गाणे जीवनगाणे

वयाच्या अकराव्या वर्षी पहिली संगीत मैफल, आजवर जगभरातल्या २०० हून अधिक शहरांतून मैफिली, सूररत्न किताब आणि इतर अनेक मानाचे पुरस्कार, आणि खुद्द वसंतराव देशपांड्यांकडून "हा मुलगा गाण्याकरता जन्माला आला आहे, याला फक्त गाणंच करू द्या" असा आशीर्वाद! यापेक्षा रोमांचक आणि काय असू शकतं? गेली ३८ वर्षं आपल्या गाण्यानी रसिकांवर मोहिनी घालणाऱ्या पं. संजीव अभ्यंकरांनी ऋतुगंधला मुलाखत देण्यासाठी वेळ काढला, मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि या अंकासाठी खास त्यांच्या जगभरच्या प्रवासात "वसुधैव कुटुम्बकम्" त्यांना कसं अनुभवाला येतं हे ही सांगितलं. ही मुलाखत तुम्हांला आवडेल अशी खात्री आहे. 

शास्त्रीय गायक व्हायचं कधी ठरवलंत? का ते तुमच्याकरता ठरवलं गेलं होतं?
: आईनं निर्णय घेतला 
माझ्याकरता ठरवलं गेलं होतं. माझी आई संगीतामध्ये पीएचडी होती आणि परफॉर्मिंग अँगलनी गाणं शिकली होती. माझी आजीही गायची. बाबा माझे गायचे नाहीत पण अभ्यंकरांच्या साइडनी पण गाणं होतं घरात. बाबांचा आवाज चांगला आहे. बाबांचे नाना - म्हणजे त्यांच्या आईचे बाबा - हे गोखलेबुवा म्हणजे त्यावेळचे फुल टाईम संगीत शिक्षक होते. तर असं संगीत जेनेटिकली दोन्ही बाजूंनी माझ्याकडे आलं. 
आईचं म्हणणं असं की आजीनं तिला वेळेत गायकी शिकायला नाही पाठवलं. आईला पंडित जसराजजींचं गाणं खूप आवडायचं. काहीसं उशीराच्या वयामध्ये जसराजजींनी तिला शिष्या म्हणून स्वीकारलं. ते रेअर होतं. तिचं गाणं ऐकून "तुला उशीर झालाय पण तरी मी तुला शिकवीन," म्हणाले ते. तर अशी माझी बॅकग्राउंड होती. आई ही पहिली गुरु माझी. ती नॉलेजेबल होती, तिनं परफॉर्म केलेलं होतं. त्यामुळे सततचा एक गुरु माझ्याबरोबर घरात होताच. आईला कळत होतं आपण काय करतोय ते. पण निर्णयाचं श्रेय आई, आईची आई आणि बाबा यांना जातं. मी पूर्ण वेळ गायक होणार हा निर्णयही त्यांनी घेतला.

उपजत कल होताच
क्लासिकल कडे माझा कल खूपच होता. आईला मी सांगायचो - एक सात आठ वर्षांचा असताना - की मला प्रभा अत्र्यांची तेव्हाची गाजलेली कलावती आणि मारू बिहागची एलपी ऐकायचीये - जागू मैं सारी रैना बलमा आणि तन मन धन तोपे वारूँ. मग मी ते ऐकत बसायचो. मग "बोले रे पपीहरा" आलं की म्हणायचं आई हे मियां मल्हार सारखं वाटतंय ना. त्यामुळे माझी आवड पण ती होती. त्यामुळे आईला असं वाटलं की आपल्याला क्लासिकल शिकायला उशीर झालाय, तसा संजीवला नको. म्हणून तिनं मी आठ वर्षांचा असताना मला तिच्या गुरूंकडे - म्हणजे गंगाधरबुवा पिंपळखरे यांच्याकडे - पाठवलं. मला बघून सर म्हणाले, "अगं, हा केवढा लहान आहे. हा काय शिकणार?" मग आई म्हणाली, "तुम्ही ऐका त्याचं गाणं." तेव्हा मी त्यांना ते म्हणून दाखवलं होतं - "देवा सोडा तो पाषाण." (संजीवजींनी आम्हाला चक्क धृपद म्हणून दाखवलं!) मला वाटतं माणिक वर्मांचं गाणं होतं. आणि मी तेव्हाही एवढंच छान गायचो, बरं का? म्हणजे काही लोक माझं लहानपणीचं गाणं ऐकून "अरे, तब भी आप इतना अच्छा गाते थे. बाद में कुछ बढे की नहीं?" असं म्हणतील. (आम्ही सगळे खळखळून हसलो यावर.) तर वाढलं. पण ते काय वाढलं तर एक रिफाईनमेंट असते, विचार असतो, एक अडवान्समेंट असते, एक मुरलेपण असतं, ते वाढलं. पण मुळात एक "आडात" म्हणतात, ते नक्की होतं माझ्याकडे. 
शास्त्रीय संगीत शिकण्यामागची भूमिका 
मला क्लासिकल शिकायला घालण्यामागे आईचा विचार हा होता की ख्याल गायनामध्ये तुमची क्रिएटीविटी व्यक्त करायला तुम्हाला प्रचंड वाव असतो, एक गायक म्हणून. इतर कुठल्याही फॉर्ममध्ये गायक हा एक इन्स्ट्रुमेण्ट असतो. महत्त्वाचा असेल पण इन्स्ट्रुमेण्ट असतो. आता उपशास्त्रीय संगीतामध्ये आपण म्हणतो - वा वा! काय गायक आहे. ह्या गायकामुळे हे गाणं छान झालं. पण हे अर्धसत्य आहे. ती रचना जो करतो तो संगीतकार असतो; त्याची ती सगळी कल्पना असते. फरारी बनवणारा एक वेगळा असतो आणि फरारी चालवणारा शूमाकर असतो - पण तो ती बनवत नसतो. पण क्लासिकल म्युजिक मध्ये बनवणाराही तोच असतो आणि चालवणाराही तोच असतो. चित्रपटाच्या गाण्यामध्ये किंवा भावगीतं गाताना गायक हा एक महत्त्वाचा इन्स्ट्रुमेण्ट असतो - ती कल्पना सत्यात उतरवण्यासाठी. क्लासिकल मध्ये हे सगळं समाधान त्या गायकालाच मिळतं. तोच क्रिएटर असतो, तोच त्याचा कॅनवास ठरवत असतो. मैफिलीचा दोन तासाचा आवाका कसा भरायचा हे सगळं गायकच ठरवतो. चांगले गाणारे बरेच असतात पण उत्तम मैफिल रंगवणारे कमी असतात. त्याचं कारणच हे असतं की चांगला गाणारा क्लासिकल गायक हा ती भूमिका उत्तम निभावू शकतो पण प्रत्येक क्लासिकल गायक हा दोन तासाचा कॅनवास इमॅजिन करणारा असतोच असं नाही. अनेक भूमिका निभावल्याशिवाय एक क्लासिकल गायक एक उत्तम मैफिल गायक म्हणून नावाजला जाऊ शकत नाही. त्याचं सगळं कसब पणाला लागतं क्लासिकल म्युजिक मध्ये. माझे खूप कंटेम्पररी होते ज्यांचं खूप कौतुक व्हायचं नाट्यसंगीतामुळे त्या वेळेला. आई मला सांगायची, "हे बघ, संजीव, तुझं उद्दिष्ट लॉंग टर्म आहे. तुला वेळ लागेल जे करायचंय त्यासाठी. पण जेव्हा ते घडेल, तो जो आनंद असेल किंवा ते जे क्रिएटिव satisfaction असेल त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. त्यामुळे आत्ता आपण शॉर्ट टर्म काहीच बघायचं नाही. म्हणून तू नाट्यगीतं शिकून ती गायची नाहीत कारण ती लोकांना पटकन माहिती असतात." ही विचारधारा पण मला तेव्हापासून आई बाबांनी दिली. 
लहान वयातलं यश 

मी चाइल्ड प्रॉडेजी होतो - तुम्ही माझ्या वेबसाईट वर माझं गाणं ऐकू शकता मी तेरा वर्षांचा असताना मैफिल करायचो ते (http://www.sanjeevabhyankar.com/classical-music.html). तर ते गाणं हिराबाई बडोदेकरांनी ऐकलं. त्यांनी तीन वेळा माझं गाणं त्यांच्या घरी केलं, आवाज बदलायच्या आधी, १२-१३-१४ ही तीन वर्षं. पु.लं.नी ऐकलं, खूप बोलले पु.लं. त्याच्यावरती. भीमसेनजींनी ऐकलं. ते म्हणाले की हा ज्ञानेश्वरांच्या कुळातला मुलगा आहे. गंगुबाई हनगळांनी पुंगोळला मला सवाई गंधर्व महोत्सवात गायला बोलावलं, १२ वर्षांचा असताना. वसंतराव देशपांड्यांनी ऐकलं, दोन वेळा. घरी बोलावून सांगितलं की हा गाण्यासाठीच जन्मलाय, ह्याला पूर्ण वेळ गाणंच करू द्या. हिराबाईंनीही सांगितलं की ह्याला पूर्ण वेळ गाणंच करू द्या, दुसरं काही करू देऊ नका. इतकं काय काय घडलं.
गुरुजींच्या गुरुकुलात प्रवेश
ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर जेव्हा गुरुजींनी माझ्या गाण्याचं कौतुक ऐकलं - आई शिकायला लागली होती त्यांच्याकडे पण त्यांना काही बोलली नव्हती पण त्यांना बाहेरून कौतुक कळलं. ते म्हणाले, "शोभा, सुना है तुम्हारा लडका बहोत धुँवाधार गाता हैI" तेव्हा आई-बाबांनी ठरवलं होतं की फक्त आणि फक्त गुरुजी - म्हणजे पंडित जसराजजी - म्हणाले मी ह्याला शिकवतो तरच मी पूर्ण वेळ गाणं करणार. कारण त्यांचं जे इस्थेटिक्स आहे गाण्याचं, संगीताकडे बघायची दृष्टी - ती माझी जी संगीताकडे बघायची जन्मजात दृष्टी होती तिच्याशी जुळते असं आईचं ठाम मत होतं. गुरुजींनी गाणं ऐकलं - ही १९८३ सालची गोष्ट. मला १३ पूर्ण, १४वं सुरु होतं. गुरुजी म्हणाले, "अगर मेरे पास आना है तो अभी डिसाइड करना पडेगा आप कोI तो पूर्ण वेळ गायक बनणार असेल तरच मी शिकवू शकतो. आणि मी कुठेही जाईन तिथे त्याला यायला लागेल बरोबर. कारण मी सारखा फिरत असतो आणि तो माझ्याबरोबर आला तरच त्याला शिकायला मिळेल." तोपर्यंत आई बाबांनी असं ठरवलं होतं की ते म्हणाले तर हो म्हणायचं. त्यामुळे मी नववीत असतानाच माझं फुल टाइम करिअर म्युझिक मध्ये ठरलं. आणि मी टिक मार्क म्हणून बी कॉम केलं. माझी बायको आर्किटेक्ट आहे. ती म्हणते - तू बी कॉम नसता झालास तर नसतं केलं हं लग्न! (संजीवजी हलक्या फुलक्या विनोदानी गप्पांमध्ये आपल्याला हसवत ठेवतात.) तर थोडक्यात माझी मानसिकता फुल टाइम म्युजिशिअनची तेव्हापासूनच बनली. 
आपण शिक्षणाविषयी बोलतो आहोत तर त्यासंबंधीच पुढचा प्रश्न आहे. तुम्ही म्हणालात की १९८३ साली पहिल्यांदा तुमचं गाणं ऐकलं गुरुजींनी. तर त्या वेळचं संगीत शिक्षण आणि आताचं यात फरक आहे का आणि असेल तर काय फरक पडला?
: हो, फरक आहे ना. खूप आहे. मुळात कलावंतांच्या कन्सेप्ट्स मध्ये पण फरक होता.
सहवासाचं तत्त्व

आता माझे गुरुजी ८६ वर्षांचे आहेत. त्यांनी बघितलेला काळ हा त्याच्याही मागचा. त्यामुळे त्यांचं दृढ मत होतं की "मेरे पास ही रहना हैI" माझ्याबरोबर प्रवास सुद्धा केला पाहिजे. मला तू नजरेसमोर पाहिजेस, तू तुझा रियाज करत रहा आणि मला हवं तेंव्हा मी तुला शिकवेन. तानपुऱ्यावर बस म्हटलं की बसायचं. तेंव्हा मला कंटाळा आलाय वगैरे काही चालणार नाही. पण ही त्यांची रिक्वायरमेंट होती, हा मला चॉईस नव्हता. मी त्यांच्याकडे असताना त्या दहा वर्षात एकदाही कधी कशाला नाही म्हटलो नाही. अमुक ठिकाणी या तारखेला पोच म्हटल्यावर आयत्या वेळी मिळेल त्या रेलवेच्या तिकिटावर तीस-चाळीस तास सेकंड क्लासनी प्रवास केलाय, मुंबईहून वाराणसी, हरिद्वारसारख्या अनेक ठिकाणी अनरिजर्व्ड क्लासमध्ये बसून प्रवास केलाय. काहीही असो, गुरुजींना नाही म्हणायचं नाही. माझ्यात हिंमतच नव्हती त्यांना नाही म्हणायची. तो काळच एवढा वेगळा होता. फुल टाईम म्युजिशन तुम्हाला व्हायचं आहे आणि जसराजजी म्हणाले की माझ्या शिस्तीत तुम्हाला वागायचं नसेल तर जा निघून, तर कसं चालेल? 
रात्री झोपताना गुरूंचे पाय चेपायचे हे म्हणजे काही विशेष करणं नव्हतंच. किंवा मैफिलीच्या आधी त्यांच्या धोतराला इस्त्री करून द्यायचो. नीट नाही झाली तर ते म्हणायचे 'चलो हटो, मैं करता हूँI' त्यामुळे त्यात खूप काम करायला लावलं असा निगेटिव्ह भाव वगैरे काही नव्हता. हा त्यांच्या सिस्टीमचा किंवा प्रोसेसचा भाग होता. मुळात या सगळ्यामागे तत्त्व हे होतं की सहवास मिळाला पाहिजे. हे तत्त्व अजूनही लागू आहे. कारण त्या सहवासातून टिप्स मिळतात. खूप शिकायला मिळतं. जे तुम्ही आठवड्यातून दोन दिवस जाऊन शिकता त्यापेक्षा या ८-१० वर्षांच्या सहवासातून अडव्हांस लर्निंग मिळतं. 
नेट प्रॅक्टिस आणि मॅच प्रॅक्टिस 
मी त्यांना ४०० मैफिलींना स्वर-साथ केली आहे. म्हणजे एवढे लाइव्ह प्रोग्रॅम ऐकले मी त्यांचे. नेट प्रॅक्टिस एक प्रकार असतो पण ज्याला मॅचेस खेळायच्या आहेत त्याला मॅच प्रॅक्टिस पण लागते. अश्या दृष्टीतून परफॉर्मिंग गुरूचा सहवास मिळणं फार महत्वाचं आहे. म्हणजे नॉन स्ट्रायकर एंड वरून तेंडूलकरची बॅटिंग बघायला मिळण्यासारखं आहे. 
काळानुरूप गुरूंच्या कन्सेप्ट्स सुद्धा बदलतात. मी ही आता शिकवायला सुरुवात केली आहे त्या माझ्या शिष्यांना नेहेमी सांगतो की माझ्या मैफिली तुम्ही ऐका. बारीक बारीक इतकी मॉडिफिकेशन्स, अड्जस्टमेंट्स असतात. मंडपाचा - तिथल्या टेम्परामेंटचा अंदाज असतो, त्यानुसार मैफिलीचे टप्पे कसे गाठले जातात, भावविश्व कसं उभारलं जातं, रागाची निवड, राग क्लायमँक्सला कसा आणला जातो - हे बघा. शेअर बाजारासारखी मैफिल खाली - वर नाही जाऊन चालत. वन डे क्रिकेट मधल्या ४०० रनच्या इंनिंग सारखी ती चढत चढत जायला पाहिजे. हे सगळं शिकायला मैफिली ऐकल्या पाहिजेत. आता आपल्यासारख्या या पुढच्या पिढीला प्रायव्हसी पण हवी असते, त्यामुळे कायमच घरात नको वाटतं. म्हणून पारंपरिक गुरुकुल पद्धतीनी शिकवणं मी नाही प्रेफर करत पण सहवासाचं तत्त्व अजून लागू आहे ते मगाशी म्हटलं तसं मैफिलींच्या तऱ्हेने जोपासलं जातं.
छोट्या सूचना महत्त्वाच्या 

दुसरं म्हणजे गुरूंच्या छोट्या छोट्या बोलण्यातून टिप्स मिळतात. मी १३ वर्षांचा असताना भीमसेनजी म्हणाले होते की हा ज्ञानेश्वरांच्या कुळाचा मुलगा आहे पण दुसरं अजून मी एक सांगीन की याने आपल्या तब्येतीकडे लक्ष द्यावं. त्यांच्या म्हणण्याचा अर्थ मला आत्ता नीट समजतो की तब्येत उत्तम असणं किती महत्त्वाचं आहे. मांडी घालून तीन-चार तास बसता आलं पाहिजे. ऑफिसमध्ये कसा वरचा माणूस फक्त निर्णय घेतो आणि टीम मधल्या बाकीच्यांना कामं देतो. परफॉर्मिंग आर्टिस्टला आणि त्यातून क्लासिकल गाणाऱ्याला तसं नाही करता येत. स्वतःच तीन-तीन तास मैफिलीत बसून गावं लागतं, स्वतःच्या ताकदीवर मैफिल रंगवावी लागते आणि त्यासाठी त्याचा फिटनेस फार महत्वाचा आहे. अनुभवसंपन्न गुरुचं एक एक वाक्य किती महत्त्वाचं असतं हे तुम्हाला कळेल यावरून. 
शास्त्रीय संगीत हा एक शोध, एक सततचं इनोवेशन 

क्लासिकल म्युजिक हे पूर्णपणे कधीच शिकता येत नाही कारण तो एक शोध आहे. प्रत्येक जण आपापल्या गाण्यातून त्याचा शोध घेत असतो. काहींना नवीन काही तरी मिळतं, काहींची पुनर्रचना असते. पण ती त्या त्या वेळी नक्की कशी घडणार आहे हे त्याला सुद्धा माहित नसतं. रंगांच्या दुनियेसारखंच आहे हे. सात रंग आहेत तेच आहेत पण त्यांच्यातून अमर्याद शक्यता निर्माण होऊ शकतात. वेगवेगळे रंग मिसळून नवीन काही तरी सुंदर मिळतं किंवा एकाच हिरव्या रंगाच्या निसर्गात आपण हजारो वेगळ्या छटा बघतो. तसंच स्वरांचं पण आहे. मला ख्याल गायन सुरु करून ३८ वर्षं झाली. मग मी एखादा बागेश्री गाताना त्याच्यामध्ये आजही मला चार वेगवेगळ्या स्वरसंगती सापडतात, चाळीस मिनिटांमध्ये, which is really very difficult. एवढया वर्षांची तपस्या झाल्यानंतरही चार गोष्टी वेगळ्या मिळतात. म्हणजे हे जे विषय आहेत त्यांच्यामध्ये ह्या शक्यता आहेत, हा एक part झाला. काही नवीन बंदिशी तयार केल्या, डीवोश्नल गीतांसाठी क्लासिकल म्युजिकच्या रागाधारित अशी कम्पोजिशन्स तयार करणं, हा त्यातला इनोवेशनचा दुसरा part आहे. क्लासिकलमध्ये इनोवेशन म्हणजे रागाच्या चौकटीमध्येच मिळणाऱ्या ज्या स्वरांच्या उत्कट अश्या कलाकृती असतात त्यांनी एक वेगळंच चित्र उभं राहत की जे आधी कधीच घडलेलं नसतं. त्यामुळे हा सौंदर्याचा शोध सगळा शिकून संपला असं कधीच होत नाही. शिकण्याच्या प्रोसेसमध्ये या अमर्यादत्वाचा अनुभव पण येतो. गुरुसुद्धा कधी 'मेरा हो गया, अब तुम सीखो' असं म्हणत नाहीत कारण ते पण शेवटपर्यंत शिकतच असतात. 
ही सगळी तत्त्वं अजूनही लागू आहेत, काही पद्धती कदाचित बदलल्या असतील. 
"संगीत ही बिनशब्दांची जागतिक भाषा आहे" याचा प्रत्यय देणारे काही अनुभव तुमच्या प्रवासाच्या निमित्ताने कधी आले का? 

: क्लासिकल हे स्वरप्रधान, म्हणूनच वैश्विक संगीत

हो, नक्कीच. मुळात क्लासिकल हे स्वरप्रधान संगीत आहे. आम्ही रसिकांच्या समोर स्वर-रचनांचा कॅनवास उभा करत असतो आणि त्याला पूरक अश्या शब्दांची जोड अश्या पद्धतीने आम्ही गात असतो. त्यामुळे भाषेचा बॅरिअर फारसा येत नाही. पण एखाद्या संपूर्ण परदेशी ऑडियंस समोर मराठी भावगीत किंवा चित्रपट गीत गायला लागलं तर त्यांना ते अजिबात रिलेट करता येणार नाही. क्लासिकल मध्ये पूर्णपणे स्वरांमुळे फुलणारे भाव आहेत. स्वरांनी घातलेली साद आणि त्याला अर्थपूर्ण, भाववाही शब्दांचा सपोर्ट म्हणजे क्लासिकल म्युझिक आणि त्यातलं ख्याल - गायन. पण म्हणून ती साद सगळ्यांनाच कळते असं नाही. काहींना हिऱ्याची किंमत कळत नाही आणि सोन्याचे दागिने घालणारे लोक त्यांना जास्त श्रीमंत वाटतात. तसंच रसिकांमध्येही उत्तम स्वर-पारखी काही असतात, काही नसतात. पण तरी शब्दप्रधान संगीतापेक्षा शास्त्रीय संगीताच्या मैफिली ह्या भाषेचा अडसर नसल्यामुळे काना-कोपऱ्यात होतात. कारण ही एक यूनिवर्सल लॅंग्वेज आहे. स्वित्झर्लंड किंवा अमेरिकेतल्या पूर्ण गोऱ्या ऑडियंसला मी अगदी हलका भाव जरी सांगितला की "मी आता पहिल्या भागात विरहाची बंदिश गाणार आहे आणि दुसऱ्या भागात मीलनाची." मग स्वरांमधून ते भावविश्व उभं राहतं की नाही ते त्यांना समजतं. भावनिर्मितीसाठी स्वर महत्त्वाचे आहेत आणि शब्द हे सपोर्टला असल्यामुळे ते बोनस आहेत. त्यामुळे ख्याल-गायनाला 'वसुधैव कुटुंबकम' ही आपल्या अंकाची थीम अगदीच लागू पडते असं मी म्हणेन. माझ्या मते गाणं जेवढं स्वर-प्रधान होत जातं तेवढं ते व्यापक होत जातं.
मैफिलीनंतर रसिकांच्या प्रतिक्रिया ऐकल्या - "we were in trance, we were in a different world" - की याचा प्रत्यय येतो. काही वेस्टर्न रसिक अगदी मोक्याच्या ठिकाणी दाद देऊन गाणं ऐकताना पाहिलं की जाणवतं की रसिकतेमध्ये भाषा, जात, देश, ओरिजिन हे अडसर येत नाहीत. ज्यांच्यावर ऐकायचे संस्कार झालेत असे, म्हणजे ज्यांना क्लासिकल गाणं ऐकायची सवय आहे, त्यांचं मैफिलीत दाद देणं पण वेगळं असतं पण त्यासाठी तो माणूस भारतीय आहे की परदेशी हे लागू होत नाही. दाद द्यायची पद्धत वेगळी असेल - म्हणजे काही 'वाह' म्हणतील तर काही मान हलवतील. पण त्यांच्या डोळ्यांमधले भाव सारखेच असतील. शरीराने अभिव्यक्त केलेली ही एक दाद आहे. त्याचबरोबर जसा रसिक कलाकाराला ऑब्जर्व करत असतो तसा कलाकार पण रसिकांना ऑब्जर्व करू शकतो आणि मी तर नक्कीच करतो.
तुम्हाला इतर संगीत प्रणालींचा पण खूप परिचय झाला असेल ना परदेश प्रवासामधे? त्यांच्यात काय साम्य किंवा भेद आहे? किंवा वेस्टर्न क्लासिकल, फ्यूजन किंवा जुगलबंदी अश्यांचा गायकीमध्ये उपयोग होतो का? 

: हो. आता इंटरनेटने केलेल्या रेवोल्युशनचा परिणाम सांगतो मी तुम्हाला. 
आता गाणं कुठेही झटपट पोचू शकतं

एचएमवीने मला रेकॉर्ड केलं ९१ मधे, तेंव्हा कॅसेट होती. त्यावेळी सीडी पण नव्हती! ही कॅसेट कुठेतरी पोहोचल्याशिवाय तुमचं गाणं पोहोचू शकायचं नाही. म्हणजे एखाद्या पॅरिसमध्ये बसलेल्या व्यक्तीला संजीव अभ्यंकर ह्याच्या गाण्याचं एक्सपोजर हे त्या व्यक्तीचा गाण्याशी संबध असेल तर, ती व्यक्ती मार्केट मध्ये गेली कुठे इंडिया मधे आली तेंव्हा किंवा तिच्या मित्रमैत्रिणी कडे गेली आणि तिथे तो किंवा ती काहीतरी ऐकत आहेत आणि त्यांनी कॅसेट/सीडी दिली की बाबा हे ऐक, this is really good, तरच होऊ शकायचं. पण आता फेसबुकवर जे माझे फ्रेंड पण नाहीयेत त्यातलं कोणीतरी माझं गाणं कुणाला तरी शेअर केलं आणि त्या पॅरिसमधल्या व्यक्तीनं बघितलं आणि मग त्या व्यक्तीला लक्ष्यात आलं की वंडरफुल आहे. म्हणून ती माझ्या साईटवर जाऊन माझं गाणं ऐकू शकते. तिला आवड असेल तसं विकत घेऊ शकते, download करून घेऊ शकते. म्हणजे खऱ्या अर्थाने इंटरनेटने "वसुधैव कुटुंबकम" जे आहे ते सत्यात उतरवलंय. लंडनमध्ये दोन अफगाणी मुलं आली अशी आपली सहज, विशीची. त्यांनी मला त्यांची सीडी दिली आणि म्हणाली, "Please listen to it and look forward to your program in London. Last time also, we were there when you were there." तर आता हे लोक कुठून कुठून येतात, त्यांच्याकडे माझी सीडी असेल असेही नाही, पण कुठे इंटरनेट मुळे एक्सपोजर असेल. कुणाचंही गाणं कुठेही पोहोचतं, त्यांना आवडही निर्माण होऊ शकते आणि ते लोक लाइव प्रोग्रॅम मध्ये येऊन व्यक्त पण करतात. इंटरनेटने हे रेवोल्युशन आणलेलं आहे. तर हा एक पार्ट झाला. 
पूर्वतयारी एका जागी नसतानाही होऊ शकते

दुसरा पार्ट मला जाणवतो "वसुधैव कुटुंबकम" या थीम मधला की मी जुगलबंदी पण खूप करतो साऊथ - नॉर्थ मध्ये पण मी खूप केल्या आहेत. फ्लूटबरोबर असेल, वायोलिनबरोबर किंवा वोकल पण खूप केलेल्या आहेत, वेगवेगळ्या ७ - ८ सिंगर्सबरोबर. वेस्टर्नमध्ये लंडनला माझा प्रोग्राम होता - हार्प, पियानो आणि मी. तर सांगायची गंमत अशी की आता हे जे प्रोग्राम असतात त्यांची रिहर्सल कशी करायची? पूर्वी जर चेन्नई ला ड्युएट करायचं असेल तर तीन दिवस आधी जाऊन बसावं लागायचं, उत्तम प्रोग्रॅम द्यायचा असेल तर. स्वतः पं. गुरुजी आणि बालमुरलीकृष्णन ह्यांच्या duet साठी ८७ - ८८ मध्ये चेन्नईला गेलेलो. चार दिवस आम्ही हॉटेलमध्ये राहिलो होतो. बालमुरलीजी चेन्नईचे. गुरुजींना तेंव्हा खोकला वैगरे काहीतरी झाला होता, तर ते मला म्हणाले की "तुम जाओ और सीख के आओ जो गाना है" आणि मला रूममध्ये गाऊन दाखवत राहा. बालमुरलीजी मला स्वर शिकवत होते आणि मग मी रूम मध्ये येऊन गुरुजींना गाऊन दाखवायचो. ते पेपर वाचत आहेत, कॉफी पीत आहेत आणि म्हणायचे की "गाते रहो तुम" आणि मग त्या दोघांचे duet झालं आणि मी तंबोऱ्यावर. पण आता हे कित्ती सोपं झालंय की Skype वर आम्ही रिहर्सल करू शकतो. म्हणजे मी इथे बसलेलो आहे, तो जो वादक आहे तो एखादवेळेस त्याच्या शहरात पण नसतो. तो सिंगापूर मध्ये बसून पण मी रिहर्सल केलेली आहे. तर तो त्याच्या iPhone वरून आणि मी माझ्या इथून, आणि प्रोग्राम होणार चेन्नईला. पण मग फक्त आम्ही चेन्नई मध्ये जेव्हा भेटतो तेंव्हा आदल्या दिवशी एका रिहर्सलमध्ये पण आमचं काम होऊ शकतं, फुल अंड फायनल. सगळी पूर्वतयारी आम्ही इंटरनेट वर करून, एक्स्चेंज ऑफ थॉटस - काय काय घ्यायचं, काय काय त्याचे पर्याय आहेत, हे आधी इमेल / वॉट्सअप वर होऊ शकतं, चर्चा होऊ शकते, वेरिअस ऑप्शन्स! कमाल झालेली आहे म्हणजे! लिटरली "वसुधैव कुटुंबकम" झालं आहे. 
वेगवेगळ्या सौंदर्यदृष्टींचे नकळत प्रभाव

आणि मग वेगवेगळ्या गायकीचं तुम्ही विचारलं, तर मी जसा म्हणतो की इस्थेटिक प्रभाव पडत राहतात एकमेकांवर, डायरेक्ट इन्कॉर्पोरेशन नसतं. म्हणजे वेस्टर्न म्यूजिक जर मी ऐकलं तर ते मला परदेशात जाऊनच ऐकायला लागत नाही. हीच तर गंमत झाली आहे आता. मी इकडे पुण्यात बसून, सगळ्या जगातलं music ऐकू शकतो. जगात घडलेल्या काही events लोक फेसबुकवर शेअर करतात, यूट्यूबवर असतं. कोणी काय केलंय याची खबरबात, प्रवास करता करता एअरपोर्ट वर बसूनही माणसाला घेता येते आणि त्यातून ती इस्थेटिक प्रोसेस स्वतःची ग्रोथ घडवून आणते. वेस्टर्नचे डायरेक्ट अप्लिकेशन मला माझ्या ख्याल गायकीमध्ये किंवा त्यांना त्यांच्या गाण्यामध्ये करायची संधी मिळते असं नाहीये. पण एकमेकांच्या चांगल्या गोष्टीपण आपण उचलू शकतो. त्यातून एक वेगळ्या प्रकारचे इन्स्पिरेशन निश्चितपणे मिळते. आणि ते बेमालूमपणे तुमच्या संगीतामध्ये प्रभाव पाडून जाते, नोन - अननोन, दोन्ही पध्दतीनी. 
संजीव जी, तुम्ही तयार केलेल्या काही बंदिशी तुमच्या वेबसाईट वर पण ठेवलेल्या आहेत. त्याविषयी काही सांगाल का? पूर्वीच्या शास्त्रीय संगीताच्या संकल्पनेप्रमाणे घराण्याची गायकी प्रत्यक्ष गुरु-शिष्य परंपरेतून पुढे जायची. त्या पार्श्वभूमीवर हे ट्रान्सफॉर्मेशन आहे ना? इंटरनेटवर नवीन कम्पोजिशन्स सगळ्यांसाठी उपलब्ध करून देणे, ह्या मागचा तुमचा विचार काय होता? 

: परंपरेतून येणाऱ्या गोष्टी तर आहेतच ना, ते मी पण गातो. पण माझ्या गुरुजींनी पण कनट्रिब्युट केलं की नाही? त्यांनी पण त्यांच्या गुरूंकडून शिकलेल्या मध्ये स्वतःची पण भर घातली. दोन विचार आहेत यामध्ये. 
स्वनिर्मिती आवश्यक

त्यातला जो पार्ट १ आहे की याच्या मागचा विचार काय? जसं पुढचा माणूस आपल्याला जे सापडलंय ते कोंदणात बांधून डिस्प्लेमध्ये आणतो. आपण जर एक संग्रहालय जर उभं केलं तर आपण म्हणतो की मेवाती घराण्याच्या दालनामध्ये हे पं. मणीरामजींनी कनट्रिब्युट केलं आहे, हे दालन आहे ते पं. जसराजजींच्या कनट्रिब्युशनचे. तर पुढे गेल्यावर संजीव अभ्यंकर यांच्या कनट्रिब्युशनचे दालन पण तिथे पाहिजे ना? मग ते बंदिशी असोत किंवा मराठी अभंगवाणी. म्हणजे मी गातो त्या प्रांतामध्ये मी करायचा प्रयत्न करतो. क्लासिकलमध्ये सर्व प्रकारचे रस आहेत - शृंगार आहे, भक्ती आहे, करुणा आहे. भक्तीसंगीत हा माझा लाडका जॉन्रा आहे - माझ्या आवाजाला आणि प्रकृतीला सगळ्यात जास्त भावणारा. त्याच्यामध्ये काय? तर मग मराठी अभंग येतात, हिंदी संतांच्या रचना येतात. वेगवेगळे संत निवडले की प्रत्येकाची भाषाशैली वेगळी असते. त्या भाषाशैलीमुळे शब्दांचा एक नाद मिळतो तुम्हाला. राजस्थानी भाषेत मीराबाई गाणं गातात, तुलसीदासांनी लिहिलेलं एखादं अवधी पद असेल, सूरदासांनी लिहिलेलं ब्रज काव्य आहे. मीराबाई कृष्णाला भेटण्याचा आनंद व्यक्त करतात, तुलसीदास रामाला भेटल्याचा आनंद व्यक्त करतात, सूरदास कृष्णाला भेटल्याचा आनंद व्यक्त करतात. ह्यातून येणारं जे वैविध्य आहे ते मी टिपण्याचा प्रयत्न केला आहे. जसं गुरुजींबद्दल आपण म्हणतो की त्यांच्या गुरुंनी त्यांना अमुक दिलं, त्यांनी मला तमुक दिलं. ते माझ्याकडे आहेच; ते उत्तम आहे, ते जतन करायचंच. पण त्याच्या व्यतिरिक्त मला असं वाटलं की हे नाहीये माझ्याकडे. मग या पद्धती करायच्या ना तर माझ्या माझ्याच तयार करतो. मी दुसऱ्याकडून कशाला घेऊ?
निर्मिती रसिकांपर्यंत पोचवणंही आवश्यक

आता तुमचा दुसरा मुद्दा की मी वेबसाईट वर बंदिशी का ठेवल्या? त्या जास्तीत जास्त लोकांनी ऐकल्या तर मला आनंद आहे ना? ती निर्मिती पोहोचण्याचा काळ शॉर्टन करायचा माझा विचार होता. मला माझी निर्मिती जर पोहोचवायची असेल तर website was best way. आणि आज काल खूप वेळा एक आक्षेप असतो ना की लोकं बालगंधर्वांची नाट्यगीतं गातात, भीमसेनजींचे अभंग गातात, अभिषेकींची, वसंतरावांची पदं ऐकायला मिळतात. पण पुढच्या पिढीने जर स्वतःचीच पदं निर्माण करून पॉप्युलर केली नाहीत, तर २५ वर्षांनंतरही लोकं हीच पदं गाणार. मधल्या पिढीने काय केलं? तर मला असं वाटत की मधल्या पिढीने जर स्वतःचे काम निर्माण केलं असेल तर ते पोहोचवायचा प्रयत्न केला आहे का? म्हणजे असं नाही मला म्हणायचं की मी एकटाच निर्मिती करतोय, पण निर्माण करणाऱ्याने निर्माण केले तर ते पोहोचवायला पण पाहिजे. 
याच note वर आता शेवटच्या प्रश्नाकडे आता येऊन पोहोचलो आहोत की असं तुमचं एखादं स्वप्न आहे का की जे पूर्ण झालं म्हणजे सारं मिळालं?

: अपूर्णत्त्वामुळे प्रतिभा जिवंत राहते

संत रामदास स्वामींचा मी आख्खा दासबोध गायलो आहे महाराष्ट्र गवर्न्मेण्टसाठी. त्यांच्या वेबसाईटवर पूर्ण दासबोध फ्री डाऊनलोड ठेवला आहे त्यांनी. तेंव्हा रामदास स्वामींनी काय सांगितलं आहे ते गाता गाता मलाही थोडं अभ्यासायला मिळालं. त्यात एक छान वाक्य होतं की आयुष्य हे अपूर्ण आहे, हे तुम्ही समजून घ्या. त्याला पूर्णत्व द्यायचा प्रयत्न करू नका. त्यामुळे कुठल्याही टप्प्यावर गेलात तरी हे अपूर्णत्व तुम्हांला जाणवतच जाणार आहे. हे माझं मत दृढ आहे की असा कुठला टप्पा असूच शकत नाही की मला सगळं मिळालं. तिथे गेल्यावर मला काहीतरी पुढंचच दिसायला लागतं. मला असं वाटत की ते जिवंत प्रतिभेचे लक्षण आहे. ती अमर्यादता जपायचा असा माझा प्रयत्न असतो. 
संजीवजी, thank you so much. आम्हाला आणखी बऱ्याच गप्पा तुमच्याशी मारायला आवडल्या असत्या, पण आता तुमचा किती वेळ घ्यायचा हाही प्रश्न आहे. पण ज्या मुक्तपणे तुम्ही गप्पा मारल्यात आणि ज्या वेगवेगळ्या विषयांना तुम्ही स्पर्श केलात, त्यातून खूप ऐकायला, शिकायला मिळालं. आणि मला अगदी खात्री आहे की आमच्या सगळ्या वाचकांना सुद्धा ही मुलाखत नक्की आवडेल.
अशा रीतीनं मोहवून टाकणाऱ्या मधाळ आवाजात मधेच काही गुणगुणत, विनोद करत, चपखल उदाहरणं देत संजीवजींनी त्यांच्या सांगीतिक कारकीर्दीविषयी आमच्याशी मनमुराद गप्पा मारल्या. यशोवर्धन जोशीला हा योग साधून आणल्याबद्दल खूप धन्यवाद! संजीवजी ऑगस्ट मध्ये सिंगापुरात एका मैफिलीसाठी येत आहेत. शास्त्रीय संगीताच्या चाहत्यांकरता ही मोठीच पर्वणी असणार आहे. त्याकडे नक्की लक्ष ठेवा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा