पाठवणी

आगळेच हे भय, आई.. निराळीच भीती,
अंतरंगी आज अनामिक कसले हे काहूर उठी.

तुमच्या हृदयावर राज्य करते तुमची शूरवीर बेटी,
कातरले पण आज मन माझे भावनांच्या पोटी.

मिटलेल्या नयनांसमोर मी सखींना आणू पाही,
न कळे आज 'त्यांचाच' चेहरा का उभा राही?

उच्चारता 'त्यांचे' नाव, गाली गुलाबपुष्पे फुलली,
बेचैन झाला जीव, नकळत स्पंदनेही वाढली.

सासरला मी निघाले, झाले स्वजनी परकी,
स्वघर झाले दूर, मिळाली त्या घरची मालकी.

अल्लड अवखळ तरूणी होईन सुकुशल गृहिणी,
नाजूक हे रोपटे आता रुजेल त्यांच्या अंगणी.

जतन करुनी संस्कार मी जिंकिन त्यांचे मन,
वाटेल तुला अभिमान, आई, देते तुज वचन. 

ही काशी, ते रामेश्वर, दोन्ही मज स्वर्ग, 
माझ्या नशिबाचा आज मलाच वाटे गर्व. 

तुझ्या भेटीसाठी वाट वाकडी करुन येईन,
तुझी मुर्त माझ्या हृदयी निरंतर राखीन. 

एक नयन हसरे माझे, दुसऱ्या नयनी जलधारा,
असहाय्य किती हे निरोप घेणे, परि त्या घरचा ओढा. 

पाठवणी करताना माझी, वचन मला देशील का?
या घरच्या कणाकणातील अस्तित्व माझे जपशील का?


- सौ. सोनाली पाटील


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा