“फिटनेस” मनाचा

“फिटनेस” याचा मराठी प्रतिशब्द ‘आरोग्य’, पण आपल्याला ‘फिटनेस’ शब्द जास्त परिचयाचा आहे. फिट म्हटले की बांधेसूद शरीर असलेली व्यक्ती डोळ्यासमोर येते. आपल्या शारीरिक आरोग्यासाठी fashion म्हणून किंवा खरंच आपल्याला त्याचे महत्व पटले असेल तर भारतीय ऋषीमुनींनी आपल्याकरिता अभ्यास, प्रयोग करून उपलब्ध करून ठेवलेल्या आयुर्वेदाचा, हठयोगाचा अवलंब करतो. त्या योगसाधनेतील प्राणायामाचा अभ्यास मनाचे आरोग्य सांभाळण्याच्या, मन शांत करण्याच्या कामी येतं.

हात, पाय, डोळे, नाक, कान, जीभ अशी बाह्य ज्ञानेंद्रिये स्थूल शरीर हे hardware अशी कल्पना केली तर ज्ञानेंद्रियांपासून संदेश ग्रहण करणारे मन, त्यावर निर्णय घेणारी बुद्धी आणि तो निर्णय परत कर्मेंद्रियांना पोहोचविणारे मन, आपल्या आपल्या निर्णयाला घट्ट धरून ठेवणारे चित्त आणि ‘मी’ नामक अहंकार ह्या सर्वांच्या सूक्ष्म शरीराला software म्हणता येईल. Hardware कार्यक्षम असेल आणि software updated आणि virus free असेल तर आपण सुखाने ‘fit’ जीवन जगू शकतो. यापैकी software update करणे म्हणजे फिटनेस वाढविणे आणि virus free राखणे म्हणजे आरोग्य सांभाळणे आहे. पण हे दोन्ही जड आहेत आणि सुखी किंवा दु:खी, खिन्न, उदास होतो तो त्यांच्यापेक्षा वेगळा असणारा जीव आहे.

पण आणखी एक गोष्ट इथे मानली आहे जी आपले वेगळे असे व्यक्तिमत्त्व दाखवते ती म्हणजे ‘वासना’. याला गुण असेही म्हणतात. सत्त्व, रज, तम असे तीन गुण शास्त्र सांगतं. गुणानुसार ब्राह्मण, क्षत्रीय, वैश्य, शूद्र या ‘वृत्ती’ बनतात. (जाती नव्हे). जातीचा ब्राह्मण सैन्यात जातो, व्यापार करु शकतो आणि जातीने शूद्र प्रोफ़ेसर होऊन ज्ञानदान करु शकतो. या सर्व शब्दांचे पारमार्थिक अर्थ वेगळे आहेत हे ध्यानात घ्यावे. ज्यापासून कामना, लोभ, तृष्णा, आसक्ती या निर्माण होतात. बुद्धीचे निर्णय कळत नकळत आपल्या मूलभूत वासनांनुसार होत असतात.

अधिकाधिक सुखाच्या हव्यासापोटी या दोन शरीरांना आपण त्यांच्या क्षमतेपेक्षा जेव्हा जास्त राबवतो तेव्हा आपण कष्टी होतो आणि हवे ते प्राप्त झाले नाही की उद्विग्न होतो, क्रोधाने अशांत होतो तेव्हा आरोग्य बिघडते. उपभोग्य विषयांचे ध्यान करण्याने आसक्ती, आसक्तीपासून कामना, त्या पूर्ण झाल्या नाहीत तर क्रोध आणि त्यामुळे अशांती अशी ही उतरंड आहे असे गीता म्हणते. भारतीय तत्त्वज्ञानाचा याकरिता कसा उपयोग होऊ शकतो यासंबंधीचा एक दृष्टीकोन इथे मांडतो.

पण ‘फिटनेस’ चा अनुभव आपल्याला कुठे येतो? आपल्या अंत:करणात. हे अंत:करण म्हणजे काय? आणि अनुभव येतो म्हणजे काय? आपण आपल्या स्थूल आणि सूक्ष्म देहाकडे शरीरशास्त्राच्या किंवा आधुनिक मानसशास्त्राच्या दृष्टीने नव्हे तर आपल्या वैदिक ऋषींनी त्याचा जसा विचार केला त्या दृष्टीकोनातून पाहू. आयुर्वेद हा उपवेद आहे आणि आणि चरक संहिता आरोग्याची व्याख्या अशी करते.

“समदोष: समाग्निश्च समधातुमलक्रिया: प्रसन्नात्मेन्द्रियमना: स्वस्थ इत्यभिधीयते” – (अध्याय १.४१).

यातील ‘स्वस्थ’ आणि ‘प्रसन्नात्मेन्द्रियमना:’ या दोन गोष्टींचा विचार मनाच्या फिटनेसच्या संदर्भात केला पाहिजे. गीता याला ‘मन:प्रसाद’ म्हणते. ‘प्रसादे सर्व दु:खानाम् हानिरस्योपजायते’ मन प्रसन्न झाले की दु:खे नष्ट होतात. म्हणजे बाह्य परिस्थिती तीच राहिली तरी अंतरी आपण स्वस्थ राहतो. स्वस्थ म्हणजे स्व च्या ठिकाणी स्थित. देहाचे प्राकृतिक संतुलन आणि बाह्य विश्वाशी त्याचा संबंध योग्य असा असणे. या स्वस्थतेचा अनुभव कुठे येतो? आपण स्वस्थ आहोत याला प्रमाण काय? तर ‘प्रसन्नात्मेन्द्रियमना:’ मनाची प्रसन्नता असणे. रागद्वेष वियुक्त असणे हा प्रसन्नतेचा उपाय गीतेमध्ये सांगितला आहे.

‘मन’ किंवा अंत:करण हे प्रत्यक्ष दाखवता येत नसले तरी आपल्याला मन आहे हे आपले आपण जाणतो. आपले मन प्रसन्न आहे की नाही हे ही आपण सांगू शकतो. म्हणजे मन आणि ते प्रसन्न आहे याचा अनुभव घेणारा ‘मी’ हे दोन वेगळे आहेत. त्या ‘मी’ ला शास्त्रीय परिभाषेत ‘जीवात्मा’ म्हणतात. शास्त्राने खरे तर आत्मा ‘अमन’ म्हणजे त्याला मन नाही असं सांगितलं आहे. मग मन असलेला हा जीवात्मा कोण? शास्त्राने सृष्टी त्रिगुणात्मक सांगितली आहे आणि ती उत्पन्न करणारा ईश्वर आणि आपला आत्मा देखील गुणातीत आहे. अर्जुनालाही भगवान गुणत्रयातीत हो असे सांगतात. पण युद्धाच्या प्रसंगी तमोगुणाचा योग्य तो वापर केल्याशिवाय युद्ध करु शकणार नाही हे ही खरे.

अंत:करणाची सत्त्वगुण व तेजतत्त्वाची ‘बुद्धी + आत्मा आणि त्यात आत्म्याचे प्रतिबिंब’ या तिघांना मिळून जीव असे म्हणतात. स्वच्छ काचेचा गोळा विजेरीच्या प्रकाशाने जसा प्रकाशित होतो, पण तो प्रकाश त्या गोळ्यामध्ये अडकत नाही, तसे अंत:करण आत्मप्रकाशाने प्रकाशित झाले असले तरी आत्मा त्यात अडकत नाही. तो स्वतंत्रच असतो. ही शास्त्राने समजुतीच्या सोयी करिता केलेली संकल्पना आहे. ती ग्राह्य धरून बऱ्याच गोष्टींचे स्पष्ट आकलन होऊ शकते. त्यातील मन, बुद्धी अंश वस्तुत: जड आहेत आणि आत्मा चेतन आहे.

आत्म्याच्या चेतनत्वावर ती कार्य करते. ह्या चेतन आणि जड तत्त्वाचा एकमेकांवर झालेला अध्यास म्हणजे जीव. मन-बुद्धी झोपेमध्ये अथावा मूर्च्छेमधे निष्क्रिय असले तरी जीवात्मा असतो यावरून त्यांचे वेगळे पण शास्त्र सिद्ध करते. स्थूल, सूक्ष्म देह हे क्षेत्र आणि त्यांचा जाणता जीवात्मा क्षेत्रज्ञ असे गीता सांगते. हे दोन वेगळेपणे अनुभवणे याला ‘ज्ञानयोग’ म्हणतात. हे जो आतमध्ये जाणतो त्याचे समता:करण मग देहाच्या सुखदु:खाने विक्षिप्त होत नाही. (सुखदु:खे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ |) गीतेचा अभ्यास आपण केला तर आपल्याला मनाचे आरोग्य कळेल.

आरोग्यपूर्णतेचा अनुभव ज्याला येतो तो त्या ‘अनारोग्या’ पासून वेगळा असला पाहिजे. सामान्यत: ‘मन’ म्हणजे अंत:करण. करण म्हणजे ‘इंद्रिय’ अंत:करण म्हणजे आतले इंद्रिय. हे त्याच्या कार्यानुरुप मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार असे चार प्रकारचे मानले जाते. संकल्प-विकल्प करणारे ते मन, आपल्या बाह्य ज्ञानेंद्रियांकडून माहिती गोळा करून बुद्धीला निर्णय करण्यास सांगणारे ते मन. मनाने दिलेल्या माहितीवरुन् निष्कर्ष काढणारी, निश्चय करणारी ती ‘बुद्धी’. बुद्धीने केलेल्या निर्णयाप्रमाणे कर्मेंद्रियांना कार्यरत करणारे ते मन.

मन असे दुहेरी कार्य करते आणि बाहेरील ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये आणि बुद्धी यांना जोडणारे ते मन. शरीर हा एक रथ मानला तर मार्ग म्हणजे विविध विषय, घोडे म्हणजे इंद्रिये आणि मन म्हणजे बुद्धी नामक सारथ्याच्या हाती असलेला लगाम. रथामधे बसलेला स्वामी म्हणजे जीवात्मा. हा रथ व्यवस्थित चालायचा असेल तर लगाम सुस्थितीत असला पाहिजे तरच तो खट्याळ घोडयांना आवरु शकेल.

बुद्धीने घेतलेला निर्णय घट्ट धरून ठेवणारे चित्त आणि या सर्वांना पाठबळ असते ते अहंकाराचे. अहंकाराच्या मैदानावर चाललेला मन, बुद्धी व चित्ताचा हा सर्व खेळ पाहणारा साक्षी तो जीवात्मा. मग प्रसन्नतेचा अनुभव कुठे येतो? हा खेळ खळबळ रहित, शांतपणे व व्यवस्थितपणे चाललेला असला म्हणजे अंत:करण प्रसन्न राहते. प्रसन्न म्हणजे अनुकूल परिस्थिती मुळे ‘excited’ अंत:करण नव्हे. जर तसे असते, तर जिथे अशी ‘excitement’ नसते ती झोप आपल्याला कधीच आवडली नसती आणि ती येण्यासाठी आपण खटाटोप केला नसता.

‘मना’चे स्वास्थ्य म्हणजे आपल्या या सर्व आंतर इंद्रियांची कार्यक्षमता. शास्त्र सांगते, की पाप पुण्य साधारण समसमान झाले की मनुष्य योनी प्राप्त होते. तसेच पाप आणि पुण्य यांची फळे भोगण्यासाठी आपल्याला देह आणि सभोवतालची परिस्थिती ही मिळाली आहे. या योनीमध्ये पाठीचा कणा सरळ आहे आणि ‘आहार निद्रा भय मैथुन’ या पशु योनीमध्ये उपलब्ध असलेल्या चार गोष्टींपेक्षा बुद्धी अधिक मिळाली आहे. पशुयोनीमध्ये केवळ पूर्व कर्मांचा भोग आहे पण मानव योनी मध्ये फलभोग आणि नवीन पुरुषार्थ करणे शक्य आहे. पशु योनीपेक्षा ‘कर्तुं अकर्तुम् अन्यथा कर्तुम्’ असे कर्मस्वातंत्र्य ईश्वराने बहाल केले आहे.

अर्थात पूर्वकर्माप्रमाणे सुख दु:खांचे भोग भोगण्यासाठी भोवतीची परिस्थितीही निर्माण केली आहे. परंतु सुखप्राप्ती आणि दु:ख टाळण्याचे स्वातंत्र्य काही प्रमाणात आपल्याला दिले आहे. पशुयोनी परतंत्र आहेत आणि नैसर्गिक प्रेरणानुसार त्यांचे जीवन चाललेले असते. मनुष्यमात्र नैसर्गिक प्रेरणांना न जुमानता विषयसुखांचा हव्यास बाळगून मनाचे आणि शरीराचे आरोग्य बिघडवतो. तेव्हा निसर्गनियमांच्या बाहेर विषयांचा हव्यास न ठेवणे हे मनस्वास्थ्य सांभाळण्याचे पहिले सूत्र आहे. भारतीय तत्त्वज्ञानाने जीवन पद्धती धर्म-अर्थ-काम-मोक्ष यांना बंदिस्त ठेवण्याची व्यवस्था केली आहे. अर्थ आणि काम हे धर्माने साध्य करावेत आणि ते अंतिम साध्य नसून मोक्ष हा जो परमपुरुषार्थ आहे त्याकडे दृष्टी ठेवून मिळविले आणि उपभोगले तर शरीराच्या संतुलनाबरोबर जीवनाचे ‘संतुलन’ राखले जाईल.

शारीरिक कष्टांनी आपल्याला दु:ख होतेच असे नाही. आपल्या समाधानासाठी, तर कधी दुसऱ्यांचे हित व्हावे या उदात्त हेतूने आपण आनंदाने कष्ट सोसतो. महाभय जो मृत्यू तो देखील आपल्या मनानेच ठरविलेल्या एखाद्या उच्च ध्येयासाठी एखादा सुखाने कवटाळतो. असे स्वातंत्र्य आपल्याला असताना आपल्या अंत:करणाची ‘प्रसन्नता’ सांभाळणे आपल्या हातात नाही का? सुखाचा किंवा दु:खाचा अनुभव येणे आपल्या स्वाधीन नाही, पण प्रारब्धानुसार देहावर सुखदु:खाचे आघात झाले तरी अंत:करणात सुखी-दु:खी होणे हे विचार केला तर आपल्या हातात आहे. जेव्हा आपल्या हाताबाहेर परिस्थिती जाते तेव्हा इतरांचा, शास्त्रांचा, संतांचा किंवा मानसोपचार तज्ञांचा सल्ला घेण्याची उपलब्धीदेखील त्या ईश्वरानेच केली आहे. तेही हाच विचार आपल्याला देतात.

मनाचे स्वास्थ्य सांभाळण्याची एक युक्ती आत्मा आणि मन यांच्या काल्पनिक संवादाने शंकराचार्यांनी आपल्या उपदेशसाहस्री ग्रंथात सांगितली आहे. आत्मा मनाला म्हणतो मला सुख प्राप्त व्हावे म्हणून तू इतकी धडपड कशाला करतोस. मी मूळचाच सुखरुप आहे. तेव्हा तू शांत राहा. मग सुखासाठी धडपड कोणाकरिता? तर आभासिक ‘जीव’ जो आपल्याला आपल्या आत्मस्वरूपापासून वेगळा समजतो त्याच्याकरिता.

गाढ झोपे मध्ये जेव्हा मन-बुद्धी-चित्त-अहंकार शांत होतात तेव्हा आपल्याला सुखाचा अनुभव येतो. ‘स्वस्थ’ वाटते कारण त्या वेळी सर्व जीवात्मे आपल्या स्वरुपाच्या ठिकाणी लीन होतात. गाढ झोपेमधले सुख सर्व स्थळ-काळात सर्व व्यक्ती यांच्या ठिकाणी सारखेच आहे. रस्त्यावर झोपलेला आणि वातुनुकूल अलिशान महालात झोपलेल्याला गाढ झोप जर लागली तर त्यात होणारे सुख यांचा दर्जा एकच असतो. कारण गाढ झोपे मध्ये राजा राजा राहात नाही, भिकारी भिकारी राहात नाही. सर्व पशु पक्षी एकाच सुखाचा अनुभव घेतात. पण मग जाग येऊन सुखदु:खाचे अनुभव का येतात? तर ते प्रारब्धामुळे.

प्रारब्ध ही संकल्पना मान्य केली तर आयुष्य बऱ्याच प्रमाणात सुखावह होईल. शास्त्र प्रारब्धाचे तीन प्रकार सांगते. स्वेच्छा प्रारब्ध, परेच्छा प्रारब्ध आणि अनिच्छा (ईश्वरेच्छा किवा कर्मफळ) प्रारब्ध. आपल्या परिचयाच्या लग्न समारंभातील ‘बुफ़े’ या भोजनपद्धतीच्या उदाहरणाने हे सहज समजून घेता येईल. चविष्ट पदार्थ मुबलक प्रमाणात समोर आहेत, किती खावे यावर कोणाचे बंधन नाही. पण आपण किती खावे म्हणजे नंतर त्रास होणार नाही हे आपल्या हातात आहे. हे स्वेच्छा प्रारब्ध. यजमानांच्या किंवा मित्रांच्या आग्रहाखातर जास्त खाणे किवा एक-दोन पेग अधिक घेणे आणि मग त्रास सहन करावा लागणे हे परेच्छा प्रारब्ध. हे दोन्ही त्रास टाळणे आपल्या हाती आहे. पण एखाद्या ठिकाणी खाण्यामुळे विषबाधा होणे हे आपल्या हाती नाही . हे अनिच्छा प्रारब्ध. मग ६७% प्रारब्ध आणि आपले स्वास्थ्य आपल्या हातात आहे की नाही?

अशा प्रकारे मनाचे स्वास्थ्य योग्य विचारसरणीवर अवलंबून आहे. मनच सुखदु:खाचे इतकेच नव्हे तर आपल्या जन्ममरणाचे कारण आहे. ‘मन एव मनुष्याणां कारणं बंध मोक्षयो: |’ या अमृतबिंदु उपनिषदातील श्रुतीचे सोपे रूपांतर ‘मन करा रे प्रसन्न | सर्व सिद्धींचे कारण’ असे संत तुकाराम महाराज करतात. खरे तर आपल्या आनंदस्वरुपापासून ढळून जीवदशेला येण्याचे कारण ‘मन’ आहे असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ‘वाया मन हे नाव | येर्हवी कल्पनाचि सावेव | जया संगे जीव-| दशा वस्तु ||’. तर या ‘मनाचेनि संगति | जन्म घेतले पुनरावृत्ती’ असे संत रामदास सांगतात. गुरु वसिष्ठ श्रीरामाला सुखप्राप्ती साठी ‘मनोनाशा’चा उपाय सांगतात. मनोनाश म्हणजे अनावश्यक संकल्प-विकल्प बंद करणे. पातंजलयोग चंचल मन स्थिर करण्यासाठी प्राणायाम इत्यादी उपाय सांगतो. पातंजल योगशास्त्र हे ‘चित्तवृत्तिनिरोधा’चे मानसशास्त्र आहे. ‘माझिया मना जरा थांब ना | पाउली तुझ्या माझिया खुणा | तुझे धावणे अन मला वेदना |’ असे म्हणणारा कवी खरे तर शंकराचार्यांचा आत्मा आणि मन याचा संवाद गीतरूपाने सांगतो.

सिंगापूरच्या रेडियोच्या FM 93.8 वरील “Slice of Life” चे ब्रीदवाक्य आहे “Change your perspective and you can change your life.” या कार्यक्रमात जीवन सरळ, सोपे आणि सुखावह कसे बनवावे याबाबत एकेक चांगला विचार सांगितला जातो. त्यात आपल्या शास्त्राने, संतांनी सांगितले त्यापेक्षा काही वेगळे सांगितले जात नाही. समर्थ सांगतात ‘हे तो विचाराची कामे | उगीच भ्रमो नये भ्रमे | जगदीश्वरे अनुक्रमे | सकळ केले ||’. आपण कसा विचार करतो यावर मनाचे स्वास्थ्य अवलंबून आहे. शास्त्र आणि संत यांनी जीव (मी) – जग – आणि जगदीश यांचा यथार्थ विचार आपल्या पुढे मांडला आहे. मी कोण, कोठून आलो, माझ्या जीवनाचा हेतू काय इत्यादी संपूर्ण विचार आणि तो कसा करावा हे पूर्णपणे आपल्याकरिता सांगितले आहे. ‘हे तो कळवळ्याची जाती | करिती लाभेवीण प्रीती’ असे हे संत. त्यांची कास धरणे हा एक उपाय आपल्या मनाचा फिटनेस सांभाळण्याकरिता उपलब्ध आहे.

हा सर्व विचार आपल्याच मनाने कसा करावा याचे २०५ श्लोकांचे ‘instruction manual‘ त्यांनी आपल्यासाठी उपलब्ध करून ठेवले आहे. एकेक श्लोक रोज मनन-चिंतनाकरिता निवडला तर पर्यायाने ‘संतांच्या संगतीत’ तो आनंदरूप, आनंदाचा कंद असा जगदीश्वर आणि मी वेगळा नाही हे कळेल. ‘संतांचे संगति | मनोमार्ग गति | आकळावा श्रीपती | येणे पंथे |’ असे ज्ञानेश्वर माऊली आपल्या हरिपाठात सांगतात. सर्व संतांचा उपदेश खरे तर शास्त्राला धरून आणि एकसारखाच आहे. कोणत्याही एका संतवाङ्मयाचा यथार्थ अभ्यास आपल्याला खूप समाधान देण्यास पुरेसा आहे. ‘संत दिसती वेगळाले | परि ते अंतरी मिळाले |’ हे समर्थवचन सार्थ आहे.

आपल्या मनाच्या फिटनेस करिता अनेक उपाय उपलब्ध असतील, रोज नवीन विचारपद्धती प्रसिद्ध होत आहेत, पण आपल्या शास्त्राने जी मूलभूत विचारसरणी आपल्यापुढे ठेवली आहे तिचा आपण उपयोग करून घेतला तर आपला त्यात खूप फायदा आहे. आपल्या संतांनी हे सर्व शास्त्र सोपे करून आपल्यापुढे मांडले आहे. त्या महान मानसशास्त्रांच्या संगतीत दिवसाचा थोडा वेळ घालवला तर आपल्याला घरबसल्या फुकट आपले स्वास्थ्य सांभाळता येईल. एकदा मनाचे स्वास्थ्य लाभले की शरीराचे आरोग्य खूप प्रमाणात सुधारेल.


-श्रीकांत जोशी













५ टिप्पण्या:

  1. मूळ विषय अवघड असला तरी मन, आत्मा, जीवात्मा..... बरेच सोपे करुन सांगितले आहे.
    एका ठिकाणी "शूद्र" ऐवजी "क्षूद्र" अशी चूक राहून गेली आहे. संपादकांनी कृपया दुरुस्ती करावी. धन्यवाद!

    उत्तर द्याहटवा
  2. Uttam vivechan ani vichar! Parat parat vachava asa ha uhapoh...Aaja chya sakala chi suruvaat uttam karun dilya baddal dhanyavaad.
    --- Anagha from Team MocktailMommies
    (Https://mocktailmommies.blogspot.com)

    उत्तर द्याहटवा