फूड कोर्ट

घराजवळील फूड कोर्ट मागील पाच-सहा महिने बंद होते रिनोवेशनच्या नावाखाली. दोन -तीनदा चकरा मारल्या तर अमूक एका तारखेला सुरु होणार अशा सूचना आणि काही जाहिराती दिसायच्या. दोनच दिवसांपूर्वी त्या बाजूला खूप गर्दी दिसली म्हणून सहज डोकावले आणि वासावरूनच ओळखले फूड कोर्ट सुरु झाले. उत्साहाने हातातील खरेदी बाजूला ठेऊन आधी तिकडे गेले. बघते तर काय तिथे एक नवं कोरं चकचकीत कुठल्याही हॉटेलला लाजवेल असं फूड कोर्ट उभं होतं.

खरं तर हे नवं रूप कुणालाही आवडेल आणि पोटातील भूक चाळवली जाईल असंच होते. पण माझा आनंद मात्र क्षणभंगूर ठरला कारण नवीन बदल होताना जुन्या खुणा पार पुसून गेल्या होत्या. फूड कोर्ट इथल्या लोकांच्या संस्कृतीचाच नाही तर रोजच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. सकाळच्या न्याहारी पासून ते संध्याकाळच्या जेवणापर्यंत वर्षातील सर्व दिवस (एखाद -दुसरी सुट्टी सोडून) तुम्ही विनातक्रार त्यावर अवलंबून राहू शकता. त्यामुळे माझ्यासारख्या स्वयंपाकाचा कंटाळा पण खायची आवड असणाऱ्या लोकांसाठी ती एक पर्वणीच ठरते. अगदी दररोज नाही पण आठवड्यात एक -दोन चकरा तर होतातच.

सकाळच्या न्याहारीसाठी काया टोस्ट (Kaya toast), अर्धवट उकडलेली अंडी आणि त्याबरोबर ते सी (Teh C), ते तारी (Teh tarik) हे चहाचे प्रकार किंवा कॉफी प्रेमींसाठी कोपी ओ (Kopi O), येथील स्थानिक कॉफी. त्याच बरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या तांदळाच्या किंवा गव्हापासून बनवलेल्या नूडल्स बरोबर प्रॉन्स, अंडी किंवा फिश, जसे चार क्वेत्याव (Char Kway teow), हॉकीन मी (Hokkien mee) असे पारंपरिक पदार्थ मिळतात. 

दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी येथे भरपूर पर्याय उपलब्ध असतात. येथील सर्वात प्रसिद्ध डिश हायनानीज चिकन राईस (Hainanese Chiken Rice) चिकन स्टॉकमध्ये शिजवलेला भात, उकडलेले किंवा भाजलेले चिकन त्याबरोबर सोया सॉस, चिली पेस्ट किंवा सॉस. कॅंटॉन्ग लकसा (Katong Laksa) ही अशीच एक प्रसिद्ध डिश. नारळाचे दूध, चिकन स्टॉक, मिरची पेस्ट, फिश सॉस, प्रॉन्स घालून केलेल्या ह्या नूडल्स अतिशय स्वादिष्ट लागतात. भरपूर तेल लावून मैद्याच्या रोटित अंडी, चीज घालून केलेला रोटी प्राटा (Roti Prata) आणि त्याबरोबर झणझणीत चिकन रस्सा ही रुचकर लागतो. याशिवाय सूपचेही भरपूर प्रकार इथे मिळतात जसे बान मियान सूप (Ban Mian), फिश सूप, बीफ नूडल्स सूप. 

सिंगापूर पाककृतींवर मुख्यत्वे चायनीज, पेरंनाकन, मलेशियन, इंडोनेशियन, भारतीय प्रभाव दिसून येतो. त्यामुळे इथे वेगवेगळ्या प्रांतातले पदार्थ भरपूर मिळतात जसे कोरियन, जापनीज, थाय, व्हिएतनामीज आणि वेस्टर्न. जेवणानंतर हमखास खायचा पदार्थ म्हणजे आइस कचांग (Ice Kachang), एका बाउलमध्ये किसलेला बर्फ आणि त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे सिरप, जेली, कोकोनट मिल्क, कन्डेन्स मिल्क घालून केलेला डेसर्टचा स्थानिक प्रकार बर्फ गोळ्याची आठवण करून देतो. 

किसलेला टर्नीप, काकडी, शेंगदाण्याचा कूट, स्वीट सोया सॉस घालून केलेला पोपिया रोल (Popiah roll) असो किंवा चवीत उकडीच्या मोदकांशी साम्य असलेला, तांदळाची शिजवलेली पिठी आणि त्यात नारळ किंवा शेंगदाण्याचा कूट, गूळ घालून केलेला टू टू कुहे (Tu Tu Kueh) सारखा अतिशय रुचकर पदार्थ असो खवय्यांसाठी मेजवानीच असते.

बदल मानवी आयुष्याचा अपरिहार्य भाग आहे. पण नवीन बदल होताना जुन्याचं अस्तित्व पूर्णपणे नाहीसं करणं कितीसं बरोबर आहे? जुनं आणि नवीन याचा ताळमेळ घालूनही बदल करता येतोच की. नाविन्याच्या आसेपोटी आपण कधी कधी संस्कृतीलाही धक्का लावतो. तसं पाहिलं तर, नवीन फूड कोर्ट मध्ये खाद्य पदार्थांचे स्टॉल्स वाढले होते. जमिनीवरील फरशांपासून ते छतावरील दिव्यांपर्यंत सर्व काही बदललं होते. साधी टेबल खुर्च्यांची मांडणी जाऊन त्या जागी आटोपशीर डिझायनर टेबले खुर्च्या आल्या होत्या. जिथे भिंती रिकाम्या होत्या तिथे मोठं मोठाले आरसे, पेन्टिंग्स आणि काही कलात्मक वस्तू लावून त्यातून संस्कृती दाखवण्याचा अट्टहास दिसत होता. हे न्याहाळत मी पुढे गेले तर कशाला तरी धडकून अडखळले. बघितले तर, एक जुनी स्कूटर! काही धान्याची पोती, फळं आणि भाज्या भरून ठेवलेल्या टोपल्या असं सगळं व्यवस्थित मांडून ठेवलं होतं. हा इंटिरियरचा एक भाग झाला तरी संस्कृतीचा होतं नव्हता. नाही म्हणायला माझ्या आवडीच्या पदार्थांचे स्टॉल्स होते पण त्यातले ओळखीचे चेहरे मात्र दिसत नव्हते. कधीही गेले तरी आपुलकीने विचारणारे, भाषेची कुठलीही अडचण न येता, हातवारे करत संवाद साधणारे. आवडी प्रमाणे सूप, नूडल्स, भात -भाज्या करून देणारे आणि नकळत आपल्या वागण्या बोलण्यातून संस्कृती जपणारे.

गर्दीतून वाट काढत पुढे गेले. तिथं काम करणाऱ्या लोकांची संख्याही वाढली होती. नेहेमीची थरथरत्या हातानं टेबलं पुसणारी, जड पावलांनी रिकाम्या डिश, बाउल्स, ट्रे च्या ट्रॉल्या ढकलणारी आजी-आजोबांच्या वयाची माणसं जाऊन तरुण, टापटीप गणवेशातील मुलं पटापट कामं उरकत होती. हा बदल आवडला तरी त्या लोकांची उदरनिर्वाहाची काय सोय झाली असेल या विचाराने मन खिन्न झालं. विचार करत करतच जेवायला सुरुवात केली आणि पहिल्या घासातच मन तृप्त झालं. कारण या सर्व बदलात जिभेवर रेंगाळणारी चव मात्र तीच होती.

फोटो सौजन्य : इंटरनेट

- अनिता पांडकर










कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा