परीक्षकांचे मनोगत

सिंगापूरसारख्या परमुलुखात मराठी काव्यक्षेत्रात मुशाफिरी करणार्‍या सर्व सहृदय कवींचं आणि काव्यरसिकांचं तसंच स्पर्धेच्या संयोजकांचं प्रथमत: मी अभिनंदन करते.

ई-मेलनं जेव्हा २५ कविता मला धाडण्यात आल्या, तेव्हा उत्सुकतेपोटी मी त्यांचं प्राथमिक वाचन केलं. त्यावेळी एकूणच कवितांमधील आशय आणि अभिव्यक्तीचा स्तर उंच असल्याचं मला जाणवलं. कवितांच्या खाली, वर कवीचं नाव न देता क्रमांक दिल्यानं मला नाव, आडनाव, गाव, शिक्षण, लिंग, हुद्दा, पद इत्यादी पार्श्वभूमीच्या प्रभावळीशिवाय निखळ नि केवळ काव्याचंच परीक्षण करता आलं. अर्थात, कवितेतून जेवढा कवी 'दिसतो’, त्याचं 'दर्शन’ घेत मी कवितांचं मूल्यमापन केलं.

'वाक्यं रसात्मकं काव्यम्’ ह्या व्याख्येनुसार कवितेतील रसपरिपोष कसा आहे आणि त्यासाठी कवी जीवनानुभवांना शब्दबद्ध करताना शब्दांना, अन्वयार्थाला, प्रतिमासृष्टीला, प्रतिकांना, ध्वन्यार्थाला, लक्षणार्थाला कसा व्यक्त करतो, कसा भिडतो, भोगतो हे पाहणं महत्वाचं असतं. कवितेतून जाणीव-नेणिवेचा प्रवासच अभिव्यक्त होत असतो- कलात्मक पद्धतीनं. सौंदर्यपूर्ण नजाकतीनं. शब्दांपल्याडचा भाव, अध्याहृत किंवा दडलेला अर्थ-भाव यांत आंदोळणारा गाभा गवसण्याचा माझा प्रयत्न होता. अभिव्यक्त होण्याची उत्कटता नि निकडही ती कविताच वाचकाला दाखवते. ’ऋतुगंध’ मधल्या बहुसंख्य कवितांनी मला हा काव्यानंद दिला आहे.

कवितांमधील विषय, आशय, काव्यात्मकता, अनुभूतींची मौलिकता, रचना आणि अभिव्यक्तीच्या अनुषंगानं काही नोंदी, काही निरीक्षणं मी इथं नोंदवत आहे. विषयांचं वैविध्य हे ह्या स्पर्धेतील कवितांचं वैशिष्ठ्य प्रथमदर्शनीच दिसतं. प्रेम, विरह, भक्ती, देशभक्ती, कवी, पूर्वज, समाज, भ्रष्टाचार, रस्ते, संवाद, आठवणी, निसर्ग अशा काही चिरपरिचित विषयांवर जशा काही कविता आहेत, तशाच अनंत काळ, तत्वज्ञान, जीवनाची क्षणभंगुरता, निरर्थकता, विपश्यना, आभासी जगातील भ्रम, ‘कृष्णकिनार्‍या’वरील राधा अशा जगण्याचा तळ ढवळून काढणार्‍या विषयांवर अंतर्मुख करणार्‍या कविताही आहेत. सीता, द्रौपदीपासून तर सावित्रीबाई फुलेंपर्यंतचा मोठा काळपट मांडणारी ‘सावित्रीचा वसा’ ही रचना स्त्री-शिक्षणाचं महत्व सांगते. माणसातील वेगळ्या लक्षणांचा वेध घेणारी ‘वळचणीचे इंद्रधनुष्य’ ही कविता, किंवा आजच्या गतिमान व्हर्च्युअल विश्वात आभासी संचार करताना संवादाचा अतिवापर टाळण्यास सांगणाऱ्या ‘संवाद’, ‘अनावृत्त’ हया कविता आणि प्रत्यक्ष- समोरासमोरच्या संवादाची भूक असणारी ‘कुणीतरी इतकं जवळचं असावं’ ही कविता नव्या जगरहाटीचं दर्शन घडवतात. ‘कुणाची तरी वाट कुणीतरी पाहतं’ आणि ‘लाजरी मेंदी’ मधून तरल प्रेमाची उत्कटता दिसते. ‘शब्दगंध’ ही रचना ‘शब्दगंध’ ह्या काव्यवाचनाच्या मासिक कार्यक्रमाचंच

कौतुक करते तर ‘हो यशस्वी’ तरुणांच्या भरार्‍यांना शुभेच्छा देत त्यांना मूल्यांना न विसरण्याचा सल्ला देते. ‘एकदा तरी भेट’ आणि ‘हिशोब’ मधून जीवनसाथीचा विरह आणि त्याच्याविषयीची राहून गेलेली कृतज्ञता व्यक्त केलीय. भाकरीसाठी वणवण करताना प्रार्थना करायला वेळ मिळत नसल्याची अगतिकता ‘उपासना’मधून दिसते. ‘काळ’मध्ये कालचक्राचं अनंतत्व जाणण्याच्या प्रयत्नात कवीनं परमनप्रवेश केलाय. ‘माझ्या कक्षेतून मोकळा हो’ हा काळाचा मनुजाला बहुमोल सल्ला आहे. ‘तत्त्वज्ञानाची वही’त मूल्यांचा र्‍हास करणार्‍या व्यवस्थेचं विदारक दर्शन घडतं. कोलाहलातील एकाकीपण नि एकांतातील कोलाहल जाणून घेणारी ‘विपश्यना’ धर्म, श्रद्धा, जीवन इत्यादींकडे तटस्थपणे पाहते. ‘जिथे सागरा धरणी मिळते’ ही कविता अरुणा ढेरेंच्या ‘कृष्णकिनारा’तील राधेची द्वारकेच्या समुद्रकाठी श्रीकृष्णाला भेटण्यापूर्वीची अवस्था वर्णन करते. त्यातील संसारी प्रौढ राधेचं साधंसंच प्रसाधन करणंही खूप सूचकपणे मांडलंय. अर्थात ही ‘स-संदर्भ’ रचना आहे.

काव्याचा विशिष्ट कलात्मक नाद ज्यांना साद घालतो, अशा काही रचना, काही भावकविता त्यांच्या पारंपरिक वळणामुळे स्मरणरंजन घडवणार्‍या आहेत. वृत्त-छंदातील, यमकांचे गमक सापडलेल्या, विडंबनात्मक, विशिष्ट रचनांमध्ये कवितेची बांधणी करण्याचा प्रयत्न करणार्‍या काही मोजक्या कविताही आहेत. त्या त्या कवीवर आजवर झालेल्या काव्यसंस्काराचीच ती परिणती होय. हल्लीच्या मुक्तछंदाच्या जमान्यात छंदोबद्ध कवितांचा ताल आणि ते ऐकणारा ‘कान’ मिळणं विरळाच! कालौघात दुर्मिळ होऊ घातलेल्या, मात्रा-वृत्ताची वृत्ती असलेल्या कवितांचं अप्रूप वाटलं. ‘उचललेस तू मीठ मूठभर, साम्राज्याचा खचला पाया’ ह्या ग. दि. माडगूळकरांच्या कवितेची आठवण करून देणारी ‘ते मीठ खारे नव्हते’ ही कविता. देशभक्ती आणि इंग्लिश जुलुमशाहीचा धिक्कार करत महात्म्याच्या अहिंसेची ताकद प्रभावीपणे मांडते. त्यातील ‘खार्‍या जखमा’ व्याकूळ करतात. ‘मीठास मिठास मोठी’ ह्या अनुप्रासातून विरोधाभासाचीही गंमत येते. ‘वळचणीचे इंद्रधनुष्य’ हे तर १४ ओळींचं सुनीत त्यातील विलक्षण विषयाबरोबरच गोळीबंद रचनासौष्ठवानं लक्षवेधी ठरलं. ‘गर्जा जयजयकार रस्त्यांचा’ हे विडंबन ‘गर्जा जयजयकार क्रांतिचा’ ह्या कवी कुसुमाग्रजांच्या कवितेवर बेतलेलं आहे. पुण्यातल्या रस्त्यांवर जे शालजोडीतले हाणलेत, जो उपहास केलाय, त्यातून कवीची विनोदबुद्धी दिसते. स्वत:वर विनोद करण्याची खिलाडूवृत्तीही त्यात आहे. ‘घ्या झेलून प्रहार’, ‘हृदयातिल खंत’ हे शब्द तसेच ठेवून विसंगतीवर नेमकं बोट ठेवलंय. बालकवी, गदिमा, कुसुमाग्रज, अरुणा ढेरे इत्यादी कवींचं काव्यऋण यानिमित्तानं व्यक्त होतं. ‘तू’ ही भक्तीपर रचनाही छंदावर पकड असणारी उत्कट कविता आहे. "घुसमटे बघ प्राण माझा, देह झाला पिंजरा...जीव नाही जीवनाला, चेतनेला ओत रे" ह्या ओळी भक्ताची देहाच्या पिंजर्‍यातली घुसमट व आर्तता अधोरेखित करतात. अर्थात काही कवितांमध्ये काही ठिकाणी मात्रा-वृत्त-यतीभंग झालेला आहे. तरीही काव्यातील प्रांजळपणा आणि स्वागतशील वृत्तीनं त्यातील विचार पाहणंही महत्वाचं असतं.

‘मृत्युंजय’, ‘आठवांचा पाऊस’, ‘गणपती’ या कविता मीटरमध्ये लिहिण्याचा प्रयत्न केलाय. ‘उपासना’, ‘कुणाची तरी कुणीतरी वाट पाहतं’, ‘समाज’, ‘गोधडी’, ‘संवाद’ ह्या आणि अन्य बहुतांश रचना सयमक मुक्तछंदात असल्यानं लयदार उमटल्यात. आधी म्हटल्याप्रमाणे एकूणच ह्या २५ कवितांमधून शब्दसृष्टीच्या ईश्वर असणार्‍या सगळ्याच कवींनी आपल्या अभिव्यक्तीचा अवकाश शोधलेला आहे. त्यात अनेक परिमिती आहेत.

‘ऋतुगंध’ चा हा काव्य-परिमळ मला अतिशय सुखावून गेला. त्याची ही गंधवार्ता बारमाही फुलणार्‍य़ा फुलांसारखी सातत्यानं फुलत राहो आणि कवी आरती प्रभूंच्या ‘गंध गेला राना-वना...’ प्रमाणे जगभर सर्वत्र दरवळो, ही शुभेच्छा.
- आश्लेषा महाजन
मंजिरी’, २३० चित्ररेखा सोसायटी,
कै. वि. . खांडेकर शाळेमागे
सहकारनगर-, पुणे ४११००९
(महाराष्ट्र)
घरचा फोन: ०२० २४२२७१८५
मोब. ९८६०३८७१२३
ashleshamahajan@rediffmail.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा