एक जगावेगळं नातं

आता तिची आणि माझी ओळख काही नवीन राहिलेली नाही. तब्बल १० वर्ष आम्ही एकत्र आहोत. माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक सुख-दु:खाच्या प्रसंगात ती माझ्याबरोबर आहे. अगदी वाटेकरी नसली तरी माझ्यासोबत तिने सुखाचा आनंद लुटलाय तसंच दु:खाच्या कठीण प्रसंगात माझ्या बरोबरीने उभी राहिली आहे. तिला काही खुपलं कि माझ्या डोळ्यात काळजी दाटून येते, कधी तिचं पोट बिघडतं तर कधी ती निरुत्साही असते. मग तिला थोडी energy मिळावी म्हणून तिची स्वच्छता केली कि ती एकदम ताजीतवानी होते. दर तीन ते चार महिन्यांनी भरपूर पाण्याने तिला अंघोळ घातली कि चार चौघात एकदम उठून दिसते. कुठल्या समारंभाला, नाटकाला, लांब फिरायला घेऊन गेलो कि लगेच सगळे मान वळवून वळवून बघत असतात्त ..पण कोणाची नजर दृष्ट नको म्हणून मी कधी काही सोपस्कार केले नाहीत. तिला पण ते कदाचित आवडत नसावेत. असं असलं तरी मात्र आम्ही कोल्हापूरला, आमच्या गावाच्या दैवताला नक्की जातो. जितका मी धार्मिक आहे, ती पण तेव्हढीच धार्मिक असल्याने आमचं मेतकुट चांगलं जमतं.

बरोब्बर दहा वर्षापुर्वी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आम्ही एकत्र आलो. त्याआधी मी किती तरी जणींना नीट पाहून निरखून घेतलं, पण छ्या: कोणी पसंतच पडत नव्हती. अखेरीस एका प्रदर्शनात आमची नजरानजर काय झाली आणि त्याक्षणी ठरवलं कि हिच माझी सोबतीण. नीटस बांधणी, फार उंच नाही पण फार ठेंगणी ठुसकी पण नाही. चारचौघात नक्की उठून दिसेल इतकी रंगाने उजळ, आल्यागेल्या प्रत्येकाची अदबीने विचारपूस करणारी...मला एकदम पसंत पडली आणि गुढीपाडव्याच्या दिवशी मी तिला घरी घेऊन आलो आणि ती पण खुशीत माझ्या घरी आली. त्यानंतर रोज रात्री जेवण झालं कि दोघंजण रस्त्यावर फेरफटका मारायला यायचो. मग ती एखाद्या नुकत्याच वयात आलेल्या नवतरुणीसारखी अल्लडपणा करायची, सरळ रस्त्यावरपण नागमोडी (CAT WALK करत) काय चालणार, मधेच हट्टीपणा करून थांबून काय राहणार, लटकेपणा करत घुमत काय राहणार, घशातून कसले कसले आवाज काय काढणार ..कधी उतरंडीवर अशी काय वेगाने धावत सुटायची आणि त्याबरोबर मलापण हाताला धरून घेऊन जायची. एक क्षण वाटायचं कि कुठेतरी जाऊन धडपडेल, पडेल कि काय. अर्थात मी पण ह्या सगळ्याला जबाबदार होतोच. अश्यावेळेस तिला कुठे खरचटू नये म्हणून पुरेपूर काळजी घायचो. 

पुढे जसजशी वर्ष जायला लागली तसतशी ती पण एखाद्या पोक्त बाईसारखी वागायला लागली. प्रत्येक नागमोडी वळणावर थांबून, इकडे तिकडे बघून नीट पुढे जायची तिलापण सवय लागली. सुरुवातीला उगाच भोंगा काढायची, नंतर तशी गरज तिलापण पडली नाही आणि मी पण थोडाफार समंजस झाल्यामुळे तिच्या गरजा समजू लागलो. सुरुवातीला रात्रीच्या वेळेस घरी येताना रस्त्यावरच्या इतरांमुळे दोघांचे डोळे अगदी दिपून जायचे. नंतर दोघांनाही सवय झाली. किती हसत खिदळत घरी यायचो. कधी पंचम, कधी गुलजार, कधी वसंतराव, कधी कुमारजी ...कितीतरी गाणी, गझला आम्ही एकत्र ऐकल्या. मला जसं धांगडधिंगा गाणी पसंत नाहीत तशी तिला सुद्धा आवडत नाहीत. संतूर, सतार, तबला अशा कितीतरी वाद्यांच्या रेकोर्डस ऐकून आम्ही पार गुळगुळीत केल्यात.

थोडी अजून काही वर्ष गेली आणि मग दोघांना एकमेकांच्या मनातल्या गोष्टी न सांगता समजायला लागल्या. एखाद्या आड वाटेवर असलो कि कसं वागायचं याचं भान दोघांनाही यायला लागलं. त्यामुळे पुढे जेव्हा केव्हा आम्ही लांबच्या प्रवासाला जात असू, तेव्हा सामाजिक भान ठेवत नियम पाळू लागलो. हे सगळं सुरळीत चालू असताना अचानक मला सिंगापूरला नोकरी निमित्त यावं लागल. भारतातून निघताना तिथे तिला एकटीला सोडवत नव्हतं ... पण इलाजच नव्हता.. त्यादिवशी पाउस इतका कोसळत होता कि ती गळा भरून रडत होती तरी ते मला समजलच नाही. इतका मी नतद्रष्ट कसा झालो ह्याचं अजून मला कोडं पडलेलं आहे. त्या दिवशी गाणं पण कुठलं लागावं तर .. “परदेस जाके परदेसीया, भूल न जाना पिया...” तिने अत्यंत उदारमनाने, डोळे मिचकावत, काहीही भोंगे न काढता मला निरोप दिला आणि तिकडे नवीन नवीन जरी कोणी भेटल्या तरी मला विसरू नकोस.. असं वर बजावून पण ठेवलं ... त्यानंतर पहिल्यांदा गेलो भारतात तर मला कुठे ठेवू आणि कुठे नको अशी तिची अवस्था झालेली होती. 

आता तब्बल ५ वर्ष व्हायला आली. जेव्हा केव्हा भारतात जातो, तेव्हा ती इतकी खूष होते कि विचारु नका.. मग आम्ही रोजचा रात्रीचा फेरफटका किंवा मुंबई कर्जत पुणे प्रवास करतो. प्रवासात खूप गप्पा मारतो, गाणी ऐकतो..खिदळतो.. आणि मग एक दिवस परत तिचा निरोप घेऊन मी सिंगापूरला येतो.. आता मागच्या महिन्यात गेलेलो तेव्हा तिच्या वार्धक्याच्या खुणा लक्षात यायला लागल्या... पुढच्या खेपेला जाईन तेव्हा आता तिचे टायरर्स बदली करेन.. एक झाक पैकी बाँडी पॉलीश करून घेईन...काचांवरची काळी फिल्म बदलेन .. सिट कव्हर्स, steering कव्हर्स नवीन टाकेन.. डोळ्यांची पॉवर कमी झाली आहे, ती बदलेन... स्पीकर्स नवीन टाकेन...म्हणजे आतून बाहेरून तिला पुन्हा नवचैतन्य मिळेल ... 

काय विचारता.. कोण ही ??? अरेच्चा !! म्हणजे तुम्हाला आत्ता पर्यंत समजलंचं नव्हतं की काय... अहो ही तर माझी कार .. मारुती कंपनीची WAGON- R.. तुम्हाला काय वाटलं ... ह्या: ह्या: ह्या: ..पण खरच गेले १० वर्ष ती माझी जिवाभावाची सखी आणि सोबतीण आहे.. कितीही मोल दिलं तरी अशी सोबतीण कधी मिळणार नाही.. रस्ता कधी चुकवणार नाही.. असं हे जगावेगळं आमचं नातं, वाहन आणि वाहनचालक ह्या मर्यादेमध्ये बांधता येणार नाही.. आहे का अशी कोणी तुमची सोबतीण?? काहीही न मागता सर्व काही तुमच्या स्वाधीन करणारी?


- ओंकार गोखले


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा