जोडीदार मित्र

आमचं लग्न होऊन आता २६ वर्षं झाली. सुनिल आमच्याच कॉलेजमध्ये शिकत होता त्यामुळे माहिती होता पण आमची खास अशी ओळख नव्हती. आमचं लग्न कांदे पोहे पद्धतीनेच झालं. आधीपासून माहिती असल्यामुळे असेल कदाचित, तो नवऱ्यापेक्षा मित्रच जास्त वाटला. 

नविन लग्न झाल्यावर घरातल्या पद्धती समजावून घेताना त्याचा खूप आधार वाटला. सुरुवातीचे दिवस सुनिलच्या मैत्रीमुळे खूपच सुसह्य झाले. आम्हाला दोघांनाही प्रवासाची आवड आहे. जेव्हा जेव्हा आम्हाला वेळ मिळतो तेव्हा आम्ही लगेच प्रवासाला निघतो. ये रासता है जिंदगी, हे गाणं आमच्या जीवनाचं थिम सॉंग आहे. औरंगाबाद, मुंबई, जोहान्सबर्ग, अम्मान आणि आता सिंगापुर... इथे त्याच्या नोकरीसाठी राहावं लागलं. आजूबाजूची प्रेक्षणीय स्थळं बघितली. सगळ्यांत वेगळी ट्रिप होती आम्ही इस्तंबूलला गेलो ती. नेहमी मुलांबरोबर न जाता यावेळी आम्ही दोघांनीच जायचं असं ठरवलं. मुलं पण एकटी राह्यला तयार झाली. खूप वर्षांनंतर दोघंच बाहेर आलो होतो . सुरुवातीला मुलांची खूप आठवण आली पण नंतर मात्र आम्ही छान एन्जॉय केलं. बऱ्याच वर्षांनंतर खरं तर गरजच होती. घर, मुलं,नोकरी, ह्या सगळ्यातून स्वतःसाठी वेळ काढायलाच हवा. आमच्या लग्नाच्या २५व्या वाढदिवशी आम्ही मालदीवज् ला गेलो होतो. ती ट्रिप पण अविस्मरणीय झाली. आम्ही दोघंही फार चांगलं पोहत नाही पण तिथे स्नॉर्कलिंग, पॅरासेलिंग, बनाना बोट असे सगळे वॉटर स्पोर्ट्स आम्ही केले. सुनील आणि मी जेट-स्की करायला गेलो. आधी आम्ही कधीच जेट-स्की केलं नव्हतं. गाईड आम्हाला खूप आत समुद्रात घेऊन गेला, मी तर भयंकर घाबरले होते. कसेतरी आम्ही सुखरूप परत आलो आणि सुटकेचा निःश्वास टाकला. 

सुनिलनी आणि मी एकदमच जिम सुरु केलं. घरातल्या वस्तू आणायला जाताना तो नेहमी माझ्या सोबत येतो. शॉपिंग करायला त्याला खूप आवडतं. माझ्यासाठी मुलांसाठी कुठेही गेला तरी काहीतरी आणतोच. दोन वर्षांपूर्वी आम्ही दोघांनीही सिंगापुर पॉलीटेक्नीक मध्ये एक "वाईन" ह्या विषयावरचा पार्टटाईम कोर्स केला. 

मुलांना वाढवताना, आई वडिलांच्या आजारपणात, घर शोधताना, घर सजवताना, पॅकिंग, अनपॅकिंग, शिफ्टिंग, शॉपिंग, पार्टीत, डिनरला सुनिल नेहमीच माझ्यासोबत असतो. कुठेही गेलं आणि कुणीही नसलं तरी मला कधी एकटं वाटत नाही. पैसे कमावण्याची सगळी जबाबदारी त्यानेच पार पाडली. 
तो अतिशय मेहनती आहे. त्याच्या मेहनतीवर तो यशाची शिखरं चढत आहे ह्याचा मला अभिमान वाटतो. तो एक चांगला मुलगा, भाऊ, वडील, पती आणि जावई आहे. 

आमच्या जीवनाचा प्रवास एकमेकांच्या सोबतीने मजेत चालू आहे. 
"तू असा जवळी रहा", एवढंच मी म्हणू शकते. 


- माधुरी देशमुख - रावके


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा