ओजा शंकर काणे

मणिपूरची राजधानी इंफाळ पासून १५० कि.मी. उत्तर पूर्वेस म्यानमार सीमेजवळील उख्रुल जिल्ह्यात खारासोम गावात "ओजा शंकर विद्यालय" ही शाळा आहे. ‘पूजनीय’ला स्थानिक भाषेत ओजा म्हणतात. ज्यांच्या स्मरणार्थ ही शाळा सुरु झाली त्या शंकर दिनकर तथा भैय्याजी काणे ह्या अपरिचित, वरकरणी सामान्य वाटणाऱ्या व्यक्तीच्या असामान्य जीवन कार्याची अल्पशी ओळख प्रस्तुत लेखाद्वारे करण्याचा हा प्रयत्न आहे.

त्यांचा लौकिक परिचय म्हणजे जन्म (१९२४) नाशिकचा. बी.ए.एल.एल.बी. पर्यंतचे शिक्षण पुणे व पुणे परिसरात. २ वर्षे भारतीय वायुदलात नोकरी. ८ वर्षे संघाचे प्रचारक म्हणून काम केले. पुढे १ तप महाराष्ट्रात विविध ठिकाणी शिक्षक. पुढील ३ वर्ष मणिपूरला अध्यापन. तदनंतर उर्वरित आयुष्य मणिपुरी मुलांना भारताच्या अन्य भागात आणून त्यांना उत्तम शिक्षण व संस्कार देणं ह्यासाठी वेचले. १९९९ साली देहत्याग. 
६ फूट उंच, गोरेपान, सडसडीत पण पिळदार शरीर, बोलके घारे डोळे, मधुर आवाज असणारे भैय्याजी आजन्म अविवाहित राहिले. स्थितप्रज्ञ, अध्यात्म प्रत्यक्ष जगणारे, निगर्वी, प्रसिद्धी पासून कोसो दूर राहणारे भैय्याजी. भैय्याजींची राहणी अत्यंत साधी असायची. मोजकेच वेष. कशाचा संग्रह म्हणून करावा असं वाटतच नसे. दर महिन्याच्या पगाराचे सर्व पैसे त्याच महिन्यात विद्यार्थ्यांसाठी खर्च करायचे. 

भैय्याजी हाडाचे शिक्षक होते. पण केवळ पुस्तकी शिक्षण देणारे नव्हे. आपल्या सहवासात शेकडो विद्यार्थ्यांचं आयुष्य भैय्याजींनी घडविलं, त्यांच्या आयुष्याला आकार दिला, जगण्यासाठी ध्येय दिलं. आईच्या मायेनं. अपार वात्सल्य भावनेनं. प्रसंगी आजारी विद्यार्थ्यांची अगदी सर्व प्रकारची सेवा करायचे. ते राणा प्रताप, शिवाजी महाराज, भगतसिंह, सुभाष बाबू, झाशीची राणी अशांच्या गोष्टी रंगवून सांगत. मुलांच्या मनात वीर रसाचा संचार होई. 

प्रत्येक समस्ये बद्दलचे त्यांचे विचार मूलभूत असत. देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सीमावर्ती भागातील जनता भारत विरोधी मानसिकतेची असणं भविष्यात फार धोकादायक ठरणार आहे हे जाणून, मीच का हे आव्हान स्वीकारू नये व जिथे जखम तिथेच मलमपट्टी करू ह्या विचाराने ईशान्य भारताच्या सीमावर्ती भागातील विद्यार्थ्यांना शिकवायचं, घडवायचं, स्थानिक माणसांत मिसळायचं, त्यांना आत्मसात करायचं ह्या पक्या इराद्याने १९७१ साली प्रथमतः त्यांनी मणिपूरास प्रस्थान केले. 

मणिपूर संबंधी 

मणिपूर कडे स्वातंत्र्योत्तर काळात केंद्र सरकारांनी दुर्लक्ष केले. म्यानमारहून विस्थापित झालेल्या तसेच मारवाडहून आलेल्या व्यापाऱ्यांनी व नंतर नोकरदारांनी स्थानिक जनतेस खूप लुबाडले. त्यामुळे लोकांत निर्माण झाला असंतोष व संशय. त्यांत भर म्हणून, काही विदेशी शक्तींकडून जाणीवपूर्वक निर्माण केलेला भारत द्वेष. आगीत तेल ह्याप्रमाणे परदेशी पैशावर पोसलेल्या मिशनर्यांनी चालू केलेले धर्मांतर, त्यातून निर्माण होणारा अलगाववाद. ह्या सर्व कारणांमुळे तेथील वातावरण कमालीचं विषारी झालं. भारत, भारतीय ह्यांच्याशी आमचं काही देणं घेणं नाही हा भाव बळावत चालला. आम्ही मंगोलियन वंशाचे आहोत, आमचं नातं असलंच तर ते चीनशी आहे. असं बोललं जाऊ लागलं. खरतर ह्यामागे चीनची प्रभावी प्रचार यंत्रणा असणार]. इंडियन शब्द उच्चारणं म्हणजे संकटाला आमंत्रण असं वातावरण निर्माण झालं. मणिपूरच्या उत्तरेस असलेल्या नागालँड व दक्षिणेस असलेल्या मिझोराम प्रांतातही कमीजास्त अशीच परिस्थिती आहे. 

जे जे गैरसमज आहेत ते ते दूर करणं, तेथील लोकांत भारत व भारतीयांविषयी विश्वासाची भावना निर्माण होईल असं वातावरण निर्माण करणं व त्यांच्यात ज्वलंत देशभक्ती फुलवणं हेच सर्वात महत्त्वाचं काम ह्या निष्कर्षावर भैय्याजी आले व शिक्षणाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता साधायची ह्या ध्येयाने प्रेरित होऊन, "दिव्य ध्येय की ओर तपस्वी, जीवनभर अविचल चलता है" ह्या गीतात म्हटल्याप्रमाणे जीवघेणी संकटे, अनेक अडचणी ह्या काटेरी मार्गावरून हसतमुखाने चालत राहिले. अपरंपार कष्ट केले. भैय्याजींचा ध्यास, धाडस, सामान्य माणसाला निःस्वार्थी प्रेमाने जिंकता येतं, आपलंस करता येतं यावरचा विश्वास व त्याप्रमाणे व्यवहार, विचारांवरील दृढता हे सर्व अद्भुत होतं.

२०-२५ मैल चालत जायला त्यांना काही वाटायचे नाही. तेही डोंगरदऱ्यांतून, जंगलांतून. “जय जय रघुवीर समर्थ” असा घोष करीत रामदासांनी संह्याद्रीची दरीखोरी पिंजून काढली. त्या घोषाचे प्रतिध्वनी आसमंतात उमटले. त्यातून देशभक्त नागरिक निर्माण झाले आणि त्या नागरिकांनीच स्वराज्याचे रक्षण केले. तसे पूर्व सीमेवर मणिपूरमध्ये डोंगरकपारीतून चालत असताना भैय्याजी जोरजोरात विष्णुसहस्त्रनाम, पुरुषसुक्त म्हणत. जेणेकरून भविष्यात येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी मंत्रोच्चाराच्या सामर्थ्याने भूमी काम करण्यासाठी सुपीक होईल. 

भैय्याजींचे ज्ञान, व्यासंग वाया जातोय याबद्दल काहीजण खेद व्यक्त करीत. त्यांनी मात्र जाणीवपूर्वक हा मार्ग निवडला होता. सावरकरांच्या भाषेत, 'बुध्याचि वाण धरिले करी हे सतीचे'. 

भैय्याजींच्या मनात व आचरणात सामाजिक उच्चनीचतेला थारा नव्हता. एकदा वसतिगृहात नेहमीची स्वयंपाक करणारी बाई आली नसता, सफाई कामगिरीणीकडून स्वयंपाक करून घेतला. सर्वाबरोबर खाल्ला. भैय्याजी काणे ह्यांनी मणिपूरमध्ये सुरवातीच्या काळात अध्यापनाद्वारे समाजमन परिवर्तनाचे काम केले. तिथं शिकवीत बसण्यापेक्षा अधिक प्रभावी ठरेल म्हणून याच मुलामुलींना भारतातल्या वेगवेगळ्या प्रांतात शिक्षणाच्या निमित्ताने ठेवण्याचा अतिशय वेगळा व धाडसी निर्णय त्यांनी घेतला.

शिक्षणाच्या निमित्ताने भारतातल्या वेगवेगळ्या शहरात राहिलेल्या विद्यार्थ्यांचं इथल्या समाज जीवनाशी मनोमिलन घडून येईल, खरी वस्तुस्थिती लक्षात येईल, शिकलेली मुलं आपापल्या गावी परत जातील तेव्हा तेथे देशभक्त नागरिकांची फळी निर्माण होईल. त्या जोरावर देशाच्या सीमा मजबूत होतील. फुटीरतावाद नष्ट होईल हा त्या मागचा विचार होता.

सुरवातीच्या काळांत, आपल्या मुलांना हजारो मैल दूरवरील अनोळखी प्रदेशात प्रत्यक्ष पाठविण्याची वेळ येताच अनेक पालकांची मने विचलित झाली. मुलांच्या सुरक्षिततेची, भविष्याची काळजी वाटणे साहजिकच होतं. चर्चेअंती एक “सौदा” ठरला. १०-१२ विद्यार्थ्यांना नेण्याच्या बदल्यात भैय्याजींनी त्यांच्या सोबत आलेल्या जयवंत कोंडविलकर ह्या १२ वर्षाच्या मुलास त्यांच्या कडे सुपूर्द केले. एक प्रकारे ओलीस ठेवले. तेथे राहायचं, शिकायचं. 

राजापूर तालुक्यातील कोंड्ये गावाजवळील जुवाठी नावाच्या छोट्याश्या खेड्यातील जयवंत ह्याने मग तिथेच सर्व शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेतले. तेथेच पदवीधर झाला. तेथे शिक्षक म्हणून नोकरी स्वीकारली व अनेक वर्षे तेथे राहून मुलं शिक्षणासाठी भारतात, महाराष्ट्र, कर्नाटक आदी अनेक राज्यांत पाठविली. सध्या त्यांचे वास्तव्य डोंबिवलीस असून आजही ह्याच कामांत झोकून काम करीत आहेत. 

ईशान्य भारतातून जे जे विद्यार्थी शिक्षणासाठी आणले जात/जातात ते सर्व ख्रिस्ती असतात. त्याने काही फरक पडत नाही. त्यांचं धर्म परिवर्तन व्हावं असेही प्रयत्न होत नाहीत. त्यांची नाळ ह्या भूमीशी जुळावी, येथील संस्कृती, परंपरा त्यांनी आत्मसात करावी. भरपूर शिकावं. हिंदी ही भारताला जोडणारी भाषा आहे. ह्यासाठी मुलांनी आग्रहाने हिंदी पण शिकावं, ['मेरी कोम' हा चित्रपट सर्व देशभर दाखविला गेला. पण स्वतः मेरी कोम मणिपूर ची असली तरी, केवळ हिंदी मध्ये आहे म्हणून चित्रपट मणिपूर मध्ये प्रकाशित नाही झाला] आणि परत जावं आपल्या गावी. मग स्वतःच्या कुटुंबाचा, गावाचा विकास करावा. आपण भारतीय आहोत असा अभिमान बाळगणारी प्रजा निर्माण व्हावी असे हे भैय्याजींनी सुरु केलेले काम आजही अनेक कार्यकर्त्यां द्वारा अव्याहत पणे चालू आहे. ठिकठिकाणी वसतिगृहे आहेत.

कित्येक व्यक्तींनी प्रेरणा घेत तेथल्या मुलाला आपल्या कुटुंबातील सदस्यासारखी जागा दिली. उदाहरणच द्यायचे झाले तर सुधीर फडक्यांनी अरुणाचल प्रदेशातील कोवळा ८ वर्षाचा लेकी फुन्सो घरी आणला. श्रीधरचा भाऊ म्हणून वाढविला. शिक्षण पूर्ण झाल्यावर आज तो त्याच्या गावी जाऊन व्यवसाय करतो. स्थानिक विकासात हातभार लावतोय.

आज पर्यंत शेकडो विद्यार्थी ह्या मांडवाखालून गेलेत. खुद्द मणिपूर सीमावर्ती क्षेत्रात भारतीय संस्कार देणाऱ्या शाळा आहेत. भैय्याजींनी सुरु केलेले व आत्तापर्यंतचे झालेले काम त्यामानाने खूप कमी आहे. तरीसुद्धा परिणाम दिसत आहेत. "जय भवानी", "जय शिवाजी", "भारत माता की जय" अशा घोषणा पूर्वी कुणी दिल्या नव्हत्या. सुभाष बाबूंच्या आझाद हिंद सेनेच्या जवानांकडून दिलेल्या घोषणांना बराच काळ लोटला आहे. त्या आज त्या भागात अल्पशा प्रमाणात का होईना, ऐकायला मिळतात. 

अजून बराच पल्ला गाठायचा आहे. ज्योत से ज्योत म्हणतात तसे वेळ व धन देणारे कार्यकर्ते अधिक मिळत जातील, काम अधिक गतीने होईल हा विश्वास आहे. 

आपणही ह्यात यथायोग्य सहभाग घ्यावा असं आवाहन ह्या लेखाद्वारे करतो.

संदर्भ :-
- 'अश्रू ईशान्येचे'
- श्री. कोंडविलकर व अन्य कार्यकर्त्यांबरोबरचा वार्तालाप


- गिरीश टिळक







२ टिप्पण्या:

  1. अशा विभूतीला दाद देणे कमीच पडेल. शतशः नमन केले तरीही अपुरे पडेल.
    परमेश्वर करो आणि यासारख्या व्यक्ती भारतमातेच्या पोटी जन्माला येवो.

    उत्तर द्याहटवा
  2. अशा माणसाला महात्मा म्हणूनच संबोधले पाहिजे.

    उत्तर द्याहटवा