फिरुन एकदा सिंगापूर !

साधारण तीनएक वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. आम्ही नुकतेच ऑस्टिन, टेक्सासला राहायला आलो होतो. सध्या ऑस्टिन हे अमेरिकेतील झपाट्याने वाढणारे शहर असल्याने अनेकजण अमेरिकेच्या इतर राज्यातून इथे स्थलांतर करत असतात. अश्याच एका नवं-स्थलांतरीताने आम्हाला विचारले, “तुम्ही कुठले?” आम्ही दोघेही एकदमच उद्गारलो  , “सिंगापूर ”!  आणि अचंब्याने एकमेकांकडे पहिले. “आम्ही पुणेकर” असे गर्वाने म्हणणारे आम्ही, मनाने “सिंगापूरकर ” कधी झालो? 

थोडाथोडका नाही १२ वर्ष्याचा सिंगापूरचा सहवास...पहिली नोकरी …. पहिले स्वतःचे घर … त्यातील इवलेसे पिल्लू ....माझ्या आयुष्यातील खूप काही “पहिले” सिंगापूरनेच पाहिले. ती जुळलेली नाती ..ते मैत्रीचे ऋणानुबंध...फिरून एकदा स्फुरलेल्या कविता, नाटकाची तिसरी घंटा , या जुन्या आठवणीं बद्दल पूर्वीही सिंगापूर सोडताना मी लिहिले होते. आज परत ते आठवणींचे गोठोडे सोडून बसले असताना काही वेगळ्याच, कधी हसवणाऱ्या, कधी हलकेच डोळ्याच्या कडा ओल्या करणाऱ्या आठवणी उसळून माझ्याकडे झेपावल्या. 

कुंडीतून काढून मातीत नव्याने रुजताना रोपटं जस थोडफार कोमेजते तसेच काहीसे आम्ही सिंगापूर मध्ये रुजलो. पहिल्याच आठवड्यात सिंगापूरच्या फूड कोर्ट च्या वासाने, तो पर्यंत शाकाहारी असणाऱ्या मला हैराण करून सोडले होते. त्यामुळे नोकरी हातात असताना डिपेंडेंट परमिटची वाट बघत मी अक्षरशः हॉटेलच्या खोलीत स्वतःला कोंडून घेतले होते. नवऱ्याची नोकरी सुरु झाली होती. संध्याकाळी फक्त घर शोधायला कसतरी बाहेर पडायचं! त्यात पहिल्यांदाच आमच्या एजन्ट ने दाखवलेल्या अतिशय अस्वच्छ HDB फ्ल्याटमुळे, आपण खरंच जगातील सर्वात स्वच्छ शहरात आलो आहोत का याची शंका यायला लागली होती. . नशिबाने एका दुसऱ्या एजन्ट ची ओळख होऊन, एक छानसा HDB चाच फ्लॅट मिळाला. त्यामुळे घरी स्वयंपाक सुरु करे पर्यंत फूड कोर्ट च्या वासामुळे फक्त मॅगी कप नूडल्स जिंदाबाद होते! पंधरवड्यात चार किलो वजन कमी करायचा हा जालीम उपाय पुढे वेळ आली तेंव्हा चालेनासा झाला कारण तो पर्यंत माझे नाक त्या सगळ्या वासांना चांगले सरावले होते आणि त्यामुळे सिंगापूर मला जरा चांगलेच मानवले. 

त्या हॉटेलच्या बंद खोलीतून सिंगापूरच्या अंतरंगात डोकावून पहिले ते टी. व्ही. च्या पडद्यातून! तेंव्हा “Under One Roof” नावाची मालिका लागायची. मी तर त्या अस्सल सिंगापुरी कुटुंबाच्या आणि त्यांच्या शेजाऱ्यांच्या प्रेमातच पडले. घर शोधणे उरकून धावत मालिकेची वेळ गाठायचे. म्हणायला आमच्यासाठी ती सिंगापूरची सांस्कृतिक शिकवणी होती. सिंग्लिश चा पहिला धडा गिरवला तो असा!

आम्ही सिंगापूरला आल्यानंतर महिन्याभरातच माझा आत्येभाऊ चीन हून कामासाठी आला होता. शनिवारी आम्ही “बोट्यानिकल गार्डन” बघून बाहेर पडलो. तिथून त्याला मुस्तफाला जायचे होते. आम्हाला इतकेच माहिती की मुस्तफा हे सरंगून रोड वर आहे. ना तेंव्हा स्मार्ट फोन ना काही. समोरच्या बस स्टॉप वर सरंगूनला जाणारी बस दिसली, म्हणून घाई घाईने चढलो आणि थेट सरंगून गावात जाऊन पोहोचलो. तिथे विचारले हा सरंगून रोड कुठे आहे? पहिल्यांदा एक दोघे खांदा उडवून चालू लागले. मग एका चीनी काकुंना आमची दया आली. “आलामा “ करत काकूंनी खास मँडेरिन चा जरा जास्तच प्रभाव असलेल्या सिंग्लिश मध्ये सुरवात केली. बऱ्याच मेहनती नंतर पुण्यातील सातारा रोड वर जायचे असतांना प्रत्यक्ष साताऱ्यात जाऊन पोहोचल्याचा आम्हाला साक्षात्कार झाला. आणि मग काकूंच्या मार्गदर्शनाप्रमाणे सरंगून रोड वरून मुस्तफाला जाणारी बस पकडली. ही त्या महान सरंगून रोड ची पहिली ओळख!

या सरंगून रोड बद्दलच्या एका भ्रमात मी अनेक महिने राहत होते. माझा नवरा, अगदी नाकासमोर वागणारा! त्याच्याकडे पाहून, त्याच्याशी बोलून तो कोणाची फिरकी वगैरे घेईल असे स्वप्नातही न वाटणारा! एकदा मी त्याला सहज विचारले, “हे सरंगून नाव इथे कुठून आले असेल ना?” तर अतिशय गम्भीरपणे साहेब बोलते झाले, “अग, बघ, रविवारी इथे किती बांगलादेशी मजुरांची गर्दी असते. त्यांच्या साठी काम करणारे एक “सर रंगून” म्हणून एक मूळचे रंगून चे बांगलादेशी गृहस्थ होऊन गेले. त्यांच्या वरून नाव ठेवले आहे.” लग्नाची नवीनवलाई , नवऱ्याने आपल्यापेक्षा जास्त जग पहिले आहे म्हणून जास्त विचार न करता मी विश्वास ठेवला. मग पुढे माझे बाबा आले असताना मोठ्या उत्साहात मी त्यांना सरंगून ची उत्पत्ती सांगितली. ते अतिशय संभ्रमानें म्हणाले, “अग पण रंगून बांग्लादेशात कुठे आले? ते राहिले म्यानमार मध्ये!” आणि माझी ही बत्ती पेटली. चिडून मी “अहों” कडे पहिले तर ते शांतपणे मंदस्मित करत होते. त्या दिवसापासून अहोंना प्रत्येकगोष्ट पुराव्यानीशी  साबीत करावी लागते! 

अशीच एक आठवण, आमच्या वेडेपणाची! एका व एंडला आम्ही मरिना बराज ला हिंडायला गेलो होतो. हिंडून परत बाहेर पडताना एक उंच, देखणे चिनी आजोबा आम्हाला सामोरे आले. त्यांनी आम्हाला हसून अभिवादन केले. आम्हीही त्याची परत फेड करत, पुढे चालू लागलो. आणि अचानक मागून गडबड ऐकू आली म्हणून वळून पहिले तर ते आजोबा गाडीत बसत होते आणि काही लोक त्यांची स्वाक्षरी घ्यायला धावत होते. इतक्यात ते गाडीत बसून निघूनही गेले. आणि अचानक आम्हाला त्यांची ओळख पटली. सिंगापूरचे पितामह, साक्षात ली. क्वान. यू. आमच्या समोरून चालत गेले आणि आम्ही!!!! आमच्याच करंटेपणावर चिडचिड करत घरी आलो. पण बरोबर आहे ना, राजकारण्यांबरोबर सतत मोठा लवाजमा पाहायची सवय असलेल्या आमच्या भारतीय डोळ्यांना, हा लांबून चालणारे एक दोन अंगरक्षक घेऊन आलेला आसामी कसा ओळखणार?

आमचे चिरंजीव साधारण अठरा महिन्यांचे असताना, त्यांनी खाणे अजिबात सोडले होते. आत्तापर्यंत मऊ भात, आमटीत कुस्करलेली पोळी एकदम आवडीने खाणारी स्वारी फक्त दुधावर राहू लागली. तेंव्हाच त्याचे पाळणाघरही चालू झाले. तिथल्या प्रिंसिपल मिस सोहं आणि मालक अंकल टोनी यांना मी ह्या बद्दल सांगितले. साधारण आठवड्याने अंकल टोनी मला म्हणाले, "तो तेथे एकदम छान खातो. बहुदा तुमचं भारतीय जेवण त्याला अजिबात आवडत नाही.”, आणि मग डोळे मिचकावून हळूच म्हणाले,"किंवा तुला नीट बनावता येत नाही.” मी ही हसून सोडून दिले कारण काही करून मुलगा जेवतो आहे ना! पुढे हे मुलांचे लाडके, हरहुन्नरी अंकल टोनी, नाशिक ला एका आश्रमात योगासने शिकायला गेले आणि शाकाहारी होऊन आले. मग झाली की पंचाईत! चिनी जेवणात शाकाहाराचे प्रकार कमी. मग स्वारी वळली भारतीय जेवणाकडे! मग हळूच फर्मायशी यायला लागल्या, मला पोळ्या पाठव, भाजी देशील का"? मी पण मग, "आत्ता कसं, मी बनवलेलं कसतरीच भारतीय जेवण चालेल तुम्हाला?” म्हणत मध्ये मध्ये डबा पाठवू लागले. एकदा त्यांच्यासाठी श्रीखंड पाठवले. ते त्यांना इतके आवडले की ते माझ्याकडून दह्याचा चक्का बनवून चक्क श्रीखंड बनवायला शिकले. त्यांच्या श्रीखंडाची पहिली चव मिळायची आमच्या गोडंब्याला आणि मग एक छोटासा डबा घरी यायचा. त्यांची  मजल वेगवेगळ्या फळांचं श्रीखंड बनवण्यापर्यंत गेली होती. मी दुरियन च्या श्रीखंडाच्या आफतीची वाट बघत होते. देव दयेने ती वेळ आली नाही. पण या अवलिया गृहस्थाशी स्नेह इतका जुळला की याच वर्षी चिनी नववर्षाला जेंव्हा त्यांना फोन केला तेंव्हा सगळ्यांनाच इतकं भरून आले की पहिली काही सेकंद फक्त शांततेत गेली!

एकदा माझ्याकडे माझी आजी आली होती. तेंव्हा “लिटिल नोन्या” नावाची अतिशय देखणी पेरानकान संस्कृतीवर आधारित चिनी मालिका चालू होती. ती मालिका आणि तिची नायिका आमची एकदम प्रिय! आमच्या बरोबर आजी ही ती मालिका बघायला लागली. त्यात पणजीला “चोर - चोर” म्हणायचे . ते पाहून चिरंजीव माझ्या आजीला म्हणजे त्याच्या पणजीला “चोर-चोर” म्हणायला लागले. ते पाहून आमच्या गृहसेविकेपासून सगळे आजीला “चोर-चोर” म्हणू लागले आणि आजीही खेळीमेळीमध्ये स्वतःला “चोर-चोर” म्हणू लागली. अजूनही पुण्याला गेल्यावर, तिच्या तब्येतीची चौकशी केल्यावर, ती म्हणते, “चोर-चोर बरी आहे.”

पुण्याच्या वैशालीचा कुरकुरीत पेपर डोसा खायची सवय असणाऱ्या आम्हाला, इथला मऊ मऊ डोसाई पहिल्यांदा कसतरीच वाटला. पण पुढे सिलोन रोडच्या गणपतीच्या मंदिरात दर्शनपेक्षा समोर मिळणाऱ्या डोसाईची ओढ जास्त असायची! ई, अंड्याचा वास येतो म्हणून आधी नाक मुरडलेला काया, टांगलेल्या कोंबड्या बघून चिकन राईस च्या ठेल्यापासून दूर पळूनही आता तोच बनवण्याचा मसाला, वगरे , सिंगापूर हून कामासाठी ऑस्टिन ला येण्याऱ्या सहकर्मचार्यांच्या सामानात आमच्यासाठी जागा पटवायला लागला आहे. 

आपल्याला सगळे चीनी सारखेच दिसतात. पण त्यांनाही आपण भारतीय सारखे दिसत असू हे मला सिंगापूरलाच कळले. मी आणि नवरा एकाच कंपनी मध्ये काम करत होतो. तिथे नव्याने लागल्यावर, पहिल्यांदा एका चिनी ऑन्टीला आम्ही बहीण भाऊच वाटायचो! 

अश्या अनेक छोट्या मोठ्या आठवणी. साधारण सामान्य माणसाच्या आयुष्यात जितक्या नाट्यमय असू शकतात तितक्याच. सनसनाटी वगरे नक्कीच नाहीत. पण तरी आमच्या पुरत्या मोलाच्या....जश्या मागे सुटलेल्या पाऊलखुणा. फिरून एकदा त्या पाऊलखुणांवरून चालायची मनीषा आहे. अश्या आठवणी निघाल्या की हमखास सिंगापूरला परत गेल्यावर काय काय करायचं याची उजळणी होते. सकाळी उठून मॅकरिचीच्या जंगलात चालायला जायचंय, MRT ने भटकाययचे आहे, डाउनटाऊन मधल्या उंच उंच इमारतीच्या सावलीतून चालत नदीवर फेरफटका मारायचा आहे, लाव-पसातला जाऊन साटे खायचे आहेत, इतरही आवडत्या रेस्टॉरंटची यादी आहेच, त्यात विनयागार मंदिराच्या समोरचा डोसा खाऊन मग देवदर्शन ही आहेच. संतोसा, नाईट सफारी परत ओळखू येते का बघायचं आहे, जुन्या मित्रांबरोबर गप्पांचे अड्डे टाकायचे आहेत..आणि कलत्या सावल्याबरोबर समुद्राचे विविध विभ्रम बघत शेवटी चांदण्यात लाटांचा मंद खळखळाट ऐकायचा आहे!

इथे यादी तर वाढत चालली आहे, पण मला लिहिताना लॅपटॉप चा पडदा धूसर दिसायला लागला आहे. त्यामुळे हा आठवणींचा पसारा आवरता घेत, आता फक्त वाट बघते, जगातल्या त्या सर्वोत्कृष्ठ विमानतळावरून बाहेर पडून त्या सदाबहार हिरवाईत परत एकदा हरवण्याची !!

-प्राजक्ता नरवणे


२२ टिप्पण्या:

  1. प्राजक्ता आठवणींचं चित्र फारच छान रंगवलं आहेस.
    डाॅ.शिशिर मोडक.

    उत्तर द्याहटवा
  2. वा. खूपच मस्त.
    सिंगापूर च्या आठवणी ताज्या झाल्या.

    उत्तर द्याहटवा
  3. Khup chhan varnan kele aahe. Tumachi kahi vakya khup chhan aahet.

    उत्तर द्याहटवा
  4. प्राजक्ता, वासही न आवडणे ते चिकन राईसचा मसाला सिंगापूरहून मागवणे ह्या प्रवासात बाकीही बरेच काही घडत गेले. सगळेच किती छान लिहिले आहेस. इतक्या कमी शब्दात सगळा पटच मांडला आहेस. साक्षात समोर ली क़ुअन यु ..great!

    उत्तर द्याहटवा