एक सुखद अनुभव

महाराष्ट्र मंडळ सिंगापूर आपल्या जिवाभावाचे, इथे राहूनही आपल्या मायभूमीची उणीव न भासू देणारे. विविध क्षेत्रात काहीतरी वेगळं करण्याची संधी देणारे त्यामुळे खवय्येगिरी हा अपवाद असूच शकत नाही… खाणंपीणं हा आबालवृद्धांपासून सगळ्यांचाच अतिप्रिय व जिव्हाळ्याचा विषय आहे. 

ह्यावर्षी महाराष्ट्र मंडळानी महाराष्ट्र दिनानिमित्त खेळोस्तव व खाद्योत्सव हा आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित केला. त्यात पाककला स्पर्धा व मराठमोळ्या खाद्यपदार्थांचे स्टाॅल… कुशल गृहिणींना आपली कला सादर करण्याची उत्तम संधी होती. त्याबरोबरच जे जातीचे खवय्ये होते त्यांना मेजवानी होती. 

ह्या दिवशी पाककलेत निपुण असलेल्या अनेक गृहिणींनी आपल्या जरा हटके असलेल्या पाककृती उत्कृष्ट सजावटीसह मांडल्या होत्या. त्यातीलच उत्तम असलेल्या तीन पाककृतींना बक्षिस मिळाले. नंतर त्या पाककृती सर्वांना चाखण्यासाठी मिळाल्या. उत्तमोत्तम मराठमोळ्या खाद्यपदार्थांचे स्टाॅल होते. पुरणपोळी, आंबेडाळ, मसालेभात, पावभाजी, वडापाव, मिसळपाव, चाट, आळूवडी, कोथिंबीरवडी, मेथीपराठे, गुलाबजाम, हापूस आंब्याचा शिरा अशा खुमासदार पदार्थांची रेलचेल होती. कोकम सरबत, लिंबू सरबत, पन्हे अशी मराठी पेये पण होती. वातावरण खाद्यमय होऊन अन्नाचा सुवास सर्वत्र दरवळला होता. 

मी माझ्या स्टाॅलवर दडपे पोहे व सुरळीच्या वड्या असे अस्सल मराठमोळं पदार्थ ठेवले होते. सुबक अक्षरात नवऱ्याने पदार्थांचे भाव लिहून दिले होते जे मी ऐटीत टेबलाच्या दर्शनी भागावर चिकटवले. टेबलक्लाॅथवर पदार्थ वाढण्यासाठी डाव, चमचे, प्लेट्स सर्व व्यवस्थित मांडून पैसे ठेवायला एक छोटा डबा ठेवला. मग लक्षात आले हायजीन म्हणून हॅंडग्लव्ह्ज नाही आणले. मग माझ्या लेकीने शेजारच्या स्टाॅल वरुन घ्यायला लावले. बघता बधता स्टाॅलवर गर्दी व्हायला लागली, पदार्थ देतां देतां अन् पैसे घेतां घेतां घाई गडबड व्हायला लागली. शेजारीच माझ्या मुलींचा नेलआर्टचा स्टाॅल होता. मग त्यांनी मला मदत केली. हातोहात दोन्ही पदार्थ विकले गेले, चवीलाही उरले नाहीत. पहाटे उठून केलेल्या श्रमाचे सार्थक झाल्याने मनस्वी आनंद झाला. आम्ही गृहिणी घरी तिन्ही त्रिकाळ खायला करतचं असतो पण काहीतरी वेगळं केल्याचं समाधान काही औरचं होतं. फारचं मजा आली; खऱ्या अर्थानी महाराष्ट्र दिन साजरा झाला. 

सुरळीच्या वड्या सर्वांना फार आवडल्या होत्या अन् बऱ्याच जणांनी पाककृती मागितली होती ती इथे देत आहे...

साहित्य :-वरची पारी - 1 वाटी बेसन, पाउण वाटी आंबट ताक, 2 वाट्या पाणी, चिमूटभर हिंग, हळद पाव चमचा, चविनुसार मीठ

सारण- ओलं खोबरं, कोथिंबीर, तिखट, चविनुसार मीठ

फोडणी- तेल, मोहरी, जिरं, हिंग

कृती- प्रथम बेसन, ताक, पाणी, हिंग, हळद, मीठ सर्व एकत्र मिसळून घ्यावं. त्यात गुठळी राहाता कामा नये. मग गॅसवर ठेऊन मध्यम आचेवर सतत ढवळावं, गुठळ्या होणार नाही ह्याची सतत काळजी घ्यावी. साधारण 10 मिनीटाच्या आतचं मिश्रण घट्ट होऊन पसरवण्यासाठी तयार होतं तेव्हा ताटावर ते पटापट पसरवावं. साधारण 5 ताटं लागतात. त्यावर फोडणी व मग खोबऱ्याचं सारण पसरवावं. सुरीने वड्या कापून गुंडाळाव्यात.

टिप- मिश्रण पसरवण्या योग्य झालं का नाही ते ओळखण्यासाठी अगदी थोडसं मिश्रण ताटाला लावावं, एक मिनीट बघावं ते जर सुटून आलं तर मिश्रण झालं आहे असं ओळखावं.

- गीता पटवर्धन


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा