ऋणानुबंध नात्याचे, माझे, आईबाबांचे !

आता कशी सांगू आईबाबांची महती ।।
त्यांच्याशिवाय या जगाची कशी झाली असती प्रचिती।।१।।

तळहाताच्या या फोडापरीस नाजूक जपले।।
पिल्लांच्या काळजीपोटी आयुष्यच खर्ची पडले।।२।।

आईवडिलांची माया जशी निखळ शुभ्र पारदर्शी ।।
कोठे पाहावयास मिळेल का निःस्वार्थी भावना ही अशी।।३।।

नको धरू वाममार्ग, मोह, मत्सर नको ते खोटेपण ।।
प्रामाणिकपणा अंगी रूजवा हीच आईबाबांची शिकवण।।४।।

प्रयत्नांची सोडू नको पाठ, न कधी जाऊ दिले आम्हास खचून।।
हार-जितीच्या खेळात पाठीशी नेहमीच राहिले ताठ मानेने हात धरून।।५।।

स्वप्नांचा त्याग करीत पिल्लांसाठी, स्वतःचे अस्तित्व जगायचे राहूनच गेले।।
सुखदुःखाचे विश्व त्यांचे मुलांभोवतीच घेरले।।६।।

मातीच्या गोळ्यास जसा आकार देई कुंभार ।।
तान्ह्या जीवास घडविता, पालक मुलांवर तसेच करती संस्कार।।७।।

मोठेपणी सुजाण पालक होऊन सांभाळा, नका देऊ म्हातारपणी त्यांच्या डोळा पाणी।।
आई-वडील हाच अमूल्य ठेवा, जतन करा हे सांगे अमृतवाणी।।८।।

- अमृता महेश कुलकर्णी


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा