आधुनिक जगातली सुट्टीची नवी संकल्पना ...

ए आई, मी मोठा झालो ना की मी टीचर होणार आहे ,कारण मला मुलांना शिकवायला आवडतं, असं म्हणेपर्यंत दुसऱ्या दिवशी माझ्या मुलाला विमान चालवण्यासाठी पायलट बनायचे असते, मधेच टॅक्सी ड्राइवर बनायची लहर येते कारण टॅक्सी वाल्याला लगेच पैसे मिळतात म्हणे, असे अनेक व्यवसाय रोज आमच्याकडे बदलले जात असतात.

किती निरागस आणि स्वच्छ विचार असतात ना लहान मुलांचे! आपल्याला जे भावेल, वाटेल ते लगेच अनुकरणात आणतात. कोण काय म्हणेल, ह्याला काय वाटेल, त्याला काय वाटेल त्याची मुळी चिंताच नसते. मला आमच्या शाळेतला मराठीचा सौ. निकुंब बाईंचा तास कायम आठवतो. त्या आम्हाला शिकवत की जी काही तुम्हाला मजा करायची आहे ती आत्ताच करून घ्या, लहान वयात मोठे होऊ नका कारण मोठे झालात तर मग बालपण यावंसं वाटलं तरी आणता येणार नाही. किती कटू सत्य आहे ना हे!

मला पण लहान असताना शाळेतल्या बाई व्हायला आवडायचं. आमच्या आजोबांचे लाकडी कपाट हा माझा फळा होता आणि मी माझा अभ्यास त्यावर लिहून स्वतःच स्वतःला मोठ्याने बोलून शिकवत असे. आजोबांच्या नवरीला आजी म्हणतात असे मी पहिलीत लिहिलेले उत्तर अजूनही माझ्या लक्षात आहे आणि ते आठवून मला हसूच येतं. अशा अनेक बाल आठवणी माझ्या मनात आज लेख लिहिताना ताज्या होत आहेत.
प्रत्येक माणसाच्या आयुष्यात बालपणीच्या आठवणींना एक वेगळेच स्थान असते. आपण आपल्या मनाचे राजे असतो. आई वडिलांसोबत घालवलेले ते सोनेरी क्षण किती महत्त्वाचे असतात आणि किती अनमोल असतात हे खरंच मोठं झाल्यावर समजतं. कसलेही बंधन नसलेलं ते वय असतं. कोणताही अर्थ नसलेला प्रश्न विचारला तरी हसून कौतुक होतं. अभ्यास करा, खेळा, टीव्ही पहा, शाळेत जा, फिरायला जा आणि आईने बनवलेले चविष्ट पदार्थ -- मुख्य म्हणजे वजनाचा विचार न करता -- मस्त खा. कसले टोमणे माहित नाहीत, ना नाती सांभाळण्याचे टेन्शन, ना ऑफिस चे टेन्शन, ना कसली भविष्याची चिंता. आईच्या कुशीतली झोप आणि बाबांची पाठीवरून फिरलेली शाबासकी आणि सोबतीला भावंडांबरोबर मित्र , मैत्रिणीबरोबर केलेली मजा हा हिरे सोन्यापेक्षा जास्त मौल्यवान खजिना आहे, नाही का !!

नुक्तीच माझ्या मुलाची वार्षिक परीक्षा संपली. सिंगापूरचे शैक्षणिक वर्ष जानेवारी ते डिसेंबर असल्यामुळे १५ नोव्हेंबर नंतर येणाऱ्या शनिवारपासून २ जानेवारी पर्यंत सर्व लोकल शाळांना सुट्टी असते. दीड महिना बहुतेक सर्व जण भारतामध्ये जाऊन सुट्टीचा सदुपयोग करून घेतात. पण ह्या वर्षी आमची भारत यात्रा नसल्यामुळे मला इथेच काहीतरी मुलांसाठी मनोरंजनाची साधने शोधावी लागणार आहेत. आम्हाला लहान असताना मोठी सुट्टी एप्रिल ते १३ जून अशी असायची. खूप सुंदर सुट्टीच्या आठवणी आज ताज्या होत आहेत . सिंगापूरला असल्यामुळे मामाच्या गावी वगैरे जाऊन सुट्टी घालवणे शक्य नाही. नवरा ऑफिसला गेला की मलाच मुलांचे मनोरंजनात्मक साधन बनावं लागणार आहे हे मी स्वतःला समजून सांगत होते.

तसं इथे सुट्टी म्हटली की खूप छान छान कार्यक्रम आखले जातात. वेगवेगळ्या मॉल्स मध्ये मुलांसाठी त्यांचे आवडते कार्टून भेटायला येतात, त्यांना भेटावयास मिळते, त्यांच्यासोबत फोटो काढून घेता येतो. सिंगापूरच्या ऑर्चर्ड रोड वर नाताळ साठी केलेली रोषणाई पाहण्यासारखी असते. ठिकठिकाणी चित्रकला, हस्तकलेचे शिकवणी वर्ग आयोजित केले जातात. इथे थंडी नाही त्यामुळे बर्फ बघायला मिळणे कधीच शक्य नाही पण काही ठिकाणी कृत्रिम हिमवर्षाव आयोजितात. मग मुले तेवढीच मजा करू शकतात. त्याबरोबर बबल शो असतो मुलं नाचून मस्त आनंद घेतात.

ह्या झाल्या आधुनिक सुट्टीच्या कल्पना. पण मी ह्यावर्षी थोडं वेगळं करायचं ठरवलं आहे. माझे अनुभवलेले बालपण माझ्या मुलांना द्यायचा प्रयत्न करणार आहे. माझ्या लहानपणच्या मला भावलेल्या आणि आठवणीत राहिलेल्या बोधक मालिका youtube वर मुलाला दाखवायचं ठरवलं आहे. गोट्या मालिके ने आम्ही श्रीगणेशा केला सुद्धा. संस्कार, बोक्या सातबंडे, मालगुडी डेज्, चाळ नावाची वाचाळ वस्ती, असे पाहुणे येती अशा बऱ्याच काही मालिका ज्या माझं बालपण ताज्या करतील आणि माझ्या मुलालाही काही शिकवतील अशा त्याला दाखवायचा विचार मी केला आहे.

गोट्या पाहताना इतकं छान वाटत होत. किती साधी सोपी सरळ मालिका. कुठेही कारस्थान नाही की कपट नाही की अश्लील प्रकार नाही आणि बोध पण घेता येण्यासारखी. "बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत.." किती अर्थपूर्ण गाणं आहे ना. हल्लीच्या एकाही मालिकेला पूर्वीच्या मालिकांची कसर येणार नाही. आपल्या बालपणी आपल्याला खूप छान बोधक मनोरंजनात्मक कथा पहायला मिळाल्या हे आपले सुदैवच. हल्लीच्या मुलांची मला खरंच कीव येते की त्यांचे निरागस बालपण ह्या टॅब, व्हिडिओ गेम्स ने हरवून टाकलंय .
चांदोबा, किशोर अशी अनेक मासिके आम्ही वाचत असू. आणि मोठं झाल्यावर मी आईचे दिवाळी अंक सुद्धा वाचायचे. मैत्रिणी आणि आईने दिलेली अशी बरीच हिंदी, मराठी पुस्तके माझ्याजवळ आहेत. जमेल तितकी पुस्तके वाचायला लावून आणि वाचून दाखवून पुस्तकांची आवड मुलांमधे निर्माण करायचे ठरवले आहे. जोडीस लहान मुलांची लायब्ररी इथे आहेच.

आम्ही सुट्टीत खूप बालनाट्ये पाहिली आहेत ती जर मला ऑनलाईन मिळाली तर सोने पे सुहागा. घरातच पॉपकॉर्न बनवून चित्रपट, नाटके बघता बघता खाण्यातही एक वेगळी मजा असते. दीनानाथ नाटयगृह ला नाटक पाहण्यापेक्षा कागदात गुंडाळलेला लसणाच्या चटणी ने माखलेला वडा पाव आणि त्यानंतर नाटक पाहता पाहता खायला मिळणाऱ्या चॉको बार किंवा orange कँडी ची आम्ही आतुरतेने वाट पहायचो . नवीन केक्स बनवायचे, मुलांच्या आवडीचं खाणं बनवून द्यायचं अशा अनेक गोष्टी मी ठरवल्या तरी आहेत .
आम्ही बिल्डिंग फ्रेंड्स सुट्टीमध्ये एकत्र येऊन पूर्वी ऑर्केस्ट्रा बसवायचो . वर्गणी काढून मैदान साफ करून घेऊन बॅडमिंटन नेट , रॅकेट्स घ्यायचो .त्याचबरोबर कॅरम ,पत्ते , सापशिडी आणि बरेच घरगुती खेळ खेळायचो . बॅडमिंटन , पकडापकडी , लंगडी , खो खो ,आईचं पत्र हरवलं असे अनेक मैदानी खेळ आणि घरगुती खेळ खेळण्यात टॅब पेक्षा किती जास्त मजा आहे हे मुलांना पटवून देणार आहे.

सुट्टीचा सदुपयोग करून घेऊन जर काही शिकायला मिळालं तरच त्याला अर्थ आहे . अर्थात मुलांनीही तेवढी साथ द्यायला हवी . ह्या आधुनिक जगात माझ्या ९० सालच्या सुट्टी संकल्पना किती सफल होतायत देवच जाणे !! मुलांच्या सुट्टी बरोबर माझे बालपण सुद्धा परत अनुभवायचा पण मी ह्यावर्षी घेतला आहे.
- श्रद्धा सोहोनी

1 टिप्पणी: