आरोग्यम् धनसंपदा - आयुर्वेदातील 'विरुद्ध आहार' संकल्पना व काही सामान्य समज-गैरसमज

मागच्या दोन लेखात आपण दोषानुरूप संतुलित आहाराचा विचार केला. आरोग्य-संपन्न शरीर हे सुयोग्य आहारापासून निर्माण होते हे आपण पाहिले. आयुर्वेदानुसार आपले शरीर हे सप्तधातूंपासून बनलेले आहे. हे सप्तधातू म्हणजे रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा व शुक्र. 

खाल्लेल्या अन्नाचे पचन होताना आहाररसाची (nutritive juice) निर्मिती होते व आहाररसापासून धातूंचे पोषण / वृद्धी होऊन धातूंची झालेली झीज भरून निघते व आरोग्य लाभते. परंतु सुयोग्य आहाराऐवजी प्रतिकूल किंवा विरुद्ध आहाराचे सेवन केले तर दूषित आहाररसाची ("आम"रस / toxins) निर्मिती होऊन वात, पित्त, कफ, हे तिन्ही दोष प्रकुपित होऊन धातूंनाही दूषित करतात. अशा विरुद्ध आहाराचा आपण ह्या लेखात विचार करूयात. 

विरुद्ध आहार (incompatible food) ही आयुर्वेदातील वैशिष्ट्यपूर्ण संकल्पना आहे. दोन पदार्थ वेगवेगळे खाल्ल्यास त्यापासून अपाय होत नाही, परंतु त्याच दोन खाद्य पदार्थांचे मिश्रण - सवयीने, दीर्घकाळ व वारंवार सेवन केले असता - शरीरावर अनिष्ट परिणाम घडवून आणते. अशा दोन किंवा अधिक परस्परविरोधी पदार्थांच्या एकत्रित संयोगाला "विरुद्ध आहार" असे म्हणतात. विरुद्ध आहाराच्या सेवनाने अनेक व्याधी उद्भवतात. उदा: अंगावर फोड येणे, खाज सुटणे, सूज येणे, गळू, त्वचारोग, allergy, वातविकार, अपचन, पोट फुगणे, अतिसार, मूळव्याध, मधुमेह, मुतखडा, वारंवार शिंका येणे, घसा खराब होणे, अंधत्व, नपुंसकत्व, त्याचप्रमाणे कधीकधी शरीराचं तेज, बल, स्मरणशक्तीचा नाश होतो.



खालील विरुद्ध आहार करणे कटाक्षाने टाळावे:


  • दूध दही किंवा ताकाबरोबर केळं खाऊ नये. (शिकरण, दह्यातली केळ्याची कोशिंबीर)
  • दुधाबरोबर फळे खाऊ नयेत (मिल्कशेक, फ्रुटसॅलड). अपवाद - आंबा.  
  • दुधासमवेत कुळीथ, वरी, वाल, मटकी, गूळ, दही, चिंच, जांभूळ, तसेच कोणताही आंबट पदार्थ खाऊ नये. 
  • दुधाबरोबर लसूण, पालेभाज्या किंवा मुळा खाऊ नये. 
  • दूध + मीठ + भात, मुगाच्या डाळीची खिचडी + दूध, दूध + मसाल्याचे पदार्थ, तसेच दूध व मासे एकत्र खाऊ नयेत. 
  • रात्री कधीही दही खाऊ नये. 
  • दह्याबरोबर उष्ण पदार्थ, फणस, ताडगोळा, दूध, गूळ, मासे किंवा चिकन खाऊ नये. 
  • तूप कधीही थंड पाण्याबरोबर घेऊ नये. 
  • मध कधीही गरम करून किंवा गरम पाण्यातून सेवन करू नये. 
  • समप्रमाणात साजूक तूप (१ चमचा) + मध (१ चमचा) असे मिश्रण कधीही घेऊ नये. 
  • थंड व गरम पदार्थ एकत्र घेऊ नये. (गरम चहा प्यायल्यावर थंड पाणी) 

असा विरुद्ध आहार घेतल्यावर त्याचे दुष्परिणाम लगेच दिसून येत नाहीत. त्याचे वारंवार व दीर्घकाळ सेवन केले असता शरीरावर अनिष्ट परिणाम होतात. नियमित व्यायाम करणाऱ्या, उत्तम पचन असणाऱ्या आणि बलवान तरुण व्यक्तींमध्ये विरुद्ध आहाराची लक्षणे लवकर दिसत नाहीत, परंतु वेळीच योग्य आहाराची योजना केल्यास निरामय आयुष्य लाभते - prevention is better than cure.


समज - गैरसमज :


१) पाणी - हल्ली सगळेच जण भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देत असतात, विशेषतः सकाळी उठल्यावर पाणी पिण्याचा. काही लोकांमध्ये असे अति प्रमाणात पाणी प्यायल्याने शरीरात पाण्याचे प्रमाण वाढून (retention of water) अनेक रोग निर्माण होतात. आयुर्वेदानुसार वातप्रकृतीच्या माणसांना जास्त तहान लागते. पित्तप्रकृतीच्या व्यक्तींना मध्यम व कफप्रकृतीच्या व्यक्तींना कमी तहान लागते. प्रत्येकाने आपल्या प्रकृतीनुसार जेव्हा आणि जितकी तहान लागेल त्याप्रमाणात पाणी प्यावे. जेवताना अगदी थोडे पाणी प्यावे व भोजन झाल्यावर १ तासाने अधिक पाणी प्यावे. त्यामुळे अन्नाचे पचन व्यवस्थित होते. कृश व्यक्तींनी जेवणाच्या आधी पाणी पिऊ नये. स्थूल व्यक्तींनी तसेच वारंवार सर्दी, खोकला, दमा असणाऱ्यांनी जेवणानंतर लगेच फार पाणी पिऊ नये. गरम पाणी पिणे हे नेहमीच पथ्यकर असते. 


२) दही - दही खाल्ल्याशिवाय जेवण झालेच नाही, असे बऱ्याच लोकांना वाटते. आयुर्वेदात दही वारंवार खाणे अपथ्यकर मानले आहे. रात्रीच्या काळात अग्नी हा स्वभावतःच मंद असल्यामुळे रात्री दही कधीच खाऊ नये. दही पचावयास जड असते. दही पचले तर गुणकारी होते, परंतु पचले नाही तर आमोत्पत्ती (toxins) होऊन कफ व पित्तदोषाचा प्रकोप होऊन विकार उत्पन्न होऊ शकतात. फ्रिजमधून काढलेलं थंड दही, दही गरम करून किंवा गरम भातावर दही घालून खाऊ नये. दही थंड आहे असे समजून उन्हाळ्यात विशेषकरून सेवन केलं जातं. परंतु दही गुणधर्मानुसार उष्ण आहे. तसेच उन्हाळ्यात पचनशक्ती प्रबळ नसते, त्यामुळे दह्याचे पचन होत नाही, म्हणून उन्हाळ्यात दही खाऊ नये. हिवाळ्यात आपली पचनशक्ती चांगली असते. त्यामुळे दिवसा दही खायला हरकत नाही. याउलट, दही घुसळून त्यात चौपट पाणी घालून केलेले ताक अतिशय पथ्यकर असते. ताक पचायला हलके, वात-कफाचा नाश करणारे, तसेच पित्तप्रकोप न करणारे असल्याने अमृततुल्य मानले जाते. 


३) फळ - बरेच वेळा breakfast किंवा रात्री जेवणानंतर फळं खाल्ली जातात. परंतु आयुर्वेदानुसार सकाळी १० वाजेपर्यंत कफ धातूचा काळ असल्यामुळे फलाहार करू नये. तसेच जेवणानंतर फळे खाण्याने त्याचे पचन नीट होत नाही. त्यामुळे जेवणानंतर लगेच फळे (विशेषतः केळे व आंबा) सेवन करू नयेत. सकाळी १० ते संध्याकाळी ७ ही वेळ फलाहारासाठी योग्य असते. शक्यतो सालासकट फळे खावीत. ऋतूनुसार विविध फळे सेवन करणे नेहमीच पथ्यकर असते. फळांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असून anti-oxidant properties ही असतात. दूध व फळे एकत्र खाऊ नयेत. कफप्रकृतीच्या व ज्यांना सर्दी, खोकला, दम्याचा त्रास वारंवार होतो, त्यांनी सैंधव मीठ, जिरेपूड किंवा मिरपूड लावून फळे खावीत. 


४) तूप - हल्ली cholesterol च्या आणि वजन वाढेल ह्या भीतीने रोजच्या आहारात साजूक तुपाचा समावेश केला जात नाही. cholesterol हे वनस्पती तूपाने वाढते. हृदयरोग, high B.P., blockages in arteries हे वनस्पती तूप, तसेच बटाटेवडा, सामोसा असे तळलेले पदार्थ खाल्ल्याने होतात, साजूक तुपाने नाही. घरगुती साजूक तूप हे सर्व स्निग्ध पदार्थांमध्ये सर्वोत्तम आहे. तूप हे शरीरात स्निग्धांशाची वाढ करणारे तसेच जठराग्नी प्रदीप्त करणारे आहे. त्यामुळे अन्नाचे सहज पचन होते. तुपाने रोगप्रतिकारक्षमता वाढते. तसेच ते बुद्धी, धारणाशक्ती व स्मरणशक्ती वाढवणारे आहे. वातपित्तदोषाचे शमन करणारे आहे. त्यामुळे साजूक तुपाचा रोजच्या जेवणात अवश्य समावेश करावा. ज्यांना मलावरोध (constipation), संधिवात (arthritis), रुक्ष त्वचा, डोळ्यांचे विकार, मानसिक विकार आहेत, तसेच लहान मुलांनी व वृद्धापकाळात साजूक तूप जरूर खावे. 



अशाप्रकारे आपलं आरोग्य हे आपल्या आहारातच दडलेलं असतं. म्हणूनच असं म्हंटलं आहे कि तुमचा आहार योग्य असेल तर तुम्हाला औषधाची गरज पडणार नाही आणि आहार अयोग्य असेल तर औषधांचाही पाहिजे तेवढा उपयोग होणार नाही.



- डॉ. रुपाली गोंधळेकर 

M.D. (A.M.), B.A.M.S.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा