महाराष्ट्र मंडळ सिंगापूर - वार्ता



आंतरराष्ट्रीय महिला दिन

बुधवार, ८ मार्च २०१७
आंतरराष्ट्रिय महिला दिनानिमित्त महाराष्ट्र मंडळाने आपल्या फेसबुक पानाचा उपयोग करुन अल्पावधीत मंडळाच्या स्त्रीवर्गासाठी एक स्पर्धा आयोजित केली. ह्या स्पर्धेमधे मंडळाच्या स्त्रीयांना एक प्रश्न विचारला गेला होता: आजच्या आंतरराष्ट्रिय महिला दिनाबद्दल तुम्हाला काय वाटतं? एक स्त्री म्हणून तुम्हाला स्वतःबद्दल काय वाटतं? मंडळाच्या स्त्रीवर्गाने उत्साहाने भाग घेऊन ह्या प्रश्नावर आपली मते मांडली. मंडळाने पाच स्त्रीयांना विजेत्या घोषित करुन त्यांना झी टीव्ही आशिया पॅसिफिक ह्यांनी आयोजित केलेल्या ख्यातनाम आचारी सरब कपूर ह्यांच्या पाककृती कार्यशाळेत नि:शुल्क प्रवेश दिला. ह्या पाककृती कार्यशाळेत पंचतारांकित दर्जा असलेले दोन पदार्थ ह्या विजेत्या स्पर्धकांना शिकण्याची संधी मिळाली. हे दोन पदार्थ होते: 

Little Thai Polento Cakes with Chilli Lime Sauce
White Chocolate & Raspberry Ripple Fluff

विजेत्या स्त्रीयांची नावे आहेतः
१) स्मिता मुंगीकर
२) अमिता फडणीस
३) मृणाल मोडक
४) अमृता कविमंधन
५) सोनल नलावडे

होली मेला

रविवार, १९ मार्च २०१७
मागील ३ वर्षांप्रमाणे याहीवर्षी मंडळाने मारवाडी मित्र मंडळ, सिंधी असोसिएशन आणि गुजराती सोसायटीबरोबर एकत्र होळी साजरी केली. आपल्या सभासदांकडून या उपक्रमाला छान प्रतिसाद लाभला. हा कार्यक्रम कोस्टा ह्रु आणि पेबल बे कॉंडो यांच्या मधील मैदान, १३४, तंजॉंग ह्रु रोड इथे संपन्न झाला. लकी ड्रॉ, वेगवेगळ्या करमणूकपर कार्यक्रमांचे थेट कार्यप्रदर्शन, बक्षिसं आणि रंगपंचमी असं सगळं काही होली मेला ह्या कार्यक्रमात समाविष्ट होतं. गेल्या वर्षीप्रमाणे Katong CC ह्या संस्थेचा देखील होली मेलामधे उत्साहपूर्ण सहभाग होता. 






गुढीपाडवा - आम्ही दोघे… आमचे नाते


रविवार, ०२ एप्रिल, २०१७
गुढीपाडवा हा नवीन कार्यकारिणीचा पहिला मोठ्या स्तरावर होणारा कार्यक्रम यशस्वी रित्या संपन्न झाला. मंडळाचे सर्वोपरिचित असलेले श्री. श्रीकांत जोशी आणि सौ. पद्मजा जोशी ह्यांच्या हस्ते गुढीपूजन झाले. गुढीपूजनाचा मान अनेक नवविवाहीत जोडप्यांनी स्वीकारला. सौ. नंदीनी नागपूरकर ह्यांनी कलात्मकरित्या कॅन्डीच्या स्वरुपात कडूलिंबाच्या पानांची चटणी केली होती. कार्यक्रमामधे 'आम्ही दोघे.. आमचे नाते' ह्या संकल्पनेवर आधारित 'फॅशन-शो' आयोजीत करण्यात आला होता. ह्याशिवाय नवीन कार्यकारिणीची ओळख, नवीन ऋतुगंध समितीची ओ़ळख करुन देण्यात आली. 

'मंथन' ह्या महिला वर्गातर्फे 'सिंगापूरी मिसळ' ही नाटुकली बायकांनी सादर केली. सौ. सोनाली नाईक ह्यांच्या दिग्दर्शनाखाली बायकांनी मिळून एक नृत्य सुद्धा सादर केले. कार्यक्रमाच्या शेवटी उखाणे घेण्याचा कार्यक्रम खूप रंगला आणि श्रीखंड पुरीच्या स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेत ह्या कार्यक्रमाची सांगता झाली. हा कार्यक्रम Alliance Française de Singapour इथे करण्यात आला. ह्या कार्यक्रमाच्या वेळी श्री विजय केंकरे दिग्दर्शीत 'तीन पायांची शर्यत' ह्या नाटकाच्या तिकीटांचा शुभारंभ करण्यात आला आणि विशेष सूट असलेल्या तिकीटांची भरपूर विक्री झाली. 


सांस्कृतिक कार्यक्रम  'Indian Cultural Fiesta'

शुक्रवार, ७ एप्रिल २०१७
सिंगापूरमधे, सन २००० मधे स्थापन झालेल्या 'लिशा' अर्थात 'लिटल इंडिया शॉपकीपर्स ऍण्ड हेरिटेज असोसियेशन' ह्या प्रतिष्ठित संस्थेने महाराष्ट्र मंडळासहीत इतर स्थानिक भारतीय मंडळांना 'लग्न' ह्या संकल्पनेवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम सादर करायला आमंत्रित केले होते.
'लिशा' ही संस्था दरवर्षी अशा प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम 'Indian Cultural Fiesta' ह्या कार्यक्रमाअंतर्गत साजरे करीत असते आणि दरवेळी मंडळाला ह्या कार्यक्रमात सहभागी होण्यास आमंत्रित केले जाते. ह्या कार्यक्रमात मंडळानेसुद्धा आपला कार्यक्रम सादर केला. हा कार्यक्रम कॅम्पबेल लेन, लिटल इंडिया, सरंगून रोड इथे संपन्न झाला. ह्या कार्यक्रमामधे मंडळाने सौ. सोनाली नाईक ह्यांच्या नृत्य-दिग्दर्शनाखाली एक नृत्य बसवले होते. तसेच, मंडळाच्या कार्यकारिणीमधील श्री. समिर कोझरेकर आणि सौ. प्राजक्ती मार्कण्डेय ह्यांनी एक छोटासा पारंपरिक लग्न-मंडप उभारुन मराठमोळी लग्नाची एक झलक सिंगापूरमधील जनतेला दाखवली.



मंडळाचे उपक्रम

१) शब्दगंध

होळीचे औचित्य साधून श्री तुषार मुळे ह्यांच्या घरी होळी विशेष शब्दगंध साजरा झाला. वेगवेगळ्या प्रविद्ध कविता आणि गाणी ह्यांचे विडंबन सादर करण्यात आले. श्री. माधव भावे, श्री. प्रद्युम्न महाजन, सौ. कल्याणी पाध्ये ह्यांच्या विडबंनपर कवितांनी कार्यक्रमाला बहार आणली. कार्यक्रमाच्या शेवटी कटाची आमटी आणि पुरणपोळी या जेवणाने मार्च महिन्यातील शब्दगंधचा समारोप करण्यात आला. एप्रिल महिन्यातील शब्दगंध श्री श्रीरंग केळकर आणि सौ. सुनिता केळकर ह्यांच्या घरी साजरा करण्यात आला. परमार्थ आणि सत्य ह्या विषयावरच्या वैविध्यपूर्ण कविता ऐकायला मिळाल्या. 



) नवीन उपक्रम - हसत खेळत मराठी: मराठी शाळा पालक माहिती सत्र

शनिवार, १५ एप्रिल २०१७
सिंगापूरमधे आपल्या छोट्या बालमित्रांसाठी मराठी शाळा असावी असे मंडळाचे एक जुने स्वप्न आणि पालकांची मागणी होती. ते स्वप्न आता पूर्ण होत आहे. दशकाहूनही अधिक काळ नियमित सुरु असलेल्या मंडळाच्या चार उपक्रमात 'मराठी शाळा' ह्या नवीन उपक्रमाची भर करताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे. आम्ही केलेल्या सर्वेक्षणात आम्हाला पालकांचा आणि शाळेसाठी शिक्षक म्हणून काम करु इच्छिणार्‍या सभासदांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आणि मराठी शाळा सुरु करण्याची योजना सुरु झाली. स्थानिक मराठी मुलांना त्यांची मातृभाषा आणि संस्कृती यांची ओळख व्हावी हा मराठी शाळा सुरु करण्यामागचा मुख्य उद्देश आहे.
पालकांच्या मनातील शंकांचे निरसन करण्यासाठी व शाळेविषयी अधिक माहिती देण्यासाठी १५ एप्रिल रोजी आम्ही 'मराठी शाळा पालक माहिती सत्र' ठेवले होते. तसेच २२ एप्रिल रोजी शिक्षक माहिती सत्र घेण्यात आले
.


३) मराठी ग्रंथालय

मराठी ग्रंथालय हा आपल्या मंडळाचा एक यशस्वी उपक्रम आहे. ३००० पेक्षा जास्त पुस्तकं असलेलं हे ग्रंथालय दर शनिवारी ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल, क्वीन्सटाउन इथे सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत वाचकांसाठी खुलं असतं. दर शनिवारी एक प्रशिक्षित स्वयंसेवक 'ग्रंथपाल' म्हणून ग्रंथालयाचे कामकाज बघतो. ग्रंथालयासाठी निरपेक्ष बुद्धीने आपला वेळ देणार्‍या स्वयंसेवकांमुळे हे ग्रंथालय अनेक वर्षांपासून नियमित सुरु आहे.

पुस्तकांची देवाणघेवाण आणि ग्रंथालयाचा इतर व्यवहार बघण्यासाठी आपण जी संगणकप्रणाली वापरतो ती शिकून घेण्यासाठी आणि ग्रंथालयामध्ये जमेल तेंव्हा स्वयंसेवक म्हणून काम करता येण्यासाठी आमच्या इच्छुक सभासदांसाठी आम्ही एक प्रशिक्षण सत्र आयोजित केले होते. मंडळाच्या कार्यकारिणीमधील श्री. सदानंद राजवाडे हे ग्रंथपाल म्हणून ह्यावर्षीचे ग्रंथालयाचे कामकाज बघत आहेत. ग्रंथालयाचे संयोजक श्री सदानंद राजवाडे व कौस्तुभ राव ह्यांनी हे प्रशिक्षण आयोजीत केले होते. त्यांनी कार्यकारिणी आणि नवीन रुजू होणार्‍या स्वयंसेवकांना ग्रंथालयाची ही प्रणाली समजावून सांगितली.

स्थळ : ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल, क्वीन्सटाउन, १ मे चीन रोड
तारीख : शनिवार २२ एप्रिल २०१७
वेळ : सकाळी ११ ते दुपारी १



) स्वरगंध: सिफास फेस्टिवल ऑफ इंडियन म्युसिक अ‍ॅन्ड डान्स २०१७

शनिवार, ८ एप्रिल २०१७
४ फेब्रवारी २०१७ रोजी संपन्न झालेला कविवर्य श्री मंगेश पाडगावकर यांच्या कविता आणि गाणी ह्यांचा श्रवणीय कार्यक्रम 'तुझे गीत गाण्यासाठी' सर्वांना खूप खूप आवडला होता. ह्या कार्यक्रमाला रसिकांनी भरभरुन दाद दिली होती. 'सिफास' च्या सांगितिक मैफलीत पुन्हा एकदा हा कार्यक्रम सादर करण्याची मंडळाला संधी मिळाली आणि पुन्हा एकदा संगीतप्रेमींनी श्री मंगेश पाडगावकर ह्यांच्या कविता आणि गाण्यांचा आनंद लुटला. हा सिफास ऑडिटोरियम, २ स्टारलाईट रोड, सिंगापूर - २१७७५५ इथे संपन्न झाला. ह्यामधे स्वरगंधचे आपले गायक आणि वादक ह्यांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमाच्या सुरवातीस गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एक मिनिटाचे मौन पाळण्यात आले तसेच कार्यक्रमाच्या शेवटी 'बोलावा विठ्ठल' ह्या अभंगाद्वारे किशोरीताईंना आदरांजली वाहण्यात आली.


आगामी उपक्रम/कार्यक्रम

१) हसत खेळत मराठी शाळा

तुम्हा सर्वांना कळवण्यास आनंद होतो आहे की शनिवार, ६ मे २०१७ पासून मराठी शाळा सुरु होत आहे. शाळा समिती स्थापन करून झाली आहे. विचारविनिमय करून अभ्यासक्रम ठरवून झाला आहे. शाळेचं पालक माहिती सत्रही झालं आहे. शिक्षकांची निवडही झाली आहे. आता वेळ आहे शाळेमध्ये मुलांना दाखल करण्याची.

'हसत खेळत मराठी' उपक्रमाचे धोरण असे आहे:

मराठी मुलांना त्यांची मातृभाषा आणि संस्कृती यांची ओळख व्हावी हा मराठी शाळा सुरु करण्यामागचा मुख्य उद्देश आहे. 
शाळेत मराठी ऐकणे, वाचणे, बोलणे शिकवले जाईल. 
मराठी संस्कृती, सण आणि उत्सव याची माहिती करून देणे ह्यावरही भर असेल. 
गोष्टी, गाणी, खेळ आणि मुलांना आवडतील असे प्रकल्प ह्या माध्यमातून मुलांना मराठी शिकवले जाईल. 
शाळा जरी मे महिन्यात सुरु होत असली तरी शाळेत प्रवेश कधीही घेता येईल.
एखादा आठवडा न येता आल्याने मुलाला पुढच्या वर्गातील अभ्यास समजण्यास अडचण होणार नाही असाच शाळेचा अभ्यासक्रम असेल. पण झालेला अभ्यासक्रम पुन्हा शिकवला जाईलच असे नाही.
मुलांनी ममंसिं वाचनालयातून दर वेळी एक मराठी पुस्तक न्यावे असे उत्तेजन आम्ही त्यांना देऊ. त्यासाठी पालकाचे अथवा मुलाचे स्वत:चे ममंसिं वाचनालय सभासदत्व असणे गरजेचे आहे.
मराठी शाळेतील मुले आजी-आजोबा, मित्र व नातेवाइकांशी मराठीत संवाद साधू शकतील. मंडळाच्या निरनिराळ्या कार्यक्रमात उत्साहाने भाग घेऊन मराठी भाषेतील प्रगती सादर करतील.
नावनोंदणीसाठी माहिती खालील प्रमाणे:

शाळेची वेळ: दर शनिवारी दुपारी १:४५ ते ४ (६ मे २०१७ पासून)
वयोगट: ५ पूर्ण ते १३ पूर्ण
स्थळ: ग्लोबल इंडियन ईंटरनॅशनल स्कूल, मराठी ग्रंथालयाचा वर्ग, क्वीन्सटाऊन, १ मे-चिन रोड, सिंगापूर - १४९२५३

प्रवेश शुल्क: १०$ वार्षिक (१ मे २०१७ ते ३१ डिसेंबर २०१७)
साधने: वही, पुस्तक, पेन्सिल अशा कोणत्याही साधनांची गरज नाही.

टीप: ११ वर्षापर्यंतच्या मुलांच्या कमीतकमी एका पालकाची व १२ पूर्ण मुलांचे स्वतःचे ममंसिं सभासदत्व असणे गरजेचे आहे.


३) श्री विजय केंकरे दिग्दर्शित त मराठी नाटक 'तीन पायांची शर्यत'

दिनांकः रविवार २१ मे २०१७
वेळः दुपारी ४ वाजता
स्थळः Khoo Auditorium, Singapore Chinese Girls School, 190 Dunearn Rd, Singapore 309437

एकाहून एक सरस नाटकं देणार्‍या 'सुयोग' संस्थेनिर्मित, श्री विजय केंकरे दिग्दर्शित, खुर्चीला खिळवून ठेवणारे रहस्यमय थरार नाटक 'तीन पायांची शर्यत' ममंसिं सिंगापूरमधे लवकरचं रंगमंचावर येत आहे. हे दोन अंकी तीन पात्री नाटक प्रत्येक प्रवेशागणिक रंगतदार होत जातं. रहस्यमय वातावरणाशी सुसंगत असं नेपथ्य, संगीत, प्रकाशयोजना, आणि प्रत्येक पात्राच्या हालचाली ह्यामुळे रंगमंचावरुन एकही क्षण प्रेक्षकांची नजर ढळत नाही. चतुरस्त्र कलाकार संजय नार्वेकर ह्यांच्या बरोबरीने शर्वरी लोहोकरे आणि लोकेश गुप्ते ह्या कलावंतांच्या भूमिका नाटकाला एका वेगळ्याच उंचीवर नेतात. न चुकवता पहावं असं हे नाविन्यपूर्ण नाटक तुमच्यासाठी प्रस्तुत करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.
गुढीपाडव्याच्या दिवशी खास सवलतीच्या दरातील तिकीट विक्रीला भरघोस प्रतिसाद दिल्याबद्दल तुम्हा नाट्यप्रेमींचे मन:पूर्वक आभार. पुढील रांगांमधील शेवटची काही तिकिटे शिल्लक आहेत आणि मधली लवकर संपत आहेत. तेव्हा मंडळी त्वरा करा आणि आजच आपल्या तिकिटांची ONLINE खरेदी करा.

तीन पायांची शर्यत
कलाकार: संजय नार्वेकर, लोकेश गुप्ते आणि शर्वरी लोहोकरे
दिग्दर्शक : विजय केंकरे
लेखक: अभिजीत गुरू ('रिचर्ड हॅरिस' यांच्या 'दी बिझनेज ऑफ मर्डर ' या नाटकावर आधारित)
पुरस्कार - म टा सन्मान २०१७ सर्वोत्कृष्ट अभिनेता (संजय नार्वेकर)


४) स्थानिक कलाकारांचे नाटक - निवडचाचणी

२१ मे २०१७ रोजी श्री विजय केंकरे दिग्दर्शित 'तीन पायांची शर्यत' ह्या नाटकाची आपण नक्कीच आतुरतेने वाट बघत असाल. तितकीच ओढ सिंगापूरमधील स्थानिक मराठी कलाकारांच्या नाट्यसोहळ्याची आपल्याला लागली असेल. अथपासून इतिपर्यंत नाटक निर्मितीची अगदी सगळी सगळी कामे आपल्यातील हौशी कलाकार सृजनशीलतेने व व्यावसायीक नाटकाच्या तोडीने करत असतात.

आम्ही नाटकाच्या तयारीला सुरुवात केली आहे. सर्वात पहिली पायरी म्हणजे दिग्दर्शक आणि सहिंता ह्यांची निवड. ह्यासाठी आम्ही दिग्दर्शकांना आवाहन केले होते. त्यासाठी आम्हाला छान प्रतिसाद मिळाला. येत्या रविवारी, ७ मे २०१७ रोजी, अभिनय तसेच बॅकस्टेज सहाय्य, संगीत, प्रकाश, नेपथ्य, वेशभूषा, रंगभूषा नाटकाच्या अशा वेगवेगळ्या कामात सहभागी होण्यासाठी मंडळाने निवडचाचणी आयोजित केली आहे. तुमच्यापैकी ज्यांना ह्या कामामधे रस आणि गती आहे त्यांनी जरुर निवडचाचणीसाठी ७ मे रोजी सकाळी ११ ते दुपारी १ ह्या वेळेत ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल (GIIS), क्वीन्सटाउन कॅम्पस, १ मे चिन रोड इथे उपस्थित रहावे.

५) आजीव सभासद सभा -  बुधवार, १० मे २०१७

बुधवार, दिनांक १० मे २०१७ रोजी आजीव सभासदांसाठी एक सभा आयोजित केली आहे.

चर्चेचे मुद्दे:
१. म म सिं २०१७ - आतापर्यंत झालेले कार्यक्रम
२. या वर्षीचे आगामी कार्यक्रम व योजना
३. इतर मुद्द्यांवर चर्चा

तारीख: बुधवार, १० मे २०१७ (वेसाक दिनाची सुट्टी)
वेळ: दु.२:०० ते ४:००
चहापान: दु ४:०० ते ४:३०
स्थळ: म मं सिं वाचनालय वर्ग, ग्लोबल इंडिअन शाळा - क्वीन्सटाऊन, १ मे चिन रोड.

आपल्या सूचना व मार्गदर्शन महत्त्वाचे आहे तेव्हा सभेला अवश्य यावे ही विनंती.

- यशवंत काकड



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा