मला भेटलेली अलौकिक व्यक्तिमत्त्वे

वयाच्या वेगवेगळ्या पायऱ्या चढताना, आजूबाजूला लख्ख प्रकाश झोत सोडणाऱ्या अनेक दीपस्तंभांशी भेट होत गेली. त्यांच्या प्रकाशाने डोळे दिपून जात असतानाच पुढे जाण्याचा मार्ग मात्र स्पष्टपणे दिसत गेला. यामुळेच या महान दीपस्तंभांची तुलना करून अमुक एक जास्त आवडता किंवा अमुक एक कमी आवडता असे प्रयत्न करूनही सांगता येणार नाही.

प्रत्येक दीपस्तंभाचे वेगळेपण मात्र जरूर भावले. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या शक्तीमुळे आणि निराळ्या स्वभावामुळे ह्या दीपस्तंभरुपी व्यक्ती माझ्या आठवणीत अढळपद मिळवून बसल्या आहेत.

हा लेख लिहीत असताना , माझ्या शाळेचा श्रीगणेशा ज्यांच्या हातून झाला आणि नंतर उच्च महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यावर ,तात्पुरता शिक्षणाला ब्रेक दिल्यावर, ज्या व्यक्तींमुळे शिक्षणाबद्दल प्रेम आणि आदर अंगात भिनला आणि अधिकाधिक शिक्षण घेण्याची प्रेरणा मिळाली अशा व्यक्तींची आठवण काढून त्यांच्या स्मृतीला अभिवादन करू इच्छिते.

अगदी सुरुवातीची शाळेत प्रवेश करतानाची आठवण आणि नंतर उच्चमहाविद्यालयातील शिक्षण संपवत असतानाची आठवण. इथे भेटलेल्या दोन व्यक्ती मला खूप आवडल्या . सुरुवातीला बालवाडीतल्या माझ्या शिक्षिका ' सौ. टिपणीस बाई 'आठवत आहेत. माझे वय तेव्हा तीन वर्षाच्या आसपास असावे. आईचे घट्ट धरलेले बोट सोडून घराच्या सुरक्षित शाळेतून निघून जगाच्या शाळेत पाउल टाकायचा माझा पहिला दिवस होता तो. कदाचित नुकताच पाऊस पडून गेला होता. बाहेर हिरवेगार दृश्य दिसत होते. माझ्या आईच्या हातात त्याकाळी वापरात असलेली काळी मोठी छत्री होती. मला फुलाफुलांचा नवीन रेनकोट आणलेला होता. त्या रेनकोटचा नवीनकोरा वास घेण्याचा आनंद मिळत असतानाच, बालमंदिराची पायरी चढताना मला आतून काहीतरी विचित्र जाणीव होत होती . कदाचित नर्वसनेस असावा. त्यावेळी मला असे वाटले की आईचा पदर धरून पुन्हा एकदा तिच्या मागे पळून जावे. त्याच वेळी एक सडपातळ, उंच, पांढऱ्याशुभ्र साडी नेसलेल्या, मानेवर सैलसर अंबाडा घातलेल्या, सौम्य चेहऱ्याच्या बाई माझ्या समोर आल्या. त्यांनी माझ्या गालाला हात लावून माझे लाड केले.

" कित्ती गोड छोकरी आहे तुमची." त्या हसून म्हणाल्या. " इतका वेळ घट्ट धरून ठेवलेले आईचे बोट मी हळूच सोडले. त्यांनीही खाली बसून माझ्या खांद्यावर हात ठेवले. " गाणे येते तुला? का नाच करता येतो?" मला हसूच आले. इथे गाणे म्हणता येते. नाच करता येतो . मला मज्जाच वाटली. मी आजूबाजूला बघितले. काही मुले रडत होती. मी एकटीच हसत होते. मी माझी काळीभोर पाटी काढून हातात घेतली. अख्खा रुळांचा बॉक्स त्यावर ठेवला. " आपल्याला एकच रूळ पुरेल". आपल्याला म्हणून टिपणीस बाईंनी माझी भीती हळूच दूर केली. चांगल्या शिक्षिकेचे हेच तर काम असते. चिमुकल्या बाळांना घरट्यातून बाहेर आणून त्यांच्या नाजूक पंखात बळ आणून त्यांना उडायला शिकवणे . खूप कठीण काम आहे हे ! कोवळ्या मनाला हळुवारपणे भीतीच्या पहाऱ्यातून मोकळे करून त्यांना शिक्षणाच्या प्रांगणात सहजपणे रमायला लावणे हे प्रत्येक शिक्षकाचे इति कर्तव्य असते आणि हे मला टिपणीस बाईंकडून शिकायला मिळाले. ही शिकवण पुढील आयुष्यात मला शिक्षिकेचा रोल करतानाही उपयोगी आली. त्यानंतर मला त्यांच्या बरोबर दोन तीन वर्षेच शिकायला मिळाले पण त्याकाळात मला 'आत्मविश्वास ' आणि 'गणिताशी मैत्री' ह्या दोन भेटी मिळाल्या. अनेक मुलामुलींच्या मनात गणिताबद्दल अढी किंवा भीती असते . सुरुवातीला मला वाटलेली भीती टिपणीस बाईंमुळे नंतर माझ्या जवळपासही फिरकली नाही. त्यांनी कधी मुलांना मारले नाही. (त्या काळात मुलांना मारल्या शिवाय शिक्षिका योग्य असल्याचे सिद्ध होत नसे). त्या नेहमी हसत खेळत गणिते आणि बाराखडी समजावून सांगत. आयुष्यातील पहिली बेरीज वजाबाकी मी त्यांच्याकडे शिकले. मला जवळ घेऊन " तू पुढे खूप शिकशील 'असे अनेक वेळा म्हणत. ह्यातूनच मला पुढे शिकत राहायची प्रेरणा मिळाली असावी आणि टिपणीस बाईंची हीच आठवण कायमस्वरूपी माझ्याजवळ राहिली आहे.

ही झाली अगदी बालपणीची आठवण!

त्यानंतर अगदी तरुणपणी मॅनेजमेंटच्या महाविद्यालयात मास्टर्स करताना भेटलेले कॉलेजचे प्रिन्सिपल श्री. मूर्ती सर! त्यांनी आम्हाला प्रेमळ शिस्तीत हसत खेळत शिक्षण कसे घ्यायचे ह्याबरोबरच आयुष्याचे गणित मॅनेजमेंट स्टाईलने कसे सोडवायचे हे शिकवले. त्यांची शारीरिक उंची बेताची होती पण विचारांची झेप उंच होती. तरुण विद्यार्थी मुलांच्या जिद्दी, अवखळ मागण्या पुरवून कॉलेजची शिस्तही बिघडू न देण्याचे अवघड काम मूर्ती सर हसत हसत करत. त्यांचा हसरा मिश्किल चेहरा माझ्या अजूनही डोळ्यासमोर येतो. प्रत्येक मुलाचे प्रश्न ते स्वतःचे समजून सोडवण्याचा प्रयत्न करत. आमची आवडती एक्स्ट्रा लेक्चर्स आयोजित करण्याबरोबरच इतरही अनेक कार्यक्रम राबवण्यासाठी आमच्या उत्साहाला समरसून दाद देत. त्यावेळी मॅनेजमेंट करणाऱ्या मुलींची संख्या अगदी हातावर मोजण्याएवढी असे. एमबीए करण्याची क्रेझ सुरु होण्यापूर्वीचे ते दिवस होते. त्यातून अगदी कमी मुली पुढील शिक्षण चालू ठेवत. कॉलेजमध्ये मुलांची संख्या भरपूर. काही वात्रटपणा करणारे. अशावेळी घरातल्या वडीलधाऱ्या करारी काकांसारखा मूर्ती सरांचा आम्हाला आधार वाटे. इंटरनेट आणि मोबाईल नसलेला तो काळ होता. गूगल नावाचा जादूगार जन्माला आला नव्हता. अशावेळी कॉलेजची लायब्ररी अद्यावत असणे महत्त्वाचे होते. मूर्ती सर जातीने लक्ष देऊन चांगली पुस्तके मागवत. माझ्या प्रोजेक्टमध्ये त्यांनी केलेली मदत अनमोल आहे.

आज या गोष्टीला अनेक वर्षे लोटली आहेत. पुलाखालून बरेच पाणी गेले आहे. कॉलेजला आपले कुटुंब मानणारे आणि प्रत्येक विद्यार्थाला आपलं मूल मानणारे किती मुख्याध्यापक भेटतील ही शंका मनात उठते. माझ्या लग्नात हक्काने घरच्यासारखे वावरणारे मूर्ती सर आठवून मन भरून येते. दोन वर्षांपूर्वीच गंभीर आजाराने त्यांना आमच्यातून दूर नेले. न जाणो तिथले कोणते तरी महाविद्यालय परमेश्वराने त्यांच्या हवाली केले असेल आणि तिथे अवेळी पोहोचलेली मुले त्यांना ' सर' 'सर' म्हणून आदराने वंदन करत असतील.

-मोहना कारखानीस


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा