खाद्य विचारांचे

खवय्ये म्हटले म्हणजे खाद्य आले आणि खाद्य म्हटले म्हणजे रेसिपीज आल्या. जर कोणी रेसिपी वाचायला मिळतील म्हणून हा लेख वाचायला गेले तर त्यांचा अपेक्षाभंग होईल म्हणून मी वाचकांची आधीच माफी मागते.

खाद्य म्हटले म्हणजे ते काही फक्त पोटासाठीच असते असे नाही तर खाद्य हे शरीर, मन, बुद्धी यांच्यासाठी सुद्धा असते. आपल्याला शारीरिक, मानसिक, बौद्धिक भूक असते तशी सांस्कृतिक, सामाजिक, नैतिक आणि वैचारिक भूकही असते. शरीर, मन, अगदी बुद्धी सुद्धा सुदृढ करण्यासाठी, वाढविण्यासाठी योग्य त्या आहाराची आणि व्यायामाची गरज असते हे तर आपल्याला माहित आहेच. लहानपणी बुद्धी, स्मरणशक्ती वाढवण्याची, मन सशक्त करण्याची गरज असते तर तरूण वयात या बुद्धीचा योग्य वापर करण्याची आवश्यकता असते आणि मोठेपणी बुद्धी, स्मरणशक्ती टिकवण्याची! डॉक्टरांकडूनही आपण हेच ऐकत असतो परंतु ह्यावर उपाय मात्र फारसे ऐकत नाही. शब्दकोडे सोडवा, सुडोकू सोडवा असे थोडे उपाय माहित आहेत पण तेवढेच! म्हणून मला असे वाटते की आता ह्या बुद्धीच्या खाद्यावर लिहिले गेले पाहिजे. 

रोजच्या खाण्यातील रेसिपीज तर असतीलच पण त्याच बरोबर ह्याही रेसिपीज मुबलक प्रमाणात आणि सहज उपलब्ध झाल्या, त्यावर लेख लिहिले गेले, पुस्तके मिळाली तर काय मजा येईल नाही!
बुद्धीच्या बाबतीत म्हणाल तर त्यातील एक भाग असतो विचार करण्याच्या कुवतीचा. ह्या विचार करण्याच्या कुवतीवर अवलंबून असलेली एक महत्वाची बाब म्हणजे श्रद्धा आणि अंधश्रद्धा. तुम्ही म्हणाल हा बादरायणी संबंध तू कोठून आणि कोठे जोडते आहेस? हा बादरायणी संबंध असेलही पण त्याला कारणही तसेच घडले आणि ते म्हणजे सध्या बराच चर्चेत असलेला बाबा राम रहीम ह्याचा विषय. 

सध्या त्या अनुषंगाने बरेच मेसेजेस येताहेत. त्यात आत्तापर्यंतच्या होऊन गेलेल्या अनेक वेगवेगळ्या बाबांची, त्यांनी केलेल्या अत्याचारांची, केलेल्या पैशांच्या अफरातफरींची सविस्तर माहिती नमूद केलेली आहे. टीव्हीवरील वेगेवेगळ्या चॅनल्सवर, वर्तमानपत्रांमधून त्यांच्याविषयीचे सर्व तपशील मिळत होते. हा सर्व प्रकारच अतिशय घृणास्पद होता. हे वाचून मलाच काय सगळ्यांनाच अतीव दुःख झाले, खेद वाटला, जीवाचा संताप संताप झाला. हे कमी की काय म्हणून वरती राजकारण्यांशी, पोलीसांशी त्यांचे कसे लागेबांधे होते, त्यामुळे त्यांना कोणी कसे हात लावू शकत नव्हते, त्यांच्या विरुद्ध तक्रार करूनही कसा काही उपयोग होत नव्हता वगैरे वगैरे तपशीलही वाचायला मिळत होते.

पोलीस, राजकारणी आणि भ्रष्टाचार हा एक न संपणारा विषय आहे. पण आज मला आपल्या बुद्धीविषयी, विचार करण्याच्या कुवती विषयी आणि पर्यायाने अंधश्रद्धे विषयी लिहावेसे वाटले.

तुम्ही म्हणाल हा अंधश्रद्धेचा प्रश्न इतका जुना आहे! खरेच, गेली शतकानुशतके हा प्रश्न अस्तित्वात आहे आणि खेदाची गोष्ट म्हणजे तो अजूनही तितकाच ‘ज्वलंत’ आहे आणि म्हणूनच तो इतका जुना असला तरी परत त्यावर लिहावे अशी गरज वाटली.

मला दुःख तर होतेच, खेदही वाटतोच पण त्याच बरोबर आश्चर्य वाटते की शेकडो नाही, हजारो नाही तर लाखोंच्या संख्येने लोकं ह्या बाबांच्या मायाजाळाला बळी पडतात. एकामागून एक असे बाबा येतातच आहेत आणि लोकं फसतातच आहेत. नुसते फसत नाहीयेत तर आपले सर्वस्व गमावून बसत आहेत, अर्थानिशी स्वार्थानिशी बुडत आहेत, स्त्रिया स्वतःची अब्रू गमावून बसत आहेत. आणि हे सगळे कशासाठी तर म्हणे ‘भगवंताच्या’ प्राप्ती साठी! प्रत्येकाला असे वाटते की आम्ही नाही त्यातले, आम्हाला ते सगळे माहित होते, कळत होते. पण मग जेव्हां ‘भक्तांचा’ आकडा लाखाच्या घरात पोहोचतो तेंव्हा वाटते अरे मग हे एवढे लोकं आहेत तरी कोण, कोठून आले? कोणीही असले, कोठूनही येत असले तरी सत्य बदलत नाही की इतके लोक फसवले, नागवले गेले आहेत, इतक्या स्त्रियांच्या अब्रूवर घाला घातला गेला आहे. म्हणून मनात विचार आला की ही अंधश्रद्धा घालविण्यासाठी आपल्या सर्वांच्या बुद्धीला, विचारांना काहीतरी पोषक खाद्याची गरज आहे. ही अंधश्रद्धा घालविण्यासाठीच्या ज्या रेसिपीज आहेत त्यांची आता रेलचेल झाली पाहिजे. जेणेकरून ह्या बाबा लोकांना बळी पडणारी जनता शहाणी झाली पाहिजे, जागृत झाली पाहिजे.

ह्या लोकांच्या विचारांना, बुद्धीला खाद्य मिळाले पाहिजे. हे खाद्य खाऊन असे खवय्ये तयार झाले पाहिजेत की जे परत कधीही अंधश्रद्धेचे बळी होणार नाहीत. कोणाचे कितीही आणि कोणाशीही राजकारणी म्हणा किंवा पोलिसांशी म्हणा संबंध असले तरी तुम्ही स्वतः जर अंधश्रद्धाळू नसाल तर तुम्ही फसवले जाणारच नाहीत, ते तुमचे नुकसान करूच शकणार नाहीत, तुम्हाला हानी पोहोचवू शकणार नाहीत. तुमचा बचाव करणे हे सर्वस्वी तुमच्याच हातात होते, आहे आणि असेल! आत्तापर्यंत अंधश्रद्धा निर्मूलनाचे जे जे प्रयत्न होत आहेत, झाले आहेत ते नक्कीच प्रशंसनीय आहेत पण अर्थातच ते पुरेसे पडत नाहीत हे सद्यस्थिती सांगते. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी अजून अथक प्रयत्न केले गेले पाहिजेत, सर्वांनी मिळून ते करायला पाहिजेत. म्हणून वाटते अंधश्रद्धा निर्मूलन ही आपली सामाजिक, वैचारिक, सांस्कृतिक, नैतिक ‘भूक’ ठरली पाहिजे. अंधश्रद्धेचे पूर्ण निर्मूलन होईल इतके आपले विचार ‘सशक्त’ झाले पाहिजेत आणि तसे होण्यासाठी तितकेच ‘पौष्टिक खाद्य’ आपल्याला मिळायला हवे, त्या खाद्याच्या अनंत रेसिपीज तयार व्हायला हव्यात आणि ते पदार्थ सहज आणि सगळीकडे मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हायला हवेत!

- योगिनी लेले


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा