छंद करे बेधुंद

"गणपती बाप्पा मोल या"
"मंगलमूर्ती मोल या"
छत्रपती शिवाजी महाराज की "दय "...
अरे वा वा! खूप छान .."त्विषा आमची शहाणी "..

तुम्ही म्हणाल काय लिहितेय ही...बोबड्या भाषेत लिखाण सुरु केलंय .माझा आणि माझ्या मुलीमध्ये खेळताना हा संवाद दिवसभर चालू असतो. आहे फक्त दोन वर्षाची, पण आता खूप शब्द बोलायला शिकतेय. घरभर नुसती इकडे तिकडे पळत असते आणि तिच्यामागे मी. आमच्या दोघींचा दिवस एकमेकींमध्ये कसा संपतो हेच मला कळत नाही.

त्याला साथ देण्यासाठी माझा मोठा मुलगा शार्विल असतो . शाळेत जाऊन आला की हिला दंगा करायला तो बरा सापडतो. मग हे भाऊ बहीण मस्ती करतात, गाणी लावून नाचतात काय ,एकमेकांच्या ताटलीमधला खाऊ खाण्यास भांडतात काय विचारू नका. दिवसाचे २४ तास मला कामासाठी कमी पडतात. 

घरची कामं सांभाळताना दोघांना सांभाळणे हे म्हणजे अगदी मोठे काम वाटते मला. चिडचिड सुद्धा होते पण रात्री झोपताना दिवसभरात दोघांच्या बाललीला आठवून हसू येत आणि आज नोकरी न केल्याचा फायदा झाला असं वाटत. मुलांमध्ये मूल होऊन खेळताना मजा वाटते. मुलांमुळे परत आपले बालपण जगायला मिळाल्याचे समाधान वाटते. 

त्विषाच्या बोबड्या आवाजामधील बडबड, तिचं दुडुदुड धावणं ,शार्विलचा अभ्यास घेताना होणाऱ्या गमतीजमती आणि मुलांसोबत राहून दिवसभर करायला मिळालेली मजा म्हणजे माझ्यासाठी एक मोठी करमणूकच आहे. त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजते की मला नवीन करमणुकीचे साधन शोधण्यासाठी बाहेर जायची तरी कधी गरजच भासत नाही. आणि ही करमणूक एकदम सोयीची आणि सोप्पी आहे बरं का? यासाठी पैसे पडत नाहीत, वायफाय ची गरज नाही, इलेक्ट्रिक प्लग नको किंवा नको तो मोबाइल.

पण हे करमणुकीचं साधन जोपासताना जुन्या काही करमणुकीच्या साधनांचा विसरच पडत गेलाय, हे मात्र अगदी खरं. 

माझा स्वभाव खूप गप्पिष्ट आहे त्यामुळे मी शांत बसू शकत नाही आणि माझ्याबरोबर असलेल्या व्यक्तिला शांत बसू देत नाही. म्हणूनच कदाचित शांत स्वभावाचा नवरा मला मिळाला आहे. मी आपली दिवसभर बडबड आणि तो नुसता मधेच विशेष टिप्पणी देऊन शांत बसलेला असतो. फोनवर गप्पा मारणे हा माझा आवडता छंद. खास मैत्रिणीचा फोन आला तर गप्पांमध्ये कसा वेळ जातो आणि कधी एक तास संपतो कळतंच नाही. माझ्या लग्नानंतर आई म्हणाली सुद्धा होती आमच्यापेक्षा तुला आपला लँडलाईन फोन जास्त मिस करतोय… गप्पा मारून नवीन गोष्टी शिकून ऐकून घ्यायला मला जाम आवडतात. भूतकाळातील जोपासलेलं फोन हे करमणुकीचं साधन मला कधीच कंटाळा येऊ देत नाही.

पण समजा कधी कंटाळा जर आलाच तर माझी एक. खास सखी माझी साथ कधीच सोडत नाही. अशी एकही व्यक्ती ह्या जगात नसेल की तिची ही सखी नसेल. आणि ती म्हणजे "गाणी ".. मला नवीन जुनी मराठी हिंदी गाणी ऐकण्याचा नाद आहे. मला काहीच सुचत नसेल तर मी सरळ माझ्या मूड प्रमाणे मला हवी ती गाणी लावते आणि कसा वेळ निघून जातो मला कळतच नाही. माझ्या एकटेपणामध्ये ही सखी माझी साथ कधीच सोडत नाही आणि विशेष म्हणजे खराब , दुःखी मूड असेल तर काय जादू आहे माहीत नाही  पण गाणी माझं नेहमीच मनोरंजन करतातं आणि त्याबरोवर माझा मूडही बदलून टाकतात.

छान छान नवीन पुस्तकं, साईट्स बघून नवीन नवीन पदार्थ करतांना मी स्वत:ला विसरून जाते आणि त्या केलेल्या पदार्थाची वाहवा झाली तर माझा आनंद गगनात मावत नाही . 

इतर स्त्रियांप्रमाणे माझं आवडतं मनोरंजनाचं साधन म्हणजे "शॉपिंग". अहाहा, काय मजा येते त्यात म्हणून सांगू. काहीही विकत न घेता नुसतं मॉल मध्ये फेरफटका दिवसभर मारला तरी मानसिक सुख मिळते . आणि फिरताना समजा एखादी गोष्ट सेल मध्ये नेहमीच्या किमतीपेक्षा स्वस्तात मिळाली तर अख्ख जग जिंकल्याचा आनंद होतो, काय सहमत आहात ना तुम्ही सुध्दा?

आता एक नवीनच साधन माझ्या हाती आलयं ज्याची मला कल्पनाही नव्हती की मी ते करू शकेन,आणि ते म्हणजे लिखाण. जसं जमत जितकं लिहिता येईल तितकं लिहून मी त्यात आनंद मिळवत असते. त्या करमणुकीच्या माध्यमानेच हा लेख लिहायची हिम्मत करत आहे . 

आपण जोपासलेले छंद योग्य तिथे वापरता आले की आपणंच आपली छान करमणूक करून घेऊ शकतो. त्यामुळे कधी एकटेपणाची जाणीवही होत नाही आणि मन कायम प्रसन्न राहत हे मी स्वानुभवावरून ठामपणे सांगू शकते. 

- श्रद्धा सोहोनी



४ टिप्पण्या: