संपादकीय: सर्वे सन्तु निरामयाः

नमस्कार मंडळी,

काय मग, आजचा बेत काय? नाही, म्हणजे जिम, जॉगिंग, योगा करून आलात की नाही? पण त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे, स्वत:ला एक ‘गुड-मॉर्निंग स्माइल’ दिलीत की नाहीत? असं म्हणतात, रोज सकाळी उठून स्वत:ला एक स्माइल द्यावं म्हणजे दिवस चांगला जातो. आरशात मिलिंद सोमण किंवा दीपिका पदुकोण दिसायची अपेक्षा करू नका; त्याची गरजही नाही. रोज आपल्याशी संपर्कात येणार्यांना थोडा आनंद देता आला तर स्वत:ला फिट समजा. 

याअर्थी तुम्ही सर्वच फिट आहात, कारण तुम्ही सर्वांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादाने ऋतुगंध समितीला फार आनंद दिला आहे. त्याबद्दल धन्यवाद.

मित्रांनो, आपण सगळेच एक चांगलं आयुष्य घडवण्यासाठी, फिट राहण्यासाठी झटत असतो. पण या सगळ्यात, कमावलेल्या पैशांचा, जपलेल्या तब्येतीचा आनंद घ्यायचं राहून जातं. म्हणूनच हा फिटनेसचा संवाद आपण स्वत:शी साधणं फार गरजेचं आहे. 

थेंबे-थेंबे तळे साचे... शरीराचं आणि मनाचंही तसंच आहे. शरीर ही एक इमारत आहे. ती उभी करायला अनेक वर्षं लागतात. मग सिमेंट, विटा म्हणजे शरीरालाच नाही तर मनालाही मिळणारं पोषण -- पोषक आहार व सकारात्मक विचार. यांची जाणीवपूर्वक सवय लावावी लागते. नाहीतर पक्की इमारत बनत नाही. सवयीचा प्रभाव दीर्घकाळ राहतो. कळत नकळत नकारात्मक विचार, वाईट सवयी रुजायला वेळ लागत नाही. 

जिभेवर ताबा हवा आणि फक्त वजनावर लक्ष ठेवायला नाही, तर . 

जिह्वे प्रमाणं जानीहि भाषणे भोजनेऽपि च।
अत्युक्तिरतिभुक्तिश्च सद्य: प्राणापहारिणी।

माणसं जोडता येणं हे पण फिटनेसचं द्योतक आहे. ज्यांना माणसं जोडता येतात त्यांचं सामाजिक जीवन आनंददायी असतं. मानसिक स्वास्थ्यासाठी हे गरजेचं आहे. आणि मानसिक स्वास्थ्याशिवाय शारीरिक स्वास्थ्य शक्य नाही. 

सकाळी उठून उमेद, उत्साह वाटणं... आपला दिनक्रम नीट आखता येणं म्हणजे फिट. दैनंदिनीत बदल होतात, अनेकदा आपल्या इच्छेविरुद्ध. हे बदल स्वीकारता येणं म्हणजे फिट. 

एक फिट अंक काढण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. आशा आहे तुम्हालाही उत्साहवर्धक वाटेल.

जीवेत शरदः शतम् !

सस्नेह,
ऋतुगंध समिती २०१७,
महाराष्ट्र मंडळ, सिंगापूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा