होतो. आपण एकटे नाही याची एव्हाना खात्री पटली होती. आपल्याला काम आणि वैयक्तिक आयुष्याव्यतिरिक्त काय करायचंय याची वाट सापडली होती. प्रसंग छोटासाच होता. ऑफिसजवळ जेवताना सिंगापूरमध्ये मराठी नाटकात काम करणाऱ्या एका तरुणाशी ओळख झाली होती. सिंगापूरमध्ये मराठी नाटक हा मोठा विषय आहे याचा अंदाज आला होता. “तू नक्की ये बघायला” असं आश्वासक निमंत्रण पण मिळालं होतं.

एका संध्याकाळी नाटकाच्या प्रयोगाला गेलो आणि भारावून गेलो. पार्ल्याच्या दीनानाथमध्ये येईल असा नाट्यानुभव. कुठेही ‘चालतंय’ हा भाव नाही. उत्तम कलाकार, उत्तम तंत्रज्ञ. कॉलेजच्या आठवणी जाग्या झाल्या आणि ही संधी मिळाली तर घ्यायची हे ठरलं.

नाटक आणि महाराष्ट्र मंडळ हा खऱ्या अर्थानी आमच्या सिंगापूर निवासाचा नांगर ठरला आणि आम्ही सिंगापूरशी कायमचे बांधले गेलो. तालमी, त्यामध्ये असलेला संपूर्ण कुटुंबाचा सहभाग. एकापेक्षा एक गुणी दिग्दर्शक आणि कमालीचे सहकलाकार. महाराष्ट्र मंडळाचं वाचनालय, महाराष्ट्र मंडळाचं काम, गणेशोत्सव, स्वरगंध, अभिवाचन, ऋतुगंध आणि शब्दगंध. प्रत्येक कार्यक्रमात नियम एकच ‘उत्तम अभिरुची’. पुढच्या नाटकासाठी रीतसर ऑडिशन्स झाल्या. हा सिंगापूर महाराष्ट्र मंडळाचा अजून एक मोठेपणा. कधीही कुणावरही “मला कोणी विचारतच नाही.” हा प्रसंग नाही. काम करायला माणसं भरपूर आणि तरीही प्रत्येक नव्या गुणवत्तेला पुरेपूर वाव.

त्या पहिल्या ऑडिशनच्या दिवसापासून मैत्र जुळत गेले. शाळा - कॉलेजच्या पलीकडे इतकी निर्भेळ मैत्री होऊ शकते हे पहिल्या प्रथम कळलं. आणि यावर कडी म्हणजे शाळा आणि कॉलेजमधले मित्रपण सिंगापूरात मिळाले. याहून अधिक काय पाहिजे?

अनेक सुंदर ठिकाणं नव्यानी कळली. सिंगापूरमध्ये मॉलमध्ये न जाता किती छान वेळ घालवता येतो त्याचा प्रत्यय आला. ई सी पी ला संध्याकाळी मस्त सायकल रपेट मारताना फारसं उकडत नाही हा शोध लागला. पब्लिक लायब्ररी मध्ये रविवार सकाळ किती उत्तम जाऊ शकते याचा प्रत्यय आला, मुस्तफा आणि ikea … (याचा नक्की उच्चार अजून कळत नाही म्हणून स्पेलिंग. एक उच्चार नक्की केला कि तो चुकीचा असं मानणारी ५-१० माणसं भेटतात आणि आपण बाळू ठरतो, असो) तर मुस्तफा आणि ikea, हे दोन जिल्हे मुंबई आणि ठाणे इतके सवयीचे झाले. स्वस्त आणि मस्त खाण्याच्या जागांचा शोध लागला. दृश्य आणि वास यांचा अलौकिक संगम असलेल्या फूड कोर्ट मध्ये पाय टाकायची हिम्मत झाली नव्हती कधी. पण आता चिकन राईस म्हणजे काय याची जवळून ओळख झाली आणि कॅरट केक मध्ये कॅरट का नाही हा “कटप्पाने बाहुबलीला का मारलं?” या इतका गहन प्रश्न पहिल्यांदा पडला. कौतुकानी खाल्लेल्या चिकन साते भ्रमनिरास केला आणि काहीच बडेजाव नसलेल्या रोजाकनी मनात घर केलं. पहिल्यांदा खाल्लेलं मँगोस्टीन दुवा घेऊन गेलं आणि पहिल्यांदा खाल्लेल्या डुरियनचा धक्का आणि तो डुरियन दोन्ही पचलं नाही. इतका घाणरेडा वास, इतकं घाणेरडं टेक्सचर आणि त्याला सर्वस्वी फटकून वागणारा अत्यंत आक्रमक गोडवा हे इतकं अजब समीकरण मी या आधी फक्त साजन सिनेमामध्ये पाहिलं होतं. (अर्थात सूज्ञांस अधिक सांगणे न लगे). गेलांगच्या कुप्रसिद्ध गल्ल्यांमध्ये बेडूक खायला न बिचकता गेलो. हे आणि असेच अनुभव गोळा करत गेलो. कापा म्हणजे कार पार्क हे कळायला लागलं आणि सिंगापूरचं हळूहळू ‘सिंगापो’ झालं.

सिंगापूरातले हे मैत्रीचे बंध खूप काही देऊन गेले. कधी बोट की - क्लार्क की वर रात्री जागवायला घेऊन गेले, कधी अरब स्ट्रीटवर तास न तास गप्पांचे फड जमवायला घेऊन गेले, कधी पहाटेचं जांभळं आकाश दाखवायला मॅकरिची रिझर्रवाॅयरला घेऊन गेले, कधी सुरेख संध्याकाळी सिंगापूर नदीच्या काठावर नाटकाच्या तालमीला तर कधी चायना टाऊनमधल्या बकाल ठिकाणी अविस्मरणीय पंगतीला.

जराशीही अतिशयोक्ती न करता आणि साहित्यिक अभिनिवेशाचा धोका पत्करून मला म्हणावसं वाटतं की सिंगापूरमुळे मला माझ्यातली रसिकता कळली. अनेक गुणी जनांनी आमचा सिंगापूर निवास समृद्ध केला. नाटक, संगीत, काव्य, विनोद…म्हणाल ते. सिंगापूरमध्ये मी नव्याने कविता केली. सिंगापूर सोडलं. तो सहवास हरवला आणि परत कविता झाली नाही. ती सिंगापूरमध्येच राहिली.


- गौतम मराठे






७ टिप्पण्या:

  1. Thanks Hemangi. But the funny part is when I wrote and submitted, I was out which aingapore not even on horizon and now when is published I am back in singapore.

    उत्तर द्याहटवा
  2. साजन चित्रपटाला नाक मुरडले असले तरी 'सोच्चेंगे तुम्हे प्या...आ...आर करे के नही' हाच तुझ्या तेव्हाच्या मनस्थितीचा आणि लेखाचा गोषवारा आहे. मस्त लेख रे. मजा आली.

    उत्तर द्याहटवा
  3. मस्त रे... आता परत ये रे माझ्या मागल्या!😉

    उत्तर द्याहटवा