जे प्रत्यक्ष अनुभवले ते

१९४२ -४३ सालापासून जे अनुभवलं ते सांगण्याचा हा प्रयत्न.

भारत छोड़ो, या चळवऴीने जोर धरला होता. घराघरातील लोक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी बाहेर पडले होते. आम्ही तेव्हा निजामराज्यात होतो. भारताला इंग्रजांना घालवायचे होते तसे आम्हाला निजाम राजवटीतून सुटका हवी होती. इथे उर्दू भाषाच बोलली जायची. शिक्षणाला माध्यमपण उर्दू. वृत्तपत्र उर्दू, टाईम्स ऑफ इंडिया तेवढा आमच्याकडे येत असे. त्यामुऴे जगात काय चालले आहे ते कळे.

आमचे वडील मुंबईहून डॉ. होवून आले होते, गावात त्यांना मान होता. अनेक मुसलमान, सरकारी अधिकारी, त्यात लातुरचा प्रसिद्ध वकील कासिम रझवी हाही आमच्या वडीलांचा फॅमिली पेशंट होता. अत्यंत आदराने बोलणे, समोरच्यांचा मान राखणे अशी त्यांची वागणुक होती. गावागावातून बातम्या येत होत्या. इंग्रजी राज्यात स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांना बंदी घातली होती. वेशपालटून लोक काम करत असत.असे अनेक लोक आमच्या घरी मुक्कामाला येत असत. स्टेट काँग्रेसला बंदी होती, मग सभा घ्यायच्या त्या साहित्यसंमेलन, वगैरे नावाने. त्यावेळी आंम्ही मुली स्वयंसेविका म्हणून जात होतो. पांढरी साडी नेसायची व जायचं.

लातुर गावात काँग्रेसपार्टी तसेच आर्यसमाज, कम्युनिस्ट पार्टीपण होती. कुठेही सभा असली की चाललो आम्ही पांढरी साडी नेसून. आमच्या गावात मुलींची शाळा नव्हती तेव्हा मी बार्शीला मामाकडे रहात होते. तेथे हिंदु महासभेचे अधीवेशन होते, तिथेही गेलो स्वयंसेविका म्हणून. श्री. भालजी पेंढारकर सभेचे अध्यक्ष होते. श्री बाबा काळे हे बार्शीचे हिंदू महासभेचे प्रमुख होते. तेंव्हा त्यांनी (बाबा काळ्यांनी), “अहो सिंधुताई इकडे या”, अशी हाक मारली तेव्हा एक खूप गोऱ्या बाई आल्या तेव्हा, “या सिधुतांई! नथुरामच्या वहिनी, व गोपाळ गोडसेचे कुटुंब”, अशी ओऴख करुन दिली. हे लक्षात ठेवण्याचे कारण म्हणजे नथुराम हे विचित्र नाव होतं व तो एक सामान्य किडकिडीत माणूस होता, आणि त्या बाईंच्या तोंडावर देवीचे खूप व्रण होते. ते विसरून गेले. पुढे गांधी वध झाला तेव्हा कुणीतरी नथुराम गोडसेने हे कृत्य केले अशा बातम्या आल्या. तेव्हा हे नाव ऐकले आहे व त्यांना पाहिले आहे हे आठवले.

हैद्राबादला या काँग्रेसच्या चळवळीने जोर धरला. मग हिंदूंची अवस्था कठीण झाली. लातुर सारख्या लहान गावात तर फार बिकट अवस्था होती. क़ासिम रझविला वाटले आता भारत स्वतंत्र झाला तर मी निज़ाम राज्यात पंतप्रधान होईन. त्याने रझाकारांची खूप मोठी पार्टी स्थापन केली. ते अत्यंत माजले होते, गावात बायका मुलींची काळजी वाटत होती आमच्याकडे दोन तरुण मुली, एक तरुण सून होती. रात्रीतून आम्ही जमेल तेवढ्या पेट्या घेऊन, बार्शी, सोलापूरला आलो. तिथे आमचे बरेच नातेवाईक होते.

पण इतकं मोठं कुटुंब पाहून ते घाबरले. दर सुट्टीला, आजारी पडले की आमच्याकडे येऊन महिना महिना रहाणारे, इथे मोगलाइत किती सुबत्ता आहे म्हणून पाहुणचार घेणारे लोक तोंड फिरवून बसले. तेव्हा कळलं की आपल्यावर वेळ आली की कोणी नसतं.

गोठ्यासारख्या दोन खोल्यात कसे तरी राहिलो, सत्याग्रह, भूमिगत राहून मंडळी काम करत होती. आमची दोन भावंडं ही होती. रोज काय बातमी येते त्यावर नज़र होती. इंग्रज सोडून गेले, पण हैद्राबादचा निकाल लागला नव्हता. आमचा सगळा जीव तिकडे लागला होता. तेव्हाच आमचं लातुरचं घर फोडून, सर्व लुटून नेलं. गाद्या उषा फाडून सत्यानाश केला हे कळलं, काय करणार होतो. शेवटी श्री. सरदार पटेल यांनी नेहरु वगैरे पुढाऱ्यांचे चे न ऐकता निज़ाम राज्यात मिल्ट्री घुसवण्याचा निर्णय घेतला. मेजर जर्नल चैधरींनी धैर्याने मिल्ट्री घुसवली व सर्व निजाम राज्य ताब्यात घेतले.

क़ासिम रझवी हैद्राबाद मध्ये राज्य करणार होता तो एका रात्रीत विमानाने कराचीला पळाला. 

आम्हाला आमच्या गावात आल्याने समाधान मिळाले, त्याबद्दल सरदार पटेलांना व मे. ज. चौधरींना धन्यवाद. त्यांनी त्यावेळच्या काँग्रेस पुढाऱ्यांचे ऐकले असते तर आम्ही पण काश्मिरच्या लोकांसारखे अर्धवट तरंगत राहिलो असतो. त्या काऴात साधी रहाणी व उच्च विचारसरणी याला महत्त्व होत.

स्वातंत्र्य मिळालं याचा गैरवापर होऊ नये. चांगले संस्कार, चांगले शिक्षण घ्यावे म्हणून हैद्राबादला शाऴेत प्रवेश घेतला. तेव्हा तिथे हिंदी साहित्य संमेलन होते. राहुल सांक्रत्यायन हे अध्यक्ष होते. ते आले तेव्हा “रशिया के जामात”, अशी त्यांची ओळख करुन दिली होती. तेव्हां त्याची ‘आई’ ही कादंबरी प्रसिध्द झाली होती, त्यांची अनेक पुस्तकं वाचली.

चांगल वाचाव, चांगलेच सिनेमे पहावेत. नीटनेटक रहावे ही मध्यमवर्गाची शिकवण होती. आता ते कालबाह्य झाले आहे. नटनट्या करतात तीच खरी फॅशन हे आजच्या पिढीचे ध्येय आहे. व्यक्ति स्वातंत्र्य असावे, ते आहे ही पण त्या स्वातंत्र्याचा कसा व किती वापर करावा हे त्यांनाच समजले पाहिजे.

दुसऱ्यांनी सांगीतलेले पटत नाही. कमीपणा वाटतो. खरंतर स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे हे लक्षात ठेवले तरी पुरे.

समाजाबरोबर पिढीही पुढे चालली आहे. काळाबरोबर जावं पण कुठे थांबावं हेही त्यांना कळेल याची आशा करुया. पुढची पिढी फार शहाणी आहे. त्यांना आपल्या मार्गदर्शनाची गरज नाही. याला अधुनिकीकरण असे म्हणतात. प्रभात फेरीच्या वेळी म्हटली जाणारी देशभक्तिपर गाणी, दिल्या जाणार्या घोषणा आजही आठवतात. देश स्वतंत्र झाला तेव्हापासून दर १५ आॉगस्ट आणि २६ जानेवारीचे झेंडावंदन कधीही चुकवले नाही. त्या काळातल्या देशभक्तांना वंदन करुन देशाच्या प्रगतीसाठी, शांततेसाठी सुरक्षिततेसाठी पुढच्या पिढीने सहकार्य करावे हीच अपेक्षा आहे.

- शांता टिळक


1 टिप्पणी:

  1. अतिशय अमूल्य आशा या आठवणी आहेत व त्या आशा डिजिटल स्वरूपात पुढच्या अनेक पिढयांसाठी एक ठेवा आहेत.

    उत्तर द्याहटवा