कोडं

"तारिणी, आज पुऱ्या करायला घ्यायच्या आहेत", अंजनाने 'आशीर्वाद' कणकेचा डबा जवळ ओढत तिच्या सुनेला, तारिणीला अडखळत, अगदी हळू आवाजात सांगितले. पण ऑफिसला जाण्याच्या गडबडीत असणाऱ्या तारिणीला ते ऐकूच आले नाही. अंजनाने निःश्वास सोडला, झाले ते बरेच झाले. रोज सकाळी किचन मध्ये दोघींचे दिवसाच्या स्वयंपाकाचे प्लॅनिंग होत असे. आज गुरुवार म्हणून स्वयंपाकात काही गोडधोड असावे असे सकाळीच अंजनाला वाटले. म्हणून पुऱ्या आणि मुगाचा हलवा असा बेत करायचा त्तिने विचार केला.

पण आपली डाएट कॉन्शस सून कोणत्या क्षणी 'नको' असा नकार झटक्यात देऊन मोकळी होईल याचा काही भरवसा नव्हता. सगळ्या बेतावर पाणी पडेल. पुऱ्या म्हणजे भरमसाठ तेल आणि त्याबरोबर साजूक तुपातील हलवा म्हणजे कॅलरीजचा डोंगर. हा डोंगर चढायला सुनेला कसे तयार करावे हे अंजनाला कळेना, म्हणून तिने आपला बेत बदलला. कार्तिकच्या आणि तारिणीच्या लग्नाला पंधरा दिवसात, येत्या गुढीपाडव्याला वर्ष होईल. सुनेच्या आवडी निवडीचा अंजनाला अंदाज आला होता. त्यात 'योग्य डाएट ' हा मुख्य वादाचा फॅक्टर होता. तेलकट, अरबट चरबट खायला सूनबाईचा विरोध होता. त्यामुळे तिचा मूड सकाळीच ऑफ करायला अंजनाचे मन तयार झाले नाही. शेवटी बराच विचार करून अंजनाने, 'पुऱ्या' तारिणी ऑफिसला गेल्यावर करायचा निर्णय घेतला. तारिणी, कार्तिक आणि सुमित नाश्त्याला नेहमीचे रोटी- सब्जी, फळे खाऊन बाहेर पडली. जाताना सासूला, "मम्मी, जिमला जायला विसरू नका", असा प्रेमळ सल्ला द्यायला तारिणी विसरली नाही. 'तारिणीच्या या प्रेमळ सल्ल्या प्रमाणे वागावे का? जाऊदे.' सकाळी उठायचे, पंधरा मिनिटे योग करायचा , सगळे ऑफिसला गेले कि जिमला जायचे. रोजच्या या वेळापत्रकाचा अंजनाला एकदम कंटाळाच आला.

गेल्या वर्षी गुढीपाडव्याला अंजनाने आणि सुमितने त्यांच्या एकुलत्याएक मुलाचे, कार्तिकचे लग्न केले. त्याच्याच आवडीच्या मुलीशी. तारिणी कार्तिकच्या कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर. त्याच्यापेक्षा तीन वर्षांनी जुनिअर. दोघांचे सूत कधी जमले कळलेच नव्हते त्यांना. तारिणी सरळ स्वभावाची पण अगदी स्वतःची ठाम मते असलेली. तिच्या स्वभावालाच एक शिस्त होती. मोजून मापून बोलणे , वागणे नेहमी लॉजिकल आणि रॅशनल थिंकिंग असे तिचे. विनाकारण भावुक होऊन घाईगर्दीत चुकीचा निर्णय तिने क्वचितच घेतला असेल. जेमतेम चोवीस वर्षांच्या या मुलीला इतके समजूतदारपणे, एखाद्या पोक्त स्त्री सारखे निर्णय घेताना पाहून अंजनाला आश्चर्य वाटे. तिला तिच्या तरुण असतानाच्या वागण्याची आठवण झाली. ती कधी इतकी ' प्रॅक्टिकल' वागली का? तेच कशाला, तिच्या सासूबाईंनी कधी तिला विचारून पुऱ्या तरी केल्या असत्या का? इतर व्यवहारातही तारिणी किती निर्भय असते. क्वचित कार्तिक पेक्षाही ती अधिक चतुरपणे निर्णय घेते. पैशाची गुंतवणूक, इतर बारीक सारीक व्यवहार करण्यात तारिणी किती चलाख आहे. उगीच नाही कार्तिक तिच्या प्रेमात पडलाय. हल्लीच्या मुलांना हेच तर हवे असते. सुमितनेही तारिणीच्या अधिकाराने वागण्याचे, त्यांच्या घरात बिन-तक्रार स्वागत केले. अंजनाच्या डोक्यात हा विचार आला आणि ...... या गोष्टीचे किंचित वाईट वाटल्याशिवाय राहिले नाही . 

जवळ जवळ २८ वर्षांत तिने आपले सर्वस्व अर्पून संसाराला एक विशिष्ट मार्गाने नेले होते. घरातल्या प्रत्येक वस्तूवर अंजनाचा ठसा होता. तिची प्रेमळ सावली अजूनही सगळ्या घरादारावर थंडावा धरत होती. ह्या सावलीत अचानक एक दुसरी सावली सामावू पाहत होती. का ती ह्या पहिल्या सावलीचे अस्तित्वच नष्ट करीत होती? घराला कधी दोन सावल्या असतात का? असल्या असे गृहीत धरले तर ते घर विकृत होईल. मग या घराचे पावित्र्य टिकवण्यासाठी पहिल्या सावलीने काय करावे? अंजनाला दिवसेंदिवस अनेक कोडी पडत होती. त्या कोड्यांच्या कोंडीत ती एकटीच पकडली जात होती. अंजना संसाराची बारीकशी कोडी सोडवण्याचा एकटीच प्रयत्न करीत होती आणि अचानक सासूबाई म्हणजे सुमितच्या आई कोकणातून थोडे दिवस येणार असल्याचा फोन आला. कार्तिकच्या लग्नानंतर सासूबाई प्रथमच घरी राहायला येणार होत्या. ते ऐकून इतक्या वर्षां नंतरही अंजनाला नाही म्हटले तरी किंचित टेन्शन आले. तिने तसे सुमितला सांगितलेही. तो हसला म्हणाला " त्या पोरीकडे बघ. कशी मस्त राहते. ती नाही तुझ्या सारख्या अशा काळज्या करत बसत. निदान तसे दाखवत तरी नाही". "खरे आहे तुमचे म्हणणे. ही मुलगी इतकी कशी निर्भय राहू शकते? हिला बेफिकीर, निष्काळजी असेही म्हणता येणार नाही. हिच्या कामात कुठलीच खोट काढता येत नाही. ऑफिसचे काम सांभाळून ही मुलगी घरातली जबाबदारीही टाळत नाही. पण बोलायला जरा तिखट आहे. स्पष्टवक्ती आहे. आधुनिक कपडे घालते. कुंकू, टिकलीचा पत्ता नसतो."

सासूबाईंना चालेल का हे सगळे? इतक्या वर्षांनंतरही आपण त्यांच्या समोर आदबीने राहतो. त्या आल्यावर नाही म्हटले तरी एक दडपण येतच मनावर. मोकळ्या ढाकळ्या तारिणीला कसे जमेल सगळे? अंजनाची मनःस्थिती मोठी विचित्र झाली. एकीकडे तारिणीची आणि पर्यायाने तिची स्वतःची आब सासूबाईंपुढे कशी राखायची हा विचार, तर दुसरीकडे, 'आता बघू या तारिणीची कशी फजिती होतेय ते!' असा एक बंडखोर , स्वार्थी विचार मनात डोकावत होता. बघता बघता सासूबाई येण्याचा दिवस उगवला. तारिणीने रजाच घेतली. सासूबाईंना आणायला स्वतः गाडी घेऊन गेली. सुमित आणि कार्तिक खुशीत ऑफिसला गेले. दोघी गाडीतून हसत हसतच उतरल्या. अंजना आ वासून बघतंच राहिली. तारिणी आजेसासूबाईंना हात धरून खोलीत घेऊन गेली. पटकन आले घालून गरमागरम गवती चहा करून घेऊन आली. "आई, नमस्कार करते." अंजनाने वाकून नमस्कार केला. "ये, बस गं. अंजना, नशीबवान आहेस. तुला सून अगदी नक्षत्रा सारखी मिळाली. अगदी निर्मळ पाण्यासारखी आहे. आतबाहेर काही नाही. माझे केस असेच नाही बाई पांढरे झाले. माणसं बघताक्षणी कळतात आता. तरुण सळसळतं रक्त आहे पण माणुसकीचा ओलावा घेऊन वाहतंय. तूच सांभाळून घे तिला." सासूबाई बशीत चहा ओतून घेत म्हणाल्या.

तारिणी त्यांच्या शेजारी बसून त्यांना हवे नको ते पाहू लागली आणि तारिणीच्या या वर्तनाने सुखावलेली आणि हो....जरासा अहं दुखावलेली अंजना कोड्यात पडल्यासारखी सासूबाईंच्या आणि सुनेच्या या नव्या रुपाकडे पाहतच राहिली. कालाय तस्मै नमः ! दुसरे काय? म्हणताना दुसरी सावली पहिल्या सावलीत एकरूपतेय असा भास झाला तिला.


- मोहना कारखानीस




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा